Sunday, April 24, 2022

Scotland Cycling : लिनलिथगो - एडींनब्रा कॅनॉल रूटवर सायकलिंग

 

Day 2: 29th March 2019 लिनलिथगो - एडींनब्रा कॅनॉल रूटवर सायकलिंग 60 किमी

काल फॉलकर्क व्हीलहून परतल्यावर फ्रेश होऊन पुतण्याच्या (सफल) च्या प्राथमिक शाळेला भेट दिली. शाळेची वास्तू पाहिल्यावर सर्वप्रथम एखादे राजवाडे किंवा म्युझियम वाटावे असे भव्य. शाळा सुटली आणि आमचा कार्यकर्ता सफल मुली मुलांच्या गरड्यातून बाहेर आला आणि मी त्याला घ्यायला आलेला पाहून आनंदी झाला. मग भावाची बायको शीतल सोबत ऐतिहासिक ग्रंथालय मधून सायकलिंग वरील पुस्तके हुडकून काढली. ग्रंथालय अद्ययावत होते आणि पुस्तकाची नोंदणी देवाणघेवाण डिजिटल बारकोड स्कॅन करणे, कार्ड स्कॅन करणे अशी सूत्रबद्ध होती।
मग लिनलिथगो पॅलेस ला भेट दिली। पॅलेस च्या बाजूला सुंदर लेक आणि त्यावर पोहण्याचा आनंद घेणारे पक्षी, बाजूला पसरलेले मखमली गवताची चादर आणि वेस्ट लोथीयन नगर परिषद ने छान मेंटेन केलंय आणि तेथील नागरिकांनी देखील. स्वच्छ लेक मध्ये आकाशाचे, पॅलेस चे सुंदर प्रतिबिंब दिसत होते. पंकजचा मेहुणा केदार लोहिया सोबत मस्त फेरफटका मारत घरी परतलो. सायंकाळी फालकर्क गावात शॉपिंग मॉल मध्ये विंडो शॉपिंग आणि माझी पुतणी पहेलचा 3रा वाढदिवस सहकुटुंब साजरा केला.
दिवसभर व्यस्तते मुळे थकल्याने रात्री लवकरच झोप लागली. २९ तारखेला सकाळी 7 वाजता कॅनॉलरूट ने निघालो एडींब्रा च्या दिशेने पण आज रस्ता शोधण्यासाठी कोणाचीही मदत घेता. आज छान ऊन पडलेले होती, उजव्या बाजूला कॅनॉल, दोन्ही बाजूला दाट जंगल, झाडेझुडपे, डोंगर,एका बाजूला स्कॉट रेल्वे ट्रॅक, त्यापल्याड लिनलिथगो हायवे असा छान प्रवास आणि वाटेत भेटणारे माझ्या सारखे भटके रनर्स, मॉर्निंग वॉकर्स आणि सायकलिस्ट, आणि प्रत्येक 5-10 किमीला कॅनॉल मध्ये तरंगणाऱ्या स्वः मालकीच्या बोट आणि सुंदर सर्व सुविधांनी युक्त बोट रेस्टॉरंट असे दृश्य अनुभवत येणाऱ्या जाणाऱ्यांना 'राम राम मंडळी' घालत होतो. वाटेत पोर्ट बोकम येथील बोट,लिन मिल चा पूल ब्रिज वरून आमची स्वारी जात होती.  1895 मध्ये याच पुलावरून वाहणारा झरा गोठला होता ज्यामुळे त्याला 'वॉटरफॉल ऑफ आईस' म्हणत.
वाटेत दगडांवर काही लोकांनी 'फ्री स्कॉटलंड' लिहिलेले होते जे सहजपणे वाटसरूंचे लक्ष वेधत होते कदाचित काही लोकांना स्थानिक प्रश्न महत्वाचे वाटत असावेत
वाटेत एक 5 किमी जंगल लागले ज्यात दोन्ही बाजूला गर्द झाडी, दोन्ही बाजूला पाहिले तर जंगल, मधून वाहणारा कॅनॉल आणि दीड फूट पाउलवाटेवर चालणारा मी सॉरी मी म्हणजे अहंकार, एकटेपणा पण इथे मी एकटा थोडीच होतो. माझ्या सोबत सायकल, वाहणारा गार वारा, पाण्याचा प्रवाह, पक्ष्याचा चिवचिवाट अनुभवत 'ब्रीज इन' स्थानक पोहोचलो आणि पुढे एडींब्रा १० किमी बाकी असताना जवळून यु टर्न घेतला कारण सकाळी 10 पर्यंत घरी पोहोचणे आवश्यक होते. वाटेत घरून आणलेले केक जंगलात बसून मस्त दाबून हाणले. तितक्यात सकाळी भेटलेला जॉन सायकलिस्ट आला. त्याचे म्हणणे होते "ब्रिटन मध्ये हवामानाचे कधीच खरे नसते पण ज्यादिवशी देखील चांगले हवामान असले तेंव्हा अंथरुणात लोळत बसत बाहेर निघणे आणि मस्त सायकलिंग, रनिंग किंवा पायी भटकंती करणे. कारण उद्याचे काय माहीत पण आजचा दिवस माझा".
वेळेवर लिनलिथगो पोहोचलो आणि पुन्हा रस्ता चुकून गावात आज नवीन रोडवरून घरी पोहोचलो

No comments: