17 November 2021
डोंगराळ भाग असल्याने शिवाय गावाबाहेर हे लॉज असल्याने रात्रभर थंडी जाणवत होती. तरी पहाटे 5:30 ला उठून आवरून 17 नोव्हेंबर च्या सकाळी 06:30 वाजता निघालो, वातावरण ढगाळ असल्याने सूर्यनारायण चे दर्शन झाले नाही. सकाळी 18-19 ची स्पीड ठेवत मनोहरपूर येथे एका टपरीवर वाफाळलेला चहा आणि सोबत पारले जी बिस्कीट घेऊन निघालो. येथील रस्ते पूर्णपणे फ्लॅट नसून बरेच चढ उतार होते. पुढे 35 किमी नंतर चांदवाजी गावा जवळ एक रस्ता जयपूर बायपास ला जाणारा पण आम्ही जयपूर कडे जाणारा रिंग रोड ने निघालो. हा सिंगल रोड होता पण वाटेत दुतर्फा शेत, रस्त्याच्या उजव्या बाजूला छोट्या टेकड्या, वाटेत शाळेला जाणारी मुले आम्हाला टाटा म्हणत हात दाखवत होती. थोडं पुढे आल्यावर कोणी तरी आवाज दिलं पाहतो काय तर सायकल च्या कॅरियर वर रात्री न वाळलेले कपडे पडले होते. पुन्हा थोडं मागे जाऊन उचलून व्यवस्थित बांधून निघालो. या भागात शाळा सुरू झाल्या असल्याने शाळकरी मुलांची वर्दळ होती आणि हायवे पेक्षा हा रस्ता कमी रहदारीचा होता. अचरोल नंतर छोटेसे जंगल लागले या जंगल वाटेतून सायकलिंग करायला मजा येत होती. 08:30 नंतर सूर्य हळूहळू वर आल्याने त्याच्या प्रकाशाने टेकडी, टेकडी खालच्या वस्ती व शेतं प्रकाशात न्हाऊन निघाली. आता वातावरण मस्त असल्याने सायकलिंग ला मजा येत होती. पण चढ उतार असल्याने वारंवार गियर बदलावे लागत होते. लाबना गाव ओलांडत रस्त्याच्या दुतर्फा एका पेक्ष्या एक भारी असे राजवाड्या सारखे हॉटेल व रिसॉर्ट आणि त्याचे वैभव बाहेरूनच पाहत आम्ही पुढे जात होतो. पुढे एक छोटासा चढ लागला व छोटेसे जंगल ज्याला नाहरगढ फॉरेस्ट म्हणतात तिथून पुन्हा उतार लागला. इथे नाहरगढ बायोलॉजिकल पार्क व इथून आमेर जवळ एलिफंटास्टिक एलेफँट वाईल्ड लाईफ संच्युरी प्रसिद्ध आहे. आमचे अंतर बरेच असल्याने आम्ही त्या सफारी ला प्रत्यक्ष भेट देऊ शकलो नाही. पुढे आमेर गाव लागले. इथे अंबर फोर्ट म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. जवळच जयपूर येथील प्रसिद्ध जल महल आहे. जे मान सागर तलाव मध्ये वसले आहे. आम्ही त्या झिल जवळून सायकलिंग करत पुराणी चुंगी सर्कल पार्क मार्गे जयपूर शहर उजव्या बाजूला ठेवत निघालो. मागील अर्धा तास पासून भूक लागली होती परंतु योग्य हॉटेल न मिळाल्याने छिड छिड होत होती. अखेर एका गाड्यावर ढोकळा, कचोरी व दाल का शीरा चा पोटभर आस्वाद घेतला. भूक इतकी लागली होती की किती प्लेट खाल्ले की कळलेच नाही. पुढे सुंदर जयपूर शहरातून मार्ग काढत रिंग रोड ने सुराजपोल अनाज मंडी जवळून, उर्मिला उद्यान मार्गे वाटेत जियोलॉगिकल सर्व्हे ऑफ इंडिया ची इमारत लागली ती बाहेरून पाहत आम्ही सितापुरा, प्रल्हादपुरा भागातून जयपूर रिंग रोड ओलांडून टोंक कोटा हायवे कडे निघालो.
वाटेत 12 वाजता मालवा गावाजवळ एका पेट्रोल पंप जवळ थोडी रिफ्रेशमेन्ट घेऊन हायवेला लागलो. या रस्त्यावर फारच तुरळक वाहतूक होती. पण अनेक ठिकाणी दारूची दुकाने दिसत होती. राजस्थान मध्ये प्रामुख्याने गहू, बाजरी, ज्वारी, मका आदी रब्बी पिके प्रामुख्याने घेतली जातात. हायवेच्या दुतर्फा बाजरी, गव्हाची पिके जास्त करून दिसत होती.
पुढे चाकसू च्या पुढे आल्यावर भूक लागली होती. शिवाय आज बरंच ऊन जाणवत होतं. आज जेवणाच्या बाबतीत देखील सकाळ प्रमाणे गणित चुकले होते. पण योग्य ढाबा मिळत नव्हता सारखी भुकेने आमच्या जीवाची तगमग होत होती. 2 ठिकाणी विचारले तर निव्वळ बार होते आणि स्नॅक्स पण आम्हाला राजस्थानी ढाबा जिथे चांगले शाकाहारी जेवण मिळेल ते आम्ही पाहत होतो. अशा परिस्थितीत पाटणकर सर अत्यंत संयम राखून होते. काय करणार या शोध मोहिमेत सायकलवरच आम्ही चिक्की खात 3 ते 4 उड्डाणपूल ओलांडून आणखी 13 किमी पुढे आलो. अखेर कोठून या गावा जवळ एक ढाबा सापडला. जवळपास 120 किमी नंतर लंच साठी थांबलो. त्याला जेवण ऑर्डर केल्यावर त्याने लाल लाल अशी तर्री असलेली तिखट गट्याची भाजी आणि चपाती पण सोबत ताक मिळाल्याने अखेर कसे बसे जेवलो.
पण इथे बरेच ट्रक ड्रायव्हर्स सोबत एड्स जनजागृती सायकल मोहीम पुढील रूट, चढ उतार विषयी चर्चा झाली. त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध विषयी माहिती दिली. व एड्स चा प्रसार कारणे, उपचार आदीविषयी माहिती दिली.
त्यात पाटणकर सरांनी त्याला कुतुहुल म्हणून कोटा नंतर घाट व रस्ता कसा आहे, चढ किती आहे आदी विचारपूस केली.
बाज वरच स्वतःला झोकून थोडा आराम करून आम्ही निघालो. पुढे गुंन्सी ओलांडून निवाई बायपास ओलांडल्यावर टोंक 17 किमी बाकी होते. आणि अचानक सायकलचे चाक डुग डुग करायला लागले. आयला आता काही खरे नाही म्हणत मी सायकल बाजूला घेतली तर पाहतो काय " अरे रामा रामा पंचर ते पण नवीन ralson चे टायर व केंदा चे ट्यूब असून देखील सायकल पंचर झाली. पंचर होणे काही नवीन अर्थात फार मोठी गोष्ट नाही पण इथे मी गोंधळून थोडी गडबड केली. पण इथे गुरू से शिष्य सकारात्मक चा अनुभव आला. मागील टायर पंचर झाल्यावर मी उगाच चिडचिड केली ज्यामुळे 10 मिनिटं ऐवजी घाई केल्याने चाक खोलून ट्यूब बसवताना कधी नट विसर तर कधी वॉल ज्यामुळे अधिक वेळ लागत होता आणि उगाच चिडचिड करत होतो ज्यामुळे जोडायला 20 मिनिटे लागली. पण या वेळी पाटणकर सरांनी धीराने, शांतपणे पंचर जोडायचा मंत्र दिला. अर्थात इतका अनुभव असून आज शिष्य पाटणकर सरांचे बोल कामी आले.
पुन्हा नव्या दमाने सायकल हायवेला लागली.
भौगोलिक दृष्ट्या देखील ही राईड नवीन अनुभव देतेय जसे पहिले 2 दिवस एक दम फ्लॅट तर दिल्लीत flyover, ट्रॅफिक तर जयपूर जवळ चढ उताराचे रिंग रोड, ट्रॅफिक, भर दुपारी हेड विंड चा सामना करत आजच्या राईड चा आनंद आम्ही घेतला.
पुढे एक चढ चढून आम्हाला बनस नदी लागली. पुढे बनस नदीवरील पूल ओलांडून टोंक शहरात प्रवेश केला. वाटेत एक बाईक वाल्याने काही अडचण भासल्यास नंबर दिला. तितक्यात कोटा येथील जी डी पटेल यांचा फोन की टोंक येथे अग्रवाल धर्मशाळा येथे श्री नरेंद्र विजय यांनी व्यवस्था केल्याचे सांगितले.
अब सब अच्छा होगा म्हणत पंचर मुळे आलेली निराशा दूर होत गेली. टोंक येथील भव्य कामानीने आमचे स्वागत केले. शहरात अनेक युवक आमच्या सायकल वरील बोर्ड वाचत आमच्या मोहिमेविषयी कुतूहल व्यक्त करत सेल्फी घेत होते. अखेर अग्रवाल धर्मशाळेत पोहोचलो. तिथे नरेंद्र विजय यांनी धर्मशाळेत येऊन आमची भेट घेऊन रात्रीच्या जेवणाची व रात्रीच्या मुक्कामाची सोय देखील केली होती.त्यांचे आभार मानून आम्ही स्नान वगैरे आटोपून आलेल्या टिफिन मधून पोटभर जेवलो. रूम अत्यंत साधी होती शिवाय थंडी बरीच होती आणि टॉयलेट बाथरूम देखील लांब होते. धर्मशाळेत उतरलेल्या बऱ्याच प्रवाशांनी आमच्या मोहिमेविषयी जाणून घेऊन शुभेच्छा दिल्या. आज बराच थकल्याने आणखी काही लिहू शकलो नाही पण उद्याची व्यवस्था संदर्भात पुण्यातील उद्योगपती लाहोटी अंकल चा फोन की कोटा येथे माहेश्वरी रिसॉर्ट मध्ये तुमची उद्याची व्यवस्था केली आहे. चला कल अच्छा होगा म्हणत झोपी गेलो.
डॉ पवन चांडक

No comments:
Post a Comment