Tuesday, December 4, 2018

पुणे अष्टविनायक सायकलवर संवाद यात्रा 26/11/18: पाटस सिद्धटेक रांजणगाव 111 km

26/11/18: पाटस सिद्धटेक रांजणगाव 111 km 


सायकलवरून जनजागृती कशी शक्य आहे हा अनेकांचा प्रश्न ? मला याच प्रश्नास उत्तर म्हणून एक प्रतिप्रश्न विचारावा वाटतो, आजवर शासन पातळीवर टीव्ही, वर्तमानपत्र, रोड शो, रेड रिबन एक्सप्रेस च्या माध्यमातून इतकी जनजागृती झाली. तरी आजही नारळ पानी अथवा कोका कोला पिऊ नका त्यात एचआयव्ही रक्त मिश्रित आहे। परभणी येथे जीवनरेखा बालगृहात मुले होती तेंव्हा देखील असाच परिसरातील लोकांमध्ये गैरसमज होता की इथे हे बालगृह नकोय कारण तर डास चावल्यामुळे एचआयव्ही चा प्रसार होईल ....
म्हणजे आजही समाजात असे अनेक गैरसमज आहेत जे केवळ संवादातूनच दूर होणे शक्य आहे आणि त्यासाठी सायकलवारी जगात लय भारी
पाटस येथे जगताप सरांकडे रात्री छान झोप लागली होती। पहाटे लवकर आवरून जगताप वहिनींनी केलेला सुमधुर असा काळा चहा घेऊन त्यांचा निरोप घेऊन 06:30 ला निघालो। हायवेला थोडे पुढे गेल्यावर टोलनाका ओलांडून डावीकडे दौंड च्या दिशेने लागलो। या भागात उसाचे उत्पादन भरपूर आहे शिवाय साखर कारखाने बरेच असल्याने ठिकठिकाणी उसाने भरलेले ट्रक भेटत होते। पण इथून रस्ता बराच खराब होता। शिवाय कालच्या खराब रोड मुळे मागील चाकात थोडे आऊट आले होते। तरी तसेच पायडल मारत 07:30 ला भीमा रेल्वे उड्डाण पूल ओलांडून दौंड शहरात प्रवेश केला। दौंड हे पुणे नगर च्या सीमेवरील तालुका। दौंड हे फार मोठे रेल्वे जंक्शन असून इथून सोलापूर दक्षिण भारत तर मनमाड दिल्ली व पुणे बारामती असा रूट फुटतो। सिद्धटेक चा रोड विचारून निघालो तर वाटेत शाळकरी मुलांची लगबग दिसत होती बहुतेक 26 पासून दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होणार होत्या। स्टेशन, स्मशान भूमी ओलांडून सिद्धटेक रोड वर 10 किमी पुढे आलो असेल भूक लागली होती लगेच एक चहाची टपरी गाठून मस्त क्रीम बिस्कीट आणि चहा घेऊन निघालो। थोडं पुढे गेलो असेल तर ओ साहेब थांबा थांबा म्हनुन कोणी आवाज देत होते। थोडं थांबून पाहतो तर 50 वर्षाचा एक व्यक्ती जवळ येऊन मोरया म्हणत नमस्कार घातला। बोर्ड वाचून त्याला माझ्या सायकल मोहीम विषयी अंदाज येऊन म्हणाला मी 'राजेंद्र बुब' दौंड येथील रहिवासी आजवर शास्त्रोक्त पद्धतीने 12 वेळेस पायी अष्टविनायक यात्रा केलीय। मी लगेच त्यांना साष्टांग नामस्कारच घातला। आयला इथे एकदा निघालो तर सरकार आणि बांधकाम विभागाच्या नावाने खडे फोडायलो आणि हा व्यक्ती 12 वेळा यात्रा केलीय। त्यांनी सर्व रूट बद्दल मुखपाट असल्यासारखे माहिती दिली आणि आशीर्वाद देऊन काहीही अडचण असल्यास कॉल करा म्हणून निरोप घेऊन निघालो। पुढे देऊळगाव मार्गे सायकल चालवत खड्डे चुकवत भीमा नदीच्या पुलावर आलो मस्त फोटोसेशन करून सिद्धटेक तिसरा अष्टविनायक ला पोहोचलो। आज चतुर्थी असल्याने बरीच गर्दी होती। गर्दीतून मार्ग काढत प्रवेश द्वाराजवळ एका टपरीवाले काकांची परवानगी घेत सायकल पार्क केली। गर्दी होती तरी लगेच दर्शन झाले।
सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. . या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.
असा इतिहास जाणून घेऊन प्रसाद घेऊन बाहेर आलो तर पाहतो काय गावातील बरेच पोरं गियर ची सायकल व बोर्ड पाहून सायकलजवळ उत्सुकतेने जमली होती। त्यांना व उपस्थित गावकऱ्यांना मोहिमेची माहिती देत निरोप घेतला। भूक लागली होती आणि टपरीवर मस्त साबुदाणा वडे चा सुगंध दरवळत होता मग काय मस्त 3 वडे दाबून हणाले व चहाचा घोट घेत त्या काकांना रांजणगाव चा रस्ता विचारला। 3 रस्ते आहेत एक दौंड मार्गे 125 किमी, दुसरा शॉर्ट कट पण खराब रस्ता गावागावातून 110 किमी तर तिसरा श्रीगोंदा मार्गे 140 किमी।
मी देऊळगाव मार्गे निघालो। देऊळगाव ओलांडून वाटेत लोकांना वाट विचारत सायकल चालूवू लागलो। पुढे भीमा नदी ओलांडून खडखड रस्त्यावर पेडल मारत अजनुज गाव लागले। थोडा चढ चढून गावात पोहोचलो। रस्ता खराब असला तरी इकडचे गाव व शेतकरी मेहनती व सधन दिसत होते गावागावात दूध संकलन केंद्र, छान फार्म हाऊस दिसत होते। भीमा नदी काठ असल्याने शेत जमीन सुपीक दिसत होती। पुढे काष्टी गाव लागले। काष्टी येथील बाजारपेठ मोठी असल्याने बरीच वर्दळ होती। इथे मात्र अनेकांनी सायकल मोहीम विषयी प्रश्न विचारले त्यांना उत्तर देत घोड नदी ओलांडून न्हाव्वारे रोड ला लागलो। या भागात कांद्याचे भरगोस पीक घेतात। जागोजागी साठवणीघर दिसत होते। इनामगाव च्या पुढे आलो नसेल भूक लागली होती। । जवळ सिद्धटेक चा मोदक प्रसाद होता तो खाऊन पुढे निघालो पाणी संपले होते। पुढे शिरसासगव ला पाणी भरून घेऊन थोडं पुढे निघालो तर पुन्हा कॅरियर चा कट कट आवाज तसच सायकल चालवत पुढे निरवी ला एका ऑटोमोबाईल मेकॅनिक ने जुगाड करून नट बसवून दिले जे पुढे निघाले नाही। निरवी व निमोणा पर्यंतचा रस्ता खूप चढ उतार पठार असलेला शिवाय रस्ता खराब असल्याने उतारावर सांभाळून खड्डे चुकवत सायकल चालवत होतो। या रस्त्यावर अत्यंत तुरळक रहदारी होती। पुढे निरवी पोहोचलो।
इथून एक रस्ता न्हावरा तर दुसरा गुणात मार्गे निमोणे हुन रांजणगाव कडे। 2 वाजले होते पोटात कावळे ओरडत होते। गुणात ते निमोणे खराब रस्ता पार करून निमोणे पोहोचलो। 2 वाजता जिल्हा परिषद च्या शाळा सुटली होती। अनेक मुले सायकल कडे व गावकरी बोर्ड वाचून प्रश्न करत एकटेच का ? किती गणपती झाले ? पण एकाने देखील उद्धट प्रश्नकेला नाही कदाचित गावातील संस्काराचा भाग असेल की वाटसरुणा मदत करावी। मस्त राईस प्लेट आणि सोबत ताक मागवून जेवलो। भूक लागलेली असल्याने ताट चकाचक केले। उन्ह बरेच होते त्यात पाईपलाईन रस्ता पकडून करडे गावात पोहोचलो। इथून रांजणगाव औद्योगिक वसाहत सुरू होते पुढे कारेगाव हुन नगर हायवेला लागलो। 3:30 ला आरामात 115 किमी सायकलिंग करून रांजणगाव गणपती पोहोचलो।
इथे स्वागतास माझ्या आत्याच्या गावचे गावकरी व काकांचे (फुफाजी) मित्र रामा अभंग पत्नीसह उभे होते। ते मूळचे हातगाव ता शेवगाव जि अहमदनगर चे पण दुष्काळ मुळे गाव सोडून इथे रांजणगाव इथे एका कंपनीत स्थायिक झाले होते। इथे लांडे वस्ती मध्ये त्यांची एकच खोली पण त्या दाम्पत्याचे मन बंगल्याहून मोठे होते। सायकलवर प्रवास असल्याने रांजणगाव महागणपती देवस्थान समितीने लाईन मध्ये न लागता त्वरित दर्शन करू दिले।
रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.
दर्शन घेतल्यावर सायकलवरील बोर्ड पाहून अनेक पर्यटक भाविक कुतूहलाने विचारत होते तुमची संस्था का ? कशासाठी काम करते ? कितवा गणपती झाला ?
त्यांना उत्तरे देतांना मनात एकाच प्रश्न की सायकलचे मागील चाक आऊट झाल्याने सायकल जड जात होती। निरवी पासून रांजणगाव असा 33 किमी सपाट व उतार असून देखील अत्यंत त्रास झाला होता। गाव नुसते मोठे पण 2 तास शोधून एकही मेकॅनिक सापडला नाही। एक बोर्ड वर लिहिलं होतं की आऊट काढून मिळेल पण तो दुसऱ्या दिवशी 11 वाजता येणार होता त्यामुळे मग नाईलाजाने रामा च्या घरी मुक्कामी आलो। त्या दाम्पत्याने छान आदरातिथ्य केले। लांडे वस्ती चे मालक यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। पुढे आश्चर्य म्हणजे फेसबुक वरील पोस्ट पाहून माझा सोमनाथ श्रमसंस्कार छावणीतील मित्र किशोर अदक भेटायला आला तेंव्हा सर्व 2012 च्या आनंदवन सोमनाथ मधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या। मस्त जेऊन लवकरच 08:30 ला झोपी गेलो की उद्या पुढे नारायणगाव रस्त्यावर एक चांगला मेकॅनिक मिळेल या आशेने।









पुणे अष्टविनायक सायकलवर संवाद यात्रा: पहिला दिवस: पुणे -थेऊर - मोरगाव -पाटस 115 km

पहिला दिवस: पुणे -थेऊर - मोरगाव -पाटस २५ नोव्हेंबर २०१८ 
 
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एखादी मोठी सायकल मोहीम करावी अशी इच्छा होती। अर्ध नर्मदा परिक्रमा करावी असा विचार दिवाळी पर्यंत मनात होता। पण नंतर विचार केला की अर्ध परिक्रमा ऐवजी एका दमात पुढील वर्षी संपूर्ण नर्मदा परिक्रमा करू म्हणून मग छोट्या मोहीम कराव्यात असा विचार मनात होता। पुरी, भुवनेश्वर, विशाखापट्टणम असे 800-1000 किमी च्या टूर करूया असे विचार सुरू असतांना प्रत्यक्ष गुगल ने मोजले असता सायकल प्रवास व टूर पूर्ण केल्यावर परतीचा प्रवास असा 12 दिवसाची प्लॅनिंग होऊ लागली जी मला आज घडीला इतके दिवस क्लीनिक बंद ठेवणे शक्य नव्हते। शिवाय पक्षी मित्र संमेलन असल्याने माझा सायकलिंग पार्टनर डॉ संदीप साखरे याला देखील दोन्ही साठी सुट्या घेणे शक्य नसल्याने मग छोट्यात छोटा पण सुरवात व शेवट करणे सोयीचे जावे व अधिकाधिक लोकांशी संवाद साधता यावा म्हणून अष्टविनायक सायकल मोहीम आखली। पण नियोजन 21 नोव्हेंबर नंतर आई बाबा स्कॉटलँड हुन परत आल्यावरच शक्य असल्याने मला वेळेवर पार्टनर मिळणे कठीण असल्याने एकट्याने सायकल चालवायची ठरले. पण पेडल मारतांना सर्व मित्रांचे शुभेच्छा रुपी बळ आपल्या सोबत असेल या विचाराने 6 दिवसात पुणे अष्टविनायक पुणे अशी मोहीम आखून 24 तारखेला पनवेल एक्सप्रेसने पुणे जाण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली। मला शुभेच्छा देण्यासाठी माझे गुरू व सेवालय प्रकल्प संस्थापक प्रा रवी बापटले सर खास हसेगाव लातूरहून आले होते। त्यांच्या व आई बाबांच्या, पत्नी आशा, 2 मुली प्रचिती व शर्वरी व आजी यांच्या शुभेच्छा घेऊन पनवेल एक्सप्रेस ट्रेन मध्ये सायकल बुक करून ट्रेन ने निघालो। यावेळेस विदर्भ सायकल मोहीम नंतर एकटाच असल्याने थोडा नर्व्हसपणा जाणवत होता। पण मग लगेच स्वतःला सावरत, समजूत घालत की या मोहिमेत अनेक नवीन मित्र, सोमनाथ छावणीतील व त्या भागात राहणाऱ्या सम विचारी मित्र भेटतील या विचाराने जेऊन झोपी गेली। 5 वाजता जाग आली तर कळले की ट्रेन 1 तास उशिरा धावत आहे। तोवर ट्रेन मध्येच फ्रेश होऊन 07:30 वाजता पुणे पोहोचून सहजपणे पार्सल ऑफिसवरून सायकल सोडवून बाहेर आलो। तर स्वागताला सागर खरात, सोमनाथ छावणीतील सर्वांच्या मदतीला धावून येणारा दोस्त किशन टाकमोडे व छात्रभारती संघटनेच्या माध्यमातून यशस्वीपणे कँडल मार्च काढून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले असा लोकेश लाटे या त्रिमूर्तींनी माझे स्वागत केले। 
 
सोबत नाश्ता आणि सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत 2013 नंतर आज आम्ही भेटलो होतो तर जुन्या आठवणी आठवत इडली सांबर चा आस्वाद घेत गप्पा मारल्या। 
 
9:15 वाजले होते व पहिला गणपती थेऊर करायचा होता म्हणून विलंब न करता त्यांचा निरोप घेऊन थेऊर कडे निघालो। सोबत काही किमी मुंढवा फाट्या पर्यंत किशनने रस्ता दाखवून शुभेच्छा देऊन तो परत गेला। पुढे मुंढवा, मांजरी पर्यंत पुण्यातून च गेल्यासारखे गजबजलेले रस्ते होते। मांजरीला भेटायला सोमनाथ छावणी 2012 तील मित्र पवन इंदूरकर आला। वेळेची मर्यादा असल्याने थोड्या गप्पा मारून पुन्हा यायचे वचन देऊन त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो। सायकलिंग करत मुळा मुठा नदीवरील पूल ओलांडून नदी कोलवाडी मार्गे थेऊर येथे पोहोचलो। इथे देखील औद्योगिक वसाहती असल्याने रस्ता वर वर्दळ बरीच होती। पण कोलवाडी ते थेऊर रस्ता दरम्यान उसाचे मळे आणि त्यात पाणी सोडल्याने सायकल चालवताना सकाळी 10 वाजता देखील थंडी वाजत होती। वाटेत बच्चा कंपनी गियर ची सायकल म्हणून कौतुकाने टाळ्या वाजवत होती। थेऊर गावात पोहोचून तेथील चहा च्या टपरीजवळ सायकल पार्क केली। सायकलवरील बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता। अनेकांचे प्रश्न कुठून आले, कुठे व कशासाठी चालले व एकटेच का ? याची उत्तरे पुढील 6 दिवस आपल्याला द्यायची आहेत याची तयारी करूनच मी संवाद साधत होतो। रविवार असल्याने श्री चिंतामणी गणपती मंदिर जे अष्टविनायकपैकी एक असल्याने बरीच गर्दी होती। 45 मिनिट लाईन मध्ये लागल्यावर दर्शन झाले। त्या दरम्यान मंदिराचा इतिहास देखील वाचून झाला। 
 
ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे। श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. 
 
11 वाजले होते सायंकाळी मुक्कामाची सोय भिगवण चे सायकलमित्र संजय चौधरी यांनी दौंड ला केली होती। नीरा ड्रिंक पिऊन हळू हळू सोलापूर हायवेला लागलो पुढे कुंजीरवाडी नंतर उरळीकांचन येथील चौकात जेजुरी मोरगाव चा रस्ता विचारून जेजुरी रोड ला लागलो। इथून खरी परीक्षा होती कारण उरळीकांचन ते जेजुरी रस्ता अत्यंत खराब, खडतर होता। या भागात तुलनेने कमी पाऊस व डोंगराळ भाग यामुळे आसपास चा परिसर ओसाड जाणवत होता। शिंदवणे गाव ओलांडून एका टपरीवर चहा व लाडु घेतला। सगळ्यांचा एकच प्रश्न तुम्ही एकटेच का ? कंटाळा येत नाही का ? मी देखील हसत त्यांना एकच उत्तर अरे राव तुम्ही सगळे आहात ना सोबत मग कशाला बोर होणार आणि सोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद सो नो चिंता....ओन्ली सायकलिंग...  पुढे अडीच किमी चा घाट लागला तसा हा छोटा घाट पण कमी अंतरात तीव्र चढ व खराब रस्ता व सोबत 8 किलोचे सामानाचे वजन त्यामुळे 2 मिनिटाच्या ब्रेक घेऊन चढलो। वाटले इथून तरी बरा रस्ता लागेल पण नाही वाघापूर, बेलसार मार्गे थेट जेजुरी पर्यंत खडखड रस्ता। दुपारचे 2 वाजले होते। उशीर झाल्याने खंडोबा मंदिराचे कळस घेउन मोरगाव रोड कडे निघालो। वाटेत लस्सी पिऊन पेडल मारत होतो। वाटेत सायकलवरील बोर्ड पाहून लोक विचारत होते आणि आपली तीच उत्तरे... पावणे तीन वाजले होते सोबत भूक देखील लागली होती। वाटेत सुरेश झोपडेंची बिन भिंतीची कुडाची शाळा ला भेट दिली। सुरेश खोपडे यांचे नाव २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया ताई च्या विरुद्ध उभे होते म्हणून ऐकलेले होते शिवाय आयपीएस म्हणून त्यांची कारकीर्द परिचित होती. पुढे थोडे अंतर आल्यावर कटकट आवाज येत होता पाहिले तर खराब रोड मुळे सायकलच्या कॅरियर चा नट निघाल्याने ते घासत होते. ते एका सायकल मेकॅनिक ने दुरुस्त करून पैसे देखील घेतले नाही उलट शुभेच्छा दिल्या। पुढे उसाचा रस पिऊन दुसरे अष्टविनायक मोरगाव पोहोचलो। रविवार असल्याने मयुरेश्वर गणपती मंदिर मोरगाव येथे दर्शनास गर्दी होती म्हणून मुख दर्शन घेतले। 
 
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. 
 
मुख दर्शन घेऊन मस्त झुणका भाकर, ठेचा वर ताव मारला। 4 वाजले होते आणि प्राजक्ता मतिमंद विद्यालय सुप्पा ला भेट देऊन दौंड जायचे होते। 7 किमी पुढे आलो असेल तितक्यात मागील चाक पंचर होऊन बसले। मी देखील विलंब न करता पंचर काढले पण ट्यूब valve जवळ व्यवस्थित न बसल्याने बाहेर येत होते त्यामुळे थोडी हवा कमी करून सुप्पा गाठले। सुप्पा येथे प्राजक्ता मतिमंद विद्यालय येथे 25 विशेष मुलांचे शिक्षण व संगोपन केले जाते। अत्यंत मेहनतीने तेथील शिक्षक या विशेष मुलांचा सांभाळ व त्यांना घडवतात। प्रकल्पात बायोगॅस, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छ स्वयंपाकघर व खेळण्यासाठी मोठे मैदान आशा छान सुविधा असून लोकसहभागावर चालते। पुढे मुलांना त्यांचं नाव, गाव विचारून मुलांचा वैद्यकीय इतिहास व IQ तसेच कौटुंबिक इतिहास विचारून हा विषय समजून घेऊ लागलो। 5:30 वाजले होते उशीर होऊ नये म्हणून चहा घेऊन गावात सायकल रिपेरिंग साठी गेलो. तेथील लक्ष्मण सायकल मार्टचे कुलकर्णी यांनी पंचर जोडून ट्यूब बाहेर यायचा प्रॉब्लेम देखील दुरुस्त करून दिला आणि पैसे देखील घेतले नाही। गणपती बाप्पा मोरया म्हणून सर्वांचा निरोप घेऊन चौफुला कडे निघालो. 6 वाजताच अंधार पडल्याने लाईट लावला सुप्पा घाट सांभाळून उतरून हेवी ट्रॅफिक व मोठे मोठे ट्रक्स चे अप्पर लाईट मधून मार्ग काढत 15 किमी नंतर चौफुला पोहोचलो। उशीर झाल्याने दौंड पोहोचणे शक्य नव्हते म्हणून चौधरी सरांना फोनवर पाटस येथे मुक्कामाची विनंती करन सोलापूर हायवेवरून पाटस कडे निघालो। हायवेवर साईड ला काचा पडलेल्या असल्याने सांभाळत सायकल चालवत होतो. पाटस च्या 2 किमी अलीकडे चौधरी सरांचा फोन वाजला तुमच्या मुक्कामाची सोय झालीय। मेसेज चेक करा। पाटस चा पेट्रोल पंप ओलांडून पुला खाली आलो तर पाहतो काय चौधरी सरांचे मित्र नवनाथ शितोळे सर स्वागतास तयार। मला आश्चर्य वाटले की काही ओळख न पाळख पण केवळ चौधरी सरांचा फोन वरून या माऊली ने राहण्याची व्यवस्था प्रा जगताप सर तर जेवण्याची व्यवस्था स्वतःच्या घरी केली। नवनाथ शितोळे यांचे पाटस हुन 4 किमीवर फार्म हाऊस असून तेथे कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला इत्यादी सर्व काम संपूर्ण कुटुंब, त्यांचे भाऊ, आई बहीण मुले हे स्वतः करते हे पाहून भारावून गेलो। त्यांच्या कुटुंबाने आदराने जेऊ घातले सर्वांशी गप्पा मारून या माऊलीचा निरोप घेऊन जगताप सरांकडे आलो। जगताप सर जिल्हा परिषदच्या च्या शाळेत शिक्षक आहेत त्या कुटुंबाने खूप आदरातिथ्य केले। रात्री भेटण्यासाठी खास भिगवण सायकल क्लब चे सदस्य संजय चौधरी, डॉ जयप्रकाश खरड सर इतक्या लांबून आले। सर्वांशी सध्या एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्याविषयी संवाद साधून झोपी गेलो एका नव्या ऊर्जेने उठण्यासाठी।













Tuesday, July 17, 2018

दिवस तिसरा: पंढरपूर कुर्डुवाडी ६० किमी

दिवस तिसरा: पंढरपूर कुर्डुवाडी  ६० किमी

१५ जुलै ला सकाळी आरामात उठून सर्व मुलांशी मस्त गप्पा मारल्या. फ्रेश होऊन चहा घेऊन त्यांचा सर्वांचानिरोप घेतला पुढच्या वारीत लवकरच भेटण्याचा शब्द देऊन निघालो.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आमचा सायकलवारीला बोर्ड पाहून अनेक लोकांच्या प्रश्नाचे उत्तरे देत छान जनजागृती झाली। तिथे नाशिक, मंगळवेढा हुन आलेले अनेक सायकल वारकरी भेटले. सायकल वारकरी म्हणजे आमचं खास म्हणायचं त्यांच्याशी प्रवासा विषयी बोलत मुख दर्शनाच्या लाईन ला लागलो. तेथे परभणीतील अनेक वारकरी मित्र भेटले. पुढे भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेऊन निघावे म्हणतो तर तितक्यात डिंपल ताईंचा फोन मग नाश्ता ला जावे लागले.

पुढे भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेऊन निघावे म्हणतो तर तितक्यात डिंपल ताईंचा फोन मग नाश्ता ला जावे लागले.  डिंपल ताई आणि तिची वाहिनी दोघाणे प्रेमाने आदरातिथ्य केले. पालवीतील मुलांनी तयार केलेल्या रुमाल विकत घेऊन पुढच्या वर्षी निवांत येण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. आता पंढरपूर कुर्डुवाडी 60 किमी अंतर बाकी होते. चांद्रभागेवरील पूल ओलांडून शेतफळ च्या दिशेने पेडलिंग करत निघालो.  रस्ता खाली वर होता सोबत उन्हाचा त्रास आणि खूप खराब शिवाय ठिकठिकाणी सिमेंट रोड चे काम चालू असल्याने सायकल चालवताना मनगटाला मुंग्या येत होत्या. थोडी स्ट्रेचिंग करून पाणी पिऊन ग्लोव्हज घातले. आरामात पेडलिंग करत 32 किमी नंतर शेतफळ पोहोचलो. आता केवळ 22 किमी बाकी बॉटल मध्ये ओआरएस भरून घेतले. वाटेत काही पालखी आणि वारकरी भेटत होते.आमच्या सायकल वारी बद्दल विचारत होते. पुढील रस्ता खडबड व माळरान चा असल्याने चढ उतार होता. वाटेत पावसाने गाठले आम्ही देखील मस्त भिजत आरामत कुर्डुवाडी स्टेशन पोहोचलो. आम्ही अत्यंत आनंदी होती की केवळ 2 दिवस साडे तीन तासात ही 345 किमी सायकलवारी पूर्ण केली. पार्सल ऑफिस मध्ये सायकल बुक करायला गेलो तर रविवार सांगून नकार मग एलटीटी अर्थात लगेज ट्रॅव्हल तिकीट म्हणून घ्या विनंती केली तर हॉलिडे ट्रेन आहे म्हणून पुन्हा नकार. शेवटी विनवणी केल्यावर 5 वाजता या म्हणून हाकलून लावले. आम्ही कंटाळून जेवायला गेलो तर सहज इंदापूर चे कैलास कदम सरांना फोन लावला काही मदत मिळतील का ? म्हणून त्यांनी लगेच प्रतिसाद देत कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या आरिफ सरांनी संबंधित पार्सल ऑफिसर ला कळवले आणि लगेच आम्हाला सायकल बुकिंग च्या फॉर्मलिटी चा निरोप मिळाला. अखेर 5 वाजता सायकल बुक करून ट्रेन मध्ये चढलो. शेवट पांडुरंगाच्या आशीर्वादाने गोड झाला कोणत्याही कटू आठवणी किंवा अनुभव मनात न येता.  विशेषतः आकाश गीते ची मोलाची लागलेली साथ.

दिवस दुसरा: चौफुला भिगवण इंदापूर पंढरपूर १६५ किमी

दिवस दुसरा: चौफुला भिगवण इंदापूर पंढरपूर १६५ किमी

१४ जुलै ला सकाळी 5 वाजता उठून 05:50 ला निघालो. भिगवण येथील ग्रुप आम्हाला न्यायला खडकी येथे येणार होता. रस्ता चढ उतार रोलिंग होता. त्यामुळे वारंवार गियर बदलत सायकल चालवत होतो. पाटस नंतर मळद पासून रस्त्याच्या उजव्या बाजूच्या सर्व्हिस रोड ने 2 किमी आलो असेल तेथे भिगवण सायकलिंग क्लब आमच्या स्वागतास सज्ज होता. त्या सर्वांनी आमचे स्वागत केले. मागच्या वर्षीच्या पंढरपूर सायकल वारी दरम्यान सायकलिंग साठी मी केलेले आवाहन त्यांनी इतके मनावर घेतले की आज भिगवण येथे सायकलींग ग्रुप तयार होऊन ते रोज 25-30 किमी सायकलिंग करतात. त्यांच्या सोबत भिगवण येथे पोहोचून आम्ही 10 झाडे लावली. भिगवण सायकलिंग क्लब व नेचर क्लब भिगवण व रोटरी क्लब भिगवण च्या सदस्तासोबत मस्त मिसळ पाव चा आस्वाद घेत सर्वांशी सध्या एचआयव्ही बाधित बालकांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या कार्याबद्दल संवाद साधला. लगेच आम्हास इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ च्या कला महाविद्यालय येथे कार्यक्रम असल्याचे कळाले. प्रा प्रशांत चवरे जे तेथील प्राध्यापक व दै सकाळ चे बातमीदार त्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. या प्रसंगी डॉ. जयप्रकाश खरड, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, प्राचार्य भास्कर गटकुळ, प्रा. पद्ममाकर गाडेकर उपस्थित होते. मी विद्यार्थांना म्हणालो "आषाढी वारीच्या माध्यमातून संतानी समाजातील अनिष्ठ प्रथा, अंधश्रध्दाविषयी प्रबोधन केले. सध्या एचआयव्ही एडस् रोगामुळे व एचआयव्ही एड्स बाधितांना समाजाकडुन मिळणाऱ्या दुय्यम अथवा हीनदर्जाच्या वागणुक यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. या अत्यंत ज्वलंत विषयावर वारीच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे यासाठी आळंदी ते पंढरपुर सायकलवारीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहे. समाजाने एडसग्रस्तांना मानवतेची वागणुक द्यावी असे आवाहन करतो".  पुढे डॉ जयप्रकाश खरड यांच्या गच्चीवरील बागेला भेट दिली.  त्यांनी या बागेत सेंद्रीय भाजीपाला, विविध फुले, कमळ फुलवले आहेत. वेळेची मर्यादा असल्याने सर्वांचा निरोप घेऊन निघालो. भिगवण पळसदेव इंदापूर रस्ता चढ उताराचा होता आणि सोबत ऊन तापल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. पळसदेव ला ओआरएस तयार करून घोट घोट घेत एक एक चढ व्यवस्थित गियर बदलत पार केले. इंदापूर च्या वेशी जवळ कैलास कदम सरांचा फोन आला. ते सर्व वाट पाहत होते. कैलास कदम हे इंदापूर नगरपरिषद येथे नगरसेवक व काँग्रेस चे गटनेते शिवाय डॉ जयप्रकाश खरड यांना गुरुस्थानी मानतात. काँग्रेस भवन इंदापूर येथे त्यांनी  आम्हा  दोघांना खास फेटे बांधून स्वागत केले. या कार्यक्रमास इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा इंदापूर चे नगरसेवक, काँग्रेस चे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या मनोगतात मी सेवालय प्रकल्प येथे संस्थापक रवी बापटले सर यांचे सुरू असलेले कार्य व त्यां मुलांना एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, जनसामन्यांत एड्स विषयी जनजागृती साठी सायकल प्रवास, 18 वर्षा वरील विद्यार्थ्यांचा रोजगार चा प्रश्न व चांगले आरोग्य तंदुरुस्ती व प्रदूषण मुक्त पर्यावरण साठी कोणतीही बॅक अप व्हेहिकल न ठेवता सुरू असलेला सायकल प्रवास विषयी संवाद साधला. कार्यक्रम नंतर दै सकाळ चे पत्रकार सागर शिंदे यांनी माझी मुलाखत घेतली. पुढे फळांचा अल्पोपहार घेऊन अकलूज कडे निघालो. आता खरी परीक्षा होती अकलूज 30 किमी आणि वेळापूर 41 किमी। मुक्काम वेळापूर ला करू असे ठरवले होते. इंदापूर अकलूज वेळापूर दरम्यान  उलट्या वाऱ्याचा अर्थात हेड विंड चा त्रास सोबत उन्हाचा त्रास होत होता. आम्ही पहिला ब्रेक 12 किमीवर सुरवड येथे घेऊन थोडी केळी, ओआरएस पिऊन स्ट्रेचिंग करून निघालो. या रोडवर ठिकठिकानी वारी संदर्भात छान सुविचार लिहिले होते शिवाय दुतर्फा झाडे असल्याने हायवे पेक्षा बरे वाटत होते. वाटेत 1 मोठी पालखी लागली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चा जयघोष करत वारकर्यांना नमस्कार करत निघालो. पुढे बावडा गाव लागले तेथील काही लोकांनी बोर्ड पाहून विचारपूस केली आणि आम्ही देखील आवडीने उत्तरे दिली. उन्हामुळे त्रास होत होता परंतु जनजागृती कार्य महत्वाचे असल्याने चिडचिड न होता लोकांशी संवाद साधण्यात आनंद मिळत होता. पुढे नीरा नदीच्या पुलावर आलो तर पाहतोय काय मागील वर्षी पेक्षा पाणी कमी दिसत होते.  पुण्यात पाऊस भरपूर होता पण सोलापूर त्या मानाने कोरडा वाटला. पेडलिंग करत अकलूज पोहोचलो मस्त एक गुजराती गाड्यावर बदाम शेक पिले. बदाम शेक माझे आवडते पेय शिवाय हाय कॅलरी व एनर्जी देणारे ड्रिंक हवे होते सोबत तितकाच अर्धा तास आराम मिळाला. पुढे 11 किमी नंतर वेळापूर सहज गाठले. माझा श्रमसंस्कार छावणीतील मित्र ह.भ.प. स्वामीराज भिसे याच्या कुटुंबीयांनी आमचे स्वागत केले. त्याच्या संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी निगडित, ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत अनेक वर्षांपासून सेवा करणारे कुटुंब व त्याचे वडील पत्रकार सूर्यकांत भिसे यांचा पालखीत विशेष मान असतो.  दोन्ही भाऊ मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध कलावंत तर स्वामीराज हा पत्रकार असून दिंडीत स्वच्छता व प्रबोधनाचे कार्य शिवाय कीर्तन व आध्यत्मिक विषयावर व्याख्यान देखील देतो. त्याच्या घरी फ्रेश होऊन मस्त पोहे, चहा घेतला. सायंकाळचे 5 वाजले होते व  पंढरपूर पर्यंतचे केवळ 33 किमी अंतर बाकी असल्याने वेळापुर येथील मुक्काम टाळून सर्वांचा निरोप घेऊन आमची चाके चालली पंढरपूर च्या दिशेने. वाटेत एक पोरगा "ओ मामा गियर टाका ना" म्हणत वेगाने सायकल आमच्या पुढे नेऊन म्हणाला "बघा मी गियर च्या सायकलला मागे टाकले". आम्ही देखील त्या निरागस चिमुकल्याच्या यशास दाद देत त्यास शाबासकी दिली.  थोडा उतार चढ असल्याने आम्ही अत्यंत उत्साहाने पेडलिंग करत तोंडाळे मार्गे भांडीशेगाव येथे पोहोचलो. भंडीशेगाव येथील बाजार प्रसिद्ध आहे. थोडी स्ट्रेचिंग करून पाणी  पिऊन निघालो. आता केवळ 15 -20 किमी अंतर बाकी होते. आता आम्हाला 'भेटी लागी जीवा लागलीशी आस' प्रमाणे केंव्हा पंढरपूर पोहोचतो याची ओढ लागली होती. सायंकाळी 7 वाजता दिवसभरातील 162 किमी आणि मागील 2 दिवसातील 275 किमी सायकलिंग करून पंढरपूर च्या चौकात पोहोचलो. पुढे एक रस्ता मंदिर कडे तर दुसरा रस्ता 5 किमीवर आमचया विठ्ठलाकडे अर्थात पालवी एड्स मुलांचे पुनर्वसन केंद्र येथे जातो. जवळील सुपर शॉपिवरून मुलांसाठी 7 किलो पेंड खजूर घेतले तर तितक्यात जोरात पाऊस सुरू झाला. बाजुच्या हॉटेल वरून पिशवी मागून आम्ही पालवी कडे निघालो तर 5 किमी मध्ये पाऊस आणि उलटा वारा आम्हाला रोखू पाहत होता. पण आमचा दृढ निश्चय असल्याने आम्ही सायंकाळी 07:40 ला पालवी प्रकल्पला पोहोचलो.  तेथील विद्यार्थांनी आम्हाला ओवाळून औक्षण केले। त्यांचे स्वागत पाहून आमचा थकवाच लगेच निघून गेला. मंगल ताई शहा या पालवी प्रकल्प च्या संस्थापक व 115 एचआयव्ही बाधित अनाथ बालकांचा सांभाळ करतात. आता त्यांची मुलगी डिंपल गाडगे आणि राजकुमार गाडगे हे हा प्रकल्प तितक्याच समर्थपणे चालवत आहेत. आम्ही फ्रेश होऊन जेवायला बसलो तितक्यात मंगल ताई खास आमच्यासाठी दाल बाटी आणि चुरमा घेऊन आल्या.  मस्त दाल बाटी चुरमा आणि सोबत मेतकूट चा आस्वाद घेत पोटभर जेवलो. जेवणानंतर ताई सोबत या मुलांचे विविध प्रश्न विशेषतः 18 वर्ष पूर्ण झाल्यावर रोजगाराचा प्रश्न यावर चर्चा तसेच या मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून मंगल ताईंनी विविध पुस्तक, लेख त्याची कात्रणे, भित्तीपत्रके, विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने, पालकत्व आदी विषयावरील कार्याबद्दल सांगितले. खरच मंगल ताईंचे या मुलांसाठी नवनविन उपक्रम स्तुत्य आहेत. आम्ही मुलांसाठी आणलेला खाऊ अर्थात पेंड खजूर व काही आर्थिक मदत ताई कडे सुपूर्द करून खऱ्या अर्थाने वारीचा समारोप केला.  थकल्याने लगेच झोप लागली.

दिवस पहिला: पुणे आळंदी चौफुला ११४ किमी

दिवस पहिला: पुणे आळंदी चौफुला ११४ किमी 

13 जुलै ला सकाळी 06:15 वाजता पुणे स्टेशन पोहोचून पार्सल ऑफिस मधून सायकलची डिलिव्हरी घेऊन 06:45 ला पेडल मारत आळंदी च्या दिशेने निघालो। वाटेत रुबी हॉल क्लीनिक ला मस्त गरम चहा आणि क्रीम रोल खाऊन निघालो तर येरवडा पर्यंत आलो नसेल तितक्यात जोरदार पावसाने आम्हाला गाठले. लगेच आम्ही देखील रेनकोट घालून त्याचा सामना करायला सज्ज होतो. मग विश्रांतवाडी, दिघी गावा पर्यंत पोहोचलो तर आमचा  सायकलिस्ट दोस्त निरंजन वेलणकर सायकलवर आमचे स्वागत करायला आला. नमस्कार माऊली म्हणत त्याचे स्वागत स्वीकारत आणि सोबत रिपरिप पावसामुळे उडणारे चिखल आणि बाजूने जाणारे वाहनधारक यांचे फुकटचे सल्ले ऐकत आम्ही आळंदी कडे मार्गक्रमण करत होतो.  मग इंद्रायणी नदीवरील पूल ओलांडून ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराच्या महाद्वारापाशी पोहोचलो. आमच्या सायकलवरील 'एचआयव्ही बाधित अनाथ बालकांच्या हक्कासाठी जनजागृती' हा बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. सिग्नल वर थांबल्यावर असो की चौका चौकातून जाणारे लोक आम्हाला विचारत होते कुठून आले ? कुठे आणि कशासाठी चालले ? आणि सायकल वरच का ? मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि पुढे मार्गक्रमण करायचे.
सायकलला लॉक न लावता आम्ही तिघे अर्थात मी, आकाश आणि निरंजन ने दर्शन घेतले आणि माउलीला साकडे घातले की आमच्या या अनाथ, एचआयव्ही बाधित बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी बळ दे.
मग सोबत नाश्ता करून निरंजन त्यांच्या घरी पिंपरी कडे निघून गेला आणि आम्ही दोघे पुण्याकडे निघालो। 11:30 वाजता 'सकाळ' पेपरच्या हेड ऑफिसला माझी मुलाखत आणि 10:45 ला किसन टाकमोडे ने शनिवार वाडा येथे देणे समाजाचे अंतर्गत अभ्यासिकेच्या मुलांकडून जमा केलेल्या पैश्यातून मदत असा कार्यक्रम आयोजित केला होता. मग आम्ही देखील वेळेचे भान पाळत मस्त पावसात पेडलिंग करत विश्रांतवाडी, येरवाडा, संचेती हॉस्पिटल मार्गे शनिवार वाडा येथे पोहोचलो. किसन टाकमोडे आणि गणेश नरसाळे दोघेही सोमनाथ श्रमसंस्कार छावणीचे शिबिरार्थी मी देखील सोमनाथ चा 2012,13 चा शिबिरार्थी त्यामुळे आमचे एक जिव्हाळाचे नाते कारण दोघांचे प्रेरणास्थान बाबा आमटे आणि आनंदवन. त्या दोघांनी अभ्यासिकेच्या 50 विद्यार्थ्यांकडून 10/- प्रति व्यक्ती प्रमाणे 500/- रुपयाची मदत सेवालय प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी माझ्याकडे सुपूर्द केली. तितक्यात अमोल काकडे भेटायला आला.  'वैष्णव भेटीचा सोहळा' म्हणतो त्याप्रमाणे सोमनाथ कॅम्प मधील एकएक मित्र ज्यांची अनेक वर्षा नंतर भेट होत होती. अमोल काकडे एके काळी विद्यार्थी संघटना आणि चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता आणि सध्या तो दै. पुण्य नगरी  मध्ये पिंपरी चिंचवड येथे वार्ताहर आहे. त्याच्याशी चर्चा करत सकाळ हेड ऑफिस ला पोहोचलो. सकाळ च्या रिपोर्टर प्रियंका तुपे यांनी आमचे स्वागत केले. कॅन्टीन मध्ये चहा पित एचआयव्ही बाधित बालकांच्या मूलभूत प्रश्न व स्वयंरोजगार व सध्या सुरू केलेला सॅनिटरी पॅड चा प्रकल्प विषयी चर्चा केली। पुढे 12:30 वाजता सकाळ फेसबुक लाईव्ह च्या स्टुडियोवर पोहोचलो. लाईव्ह मुलाखत ची पहिलीच वेळ होती. कॅमेरा, रेडी कमांड नंतर प्रियांका च्या एकेक प्रश्नाला कोणतेही दडपण न ठेवता उत्तरे देत होतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या क्षेत्रात 10 वर्षांपासून मी स्वतः या क्षेत्रात कार्य करत असल्याने या मुलाखत विषयी कोणतीही पूर्व तयारी अथवा प्रश्नावली नसताना उत्तरे देत होतो.  आजवर ची सायकल वारी, त्यातील विविध अनुभव, वारी मागील उद्देश, त्याचा समाज व जनसमान्यांशी संवाद व प्रभाव, आजवरचे अंतर, 18 वर्ष पूर्ण झालेल्या एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगार व प्रशिक्षणाचा प्रश्न व त्यासाठी आजवर केलेले विविध प्रयत्न, सध्या चे एचआयव्ही चा प्रसार मधील घटलेले प्रमाण, आई कडून बाळाला होणार एचआयव्ही चा घटलेला संसर्ग याविषयी छान चर्चा झाली। शेवटी सकाळ टीमचे आभार मानून आम्ही निघालो। 1 वाजले होते व 2 वाजता खराडी येथे डॉ गौरी निरखे हिने विवेकानंद विवेक मंच च्या माध्यमातून माझ्या एड्स जनजागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन गेरा सोसायटी खराडी येथे केले होते.
पेडलिंग करत येरवाडा पर्यंत आलो होतो. पाऊस थांबला होता पण गर्मीमुळे घामाच्या धारा वाहू लागल्या. कंटाळून रेनकोट बॅग मध्ये भरले पुन्हा परत घालायची गरज पडू नये म्हणून. 2 वाजता गेरा सोसायटी येथे डॉ गौरी मंगेश पाटील यांच्या कडे आयोजित जनजागृती कार्यक्रमास पोहोचलो. गौरी तशी माझ्या बायकोची डिकेएमएम कॉलेज औरंगाबाद मधील ज्युनियर व मैत्रीण मूळची जालना व लग्नानंतर पुणे येथे रहायला आलेली. आम्ही दोघे फेसबुक वरील मित्र आणि फेसबुक वरील सायकल वारीची पोस्ट वाचल्यावर तिने केलेला हा सर्व प्रयत्न. सोसायटी मधील विविध भाषा, प्रांत, राज्यातील पण मुलं मुली अथवा सुनबाई यांच्या नोकरीमुळे स्थलांतर झालेली कुटुंबातील ज्येष्ठ आजी आजोबा या कार्यक्रमास उपस्थित होते. फ्लॅट च्या प्रवेश द्वारावरच गौरी ने एड्स जनजागृती चा संदेश देणारी सुंदर रांगोळी काढली होती. तेथील उपस्थित सर्वांना नमस्कार करून सर्वांशी ओळख करून मी आपल्या मनोगताला सुरवात केली.  जीवनरेखा बालगृहतील एचआयव्ही बाधित विद्यार्थांशी जुलै 2008 मधील पहिली भेट ते त्यांच्या पोषक आहार, आरोग्य समस्या, तेथील अस्वच्छता, रोगराई, वारंवार आजारी पडणे, बालमृत्यू, अंतिम संस्कार च्या वेळी नातेवाईकांचा उपस्थित राहण्यास नकार, विविध सण साजरे करून परिवर्तनाचा प्रयत्न, शाळेत प्रवेश, सेवालय प्रकल्प लातूर येथे स्थलांतर, हॅपी म्युझिक शो, आंब्याची लागवड व विक्री तसेच गणेश मूर्ती तयार करणे व विक्री उपक्रमातून स्वयंरोजगार व प्रशिक्षणचे धडे तसेच एचआयव्ही एड्स विषयी असलेले विविध समज गैरसमज आदी विषयावर अनुभव व एड्स जनजागृती साठी सायकलिंगच का ? व आजवर केलेला प्रवास इत्यादी  प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. उपस्थितांनी देखील खूप छान प्रतिसाद दिला. डॉ गौरीच्या आईने आदरातिथ्याने आम्हास जेऊ घातले. 4 वाजले होते त्यांचा निरोप घेऊन निघालो तर फ्लॅट च्या गेट जवळ माझा सोमनाथ शिबिरातील मित्र पवन इंदूरकर पत्ता शोधत मला भेटायला आला होता. त्याने प्रवासासाठी पेंड खजूर आणले होते ते आम्ही पालवी पंढरपूर येथील मुलांना दिले.
त्याला भेटून वेळेची मर्यादा असल्याने निरोप घेऊन पेडल मारत निघालो. हडपसर पर्यंत ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होती तरी त्यातून मार्ग काढत हडपसर येथील संत तुकाराम महाराज उड्डाण पूल ओलांडला. चौफुला 55 किमी बाकी होते आणि 04:30 वाजले होते. व्यवस्थित प्लॅन केले व उरली येथे एनरझल ओआरएस पाण्यात मिसळून घोट घोट पीत आम्ही सायकलिंग करत होतो. सायंकाळ ची वेळ असल्याने प्रचंड वाहतूक होती. दोघे एका मागे एक असे लयबद्ध सायकलिंग करत यवत गाठले.आता चौफुला केवळ 10 किमी होते जे आम्ही सहज पार करत दिवसभरातील ११४ किमी सायकलिंग करत चौफुला पोहोचलो. मुक्कामाची सोय अनिल गडवे यांनी स्वतःचे हॉटेल जगदंबा येथे केली होती.हॉटेल मध्ये आम्ही थांबत नसल्याचे कळवले परंतु ते लॉज बंद असून केवळ कौटुंबिक अथवा नातेवाईक व्यक्तींनाच देतात. त्यांनी एक पैसा न घेता आंमची रहाण्याची, जेवण्याची सोय केली. फ्रेश होऊन गावात थोडे फिरून लवकर झोपी गेलो.

पुणे आळंदी पंढरपूर एक ऊर्जा देणारी सायकलवारी - प्रस्तावना


वारी म्हणजे काय असते ? माझी आजी अनेक वर्षे पायी आळंदी ते पंढरपूर च्या दिंडीत जायची आता वयामुळे शक्य होत नाही. पण वारी म्हणजे केवळ दिंडीत पायी चालणे इतकेच माहीत होते. 2014 मध्ये पहिल्यांदाच मी सायकलवर वारी करूया असा विचार आला आणि ते पण परभणी ते पंढरपूर ! मग वाटले आपल्याला हरीपाठ वगैरे केवळ 'हरी मुखे म्हणा' इतकेच माहीत. पण आपला हरी ? आपला विठ्ठल ? म्हणचे समाजातील एचआयव्ही बाधित बालकांची सेवा व त्यांच्या मूलभूत प्रश्नावर सुरू असलेले कार्य हेच ना.
माझं खूप काही वाचन नव्हते परंतु डॉ नरेंद्र दाभोलकरांची काही व्याख्याने, गाडगेबाबा विषयी त्यांनी लिहिलेले लेख वाचून व युट्युब वर बघून होतो. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी त्यांच्या शिकवणीतून समाजप्रबोधनाचे कार्य केले यामुळे मला वारी ही समाजप्रबोधनासाठी अत्यंत प्रभावी माध्यम वाटली.
म्हणून मग मी विचार केला आणि त्याप्रमाणे सायकलवर परभणी ते पंढरपूर अशी वारी जून 2014, डिसेंबर 2014, जुलै 2016 मध्ये केली. तर मागील वर्षी पुणे आळंदी पंढरपूर सायकलवारी जून 2017 मध्ये केली.
मागच्या वर्षी पूणे आळंदी पंढरपूर वारीतून एचआयव्ही एड्स या विषयावर प्रबोधनात्मक उपक्रमास छान प्रतिसाद मिळाला म्हणून मग याही वर्षी पुणे आळंदी पंढरपूर कुर्डुवाडी असा सायकल प्रवास आखला. तशी ही सायकलवर केलेली पाचवी वारी.
यावर्षी मग प्लॅनिंग केली पुणे स्टेशन देहू आळंदी भिगवण पंढरपूर कुर्डुवाडी असे 13 जुलै ते 15 जुलै दरम्यान ३ दिवसात करूया. परंतु 13 जुलै रोजी पुण्यात सकाळी 11 ते 3 दरम्यान 3-4 जनजागृती पर कार्यक्रम असल्याने देहू ड्रॉप करावे लागले.
सुरवातीला मार्च मध्ये सेवालय प्रकल्पातील 2 विद्यार्थांना सायकली घेऊन दिल्या होत्या त्या प्रमाणे त्यांना सोबत घेऊन सायकलवारी करायची इच्छा होती. परंतु जून महिन्यात सुट्या मध्ये त्यांचा सरावात खंड पडल्याने, शिवाय रोजचे अंतर 120-130 किमी व पावसाचे दिवस व अत्यंत हेवी ट्रॅफिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने नाईलाजाने त्यांना नम्रपणे नकार दिला.
मी आणि आकाश गीते असा प्लॅन करून पनवेल एक्सप्रेस ट्रेन ने पुणे जायचे आणि सायकली रेल्वे पार्सल व्हॅन मध्ये असा प्लॅन केला. अपेक्षेप्रमाणे परभणी पार्सल ऑफिस चे सहकार्य देखील मिळाले.