Showing posts with label सायकलिंग. Show all posts
Showing posts with label सायकलिंग. Show all posts

Sunday, January 30, 2022

टोंक बुंदी कोटा 145 किमी एड्स जनजागृती सायकल यात्रा





















 


18 नोव्हेंबर 

कालच्या हेक्टिक आणि टफ राईड नंतर रात्री छान झोप झाली शिवाय ढगाळ वातावरण असल्याने काल पेक्षा थंडी कमी अर्थात 8 किंवा 9 'C इतकी होती. रात्री धर्मशाळा चालकाने पाण्याची मेन लाईन बंद केल्याने थोडी गैरसोय झाली. असो बडे बडे शहरो में छोटी छोटी मुश्किले आती रहती है. सकाळी आवरून 7 वाजता अग्रवाल धर्मशाळायेथे चहा घेतांना तेथील care taker विचारत होता "आपको रास्ते में पुलीस वाले परेशान करते होंगे". आम्ही म्हणालो "परेशान ? बिलकुल नहीं बलकी हमे सहयोग देते है, खुद हो के पाणी देते है, आगे का रास्ता, रात में ठहरने की व्यवस्था आदी" त्यांना निरोप देऊन टोंक येथून निघालो. मी तसा मारवाडी पण 100 वर्ष पेक्षा अधिक महाराष्ट्रात आमचे कुटुंब असल्याने आमची मराठी मारवाडी पेक्षा अधिक चांगली असून उलट मारवाडी मध्ये जरा खिचडी झाली आहे. तरी काल पासून अनेक लोकांशी मारवाडीत संवाद झाला पण त्यांनी आमची खिचडी मारवाडी भाषा ओळखून लगेच म्हणाले "आप दक्खन से हो क्या ?".

बस झाल्या गप्पा आणि आमची सकाळी आभाळ वातावरण असल्याने थंडीचा त्रास नाही झाला.

  आज मी आणि पाटणकर सर मनाने देखील ताजे झालो होतो. सर्व नकारात्मकता रात्रीच त्यागून सकाळच्या सूर्याच्या किरणाने मिळालेल्या उर्जाने आम्ही कोटा हायवे ने निघालो. आजचा दिन विशेष होता कारण मागील 7 दिवसांत आज आमचे 1000 किमी सायकलिंग पूर्ण करून कोटा पोहोचणार होतो. 


आजच्या तिसऱ्या मुक्कामी अर्थात शिक्षणाचे माहेरघर 'कोटा' म्हणजे IIT आणि NEET मधील टॉपर्स विद्यार्थांना घडवणारे केंद्र कदाचित आता COMMERCIAL HUB बनले असेल....असो

तसेंच 'कोटा फॅक्टरी' या वेब सिरीज मुळे कोटा विषयी बऱ्या पैकी माहिती होती. 

 आज कालच्या चुका टाळल्या अर्थात वेळेवर नास्ता , चहा पानी आणि Hydration. दोघे अत्यंत संयमाने पेडलिंग करत राईड चा आनंद घेत सकाळी 09 वाजता 35 किमी नंतर भरनी या गावाच्या पुढे धाब्यावर नाश्ता मध्ये चहा बिस्किटे आणि चिवडा इतकेच मिळाले.   पण सोबतचे राजगिरा लाडू ची भूक लागल्यावर चव एकदम रुचकर लागते. पुढे सरोली जवळ रस्त्याच्या बाजूला माधवप्रसाद आश्रम जवळ तलाव आणि जवळ च्या परिसरात  बहरलेली शेत असे विहंगम दृश्य होते. ते तलाव पाहून आम्ही निसर्गाच्या सानिध्यात सायकलिंग चा आनंद लुटत पुढे निघालो. 50 किमी नंतर दुनी तहसील ओलांडले.  9:30 वाजून गेले होते.  पुढे डोलता - कुचलवाडा - टिकर दरम्यान 10 ते 15 किमी रस्त्याचे काम सुरू असल्याने  एकेरी वाहतूक वळवल्याने इथे सांभाळून चालवावे लागले. रस्त्याच्या बाजूला काटे, काचेचे तुकडे पासून टायर ला सांभाळून चालवत असतांना अखेर 80 किमी नंतर हिंदोली गावा जवळ टायर पंचर ! 


पण आज मी शिवी नाही हसडली. अत्यंत संयमाने टीम वर्क ने कामाला लागलो. मी टायर disment करून चाक उघडून ट्यूब बाहेर काढे पर्यंत पाटणकर सरांनी कालचे पंचर जोडले. नंतर ते जोडलेले पंचर पुन्हा हवा मारून चेक करून फिट केले. इकडे हे सर्व टायर फिटिंग करून सायकल रेडी करे पर्यंत पाटणकर सरांनी दुसऱ्या ट्यूब चे पंचर जोडले. तोपर्यंत पॅनियर बॅग कॅरियर वर फिट केली आणि जय भोलेनाथ म्हणत निघालो.


वाटेत सायकलवरील एड्स जनजागृती बोर्ड पाहून सगळ्यांचा पहिला प्रश्न असायचा "सरकार के पास से आयो हो क्या ? ये सायकलिंग के पैसे मिलेंगे क्या ? रेस है क्या ? आदी. "

पण जेव्हा त्यांना मी देखील मारवाडीत संपूर्ण उद्देश सांगायचो तेंव्हा आश्चर्याने आ वासून पहायचे. 

जवळपास 95 किमी आलो असेल. इथे छोट्या मोठ्या डोंगर रांगा असल्याने चढ होता. पण वातावरणात गारवा आणि निसर्गाने जरा जास्तच कृपा केली. पाऊस सुरू .......रिमझिम सुरू आणि आणि आम्ही पण त्याच रिमझिम चा आस्वाद घेत 2,3 चढ चढत वर आलो. पाऊस थांबत नाही हे पाहून मी 2 इन 1 जॅकेट घातले कारण पावसासोबत थंडी पण खूप होती. काल पाटणकर सर चे  रस्त्यात स्वेटर पडले होते. मग मी त्यांना थर्मल आणि रेफलेक्टर जॅकेट दिले.  मागील 20 किमी पासून पावसात भिजत सायकलिंग सुरू होती. पुढे बुंदी गावा जवळ आलो.  तर एका बाजूला बुंदी चा नयनरम्य आणि नवल सागर तलाव  त्यात या पावसात देखील डोंगराचे प्रतिबिंब दिसत होते. आम्हाला सेल्फी चा मोह आवरला नाही. इथून ऐतिहासिक वास्तू व प्रेक्षणीय स्थळ जैत सागर किल्ला,  लतारागढ किल्ला व  गढ महल जवळच आहे. या तलाव जवळ नवल सागर उद्यान छान विकसित केले आहे. 


प्राचीन बुंदी प्रदेशावर मीणांच्या उषार गोत्राचे राज्य होते, परंतु अक्रंकटा राजपूतांनी जुन्या शहराचा नाश केला. सध्याच्या बुंदीची स्थापना राव देवा हाडा यांनी 1242 मध्ये जैता मीनाची कपटाने हत्या करून केली होती. राजा बुंदा मीनाच्या नावावरून या भागाला ‘बुंदी’ असे नाव पडले. पुढे या नाल्याचे पाणी अडवून नवलसागर तलाव बांधण्यात आला. राजा देव सिंह यांच्यानंतर राजा बारसिंगने 1354 मध्ये टेकडीवर तारागड नावाचा किल्ला बांधला. यासोबतच किल्ल्यात राजवाडा आणि तलाव-बावडीओ बांधण्यात आला. 14व्या ते 17व्या शतकाच्या दरम्यान पायथ्याशी एक भव्य राजवाडा बांधण्यात आला. 1620 मध्ये राव रतन सिंह जी यांनी राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी एक भव्य खांब (दरवाजा) बांधला. दोन हत्तींच्या पुतळ्यांनी सजवलेल्या खांबाला ‘हत्तीपोल’ म्हणतात. बुंदी त्याच्या विशिष्ट चित्रकला शैलीसाठी प्रसिद्ध आहे, ती महाराव राजा "श्रीजी" उमेद सिंग यांनी बांधली होती, जे त्यांच्या चित्रकला शैलीसाठी जगप्रसिद्ध आहेत. हा झाला बुंदी चा इतिहास. 


पुढे आणखी एक चढ चढून आम्हाला दीड किमी चा बुंदी हायवेवर बोगदा लागला जो सायकल चे दोन्ही लाईट लावून काळजीपूर्वक सायकल चालवत बोगदा मधून सायकल चालवत बाहेर आलो. आता जाम भूक लागली होती. पावसात भिजल्यावर थंडी पण वाजू लागली. दाल बाटी वर मस्त ताव मारला. हुडहुडी काही कमी होईना मग अखेर  जॅकेट चढवून बसलो. पावसाकडे पाहत घोटभर चहा घेतला. दीड तास झाले पाऊस थांबत नाही म्हणून आणखी एक चहा घेतला. पुढे अखेर आम्ही पावसातच सायकल चालवायचा निर्णय घेऊन लाईट, रेफलेक्टर जॅकेट चढवून निघालो. 


रिप रिप पाऊस सुरूच होता अखेर सकाळपासून 135 किमी नंतर कोटा कडे मेन रोड ने वळालो. इथे पुणे येथील लाहोटी uncle  यांच्या पुढाकाराने स्थानिक उद्योगपतींनी कोटा येथे माहेश्वरी Resort मध्ये राहण्याची सोय केली होती. हॉटेल, लॉज आम्ही शक्यतो टाळतो पण त्याच्या प्रेमा खातर हे आदरातिथ्य स्वीकारून आजची 144 किमी राईड पूर्ण करून कोटा पोहोचलो. 

कोटा येथील कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र कृषी विषयक संशोधन साठी प्रसिद्ध आहे. तसेच IIT आणि NEET मधील टॉपर्स विद्यार्थांना घडवणारे केंद्र तर आपल्या सर्वांनाच परिचित आहे. 

 माहेश्वरी रिसॉर्ट चे मालक राजकुमारजी माहेश्वरी यांनी खूप छान आदरातिथ्य व जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांनी त्यांचे रिसॉर्ट्स मधील विविध रंगबिरंगी कारंजे, प्रकाशव्यवस्था, लायटिंग, लहान मुलांसाठी विविध खेळ, बोटिंग आदी  दाखवले. अजूनही पाऊस सुरूच होता पण पाऊस उद्या तरी थांबू दे अशी वरुण राजाला प्रार्थना करून झोपी गेलो. 


डॉ पवन चांडक 

9422924861

Saturday, January 29, 2022

शाहपुर जयपूर निवाई टोंक 160 किमी एड्स जनजागृती सायकल यात्रा

 


















17 November 2021 


डोंगराळ भाग असल्याने शिवाय गावाबाहेर हे लॉज असल्याने रात्रभर थंडी जाणवत होती. तरी पहाटे 5:30 ला उठून आवरून  17 नोव्हेंबर च्या सकाळी 06:30 वाजता निघालो, वातावरण ढगाळ असल्याने सूर्यनारायण चे दर्शन झाले नाही.  सकाळी 18-19 ची स्पीड ठेवत मनोहरपूर येथे एका टपरीवर वाफाळलेला चहा आणि सोबत पारले जी  बिस्कीट घेऊन निघालो. येथील रस्ते पूर्णपणे फ्लॅट नसून बरेच चढ उतार होते. पुढे 35 किमी नंतर  चांदवाजी गावा जवळ एक रस्ता जयपूर बायपास ला जाणारा पण आम्ही जयपूर कडे जाणारा रिंग रोड ने निघालो. हा सिंगल रोड होता पण वाटेत दुतर्फा शेत, रस्त्याच्या उजव्या बाजूला छोट्या टेकड्या, वाटेत शाळेला जाणारी मुले आम्हाला टाटा म्हणत हात दाखवत होती. थोडं पुढे आल्यावर कोणी तरी आवाज दिलं पाहतो काय तर सायकल च्या कॅरियर वर रात्री न वाळलेले कपडे पडले होते. पुन्हा थोडं मागे जाऊन उचलून व्यवस्थित बांधून निघालो. या भागात शाळा सुरू झाल्या असल्याने शाळकरी मुलांची वर्दळ होती आणि हायवे पेक्षा हा रस्ता कमी रहदारीचा होता.  अचरोल नंतर छोटेसे जंगल लागले या जंगल वाटेतून सायकलिंग करायला मजा येत होती. 08:30 नंतर सूर्य हळूहळू वर आल्याने त्याच्या प्रकाशाने टेकडी, टेकडी खालच्या वस्ती व शेतं प्रकाशात न्हाऊन निघाली. आता वातावरण मस्त असल्याने सायकलिंग ला मजा येत होती. पण चढ उतार असल्याने वारंवार गियर बदलावे लागत होते.  लाबना गाव ओलांडत रस्त्याच्या दुतर्फा एका पेक्ष्या एक भारी असे राजवाड्या सारखे हॉटेल व रिसॉर्ट आणि त्याचे वैभव बाहेरूनच पाहत आम्ही पुढे जात होतो. पुढे एक छोटासा चढ लागला व छोटेसे जंगल ज्याला नाहरगढ फॉरेस्ट म्हणतात तिथून पुन्हा उतार लागला. इथे नाहरगढ बायोलॉजिकल पार्क व इथून आमेर जवळ एलिफंटास्टिक एलेफँट वाईल्ड लाईफ संच्युरी प्रसिद्ध आहे. आमचे अंतर बरेच असल्याने आम्ही त्या सफारी ला प्रत्यक्ष भेट देऊ शकलो नाही. पुढे आमेर गाव लागले. इथे  अंबर फोर्ट म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. जवळच जयपूर येथील प्रसिद्ध जल महल आहे. जे  मान सागर तलाव मध्ये वसले आहे. आम्ही त्या झिल जवळून सायकलिंग करत पुराणी चुंगी सर्कल पार्क मार्गे जयपूर शहर  उजव्या बाजूला ठेवत निघालो. मागील अर्धा तास पासून भूक लागली होती परंतु योग्य हॉटेल न मिळाल्याने छिड छिड होत होती. अखेर एका गाड्यावर ढोकळा, कचोरी व दाल का शीरा चा पोटभर आस्वाद घेतला. भूक इतकी लागली होती की किती प्लेट खाल्ले की कळलेच नाही. पुढे सुंदर जयपूर शहरातून मार्ग काढत रिंग रोड ने सुराजपोल अनाज मंडी जवळून, उर्मिला उद्यान मार्गे वाटेत जियोलॉगिकल सर्व्हे ऑफ इंडिया ची इमारत लागली ती बाहेरून पाहत आम्ही  सितापुरा, प्रल्हादपुरा भागातून जयपूर रिंग रोड ओलांडून टोंक कोटा हायवे कडे निघालो. 

वाटेत 12 वाजता मालवा गावाजवळ एका पेट्रोल पंप जवळ थोडी रिफ्रेशमेन्ट घेऊन हायवेला लागलो. या रस्त्यावर फारच तुरळक वाहतूक होती. पण अनेक ठिकाणी दारूची दुकाने दिसत होती. राजस्थान मध्ये प्रामुख्याने गहू, बाजरी, ज्वारी, मका आदी रब्बी पिके प्रामुख्याने घेतली जातात. हायवेच्या दुतर्फा बाजरी, गव्हाची पिके जास्त करून दिसत होती. 

पुढे चाकसू च्या पुढे आल्यावर भूक लागली होती. शिवाय आज बरंच ऊन जाणवत होतं. आज जेवणाच्या बाबतीत देखील सकाळ प्रमाणे  गणित चुकले होते.  पण योग्य ढाबा मिळत नव्हता सारखी भुकेने आमच्या जीवाची तगमग होत होती. 2 ठिकाणी विचारले तर निव्वळ बार होते आणि स्नॅक्स पण आम्हाला राजस्थानी ढाबा जिथे चांगले शाकाहारी जेवण मिळेल ते आम्ही पाहत होतो. अशा परिस्थितीत पाटणकर सर अत्यंत संयम राखून होते. काय करणार या शोध मोहिमेत सायकलवरच आम्ही चिक्की खात 3 ते 4 उड्डाणपूल ओलांडून आणखी 13 किमी पुढे आलो. अखेर कोठून या गावा जवळ एक ढाबा सापडला. जवळपास 120 किमी नंतर लंच साठी  थांबलो. त्याला जेवण ऑर्डर केल्यावर त्याने लाल लाल अशी तर्री असलेली तिखट गट्याची भाजी आणि चपाती पण सोबत ताक मिळाल्याने अखेर कसे बसे जेवलो. 

पण इथे बरेच ट्रक ड्रायव्हर्स सोबत एड्स जनजागृती सायकल मोहीम पुढील रूट, चढ उतार विषयी चर्चा झाली. त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध विषयी माहिती दिली. व एड्स चा प्रसार कारणे, उपचार आदीविषयी माहिती दिली. 

त्यात पाटणकर सरांनी त्याला कुतुहुल म्हणून कोटा नंतर घाट व रस्ता कसा आहे, चढ किती आहे आदी  विचारपूस केली. 

बाज वरच स्वतःला झोकून थोडा आराम करून आम्ही निघालो.  पुढे गुंन्सी ओलांडून निवाई बायपास ओलांडल्यावर टोंक 17 किमी बाकी होते. आणि अचानक सायकलचे चाक डुग डुग करायला लागले. आयला आता काही खरे नाही म्हणत मी सायकल बाजूला घेतली तर पाहतो काय " अरे रामा रामा पंचर ते पण नवीन ralson चे टायर व केंदा चे ट्यूब असून देखील  सायकल पंचर झाली. पंचर होणे काही नवीन अर्थात फार मोठी गोष्ट नाही पण इथे मी गोंधळून थोडी गडबड केली. पण इथे गुरू से शिष्य सकारात्मक चा अनुभव आला.  मागील टायर पंचर झाल्यावर मी उगाच चिडचिड केली ज्यामुळे 10 मिनिटं ऐवजी घाई केल्याने चाक खोलून ट्यूब बसवताना कधी नट विसर तर कधी वॉल ज्यामुळे अधिक वेळ लागत होता आणि उगाच चिडचिड करत होतो ज्यामुळे जोडायला 20 मिनिटे लागली. पण या वेळी पाटणकर सरांनी धीराने, शांतपणे पंचर जोडायचा मंत्र दिला. अर्थात इतका अनुभव असून आज शिष्य पाटणकर सरांचे बोल कामी आले. 

 पुन्हा नव्या दमाने सायकल हायवेला लागली. 

भौगोलिक दृष्ट्या देखील ही राईड नवीन अनुभव देतेय जसे पहिले 2 दिवस एक दम फ्लॅट तर दिल्लीत flyover, ट्रॅफिक तर जयपूर जवळ चढ उताराचे रिंग रोड, ट्रॅफिक, भर दुपारी हेड विंड चा सामना करत आजच्या राईड चा आनंद आम्ही घेतला.


पुढे एक चढ चढून आम्हाला बनस नदी लागली. पुढे बनस नदीवरील पूल ओलांडून टोंक शहरात प्रवेश केला. वाटेत एक बाईक वाल्याने काही अडचण भासल्यास नंबर दिला. तितक्यात कोटा येथील जी डी पटेल यांचा फोन की टोंक येथे अग्रवाल धर्मशाळा येथे श्री नरेंद्र विजय यांनी व्यवस्था केल्याचे सांगितले.  

अब सब अच्छा होगा म्हणत पंचर मुळे आलेली निराशा दूर होत गेली.  टोंक येथील भव्य कामानीने आमचे स्वागत केले. शहरात अनेक युवक आमच्या सायकल वरील बोर्ड वाचत आमच्या मोहिमेविषयी कुतूहल व्यक्त करत सेल्फी घेत होते. अखेर अग्रवाल धर्मशाळेत पोहोचलो. तिथे नरेंद्र विजय यांनी धर्मशाळेत येऊन आमची भेट घेऊन रात्रीच्या जेवणाची व रात्रीच्या मुक्कामाची सोय देखील केली होती.त्यांचे आभार मानून आम्ही स्नान वगैरे आटोपून आलेल्या टिफिन मधून पोटभर जेवलो. रूम अत्यंत साधी होती शिवाय थंडी बरीच होती आणि टॉयलेट बाथरूम देखील लांब होते. धर्मशाळेत उतरलेल्या बऱ्याच प्रवाशांनी  आमच्या मोहिमेविषयी जाणून घेऊन शुभेच्छा दिल्या. आज बराच थकल्याने आणखी काही लिहू शकलो नाही पण उद्याची व्यवस्था संदर्भात पुण्यातील उद्योगपती लाहोटी अंकल चा फोन की कोटा येथे माहेश्वरी रिसॉर्ट मध्ये तुमची उद्याची व्यवस्था केली आहे. चला कल अच्छा होगा म्हणत झोपी गेलो. 


डॉ पवन चांडक 

Saturday, November 11, 2017

एड्स जनजागृती सायकल मोहीम: बेंगलोर श्रीरंगपट्नम २५ ऑक्टोबर २०१७



बेंगलोर केरळ कन्याकुमारी एक खडतर साहसी सायकल प्रवास

2010 पासून एचआयव्ही बाधित बालकांचे विशेषतः अनाथ मुलांच्या मूलभूत प्रश्न - शिक्षण, आरोग्य पुनर्वसन स्वयंरोजगार प्रशिक्षण या विषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही कार्य करत आहोत. पण केवळ डोनेशन, मदत इतक्या पुरते मर्यादित राहता आदरणीय समाजसेवक बाबा आमटे यांनी 1986 1989 मध्ये काढले






ल्या भारत जोडो यात्रेची डॉक्युमेंटरी पाहिल्यावर आपणही काही तरी करावे असे वाटले.
महाविद्यालयीन जीवनात बीएचएमएस द्वितीय वर्षात सायकल सोडली होती. परंतु बाबा आमटेंच्या भारत जोडो अभियान ची डॉक्युमेंट्री पाहिल्यावर सायकलिंग च्या माध्यमातून एड्स जनजागृती ची प्रेरणा मिळाली.


मग काय छोट्या मोठ्या मोहीम पूर्ण केल्या ते पण कोणताही बॅक अप सपोर्ट घेता. यात 2013 मध्ये केलेला मुंबई ते कोंकण सागरी मार्ग, दरवर्षी जून महिन्यात केलेली परभणी पंढरपूर 300 किमी सायकलवारी, 2014 मध्ये परभणी पणजी 752 किमी, 2015 मध्ये अकोला मेळघाट गोंदिया विदर्भ सायकल मोहीम 826 किमी, 2016 मध्ये सुरत -माऊंट अबू - चित्तोडगड 855 किमी, 2017 मध्ये गोंदिया प्रतापगढ़, गडचिरोली, चंद्रपूर च्या दुर्गम जंगलातून नक्षलग्रस्त भागात केलेला सायकल प्रवास.  प्रत्येक प्रवास तितकाच महत्वाचा खडतर होता. प्रत्येक प्रवासातून नवीन शिकायलाच मिळाले.
अशाच प्रकारे मग या वर्षी थंडी चालू व्हायच्या आगोदर अर्थात दिवाळीनंतर सुट्या जेणेकरून या कालावधीत पेशंट देखील कमी असतात म्हणून हि मोहीम 2 महिन्यापुर्वीच आखली.
चांगले होम वर्क म्हणून त्या रुटची गुगल मॅप च्या आधारे आखणी केली. कर्नाटक, केरळ तामिळनाडू च्या भागातील मित्र, सायकलिंग ग्रुप, एड्स नियंत्रण विभागाचे अधिकारी या सर्वांशी फोन, इमेल ने संपर्क साधून आमच्या सायकल मोहीम जनजागृती कॅम्पेन विषयी पूर्वकल्पना दिली.
नियमितपणे परभणी मध्ये सायकलवर सराव चालू होता. प्रत्येक रविवारी 100 किमी लॉंग राईड करून मानसिक तयारी सोबत शारीरिक क्षमतेची देखील चाचणी झाली.
शेवटी 24 तारीख उजाडली. सकाळी नांदेड बेंगलोर ट्रेन मध्ये लगेच कोच मध्ये सायकल बुक केल्या. विशेष म्हणजे बुकिंग क्लार्क एक वेळचे पक्के सायकलपटू असल्याने त्याने पूर्णतः सहकार्य केले.
 तसे पाहिले तर केरळ चे विशेष आकर्षक असल्याने टीम फार मोठी तयार झाली होती. परंतु लॉंग सायकलिंग एक्सपेडिशन चा अनुभव मला माझा 3 वर्षापासूनचा सायकल मोहिमेतील सहकारी मित्र डॉ संदीप साखरेलाच होता.
तरी मी स्वतः डॉ पवन चांडक, डॉ संदीप साखरे, डॉ किरण बकान, डॉ चंद्रशेखर भालेराव, कैलास तिथे, माउली खटिंग, ओम तलरेजा, सनथ जैन अशी 8 जणांची टीम होती.

25 ऑक्टोबर ला बेंगलोर रेल्वे स्थानक ला पोहोचून पार्सल ऑफिसवरून  सायकल सोडवून रेल्वे स्टेशन च्या मुख्य द्वारापाशी आलो.  तर पाहतो काय कर्नाटक आरोग्य विभागाच्या आय.. सी चे संचालक श्री गोविंद राजू, हनुमंत राव सर्व सहकाऱ्यांनी आमचे स्वागत करून एड्स जनजागृतीविषयी प्रादेशिक भाषेतील मटेरियल सुपुर्द करून आमच्या सायकल मोहिमेस हिरवा झेंडा दाखविला.
मग सुरु आमचा प्रवास गजबजलेल्या बेंगलोर मधील हेवी ट्रॅफिक मधून मार्ग काढत जिथे थांबू तेथील लोकांना पाम्पलेट वाटत अखेर बेंगलोर च्या 18 किमी बाहेरील डिकॅथलॉन या स्पोर्ट्स मॉलला भेट दिली. तेथील सहकाऱ्यांनी आम्हास शुभेच्छा दिल्या. भूक लागली होती. त्या भागातील स्पेशल गरमा गरम बिदादी इडली वर ताव मारला. मैसूर हायवे वर हि स्पेशल इडली असून जी नॉर्मल इडली पेक्षा मोठी अर्थात 4-5 इंच इतकी असते.
 

पुढे मैसूर हायवे वर आमची पेडलिंग सुरु होती.हायवे म्हटले कि मागे पुढे होणारच. रस्ता मोठा होता परंतु ट्रॅफिक खूप जास्त होती. वाटेत कुंबलगोडु, बिदादी गाव लागले.बिदादी येथील मोठी इडली प्रसिद्ध आहे. या इडलीला बिदादी इडली असे म्हणतात. तिथे पाणी बॉटल रिफिल केल्या. काही ट्रक ड्रायव्हर्स, हॉटेल वाल्यांच्या प्रश्न ज्याला भाषेची अडचण असल्याने पाम्पलेट वाटून उत्तर दिले. तुटकी फुटकी हिंदीत ते बोलत होते पण सर्व जणांच्या शुभेच्छा आमच्या सोबत होत्या.
दुपारी 12 वाजता रामनगर गाठले. रामनगर हे गाव सिल्क सिटी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक भाग विशेषतः परळी, बीड येथून रेशन याच बेंगलोर एक्सप्रेसने रामनगर ला जातो. येथे सिल्क कापड, साडी चे मोठे मोठे कारखाने आहेत.कारखाने असल्याने येथे येणारे कामगार विविध भागातून स्थलांतरित झालेले आहेत. कर्नाटक मध्ये 2010 च्या आकडेवारी नुसार 36000 पेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमित व्यक्ती  एआरटी औषधोपचार घेत आहेत. एचआयव्ही प्रसाराचे मुख्य कारण म्हणजे कामगारांचे स्थलांतर महिनोमहिने घरापासून दूर राहिल्याने होणारे असुरक्षित लैंगिक संबंध.
म्हणून आम्ही रामनगर येथील हायवे वरील मार्केट कापड कारखाने भागातील मजुरांना दिसेल त्याला माहितीपत्रके वाटत होतो.हिंदीत त्यांना सांगत होतो. पुढे थोडी चिक्की खाऊन नारळपाणी पिऊन आम्ही चिन्नपटनम पोहोचलो.दुपारचे दीड वाजले होते. जवळपास 70 किमी सायकलिंग झाली होती सोबत भूक देखील लागली होती. चिन्नपटनम हे लहान मुलांच्या लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असे शहर आहे. सायकलवर आधीच 10 किलो सामान असल्याने आम्ही केवळ खेळण्यांच्या दुकानांना भेट देत विंडो शॉपिंग केली. परंतु लाकडी घोडा, रेल्वे, घोडागाडी प्रत्येक खेळणी देखनिय मोहक होत्या.
तेथील कारागिरांना पाम्पलेट वाटप करून माहिती दिली.पुढे थोडे 10 किमी सायकल चालवून एक ढाबा गाठला. भूक लागली होती पण तेथे केवळ फिश कबाब होता. मी शुद्ध शाकाहारी असल्याने वांदे झाले. संदीप ने लगेच घरून आणलेल्या पोळ्या चटणी काढली. मस्त पोटभर खाऊन थोडी स्ट्रेचिंग करून निघालो. आभाळ भरून आले होते. गर्मी मुळे घामाच्या धारा निघत होत्या. बघता बघता मंडया जवळ पाऊस झाला होतापरंतु काही फरकाने आम्ही भिजायचं वाचलो. पुढे मंडया दूध सहकारी संघाच्या आउटलेट वर मँगो लस्सी, केशर लस्सी पिली. तेथील कर्मचाऱ्यांना भेटून पाम्पलेट वाटले. 5 किमी पुढे आलो असेल तर पावसाने अडवले.तब्बल पाऊण तास आडोश्याला थांबलो. तेथे देखील गप्पांच्या ओघात महाराष्ट्र कर्नाटक भाई भाई म्हणत एक दोस्त मिळाला. त्याने जवळील टपरीवर मस्त कॉफी पाजली. घरी चला म्हणून आग्रह करू लागला पण वेळेची मर्यादा असल्याने नम्रपणे नकार देऊन निरोप घेतला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निघालो. मंडया जिल्ह्याचे स्थान परंतु खूप पाऊस चालू असल्याने जास्त वेळ थांबता हायवेला लागलो. पाऊस पडून गेल्याने वातावरण छान झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा भात शेती काही छोटी मोठी तलाव होते. सकाळच्या पेक्षा हा रस्ता चांगला होता. किमान धाबे, हॉटेल्स ऐवजी छान निसर्ग सौंदर्य अनुभवण्यास मिळाले. माझा मित्र डॉ बकान ला थोडे हायपोग्लायसेमिक वाटू लागले. जवळील टपरीवर कॉफी, चिक्की खाऊन कावेरी नदीवरील मोठा पूल ओलांडून ऐतिहासिक शहर श्रीरंगपटनम पोहोचलो. सकाळ पासून जवळपास १३० किमी सायकलिंग झाली होती


 गावाच्या वेशीवर श्रीरंगपटनम एड्स नियंत्रण विभागाची टीम आमच्या स्वागताला होती.त्यांचे स्वागत स्वीकारून सर्वप्रथम आम्ही प्राचीन श्री रंगनाथ स्वामी मंदिर महालक्ष्मी चे दर्शन घेतले.
श्रीरंगपटनम हे तिन्ही बाजूने कावेरी नदीने व्यापले असून एक प्रकारचे बेट तयार झाले आहे. श्रीरंगपटनम हे विजयनगर च्या साम्राज्याचा एक भाग होते. श्रीरंगपटनम च्या किल्यात ब्रिटिशांशी झालेल्या लढाईत टिपू सुलतान चा मृत्यू झाला होता.हैदर अली टिपू सुल्तानशी संबंधित ऐतिहासिक इमारतीना आम्ही भेटी दिल्या.
 

आधीच उशीर झाल्याने लवकर 7:30 वाजता मार्केट  गाठून तेथील ऑटो, भाजीवाले, चहाच्या टापरीवर असलेले गिऱ्हाईक सगळ्यांना पाम्पलेट वाटले.मी इंग्रजीत छोटेसे भाषण दिले जे सोबतच्या कर्नाटक एड्स नियंत्रण विभाग च्या सहकार्यांनी कन्नड मध्ये लोकांना भाषांतर करून सांगितले.शासकीय विश्राम गृहात आमची सोय केली होती. केवळ 300 रुपयात 2 खोली मिळाल्या.मस्त पोटभर जेऊन झोपलो.