Tuesday, December 4, 2018

पुणे अष्टविनायक सायकलवर संवाद यात्रा: पहिला दिवस: पुणे -थेऊर - मोरगाव -पाटस 115 km

पहिला दिवस: पुणे -थेऊर - मोरगाव -पाटस २५ नोव्हेंबर २०१८ 
 
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एखादी मोठी सायकल मोहीम करावी अशी इच्छा होती। अर्ध नर्मदा परिक्रमा करावी असा विचार दिवाळी पर्यंत मनात होता। पण नंतर विचार केला की अर्ध परिक्रमा ऐवजी एका दमात पुढील वर्षी संपूर्ण नर्मदा परिक्रमा करू म्हणून मग छोट्या मोहीम कराव्यात असा विचार मनात होता। पुरी, भुवनेश्वर, विशाखापट्टणम असे 800-1000 किमी च्या टूर करूया असे विचार सुरू असतांना प्रत्यक्ष गुगल ने मोजले असता सायकल प्रवास व टूर पूर्ण केल्यावर परतीचा प्रवास असा 12 दिवसाची प्लॅनिंग होऊ लागली जी मला आज घडीला इतके दिवस क्लीनिक बंद ठेवणे शक्य नव्हते। शिवाय पक्षी मित्र संमेलन असल्याने माझा सायकलिंग पार्टनर डॉ संदीप साखरे याला देखील दोन्ही साठी सुट्या घेणे शक्य नसल्याने मग छोट्यात छोटा पण सुरवात व शेवट करणे सोयीचे जावे व अधिकाधिक लोकांशी संवाद साधता यावा म्हणून अष्टविनायक सायकल मोहीम आखली। पण नियोजन 21 नोव्हेंबर नंतर आई बाबा स्कॉटलँड हुन परत आल्यावरच शक्य असल्याने मला वेळेवर पार्टनर मिळणे कठीण असल्याने एकट्याने सायकल चालवायची ठरले. पण पेडल मारतांना सर्व मित्रांचे शुभेच्छा रुपी बळ आपल्या सोबत असेल या विचाराने 6 दिवसात पुणे अष्टविनायक पुणे अशी मोहीम आखून 24 तारखेला पनवेल एक्सप्रेसने पुणे जाण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली। मला शुभेच्छा देण्यासाठी माझे गुरू व सेवालय प्रकल्प संस्थापक प्रा रवी बापटले सर खास हसेगाव लातूरहून आले होते। त्यांच्या व आई बाबांच्या, पत्नी आशा, 2 मुली प्रचिती व शर्वरी व आजी यांच्या शुभेच्छा घेऊन पनवेल एक्सप्रेस ट्रेन मध्ये सायकल बुक करून ट्रेन ने निघालो। यावेळेस विदर्भ सायकल मोहीम नंतर एकटाच असल्याने थोडा नर्व्हसपणा जाणवत होता। पण मग लगेच स्वतःला सावरत, समजूत घालत की या मोहिमेत अनेक नवीन मित्र, सोमनाथ छावणीतील व त्या भागात राहणाऱ्या सम विचारी मित्र भेटतील या विचाराने जेऊन झोपी गेली। 5 वाजता जाग आली तर कळले की ट्रेन 1 तास उशिरा धावत आहे। तोवर ट्रेन मध्येच फ्रेश होऊन 07:30 वाजता पुणे पोहोचून सहजपणे पार्सल ऑफिसवरून सायकल सोडवून बाहेर आलो। तर स्वागताला सागर खरात, सोमनाथ छावणीतील सर्वांच्या मदतीला धावून येणारा दोस्त किशन टाकमोडे व छात्रभारती संघटनेच्या माध्यमातून यशस्वीपणे कँडल मार्च काढून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले असा लोकेश लाटे या त्रिमूर्तींनी माझे स्वागत केले। 
 
सोबत नाश्ता आणि सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत 2013 नंतर आज आम्ही भेटलो होतो तर जुन्या आठवणी आठवत इडली सांबर चा आस्वाद घेत गप्पा मारल्या। 
 
9:15 वाजले होते व पहिला गणपती थेऊर करायचा होता म्हणून विलंब न करता त्यांचा निरोप घेऊन थेऊर कडे निघालो। सोबत काही किमी मुंढवा फाट्या पर्यंत किशनने रस्ता दाखवून शुभेच्छा देऊन तो परत गेला। पुढे मुंढवा, मांजरी पर्यंत पुण्यातून च गेल्यासारखे गजबजलेले रस्ते होते। मांजरीला भेटायला सोमनाथ छावणी 2012 तील मित्र पवन इंदूरकर आला। वेळेची मर्यादा असल्याने थोड्या गप्पा मारून पुन्हा यायचे वचन देऊन त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो। सायकलिंग करत मुळा मुठा नदीवरील पूल ओलांडून नदी कोलवाडी मार्गे थेऊर येथे पोहोचलो। इथे देखील औद्योगिक वसाहती असल्याने रस्ता वर वर्दळ बरीच होती। पण कोलवाडी ते थेऊर रस्ता दरम्यान उसाचे मळे आणि त्यात पाणी सोडल्याने सायकल चालवताना सकाळी 10 वाजता देखील थंडी वाजत होती। वाटेत बच्चा कंपनी गियर ची सायकल म्हणून कौतुकाने टाळ्या वाजवत होती। थेऊर गावात पोहोचून तेथील चहा च्या टपरीजवळ सायकल पार्क केली। सायकलवरील बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता। अनेकांचे प्रश्न कुठून आले, कुठे व कशासाठी चालले व एकटेच का ? याची उत्तरे पुढील 6 दिवस आपल्याला द्यायची आहेत याची तयारी करूनच मी संवाद साधत होतो। रविवार असल्याने श्री चिंतामणी गणपती मंदिर जे अष्टविनायकपैकी एक असल्याने बरीच गर्दी होती। 45 मिनिट लाईन मध्ये लागल्यावर दर्शन झाले। त्या दरम्यान मंदिराचा इतिहास देखील वाचून झाला। 
 
ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे। श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. 
 
11 वाजले होते सायंकाळी मुक्कामाची सोय भिगवण चे सायकलमित्र संजय चौधरी यांनी दौंड ला केली होती। नीरा ड्रिंक पिऊन हळू हळू सोलापूर हायवेला लागलो पुढे कुंजीरवाडी नंतर उरळीकांचन येथील चौकात जेजुरी मोरगाव चा रस्ता विचारून जेजुरी रोड ला लागलो। इथून खरी परीक्षा होती कारण उरळीकांचन ते जेजुरी रस्ता अत्यंत खराब, खडतर होता। या भागात तुलनेने कमी पाऊस व डोंगराळ भाग यामुळे आसपास चा परिसर ओसाड जाणवत होता। शिंदवणे गाव ओलांडून एका टपरीवर चहा व लाडु घेतला। सगळ्यांचा एकच प्रश्न तुम्ही एकटेच का ? कंटाळा येत नाही का ? मी देखील हसत त्यांना एकच उत्तर अरे राव तुम्ही सगळे आहात ना सोबत मग कशाला बोर होणार आणि सोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद सो नो चिंता....ओन्ली सायकलिंग...  पुढे अडीच किमी चा घाट लागला तसा हा छोटा घाट पण कमी अंतरात तीव्र चढ व खराब रस्ता व सोबत 8 किलोचे सामानाचे वजन त्यामुळे 2 मिनिटाच्या ब्रेक घेऊन चढलो। वाटले इथून तरी बरा रस्ता लागेल पण नाही वाघापूर, बेलसार मार्गे थेट जेजुरी पर्यंत खडखड रस्ता। दुपारचे 2 वाजले होते। उशीर झाल्याने खंडोबा मंदिराचे कळस घेउन मोरगाव रोड कडे निघालो। वाटेत लस्सी पिऊन पेडल मारत होतो। वाटेत सायकलवरील बोर्ड पाहून लोक विचारत होते आणि आपली तीच उत्तरे... पावणे तीन वाजले होते सोबत भूक देखील लागली होती। वाटेत सुरेश झोपडेंची बिन भिंतीची कुडाची शाळा ला भेट दिली। सुरेश खोपडे यांचे नाव २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया ताई च्या विरुद्ध उभे होते म्हणून ऐकलेले होते शिवाय आयपीएस म्हणून त्यांची कारकीर्द परिचित होती. पुढे थोडे अंतर आल्यावर कटकट आवाज येत होता पाहिले तर खराब रोड मुळे सायकलच्या कॅरियर चा नट निघाल्याने ते घासत होते. ते एका सायकल मेकॅनिक ने दुरुस्त करून पैसे देखील घेतले नाही उलट शुभेच्छा दिल्या। पुढे उसाचा रस पिऊन दुसरे अष्टविनायक मोरगाव पोहोचलो। रविवार असल्याने मयुरेश्वर गणपती मंदिर मोरगाव येथे दर्शनास गर्दी होती म्हणून मुख दर्शन घेतले। 
 
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. 
 
मुख दर्शन घेऊन मस्त झुणका भाकर, ठेचा वर ताव मारला। 4 वाजले होते आणि प्राजक्ता मतिमंद विद्यालय सुप्पा ला भेट देऊन दौंड जायचे होते। 7 किमी पुढे आलो असेल तितक्यात मागील चाक पंचर होऊन बसले। मी देखील विलंब न करता पंचर काढले पण ट्यूब valve जवळ व्यवस्थित न बसल्याने बाहेर येत होते त्यामुळे थोडी हवा कमी करून सुप्पा गाठले। सुप्पा येथे प्राजक्ता मतिमंद विद्यालय येथे 25 विशेष मुलांचे शिक्षण व संगोपन केले जाते। अत्यंत मेहनतीने तेथील शिक्षक या विशेष मुलांचा सांभाळ व त्यांना घडवतात। प्रकल्पात बायोगॅस, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छ स्वयंपाकघर व खेळण्यासाठी मोठे मैदान आशा छान सुविधा असून लोकसहभागावर चालते। पुढे मुलांना त्यांचं नाव, गाव विचारून मुलांचा वैद्यकीय इतिहास व IQ तसेच कौटुंबिक इतिहास विचारून हा विषय समजून घेऊ लागलो। 5:30 वाजले होते उशीर होऊ नये म्हणून चहा घेऊन गावात सायकल रिपेरिंग साठी गेलो. तेथील लक्ष्मण सायकल मार्टचे कुलकर्णी यांनी पंचर जोडून ट्यूब बाहेर यायचा प्रॉब्लेम देखील दुरुस्त करून दिला आणि पैसे देखील घेतले नाही। गणपती बाप्पा मोरया म्हणून सर्वांचा निरोप घेऊन चौफुला कडे निघालो. 6 वाजताच अंधार पडल्याने लाईट लावला सुप्पा घाट सांभाळून उतरून हेवी ट्रॅफिक व मोठे मोठे ट्रक्स चे अप्पर लाईट मधून मार्ग काढत 15 किमी नंतर चौफुला पोहोचलो। उशीर झाल्याने दौंड पोहोचणे शक्य नव्हते म्हणून चौधरी सरांना फोनवर पाटस येथे मुक्कामाची विनंती करन सोलापूर हायवेवरून पाटस कडे निघालो। हायवेवर साईड ला काचा पडलेल्या असल्याने सांभाळत सायकल चालवत होतो. पाटस च्या 2 किमी अलीकडे चौधरी सरांचा फोन वाजला तुमच्या मुक्कामाची सोय झालीय। मेसेज चेक करा। पाटस चा पेट्रोल पंप ओलांडून पुला खाली आलो तर पाहतो काय चौधरी सरांचे मित्र नवनाथ शितोळे सर स्वागतास तयार। मला आश्चर्य वाटले की काही ओळख न पाळख पण केवळ चौधरी सरांचा फोन वरून या माऊली ने राहण्याची व्यवस्था प्रा जगताप सर तर जेवण्याची व्यवस्था स्वतःच्या घरी केली। नवनाथ शितोळे यांचे पाटस हुन 4 किमीवर फार्म हाऊस असून तेथे कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला इत्यादी सर्व काम संपूर्ण कुटुंब, त्यांचे भाऊ, आई बहीण मुले हे स्वतः करते हे पाहून भारावून गेलो। त्यांच्या कुटुंबाने आदराने जेऊ घातले सर्वांशी गप्पा मारून या माऊलीचा निरोप घेऊन जगताप सरांकडे आलो। जगताप सर जिल्हा परिषदच्या च्या शाळेत शिक्षक आहेत त्या कुटुंबाने खूप आदरातिथ्य केले। रात्री भेटण्यासाठी खास भिगवण सायकल क्लब चे सदस्य संजय चौधरी, डॉ जयप्रकाश खरड सर इतक्या लांबून आले। सर्वांशी सध्या एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्याविषयी संवाद साधून झोपी गेलो एका नव्या ऊर्जेने उठण्यासाठी।













No comments: