सायकल संवाद यात्रा - प्रस्तावना
शनिवारी 4 देशांच्या संवाद यात्रेहून परतलो। आलो तेंव्हापासून आप्त, मित्र यांच्या सहवासात भेटी गाठी, शिवाय जेट लॅग अर्थात साडे तीन तास चा फरक आणि क्लिनिक मधील व्यस्त वेळापत्रक आणि सोमवारी क्लिनिक हुन सायकलवर घरी जातांना एका मोटारसायकल ने धडक दिल्यामुळे गुडघ्या ला मुक्का मार लागला त्यामुळे थोडं ठणकतय। पण आता मतदान, कौटुंबिक विवाह सोहळा आणि मतदानोत्तर गप्पा बास झाल्या आता लिहिण्यास सुरवात करायची......पण कुठून
चला सर्वप्रथम थोडं मागे जाऊया.....27 मार्च .....26 मार्च .......नाही नाही.......जानेवारी 2019
जानेवारी 2019 मध्ये दिवाळीनंतर जर्मनी येथे होमिओपॅथीचे जनक डॉ सॅम्युएल हानीमन यांच्या जन्मगावी हॅनीमन हाऊस येथे आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषद साठी जे अबस्ट्रॅक्ट पाठवले होते त्याचा रिप्लाय की तुमचं पेपर/शोधनिबंधची निवड झालीय। जीवनात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिग्गज हस्तीसमोर पेपर सादर करणार! 2 दिवस 9,10 एप्रिल कॉन्फरन्स असणार पण केवळ तितक्यासाठी जाणे येणे परवडेल ?
मग विचार केला सरळ नाही म्हणावं म्हणून माझे केरळचे गुरू डॉ सुदिनकुमार सरांना अडचण सांगितली त्यांनी पुन्हा ही संधी मिळणार नाही आणि आशा संधीचं सोने केलेच पाहिजे.
लहान भाऊ पंकज मागील 9 वर्षा पासून लिनलिथगो स्कॉटलँड युके येथे राहतो तो देखील अनेक वर्षांपासून बोलवतोय पण आजवर भारताबाहेर कुठे गेलो नव्हतो त्यामुळे जाणे झालेच नाही। अनेक शाळेतील वर्गमित्र त्यांचे नातेवाईक युके, जर्मनीत राहतात मग विचार केला कुछ हटके बजेटमध्ये मल्टीटास्क टूर प्लॅन करूया।
पंकज कडे काही दिवस राहावे किंवा रात्री त्याच्या कडे मुक्काम करून ट्रेन व सायकलने स्कॉटलँड मधील 500 किमी भाग आणि हायलँड, एडींब्रा, ग्लासगो, फोर्ट विलियम, बेन नेव्हीस सारखी निसर्गरम्य व ऐतिहासिक स्थळे हिंडून तेथील लोकांशी सायकल, पर्यावरण, संस्कृती, एकात्मता आदी विषयी जमेल तसे संवाद साधायचा. होईल तितकं रस्ता आणि स्थळ शोधण्यासाठी गुगल ऐवजी स्थानिकांशी संवाद साधून त्यांची मदत घ्यायची. त्यानिमित्ताने संवाद तर घडेल.
मग सुरू प्लॅनिंग 8-9 दिवस पंकज कडे 2-4 दिवस राहून बाकी ठिकाणी ट्रेन ने डेस्टिनेशन पोहोचून सायकलवर हिंडणे, 2 दिवस संपूर्ण लंडन सिटी सेंटर आणि ऐतिहासिक वास्तू, स्थळ पायी हिंडणे, फेसबुकवरील मित्र जयदेव ची मदत घेऊन बर्लिन, टोर्गू सायकलिंग आणि पॅरिस पायी किंवा सायकलवर हिंडणे या प्रमाणे 15-16 दिवसांचा प्लॅन अत्यंत कमी बजेट मध्ये तयार.
पथ्य: टॅक्सी, लक्सरियस हॉटेल्स, महागडे फूड टाळणे त्याऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे ट्रेन, बसचा वापर, जागोजागी मित्रांची सायकल आणि व्यवस्था नाहीच झाली तर किरायाची सायकल वापरणे.
शुद्ध शाकाहारी असल्याने थोडं अवघड होतं पण फळे मुबलक प्रमाणात आणि स्वस्त मिळतात त्यामुळे तितका त्रास होणार नाही.
पंकज कडे 2-3 दिवस आरामात घालवता यावे म्हणून राखीव ठेऊन प्लॅन तयार केला.
खूप काही खरेदी नाही परंतु सायकलिंग संबंधित शॉपिंग करून इतर कॉन्फरन्स आणि कपडे अशी तयारी करून 26 ला हैदराबाद साठी निघायचं ठरलं।
तत्पूर्वी लंडन, स्कॉटलँड, बर्लिन मधील मित्रांना पूर्वकल्पना दिली.
वडील हैदराबाद विमानतळ येथे निरोप द्यायला आले होते त्यांचे आशीर्वाद घेऊन सुरक्षा तपासणी वगैरे आटोपुन हैदराबाद दुबई पोहोचलो। दुबई विमानतळ येथे 45 मिनिट उशिरा पोहोचून देखील व्यवस्थित बोर्ड वाचून कनेक्शन फ्लाईट पाहत ट्रेन ने टर्मिनल ओलांडून सुरक्षा तपासणी, इमिग्रेशन आटोपून ग्लासगो विमानात बसलो। 2 चित्रपट मग थोडा शेजारची स्कॉटिश आजी सोबत गप्पा आणि कसा बसा टाईमपास करत अखेर रात्री 8 वाजता ग्लासगो विमानतळ पोहोचलो। पासपोर्ट, व्हीजा, रिटर्न तिकीट तपासून अत्यंत सहजपणे 5 मिनिटात इमिग्रेशन आटोपून बाहेर आलो तर पंकज ने आलिंगन तर पुतण्या सफल ने नमस्कार करून आशिर्वाद घेतला। आता इथून 9 दिवस स्कॉटलँड आणि पंकज कडे 2-4 दिवस मुक्काम, साईट सीइंग, पर्यटन, सायकलिंग, रनिंग आणि बरंच काही.....विशेष म्हणजे पंकज ने स्वतःच्या मेहनातीतून घेतलेले युके मधील घरी गेल्यावर शीतल सुनबाई ने औक्षण करून केलेले स्वागत आणि वास्तू दर्शन - कौलारू घरे, वूड, लोखंड, अत्यंत कमी काँक्रीट पण लाकडाचा वापर, लाकडी फ्लोअर, प्रत्येक रूम मध्ये गॅसवर चालणारे रूम हिटर, पाठीमागील गार्डन, 24 तास नळातून गरम पाणी, पंखे नसलेले छत आणि मुबलक पार्किंग साठी जागा अत्यंत आलिशान वास्तू. खरंच आनंद आणि पंकज च्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला.
आता सायकलिंग, सायकलिंग ट्रॅक, सायकलिंग हायवे, कॅनॉल रूट, सायकलिंग म्युझियम, लेक वगैरे वर लवकरच लिहिणार आहे.
आणि हो इथे किती सायकलिंग केली पेक्षा काय अनुभवलं आणि संवाद कसा झाला हे महत्त्वाचे असल्याने मला बरंच काही धडे देणारी, आत्मपरीक्षण करायला लावणारी, किमी मागे न धावता माझा मित्र डॉ संदीप साखरे, सुमित परिंगे, आप्पा मदन यांच्या सारखं निसर्गात, ऐतिहासिक वास्तू आणि सायकलिंगच्या एका वेगळ्या दुनियेत स्वतःला हरवून घेण्यासाठी ही संवाद यात्रा होती.....क्रमशः

No comments:
Post a Comment