Konkan Diary Day IV: गणपती पुळे - आरे वारे - रत्नागिरी - पावस - रत्नागिरी रेल्वे स्टेशन
सकाळी ७: ३० वाजता फ्रेश होऊन, चहा घेऊन रत्नागिरी (२४ किमी) कडे निघालो, वाटेत रत्नागिरीचा रस्ता विचारून गणपती पुळे च्या सागरी किनाऱ्यावर फोटो काढून पुढे निघालो. थोडासा १ किमीचा चढ चढून सुंदर अश्या आरे व वारे समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढले. तर माझ्या लक्षात आले रात्री विश्रांती घेऊन सुद्धा मुकेशचा थकवा गेला नव्हता. वारंवार काल प्रमाणे तो मागे पडत होता. चढ आल्यावर तर आणखी मागे जवळपास २ किमी मागे पडत होता. त्याने थकल्याचे सांगितले. म्हणून आम्ही हळू हळू निघालो. पुन्हा ३ किमीचा कठीण चढ त्याची कठीणता इतकी होती कि आम्हाला १/२ गेअर वर शिफ्ट करावे लागले, वर चढावर पोहचल्यावर गटागटा पाणी पिउन पुढे निघालो तर पुन्हा ३-४ किमीचा उतार सावधपणे उतरत एका मोठा बॅकवॉटर वरील पूल ओलांडत ‘शिरगावा’त आलो. तेथील पूल पाहून मला 'हापूस' या मराठी चित्रपटातील सीन आठवला. लगेच मुकेश येईपर्यंत छान फोटो काढले. तेथील नाव, बोटी, मासे पकडायचे जाळे आकर्षक वाटत होते. मग ‘झाडगाव’ मार्गे रत्नागिरी शहरात ८:३० वाजता प्रवेश केला.
मुकेश थकल्यामुळे तो रत्नागिरीलाच थांबला. आम्ही पोटभर मिसळ पाव व दही खाल्ले. पुढे मी एकटाच ‘पावस’च्या दिशेने न वेळ घालवता निघालो. कारण मला १ वाजेपर्यंत परत रत्नागिरी रेल्वे स्टेशन वर पोहचायचे होते.
सुंदर रत्नागिरी शहर पाहत मी गावाबाहेरील पूल चढून ‘पावस’ कडे निघालो. पुन्हा २ किमीच्या अवघड घाट चढून highway ला लागलो. नंतर १०-१५ किमीचा पठार होता. वाटेत मला काही वारकरी मंडळी भेटल्या. त्यांनीही आमच्या ३ दिवसात ‘मुंबई ते रत्नागिरी’ सायकल प्रवासाबद्दल कुतूहल व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. पुढे ‘घोलप’ गावाजवळ २-३ किमीचा उतार उतरून पुन्हा २ किमीचा कठीण चढ होता. उन्हामुळे घामाने ओलेचिंब झालो होतो. सायकल चालू असतांनाच पोटात पाणी ओतून १/२ गेअर टाकून जोर लावला व चढलो नंतर पुन्हा उतार उतरून पावस बस स्थानका समोरून स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या मठात आलो.
आरती चालू होती. हात पाय धुवून शांत पणे रांगेत दर्शन घेतले. दर्शन झाल्यावर उर्जेसाठी कोकम शरबत पिउन सायकलजवळ आलो. तर कालचेच पर्यटक पुन्हा भेटले होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या सोबत फोटो काढले व रत्नागिरी कडे ११ वाजता निघालो.
गावातून पुन्हा २ किमीचा अत्यंत अवघड असा वळणदार चढ होता. बाजूने वाहने आवाज करत जात होती. वाहनांचा आवाज व कंप माझी एकाग्रता भंग करू पाहत होता. तितक्यात बस मधील शाळकरी मुलांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या व मला स्फूर्ती आली. लगेच १/१ गेअर टाकून जोर लावून एकाग्रपणे चढ चढलो. पुन्हा उतार उतरून ३ किमीचा चढ चढून highway ला लागलो. उंचावरून सह्याद्रीच्या डोंगर रांगाचा फोटो घ्यायचा मोह आवरला नाही. लगेच फोटो काढून रत्नागिरी कडे निघलो. ‘भाटे’ गावा जवळील डोंगर उतरून रत्नागिरी जवळील पूल ओलांडून रत्नागिरीच्या सुंदर समुद्रकिनार्यावर फोटो काढून शहरात आलो.
रेल्वे स्टेशनचा मार्ग (१० किमी) विचारून निघालो. हा highway सतत चढ उताराचा होता. वाटेत अनेक शहरवासीय आमचा बोर्ड पाहून विचारपूस करत होते. त्यांना उत्तरे देत रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो.
स्टेशन जवळ मुकेश भेटला. तो रत्नागिरी किल्ला पाहून आला होता. आम्ही दोघांनी उसाचा गार रस पिउन स्टेशनवर पोहोचलो. इथे आमचा ४ दिवसांचा प्रवास झाला. या ४ दिवसात आम्ही जवळपास ४०० किमी अंतर कापले. थोड्या वेळात आम्ही आमच्या तिघांच्या सायकली (राजेश सोडून) मुंबई कडे पाठवून जनशताब्दी ची वाट पाहत सोबत जेवण उरकले. व कधीही न विसारणाऱ्या या साहसी अनुभवाचा व आठवणीचा खजिना घेऊन परतीचा प्रवास सुरु केला.












No comments:
Post a Comment