Saturday, November 11, 2017

एड्स जनजागृती सायकल मोहीम: बेंगलोर श्रीरंगपट्नम २५ ऑक्टोबर २०१७



बेंगलोर केरळ कन्याकुमारी एक खडतर साहसी सायकल प्रवास

2010 पासून एचआयव्ही बाधित बालकांचे विशेषतः अनाथ मुलांच्या मूलभूत प्रश्न - शिक्षण, आरोग्य पुनर्वसन स्वयंरोजगार प्रशिक्षण या विषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही कार्य करत आहोत. पण केवळ डोनेशन, मदत इतक्या पुरते मर्यादित राहता आदरणीय समाजसेवक बाबा आमटे यांनी 1986 1989 मध्ये काढले






ल्या भारत जोडो यात्रेची डॉक्युमेंटरी पाहिल्यावर आपणही काही तरी करावे असे वाटले.
महाविद्यालयीन जीवनात बीएचएमएस द्वितीय वर्षात सायकल सोडली होती. परंतु बाबा आमटेंच्या भारत जोडो अभियान ची डॉक्युमेंट्री पाहिल्यावर सायकलिंग च्या माध्यमातून एड्स जनजागृती ची प्रेरणा मिळाली.


मग काय छोट्या मोठ्या मोहीम पूर्ण केल्या ते पण कोणताही बॅक अप सपोर्ट घेता. यात 2013 मध्ये केलेला मुंबई ते कोंकण सागरी मार्ग, दरवर्षी जून महिन्यात केलेली परभणी पंढरपूर 300 किमी सायकलवारी, 2014 मध्ये परभणी पणजी 752 किमी, 2015 मध्ये अकोला मेळघाट गोंदिया विदर्भ सायकल मोहीम 826 किमी, 2016 मध्ये सुरत -माऊंट अबू - चित्तोडगड 855 किमी, 2017 मध्ये गोंदिया प्रतापगढ़, गडचिरोली, चंद्रपूर च्या दुर्गम जंगलातून नक्षलग्रस्त भागात केलेला सायकल प्रवास.  प्रत्येक प्रवास तितकाच महत्वाचा खडतर होता. प्रत्येक प्रवासातून नवीन शिकायलाच मिळाले.
अशाच प्रकारे मग या वर्षी थंडी चालू व्हायच्या आगोदर अर्थात दिवाळीनंतर सुट्या जेणेकरून या कालावधीत पेशंट देखील कमी असतात म्हणून हि मोहीम 2 महिन्यापुर्वीच आखली.
चांगले होम वर्क म्हणून त्या रुटची गुगल मॅप च्या आधारे आखणी केली. कर्नाटक, केरळ तामिळनाडू च्या भागातील मित्र, सायकलिंग ग्रुप, एड्स नियंत्रण विभागाचे अधिकारी या सर्वांशी फोन, इमेल ने संपर्क साधून आमच्या सायकल मोहीम जनजागृती कॅम्पेन विषयी पूर्वकल्पना दिली.
नियमितपणे परभणी मध्ये सायकलवर सराव चालू होता. प्रत्येक रविवारी 100 किमी लॉंग राईड करून मानसिक तयारी सोबत शारीरिक क्षमतेची देखील चाचणी झाली.
शेवटी 24 तारीख उजाडली. सकाळी नांदेड बेंगलोर ट्रेन मध्ये लगेच कोच मध्ये सायकल बुक केल्या. विशेष म्हणजे बुकिंग क्लार्क एक वेळचे पक्के सायकलपटू असल्याने त्याने पूर्णतः सहकार्य केले.
 तसे पाहिले तर केरळ चे विशेष आकर्षक असल्याने टीम फार मोठी तयार झाली होती. परंतु लॉंग सायकलिंग एक्सपेडिशन चा अनुभव मला माझा 3 वर्षापासूनचा सायकल मोहिमेतील सहकारी मित्र डॉ संदीप साखरेलाच होता.
तरी मी स्वतः डॉ पवन चांडक, डॉ संदीप साखरे, डॉ किरण बकान, डॉ चंद्रशेखर भालेराव, कैलास तिथे, माउली खटिंग, ओम तलरेजा, सनथ जैन अशी 8 जणांची टीम होती.

25 ऑक्टोबर ला बेंगलोर रेल्वे स्थानक ला पोहोचून पार्सल ऑफिसवरून  सायकल सोडवून रेल्वे स्टेशन च्या मुख्य द्वारापाशी आलो.  तर पाहतो काय कर्नाटक आरोग्य विभागाच्या आय.. सी चे संचालक श्री गोविंद राजू, हनुमंत राव सर्व सहकाऱ्यांनी आमचे स्वागत करून एड्स जनजागृतीविषयी प्रादेशिक भाषेतील मटेरियल सुपुर्द करून आमच्या सायकल मोहिमेस हिरवा झेंडा दाखविला.
मग सुरु आमचा प्रवास गजबजलेल्या बेंगलोर मधील हेवी ट्रॅफिक मधून मार्ग काढत जिथे थांबू तेथील लोकांना पाम्पलेट वाटत अखेर बेंगलोर च्या 18 किमी बाहेरील डिकॅथलॉन या स्पोर्ट्स मॉलला भेट दिली. तेथील सहकाऱ्यांनी आम्हास शुभेच्छा दिल्या. भूक लागली होती. त्या भागातील स्पेशल गरमा गरम बिदादी इडली वर ताव मारला. मैसूर हायवे वर हि स्पेशल इडली असून जी नॉर्मल इडली पेक्षा मोठी अर्थात 4-5 इंच इतकी असते.
 

पुढे मैसूर हायवे वर आमची पेडलिंग सुरु होती.हायवे म्हटले कि मागे पुढे होणारच. रस्ता मोठा होता परंतु ट्रॅफिक खूप जास्त होती. वाटेत कुंबलगोडु, बिदादी गाव लागले.बिदादी येथील मोठी इडली प्रसिद्ध आहे. या इडलीला बिदादी इडली असे म्हणतात. तिथे पाणी बॉटल रिफिल केल्या. काही ट्रक ड्रायव्हर्स, हॉटेल वाल्यांच्या प्रश्न ज्याला भाषेची अडचण असल्याने पाम्पलेट वाटून उत्तर दिले. तुटकी फुटकी हिंदीत ते बोलत होते पण सर्व जणांच्या शुभेच्छा आमच्या सोबत होत्या.
दुपारी 12 वाजता रामनगर गाठले. रामनगर हे गाव सिल्क सिटी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक भाग विशेषतः परळी, बीड येथून रेशन याच बेंगलोर एक्सप्रेसने रामनगर ला जातो. येथे सिल्क कापड, साडी चे मोठे मोठे कारखाने आहेत.कारखाने असल्याने येथे येणारे कामगार विविध भागातून स्थलांतरित झालेले आहेत. कर्नाटक मध्ये 2010 च्या आकडेवारी नुसार 36000 पेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमित व्यक्ती  एआरटी औषधोपचार घेत आहेत. एचआयव्ही प्रसाराचे मुख्य कारण म्हणजे कामगारांचे स्थलांतर महिनोमहिने घरापासून दूर राहिल्याने होणारे असुरक्षित लैंगिक संबंध.
म्हणून आम्ही रामनगर येथील हायवे वरील मार्केट कापड कारखाने भागातील मजुरांना दिसेल त्याला माहितीपत्रके वाटत होतो.हिंदीत त्यांना सांगत होतो. पुढे थोडी चिक्की खाऊन नारळपाणी पिऊन आम्ही चिन्नपटनम पोहोचलो.दुपारचे दीड वाजले होते. जवळपास 70 किमी सायकलिंग झाली होती सोबत भूक देखील लागली होती. चिन्नपटनम हे लहान मुलांच्या लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असे शहर आहे. सायकलवर आधीच 10 किलो सामान असल्याने आम्ही केवळ खेळण्यांच्या दुकानांना भेट देत विंडो शॉपिंग केली. परंतु लाकडी घोडा, रेल्वे, घोडागाडी प्रत्येक खेळणी देखनिय मोहक होत्या.
तेथील कारागिरांना पाम्पलेट वाटप करून माहिती दिली.पुढे थोडे 10 किमी सायकल चालवून एक ढाबा गाठला. भूक लागली होती पण तेथे केवळ फिश कबाब होता. मी शुद्ध शाकाहारी असल्याने वांदे झाले. संदीप ने लगेच घरून आणलेल्या पोळ्या चटणी काढली. मस्त पोटभर खाऊन थोडी स्ट्रेचिंग करून निघालो. आभाळ भरून आले होते. गर्मी मुळे घामाच्या धारा निघत होत्या. बघता बघता मंडया जवळ पाऊस झाला होतापरंतु काही फरकाने आम्ही भिजायचं वाचलो. पुढे मंडया दूध सहकारी संघाच्या आउटलेट वर मँगो लस्सी, केशर लस्सी पिली. तेथील कर्मचाऱ्यांना भेटून पाम्पलेट वाटले. 5 किमी पुढे आलो असेल तर पावसाने अडवले.तब्बल पाऊण तास आडोश्याला थांबलो. तेथे देखील गप्पांच्या ओघात महाराष्ट्र कर्नाटक भाई भाई म्हणत एक दोस्त मिळाला. त्याने जवळील टपरीवर मस्त कॉफी पाजली. घरी चला म्हणून आग्रह करू लागला पण वेळेची मर्यादा असल्याने नम्रपणे नकार देऊन निरोप घेतला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निघालो. मंडया जिल्ह्याचे स्थान परंतु खूप पाऊस चालू असल्याने जास्त वेळ थांबता हायवेला लागलो. पाऊस पडून गेल्याने वातावरण छान झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा भात शेती काही छोटी मोठी तलाव होते. सकाळच्या पेक्षा हा रस्ता चांगला होता. किमान धाबे, हॉटेल्स ऐवजी छान निसर्ग सौंदर्य अनुभवण्यास मिळाले. माझा मित्र डॉ बकान ला थोडे हायपोग्लायसेमिक वाटू लागले. जवळील टपरीवर कॉफी, चिक्की खाऊन कावेरी नदीवरील मोठा पूल ओलांडून ऐतिहासिक शहर श्रीरंगपटनम पोहोचलो. सकाळ पासून जवळपास १३० किमी सायकलिंग झाली होती


 गावाच्या वेशीवर श्रीरंगपटनम एड्स नियंत्रण विभागाची टीम आमच्या स्वागताला होती.त्यांचे स्वागत स्वीकारून सर्वप्रथम आम्ही प्राचीन श्री रंगनाथ स्वामी मंदिर महालक्ष्मी चे दर्शन घेतले.
श्रीरंगपटनम हे तिन्ही बाजूने कावेरी नदीने व्यापले असून एक प्रकारचे बेट तयार झाले आहे. श्रीरंगपटनम हे विजयनगर च्या साम्राज्याचा एक भाग होते. श्रीरंगपटनम च्या किल्यात ब्रिटिशांशी झालेल्या लढाईत टिपू सुलतान चा मृत्यू झाला होता.हैदर अली टिपू सुल्तानशी संबंधित ऐतिहासिक इमारतीना आम्ही भेटी दिल्या.
 

आधीच उशीर झाल्याने लवकर 7:30 वाजता मार्केट  गाठून तेथील ऑटो, भाजीवाले, चहाच्या टापरीवर असलेले गिऱ्हाईक सगळ्यांना पाम्पलेट वाटले.मी इंग्रजीत छोटेसे भाषण दिले जे सोबतच्या कर्नाटक एड्स नियंत्रण विभाग च्या सहकार्यांनी कन्नड मध्ये लोकांना भाषांतर करून सांगितले.शासकीय विश्राम गृहात आमची सोय केली होती. केवळ 300 रुपयात 2 खोली मिळाल्या.मस्त पोटभर जेऊन झोपलो.

No comments: