Sunday, April 24, 2022

Scotland Cycling : लिनलिथगो ते फालकर्क व्हील 50 किमी कॅनॉल मार्गे ऑफ रोड सायकलिंग

 

Day 1: 28th March 2019: लिनलिथगो ते फालकर्क  व्हील 50 किमी कॅनॉल मार्गे ऑफ रोड सायकलिंग 50 km

 

काल रात्री 13 तास विमानप्रवास करून ग्लासगो पोहीचलो. विमानात १३ तास सतत बैठक मुळे थकल्याने लवकर झोपी गेलो. रात्रीची कडाक्याची थंडीत अथात 'c  मध्ये रजईच्या ऊब मुळे छान झोप लागली. पहाटे 04:45 लाच उठून आवरून, वॉर्म अप, ध्यान करून पंकजच्या हाताचा अमृततुल्य चहा घेऊन सायकल बाहेर काढली. मला रूट माहीत नसल्याने पंकज ने कॅनॉलरूट पर्यंत सोडलं आणि सकाळच्या 5'C तापमानात जॅकेट घालून निघाली आमची सायकल स्वारी स्कॉटलंड च्या निसर्गरम्य परिसराव.  एका बाजूला हिल तर दुसऱ्या बाजूला कॅनॉलचे पाणी आणि झोंबणारा वारा चा आनंद घेत सायकलिंग सुरू होती. वाटेत मॉर्निंग वॉक, रनर्स आणि हौशी सायकलिस्ट ला राम राम घालत मार्गक्रमण करत होतो. या कॅनॉल रूट वर सायकलिंग करतांना वाटेत पुलाखालील बोगदा आणि केवळ दीड फूट रोडवरून काळजीपूर्वक सायकल चालवावी लागते आणि समोरून येणाऱ्या सायकलिस्ट, रनर्स ला वाट मोकळी करून देत सायकल चालवत होतो.  युनियन कॅनॉल हे फोलकर्क व्हील ते एडींब्रा असा 1842 मध्ये बांधलेला आणि याच मार्गातून पर्यटन साठी जलवाहतूक सुरू असते. एका बाजूला स्कॉट रेल्वे लाईन आणि दुसऱ्या बाजूला जंगल आणि कॅनॉलच्या बाजूला काटेरी झुडपे असलेले वनस्पती, कॅनॉल मधून पोहण्याचा आनंद घेणारे पक्षी असे सूंदर दृश्याचा आनंद घेत होतो. वाटेत डेव्हीस, कॅरोलिन सारखे हौशी सायकलिस्ट सोबत गप्पा मारत इथल्या सायकलिंग विषयी जाणून घेतले. पुढे २५ किमी नंतर फोलकर्क व्हील ला पोहोचलो. फॉलकर्क व्हील येथे कॅनॉल चे अडवलेलं पाणी आणि तिथे चालू असलेले साहसी राईड, बोटिंग आदींचा डोळ्यानेच आनंद घेतला. इकडे पोटात कावळे ओरडत होते मग गावात एका सायकलिस्ट ला मार्ग विचारत फॉलकर्क गावात शोधत 'ग्रेग' - चेन ऑफ टेक अवे वर 2 पाउंड ला पोटभर नाश्ता मारून परत निघालो ते पण जंगलातून पाऊलवाटेने. 1 किमी लांबीचे टनेल मधून मार्ग काढत कॅनॉल रूटने परत निघालो. बऱ्याच दिवसाच्या स्नो फॉल आणि प्रतिकूल वातावरण नंतर येथील हवामान हळू हळू सायकलिंग, भटक्या लोकांसाठी अनुकूल झाले होते. आजचे वातावरण पाहून जेव्हाही मी युके मध्ये राहणाऱ्या भारतीय  मित्रानो कॉल करायचो तर ते मला म्हणायचे "तू भारतातून छान वातावरण घेऊन आलास. कारण 2 दिवसांपूर्वी इथे पाऊस आणि बर्फ वृष्टी होत होती ". सकाळच्या कोवळ्या उन्हात सायकलिंग साठी पोषक वातावरणात आनंद घेत वेस्ट लोथीयन बोट क्लब ओलांडून चुकून लिनलिथगो मध्ये अलिकडून प्रवेश केला आणि रस्ता चुकलो. इथे सर्वच घर सारखे आणि मोबाईल स्विच ऑफ झाला. काल ग्लासगो एअरपोर्ट वर इमिग्रेशन ऑफिसर विचारतील म्हणून पत्ता पाठ केल्याने रस्ता विचारला पण 2-4 वाटेत भेटलेले लोक लिनलिथगो चे नसून एडिनब्राचे होते. त्यामुळे त्यांना देखील पत्ता लक्षात आला नव्हता आणि सुदैवाने एक ज्येष्ठ नागरिकांशी बोलताना एक जोडपे आले आणि ते म्हणाले चला आम्ही तिकडेच निघालो पण पायी चालण्यास तुमची हरकत नसेल तर ! त्यांच्याशी गप्पा मारतांना ते म्हणाले मी सायकलिस्ट आणि माझा नवरा मोटर बाईकर आणि एकदा मी मुंबईत अशीच एकदा रस्ता विसरले आणि एका भारतीयाने मला मार्ग दाखवला आणि 20 मिनिटांच्या पायी प्रवासात स्कॉटलंड क्रिकेट, येथील प्रसिद्ध फुटबॉल आणि रग्बी, डेन्मार्क मधील सायकलिंग, केरळ मधील निसर्ग सौंदर्य आणि येथील प्रसिद्ध भारतीय हॉटेलमधील मसाला डोसा आदींविषयी बोलत होतो. पुढे तिने स्वयंपाकातील कोणकोणते खाद्यपदार्थ तुम्हाला येतात हे विचारल्यावर मी मात्र गप्प झालो कारण मला चहा कॉफी शिवाय काहीच येत नाही. गप्पांच्या ओघात घर कधी आले ते कळले नाही. पण बरे झाले रस्ता विसरलो कारण ही सायकल रेस नसून संवाद यात्रा आहे. कदाचित माझी इंग्रजी मोडकी तुटकी असेल पण माणसांशी संवाद साधायला भाषेचा अडसर येत नाही. त्यामुळेच तर 3 तास 40 मिनीटात 3 सायकलिस्ट, 4 रनर, 1 हॉटेलवाला आणि रस्ता दाखवणारे 50 वर्षीय जोडपे या सर्वांशी भेटून त्यांच्याशी झालेल्या संवादातून भरपूर काही शिकायला मिळाले.

पहिला दिवस exciting गेला आणखी लवकरच लिहीन या लिनलिथगो शहर बद्दल कारण रस्ता चुकल्यामुळे आता पायी भटकणार आहे या ऐतिहासिक शहराविषयी जाणून घेईल.

No comments: