Sunday, January 23, 2022

आझादी का अमृत महोत्सव निमित्त आमची अट्टारी वाघा बॉर्डर उज्जैन 1320 किमी सायकलवारी 10,11 नोव्हेंबर: रेल्वे प्रवास







आझादी का अमृत महोत्सव निमित्त आमची अट्टारी वाघा बॉर्डर दिल्ली उज्जैन 1320 किमी सायकलवारी

10,11 नोव्हेंबर: रेल्वे प्रवास

 

महामानव बाबा आमटे यांच्या भारत जोडो सायकल यात्रे पासून प्रेरणा घेऊन 2013 पासून दरवर्षी मी काही समःविचारी मित्रांसोबत भारतातील विशिष्ट भागात विविध सायकल मोहिमेचे आयोजन करून एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती करत असतो. 2010 पासून एचआयव्ही संक्रमित अनाथ बालकांचे मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य पुनर्वसनासाठी साठी कार्यरत असून आजवर जीवनरेखा बालगृह परभणी, सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर तसेच इंफॅन्ट इंडिया बीड, पालवी एड्स प्रकल्प पंढरपूर, सूर्योदय बालगृह अकोला येथील एचआयव्ही ग्रस्त अनाथ बालकांच्या मूलभूत प्रश्न गरजांसाठी वेळोवेळी लोकसहभागातून मदत करून आज या संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर एआरटी विभाग परभणी येथे उपचार घेणाऱ्या 150 पेक्षा अधिक एचआयव्ही ग्रस्त एक पालक मुलांच्या शिक्षण, आरोग्य, पोषक आहार पुनर्वसन विषयक गरजा विवाहयोग्य मुलींच्या विवाहासाठी मदत असो की निराधार एचआयव्ही ग्रस्त युवती महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीन, पिठाची गिरणी आदी द्वारे मदत केली आहे. चला ही झाली आमच्या कार्याविषयी पार्श्वभूमी

 तर या वर्षीच्या सायकल मोहिमेविषयी बोलूया. खरे तर या वर्षी नागपूर जगन्नाथ पुरी अशा सायकल मोहिमेचे नियोजन आयोजन केले होते. परंतु सोबत येणाऱ्या सहकाऱ्यांच्या शाळेच्या सुट्या कमी झाल्याने तो दौरा रद्द करून मी आणि माझे सायकलिस्ट मित्र पांडुरंग पाटणकर सोबत नवीन मोहिमेचे पूर्वनियोजन आखणी ऐन लक्ष्मी पूजन च्या दिवशी केले

होय ! वाघा बॉर्डर - अमृतसर - दिल्ली- जयपूर - उज्जैन अशा 5 राज्यातून प्रवास निमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 'कुछ हटके करते है'.

मी व्यवसायाने होमिओपॅथीक डॉक्टर असल्याने जास्त दिवस माझ्या प्रायव्हेट क्लीनिक हुन सुट्टी शक्य नसल्याने 150 किमी सायकलिंग प्रति दिन नुसार नियोजन करणे कमीत कमी खर्चात त्या भागातील सायकलिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स यांच्याशी संपर्क साधून गुरुद्वारा, मंदिर, शासकीय विश्रामगृह आदी ठिकाणी मुक्काम करून लोकांशी संवाद साधून अत्यंत कमी खर्चात नियोजन केले. रोजचा खर्च जेवण, राहणे सोबत 300 ते 350/- प्रति व्यक्ती जाऊ नये याची काळजी आम्ही घेणार या हिशोबाने नियोजन करून सचखंड एक्सप्रेस ने सायकल बुक केली तेथील पार्सल ऑफिस कार्यालय ने सहकार्य केले. 10 नोव्हेंबर ला पूर्णा हुन अमृतसर साठी आमची ट्रेन होती. परभणीतून निघतांना बायको आशा , मुली प्रचिती, शर्वरी यांच्या शुभेच्छा आई आज्जीचे आशीर्वाद घेऊन पूर्णा साठी निघालो.   पूर्णा स्टेशनवर पोहोचल्यावर तेथील सायकल प्रेमी मित्र आनंद अजमेरा, विशाल चितलांगे, विशाल राठोड, अतुल शहाणे बालगोपाल मंडळी असे जवळपास 50 ते 70 जणांनी पूर्णा स्टेशनवर आमचे स्वागत करून भरभरून सायकल प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. हे सर्व स्वागत पाहून एक गोष्ट पक्की की या सायकल प्रेमींच्या शुभेच्छारुपी आशीर्वादाचा जोरावर आम्ही मोहीम फत्ते करणार. असा जणू आत्मविश्वास निर्माण झाला. ट्रेन ची निघायची घोषणा होताच मनात एक थोडीशी धाकधुक निर्माण झाली होती. लगेच वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. गाडी पूर्णा हुन हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे खंडवा, भोपाळ, दिल्ली मार्गे अमृतसर असा मार्ग होता. सोबत अनेक सरदारजीची सोबत होती. दुसऱ्या दिवशी अमृतसर सायंकाळी पोहोचणार होतो. दुपारी भूक लागल्यावर धुरी स्टेशनवर छोले भटुरे चे गरम पार्सल घेतले. ते पण दोन्ही हातात, ते इतके गरम होते की 4 कोच चालत जाऊन सीट वर पोहोचे पर्यंत तर तळहात दोन्ही लाल झाले होते. बरेच पोळले होते, लगेच थंड पाण्यात वारंवार हात धुवून दाह कमी करत होतो. मनात एकच धाकधुक उद्याची सायकलिंग कशी होईल ? जर यावर blisters निर्माण झाले तर ?

पण सुदैवाने अमृतसर पोहोंचे पर्यंत आराम पडला. Cantharis 30 या होमिओपॅथी औषधाने फरक पडला.

अमृतसर ला पोहोचल्यावर मंजितसिंग यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत आमचे  स्वागत केले. आता प्रश्न होता सायकलचा ? पार्सल ऑफिस 5 वाजताच बंद झाल्याने सायकल उद्या मिळणार अर्थात उद्या 9 नंतरच पुढील नियोजन जसे वाघा बॉर्डर जाणे, फ्लॅग ऑफ वगैरे.....थोडा निराश झालो. पण मंजितसिंग ने दिलासा दिला "वाहे गुरुजी पर भरोसा रखो सब ठीक होगा. " सायंकाळी छेहार्ता साहेब गुरुद्वारा येथे आमची राहण्याची सोय मंजितसिंग यांनी केली होती तिथे आम्ही दर्शन घेऊन लंगरचा प्रसाद घेऊन रात्री लवकर झोपी गेलो

उद्या पहिल्या दिवशीचा 12नोव्हेंबर वाघा अमृतसर फगवाडा अनुभव शेअर करेल 

डॉ पवन चांडक 

9422924861

Thursday, November 25, 2021

Long Distance Cycling साठी काही वैयक्तिक Tips

 


मागील 8 वर्षातील सायकलिंग च्या अनुभवातून काही टिप्स देत आहेत.


1) सर्वप्रथम नियमितपणे किमान 20 किमी सायकलिंग दररोज अर्थात आठवड्यात 4 दिवस करण्याचा सराव असावा. पण त्यासाठी पूर्व तयारी म्हणून तुम्ही किमान शतके मारणे याचा अट्टाहास करण्याची गरज नाही. जो व्यक्ती नियमितपणे 25 किमी सायकलिंग करतो तो कोणतीही मोहीम पूर्ण करू शकतो. 

2) सायकलिंग ला Cross Exercise म्हणून Running जसे 5 किमी किंवा 10 किंवा 15 किमी आठवड्यात 2 वेळा करत असाल तर उत्तम

3) Long Distance Cycling ज्यात Touring प्रकारात जेंव्हा आपल्यास रोज 120 - 150 किमी अंतर रोज कापायचे असेल तेंव्हा खालील बाबतीत लक्ष द्या

1) Hydration - किमान 25 -30 किमी साठी 1 लिटर पाणी आवश्यक. दुपार नंतर 2 लिटर ORS आवश्यक। Hydration व्यवस्थित आहे हे पाहण्यासाठी लघवी चा रंग पांढरा व Diluted असावा. जर पिवळा किंवा dark पिवळा असेल तर  Dehydrated होत आहात. 

Dehydration टाळण्यासाठी ORS आवडत नसेल तर लिंबू शरबत किंवा मोसंबी ज्यूस किंवा डाळिंब ज्यूस नाही तर नारळाचे पाणी उत्तम. जर हे जरी नाही मिळाले तर साखर मीठ टाकून ORS बनवू शकता. 

2) वेळेवर इंधन: प्रत्येक 25 - 40 किमी दरम्यान काही तरी खाणे आवश्यक आहे जसे केळी, चिक्की, शेंगदाणे लाडू खाऊ शकता. बाकी वेळेवर, नाश्ता, मध्यम पोटभर जेवण आणि रात्रीचे जेवण घेतल्यावर किमान 2 तास तरी जागे राहून भरपूर पाणी प्या. 

3) Warm up Exercises: सायकलिंग पूर्वी Shoulder, Elbow, Wrist चे व्यायाम तसेच मानेचे व्यायाम आवश्यक आहे. तसेच Back Stregthening Exercise आवश्यक आहे. 

4) Stretching : याचा खूप उपयोग होतो long ride मध्ये. Physiotherapist चा सल्ला आवश्यक

5) Mind Game: सायकलिंग सुरू करतांना 150 किमी ची धसकी घेऊ नका. तुम्हाला खात, पीत मजेत सकाळी 7 ते सायंकाळी 5 दरम्यान सायकलिंग करायची आहे. पेडलिंग करत राहा 150 केंव्हा झाले ते कळणार सुद्धा नाही. 

6) Golden Hour: सकाळी 6:30 ते दुपारी 11 म्हणजे Golden Hour असून त्या दरम्यान किमान 80 -90 किमी अंतर गाठा. म्हणजे दुपारी Lunch नंतर 40-50 किमी हसत खेळत होतील. 

7) निसर्गाच्या सानिध्यात: सायकलिंग करतांना App, Speedometer कडे लक्ष न देता निसर्गाशी एकरूप व्हा जसे रस्त्याच्या दुतर्फा, झाडे, शेत, तलाव, तुम्हाला टाळ्या वाजवणारा बच्ये कंपनी, तलाव, नदी, समुद्र किनारा, डोंगर किंवा कडा आणि जमल्यास फोटो घेत राहा. Music गाणे शक्यतो टाळा निसर्गाचे आवाज ऐका. 

8) Short Break: प्रत्येक 15-20 किमी ला Compulsory Hydration Break घ्या जो 3 ते 5 मिनिटं एखाद्या ठिकाणी बसून पाणी प्या सोबत काही तरी खा. पण जास्त टंगळ मंगळ नको. 

9) शेवटी जिद्द आणि चिकाटी बस . 


हीच पद्धत वापरत या वर्षी 1320 किमी सायकलिंग 9 दिवसांत 146 किमी/प्रतिदिन या प्रकारे पूर्ण केली. 


©


डॉ पवन चांडक 

9422924861

Friday, December 7, 2018

एचआयव्ही एड्स जनजागृती संवाद यात्रा: पाली खोपोली चिंचवड धायरी पुणे २०० किमी

परतीचा प्रवास: पाली पुणे २०० किमी २९ व ३० नोव्हेंबर 

दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर सकाळी मी आणि प्रमोदने सोबतच बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन पालिवाला कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे आयोजित एड्स जनजागृती वर संवाद साधण्यासाठी पोहोचलो। महाविद्यालयातर्फे सत्कार स्वीकारून एचआयव्ही व एड्स मधील फरक सांगत, सध्याची परिस्थिती, उपाययोजना व विविध समज गैरसमज विषयी संवाद साधला। शिवाय मागील 10 वर्षांपासून एचआयव्ही बाधित बालकांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन विषयी सुरू असलेले कार्य तसेच  जीवनरेखा बालगृहात असताना व पुढे 2014 मध्ये सेवालाय प्रकल्प येथे हि मुले स्थलांतर झाल्यावर व आता ही मुले मोठी झाल्यावर रवी बापटले सरांच्या सेवालय प्रकल्प तर्फे मुलांच्या स्वयंरोजगार व प्रशिक्षण चे धडे आदी विषयी संवाद साधला। या संवाद कार्यक्रमात मुली जास्त मोकळेपणाने प्रश्न विचारताना दिसल्या तर मुले लाजळु होती असे वाटले। शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा बडगुजर सर, प्राचार्य व उपस्थित सर्वांचा व विशेषतः प्रमोद जाधव जो खास वेळ काढून कालपासून माझ्या सोबतच होता त्याला पुन्हा लवकर भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेऊन परतीच्या प्रवासाकडे निघालो। 
11 वाजले होते आज कामशेत किंवा पुढे पुण्या जवळ मुक्काम करायचा होता। कालच या रस्त्यावरून आल्यामुळे खड्डे माहीत होते ते चुकवत सहज 17 किमी पार करत परळी पोहोचलो। तिथून पुढे एका हॉटेलवर चहा व चिक्की घेतली। त्यां हॉटेल चालवणाऱ्या दाम्पत्याला 4 दिवसांत अष्टविनायक पूर्ण केल्याचे नवल वाटले। पण अख्या अष्टविनायक यात्रेत रोड खराब असल्याची खंत आमच्या दोघांच्या बोलण्यात होती। या भागात रेंज नसल्याने फोन असून नसल्यागत होता पण रहदारी बरीच होती। खोपोली कडे जाताना बरेच छोटे मोठे चढ चढत 1 वाजता पाली फाटा ओलांडून थोडे पुढे आलो तर गोपाल शहा यांचा फोन की काल आपण घरी जेवण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले ? मी त्यांना नम्रपणे नकार देऊन सोबत चहा घेऊ म्हणालो। पुढे हॉटेल कृष्णा येथे आम्ही सोबत इडली सांबर व शीत पेय पीत असताना थोड्या गप्पा झाल्या व त्यांना परभणी येण्याचे आमंत्रण देऊन खोपोलीकडे निघालो। वाटेत जत्रा लागली - छान रात्रपाळने, विविध खेळ, मौत का कुंवा छान जत्रा सजली होती आणि सोबत लोकांची गर्दी देखील पुष्कळ होती। गर्दीतून मार्ग काढत खोपोली गावातून NH4 ला लागलो। घोट घोट पाणी पिणे सुरूच होते एक कॉलेज गेल्यावर भोर घाटाची चढाई सुरू झाली.  मी देखील लगेच समोर 1 आणि मागे 3ऱ्या व काही वेळाने पहिल्या गियरवर चेन घेऊन घाट चढणे सुरू केले। 2 वाजल्याने उन्ह बरेच आणि शिवाय भरपूर सामान असल्याने थोडं जड जात होतं.  अखेर दीड किमी नंतर एक हायड्रेशन ब्रेक घेऊन पुन्हा चढाई सुरू मग 2 किमी नंतर शिंगोबा मंदिर पर्यंत पोहोचलो। इथे मात्र 10 मिनिट चा ब्रेक घेऊन थोडी चिक्की आणि जवळील माझा ड्रिंक पिऊन सकाळपासूनची पहिली फेसबुक पोस्ट टाकली।  शिंगोबाचे दर्शन घेऊन पुन्हा चढाई सुरू आता खंडाळा घाटाच्या दिशेने  उड्डाण पुलावरून आमची चढाई सुरू असताना वाटेत अनेक पालख्या लागल्या त्यांच्या सोबत चढतांना आणखी हुरूप येत होता। अखेर शेवटच्या टप्यात घाटांचा राजा च्या पोस्टर समोर सेल्फी घेत भोर घाट फत्ते केल्याचं मनोमय आनंद साजरा केला। मग आरामात खंडाळा टॉप वरून लोणावळा पोहोचलो। दुपारचे 03:45 वाजले होते मस्त गारेगार लस्सी पिली. पण आता वाटले की आपण कामशेत ऐवजी तळेगाव सहज सर करू.  तरी किसन टाकमोडे ला मुक्कामाची कुठे सोया होईल का ? म्हणून कॉल करून निघालो। आरामात पेंडलिंग करत कार्ला गाव क्रॉस केले। कामशेत घाट चा चढ चढून नाश्ता करण्यासाठी रेस्टॉरंटला पोहोचलो तर तितक्यात किसन टाकमोडे चे भाचे सुरेश खरसे यांचे  आग्रहाचे निमंत्रण मुक्कामी मोशीला  या म्हणून पण आता 5 वाजले होते आणि रात्री इतक्या वेळ सायकल चालवणे शक्य नसल्याने त्यांना नम्रपणे  नकार देऊन आभार मानले। तितक्यात निसर्ग सायकलमित्र चे सायकलिस्ट मारोती पवार यांचा फोन सर मी पिंपरी चिंचवड ला राहतो तुम्हाला माझ्या घरी मुक्कामी यायचंय। मी लगेच त्याना होकार दिला कारण इथून 30 किमी अंतर बाकी होते जे मी सहज दीड तासात पोहोचू शकतो। इकडे महाराष्ट्र टाइम्स चे रिपोर्टर आनंदजी कस्तुरे यांना सध्या एड्सग्रस्त व्यक्तींची विशेषतः बालके यांची आकडेवारी, त्यांच्या मूलभूत समस्या व सामाजिक सुरक्षा योजना या विषयी फोनवर माहिती देऊन नाश्ता आटोपून 05:30 ला आमची सायकलस्वारी निघाली वडगाव, तळेगाव अंतर आरामात कापले मग हेड लाईट ऑन करून सहज देहू रोड क्रॉस केले। 
इथून बरीच ट्रॅफिक होती आणी फेसबुकवर मुक्काम विषयी पोस्ट टाकल्याने फोन येत होते म्हणून थांबून लगेच मुक्कामाची सोय झाल्याची कमेंट टाकून निघालो। 7 वाजता 100 किमी सायकलिंग करून भक्ती शक्ती चौक निगडी मध्ये पोहोचलो तर पाहतो काय सायकलिस्ट मारोती पवार सर स्वागतास हजर होते। त्यांनी कृष्णनगर येथील घरी नेले अत्यंत आदरातिथ्यपूर्वक स्वागत केले। 
गरम पाण्याने अंघोळ करून आम्ही दोघं पोटभर जेवलो। मारोती पवार सर रामदेव बाबा यांचे साधक योगा, प्राणायाम पासून स्वदेशी उत्पादन, सात्विक आहार यावर त्यांचा भर स्वतःचा व्यवसाय सांभाळून पतंजली चे त्यांचे स्वतःचे स्टोअर आहे। निसर्ग सायकलमित्र ग्रुपचे अस्सल सायकलिस्ट, मनमिळाऊ स्वभावाचे त्यांच्यासोबत आजवर एचआयव्ही एड्स पासून सायकलिंग व एड्स बाधित बालकांच्या समस्यावर सुरू असलेल्या कार्यावर चर्चा केली। 
दै सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सागर शेंडे यांनी फोनवर सायकल मोहिमविषयी मुलाखत घेतली। इंडो सायकलिस्ट क्लब चे गजू दादा आणि अजित पाटील सर भेटण्यास आले त्यांनी ICC Club तर्फे स्मृतिचिन्ह व T shirt देऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या। पुण्यात निसर्ग सायकलिंग क्लब आणि इंडो सायकलिस्ट क्लब दोघांनी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी फार मोठे कार्य केले आहे। ICC क्लब सायकलिंग, रनिंग, मॅरेथॉन, Triathlon, Hiking, Swimming साठी प्रोत्साहन देते ज्याचे आज शेकडो सदस्य आहेत। निसर्ग सायकलमित्र ग्रुप ने आजवर सायकलिंग सोबत शेकडो झाडे लावून व त्यांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनाचे व्रत जोपासले आहे। माझा सोमनाथ श्रमसंस्कार छावणीतील मित्र व दै पुण्यनगरी  येथील बातमीदार अमोल काकडे भेटण्यास आला त्यांच्याशी सायकल मोहीम विषयी निवांत गप्पा मारून निरोप घेतला। 
ही संपूर्ण मोहीमच  संवाद यात्रा झाली कारण या 5 दिवसात  ओळखीचे असो व अनोळखी अनेकांशी मनमोकळेपणे बोललो, सुरू असलेल्या कामाविषयी भावना व्यक्त करता आल्या, नवीन मित्र भेटले, फेसबुकवरून अनेकांनी अस्थावाईकपणे वेळोवेळी चौकशी केली, सायकल खराब झाल्यावर असो की रात्री मुक्कामाची सोय किंवा कुठे एड्स जनजागृती कार्यक्रम असो प्रत्येकांचे शुभेच्छारुपी पाठबळ सोबत होते म्हणूनच केवळ 5 दिवसात 600 किमी अष्टविनायक सायकल प्रवास करून पिंपरी चिंचवड व्यवस्थित पोहोचलो। आता केवळ स्टेशन पोहोचून औपचारिक समारोप बाकी होता पण समाधानाची ऊर्जा घेऊ  झोपलो। 
 
आता औपचारिकता बाकी
30 नोव्हेंबर ची पहाट 5 वाजताच उजाडली साडे पाच तास झोपून देखील फ्रेश होतो। आता मी आणि मारोती पवार सरांची स्वारी निघाली आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी नथमस्तक व्हायला। 
मला रोड माहीत नव्हता मी केवळ मारोती पवार सरांना फॉलो करत पेंडलिंग करत होतो। आरामात 15 किमी नंतर पुणे आळंदी रोड ला लागलो। 06:30 वाजता संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर पोहोचलो तर तिथे काल ज्यांनी घरी मुक्कामी यायचे निमंत्रण दिले होते असे आदरणीय सुरेश खरसे सर आमची वाट पाहत होते। सायकली व्यवस्थित पार्क करून मुख दर्शन घेतले कारण लाईन मोठी असून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी रांगेत उभे असतांना आपण केवळ सायकलवर आलोय म्हणून ट्रस्टीना दर्शनासाठी सोडा म्हणणे योग्य वाटले नाही म्हणून मुख दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारून मृदंग वाजवणाऱ्या माऊलींचे आशीर्वाद घेऊन ही अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचे आभार मानले। आता आमची स्वारी मोशी कडे  खरसे सरांच्या घरी नाश्ता साठी निघाली। सरांच्या घरच्यांनी छान पोहे व चहा देऊन आदरातिथ्य केले। सुरेश खरसे सर मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ त्यांचे गाव अनेक वर्षापासून पुणे येथे एक कंपनीत स्थाईक झालेले अशा खरसे कुटुंबीयांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पिंपरी चिंचवड पोहोचलो। 11 वाजता  महानगरपालिका शाळा धायरी येथे एड्स जनजागृतीपर संवादाचा कार्यक्रम होता म्हणून पटापट पॅकिंग करून सायकलला बांधून पवार कुटुंबियांचे आभार मानून निरोप घेतला। तरी रस्ता दाखवायला सर मुठा पुलपर्यंत आले। पुढे हायवेने आरामात पेंडलिंग करत निघालो वाटेत आरोग्यदायी नीरा आणि हायड्रेशन ब्रेक सुरू होते। पण गियर सेटिंग मध्ये प्रोब्लेम आल्याने चेन डिरेलर सोडत होती। मग वारंवार थांबून सेटिंग करत होतो। वर्किंग डे असल्याने ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम मधून मार्ग काढत  धायरी पोहोचलो। गुगल लोकेशन ने थोडा चकवले मग सरळ ऑटोवाल्याला रस्ता विचारून महानगरपालिका शाळा धायरीत पोहोचलो। मुलांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। माझा मित्र लोकेश लाटे आणि रशीद मणियार या दोघांनी या कार्यक्रम साठी खास पुढाकार घेतला होता। लोकेश ने साने गुरुजींची प्रेरणादायी गीते मुलांकडून म्हणवून घेतली आणि तितकाच प्रतिसाद मुलांनी दिला। पुढे मी 9वि, 10वित शिकणाऱ्या मुलांशी एचआयव्ही एड्स त्याची कारणे, प्रसार, समज, गैरसमज इत्यादी विषयी माहिती देऊन आजवर या एचआयव्ही बाधित बालकांच्या हक्कासाठी सुरू असलेले कार्य व सायकल मोहिमेतून आजवर 40 हजार किमी पेक्षा अधिक सायकल प्रवास विषयी संवाद साधला। विद्यार्थ्यांत विशेषतः मुलींनी एड्स ची लक्षणे, समाजात त्याविषयी असलेले गैरसमज विषयी अत्यंत मुद्देसूद प्रश्ने विचारून शंकांचे निवारण करून घेतली। मुख्याध्यापक हिरेमठ मॅडम नि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। भविष्यात देखील पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषण मुक्तीसाठी सायकल वापरण्याविषयी मुलांना आवाहन करून निरोप घेतला। इथून आमची स्वारी सम्यक फाऊंडेशन च्या कार्यालयात पोहोचली। इथे संदीप आखाडे नावाचा चळवळीतील आणि अत्यंत मेहनती कार्यकर्ता भेटला। तो  सम्यक फाऊंडेशन चे काम सोबत सध्या वृत्तपत्रविद्या विभागात पदवी घेऊन दै लोकमत मध्ये त्याची इंटर्नशिप सुरू आहे। सम्यक फाऊंडेशन चे Gender Equality वर  सखोल असे काम झाले आहे. संदीप कडून संस्थेचे काम जाणून घेतले। त्याने देखील पत्रकारितेच्या शैलीत एचएआरसी संस्थेच्या एचआयव्ही बाधितांच्या मूलभूत प्रश्नावर सुरू असलेल्या कार्याविषयी चर्चा केली।  पुढे निरोप घेऊन आम्ही साने गुरुजी स्मारक येथे पोहोचून छात्रभारती कार्यालय व राष्ट्रीय सेवा दल च्या कार्यालयास भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांना सायकल मोहीम विषयी माहिती दिली। तिथे Sakal Times चा रिपोर्टर निखिल बोरकर खास मुलाखत घेण्यासाठी आला होता। 2008 पासून जीवनरेखा बालगृहातील 18 एचआयव्ही बाधित अनाथ  मुले व मग पुढे ही मुले सेवालाय प्रकल्प हसेगाव लातूर येथे स्थलांतर झाल्यावर वाढलेले व्यापक कार्य, शिक्षण आरोग्य व पुनर्वसन आदी विषयावर कार्य करतांना आलेल्या अडचणी व सायकल मोहिमेतून सुरू असलेली एड्स जनजागृती व त्यातील अनुभव अशी सविस्तर चर्चा करून निरोप घेतला। वाटेत तेजस्विनी मॅडम यांच्या बुधवार पेठेतील सहेली या संस्थेस भेट दिली। येथे  वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांचे संगोपन केले जाते। त्यांचे जगावेगळे असे काम जाणून निरोप घेऊन सकाळपासून 100 किमी सायकल चालवून पुणे स्टेशन पोहोचलो। 
पार्सल ऑफिस पोहोचून सायकल बुकिंग च्या फॉर्मलिटी करून ट्रेन मध्ये चढलो असंख्य आठवणींचा खजिना व ऊर्जा घेऊन पुढील वर्षी तितक्याच जोमाने पुढील मोहिमेस सज्ज होण्यासाठी। इथे थोडा विराम घेतो.....










एचआयव्ही एड्स जनजागृती संवाद यात्रा : मंचर महड पाली

२८ नोव्हेंबर : मंचर महड पाली  १६५ किमी

रात्रीची छान झोप झाल्यामुळे सकाळी पावणे पाचला उठून आवराअवरी करून 05:36 ला सायकलवर सामान बांधून मंचर हुन निघालो। आजचा मुक्काम महड किंवा पाली त्यादृष्टीने लवकर सायकलिंग सुरवात करत 5 किमी नंतर हायवेला लागलो। थोडा चहा बिस्कीट घेतल्यावर सायकलच्या हेड लाईट च्या उजेडात सावधपणे सायकल चालवत पेठ जवळ एक थोडा चढ लागला तो चढून पुन्हा थोडा उतार मग खेडा घाट टॉप ला ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिरला जाणाऱ्या पालखीचे दर्शन घेऊन खेडा घाट उतरणे सुरू केले। दिवस उजडल्याने सभोवतालचे दृश्य नयनरम्य होते। अडीच किमी खेडा घाट उतरून राजगुरूनगर मध्ये प्रवेश केला। बस स्थानक जवळ हुतात्मा  राजगुरू स्मारक चा कुठे बोर्ड दिसतो का पाहू लागलो पण न भेटल्याने पुढे भीमा नदीवरील पूल ओलांडून पुढे आलो. तितक्यात हुतात्मा राजगुरू स्मारक चा बोर्ड दिसला मग परत त्या दिशेने विचारत गल्ली बोळ्यातून हुतात्मा राजगुरू स्मारक चे दर्शन घेण्यास पोहोचलो। भीमा नदीच्या काठावर राजगुरू वाडा आहे तिथेच हे स्मारक उभारले आहे। तिथे राजगुरूंच्या जन्मस्थळ, जन्मखोली व त्यांच्या जीवनावरील विविध पोस्टर लावले होते ते बाहेरूनच पाहून निघावे लागले। सकाळी 10 वाजता हे स्मारक उघडते तरी 07:30 ला त्यांनी बाहेरून पाहण्याची अनुमती दिल्याने या पावन भूमीचे दर्शन घेऊ शकलो। गल्लीतून फिरतांना अनेकांचे सायकल मोहिमविषयी विविध प्रश्न आणि उत्तरे असा संवाद सुरू होता। पुन्हा हायवेला लागून सहज चाकण पोहोचलो। इथून एक रोड तळेगाव कडे जातो म्हणून माहीत नसल्याने मी तसाच पुढे पुण्याकडे जात राहिलो। पुढे मोशी गाव लागल्यावर रस्ता चुकल्याची शंका आली मग लोकांना विचारत आकुर्डी मार्गे देहू पोहोचलो। मी मनात म्हटले बरे झाले रस्ता चुकलो ते निदान संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठस्थान मंदिरास माथा टेकवूया! गर्दी नव्हती आधी इंद्रायणी नदी काठी वसलेले विठ्ठल रुकमाई मुख्य मंदिर व तुकाराम महाराज जन्मस्थळ चे दर्शन घेऊन संत तुकाराम महाराज वैकुंठस्थान मंदिर येथे माथा टेकवून आशीर्वाद घेतला। आता भूक लागली होती पण विचार केला आधी हायवेला लागू म्हणून देहू रोड ऐवजी तळेगाव मार्गे लागू या उद्देशाने भंडारा हिल जवळ चाकण - तळेगाव हायवेला लागलो। तिथे हॉटेल भंडारा येथे मस्त पोटभर मिसळ पाववर ताव मारून पाणी भरून निघालो। तळेगाव पर्यंत रस्ता गजबजलेला, मध्यम वाहतूक व चढ उतार असलेले रस्ते 10 किमी नंतर पुणे मुंबई NH4 हायवेला लागलो। इथून काळजीपूर्वक चालवणे आवश्यक होते कारण प्रचंड वाहतूक, वेगाने चालणारी वाहने म्हणून बरोबर डाव्या साईड ने पेंडलिंग मध्ये एक लय ठेवत वडगाव मार्गे कामशेत पोहोचलो। पुढे थोडा 1 किमी लांब चढ लागला तो चढून लोणावळा च्या दिशेने निघालो। इथून एकीकडे डोंगर रांगा दुसरीकडे रेल्वे ट्रॅक व डावीकडे एक्सप्रेस हायवे असं छान दृश्य दिसते। पाण्याचे छोटे छोटे हायड्रेशन ब्रेक सुरू होते। वाटेत वेट n जॉय वाटरपार्क, विविध रिसॉर्ट्स, कार्ला मार्गे निसर्गरम्य ठिकाण लोणावळात प्रवेश केला। इथे मात्र विविध पर्यटक, स्थानिक, ऑटोवाले सायकलवरील बोर्ड वाचून चौकशी करत होते। येथील प्रसिद्ध लोणावळा चिक्की घेऊन पुढे छान प्रसिद्ध असा तंदुरी चहा घेऊन खंडाळा च्या दिशेने निघालो। वाटेत खंडाळा लेक पाहून थोडा चढ चढून खंडाळा घाट टॉप ला पोहोचलो। इथे विविध सनसेट पॉईंट व व्ह्यूव पॉईंट आहेत। इथून एकीकडे लांब पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा तर दुसरीकडे एक्सप्रेस हायवे, बोगदे असे छान दृश्य दिसते। थोडा  निवांत वेळ घालवत या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत भोर घाट आरामात उतरणे सुरू केले। वाटेत बरीच मंदिर आहेत। बाहेरून एकवीरा आई मंदिराचे दर्शन घेत तीव्र उतारावर सांभाळून सायकल चालवत  भोर घाट उतरू लागलो। 8 किमी उतार नंतर खोपोली गावात प्रवेश केला। उतारावर मजा आली पण मनात विचार केला की उद्या आपल्याला याची परतफेड करायची आहे हा घाट चढून। बरोबर रस्ता विचारत खोपोली हुन महड रोड ला लागलो। 1 वाजता महड येथील अष्टविनायक पैकी एक वरद विनायक  मंदिर पोहोचलो। माझा हा 7वा अष्टविनायक गणपती त्याचे दर्शन घेण्यासाठी रांगेत लागलो। विशेष गर्दी नव्हती। छान चरण दर्शन झाले। बाजूला सुंदर कुंड आहे। 

दर्शन घेऊन नीरा पिऊन अलिबाग येथील अधिकारि श्री जयवंत गायकवाड सरांना फोन केला। त्यांनी 3 वाजता पंचायत समिती खालापूर येथे कार्यक्रम ठेवला होता। मग आरामात खालापूर येथील विश्रामगृह येथे पोहोचून जेवण वगैरे आटोपून 3 वाजल्याची वाट पहात असतांना फेसबुकवरील पोस्ट पाहून परभणी येथील आमच्या वाहिनी सौ रिपल मितेश शहा यांचा फोन की खालापूर त्यांचे माहेर आहे प्लिज घरी जा। पण वेळेची मर्यादा असल्याने त्यांना नकार दिल्याने त्यांचे भाऊ गोपाल शहा भेटण्यास आले त्यांना भेटून खूप आनंद झाला। गोपाल शहा हे मूळचे खालापूर निवासी त्यांचे येथे किराणा दुकान व कोका कोला ची एजन्सी असे नामवंत व्यवसायिक पण त्यांच्या बोलन्यात अत्यंत साधेपणा व मनमिळाऊ स्वभावाचे  असे.  त्यांना  उद्या जेवायला येण्याचे आश्वासन देऊन निरोप घेऊन पंचायत समिती खालापूर येथे पोहोचलो। तिथे बीडीओ साहेबांच्या  हस्ते माझा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गटविकास अधिकारी श्री संजय भोये, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री जयवंत गायकवाड, विस्तार अधिकारी श्री भालेराव मॅडम, दत्तात्रय नाईक व महिला बचत गट च्या सदस्य उपस्थित होत्या। या प्रसंगी मी एचआयव्ही एड्स विषयी माहिती देतांना त्याविषयी आलेल्या विविध गैरसमज मुळे एचआयव्ही बाधित बालके त्यांच्या मुलभुत हक्कांपासून वंचित राहतात। म्हणून त्यांचे मूलभूत हक्क शिक्षण आरोग्य व पुनर्वसन  या प्रश्नावर परिपूर्ण आशा उपाययोजनेची गरज आहे म्हणून या प्रश्नांवर  संवादातून जनजागृती व्हावी म्हणून मी विविध सायकल मोहिमेतून जनजागृती करत असल्याचे म्हणालो। उपस्थितांच्या शुभेच्छा घेऊन निरोप घेतला। 
पावणे चार वाजले होते। पुढे एक चढ चढून पाली फाट्याला लागलो। इथून खरी परीक्षा होती। कारण पाली ते दिघी जेट्टी हा रहदारीचा रस्तावर सिमेंट रोडच्या कामामुळे ठिकठिकाणी खोद काम केलेले होते। सावकाश खड्डे चुकवत सायकल चालविल्यामुळे वेग मंदावला होता। ऍडलॅब इमॅजिका चौकात ताक पिऊन निघालो। पुढे रस्ता चढ उतार व रस्ता खराब असल्याने उताराचा फायदा होत नव्हता पण दोन्ही बाजूला जंगल त्यामुळे सायकल चालवताना उत्साह होता। सकाळ पासून 130 किमी होऊन देखील थकवा नव्हता। उंबरे, दुरशेत नानोसे गाव गेले परळी ला पोहोचलो। उंबरे इथून उबरखिंड छावणीकडे साठी रस्ता फुटतो । उंबरखेड छावणीत निवडक मावळ्यांनी गनिमी कावा पद्धतीने लढा देत ही खिंड लढवून मुघल फौजांना नाकी नऊ आणले होते असा इतिहास आहे।  तर दुरशेत चे नाव मी ड्युइथलॉन साठी ऐकले आहे। इथून केवळ 17 किमी बाकी पण सायंकाळचे 05:45 झाले होते। इथे थोडे पायात गोळे आल्यासारखे वाटू लागले म्हणून चहा व मोनाको बिस्किट घेतले। इथे अनेक जणांनी अष्टविनायक मोहीम विषयी चौकशी केली। चहा मुळे मला देखील थोडा उत्साह व 4 थ्या दिवशीच अष्टविनायक यात्रा पूर्ण होणार म्हणून आनंद असल्याने तितक्याच उत्साहाने उत्तरे देत होतो। मला वाटले आता खराब रस्ता संपला आणि पाली 8 किमी बाकी असताना  अंदाज चुकला. एक साईडने रोड खोदून ठेवल्याने संपूर्ण धुरळामुळे  आणि येणारे वाहने कर्णकर्कश हॉर्न वाजवून खाली उतरण्यास मजबूर करत होते अखेर आता माझी सटकली होती....
सायकल साईड ला घेऊन तोंडावर मास्क आणि डोळ्यावर गॉगल चढवून धुळीच्या साम्राज्यात लढत धुरळा उडवणार्या वाहनातून सावध मार्ग काढण्यास तयार होऊन निघालो। ७ किमी च्या या धुळीच्या ऑफ रोडवर सायकल चालवताना मला युद्धभूमीवर घोडा चालवल्यासारखे वाटले अखेर आमच्या लढाऊ बाण्यापुढे रस्त्याने शरणागती पत्करली आणि 7 किमी नंतर आमची स्वारी अष्टविनायक पाली गावात दाखल झाली। 
पाली येथे माझे तरुणाईच्या वेगळ्या वाटा (गेवराई 2014) मध्ये भेट झालेले फेसबुक मित्र व शिवम प्रतिष्ठान व सृजन यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना जोडणारे प्रमोद जाधव व दापोली येथे बीडीओ म्हणून कार्यरत असलेली त्यांची पत्नी सुवर्णा बागल यांनी शासकीय विश्रामगृह येथे व्यवस्था केली होती। मी फ्रेश होऊन बल्लाळेश्वर अष्टविनायक गणपती मंदिर पाली येथे दर्शनास पोहोचलो। बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन प्रसाद घेतांना तेथील देवस्थान समितीने माझे अष्टविनायक पूर्ण झाल्याबद्दल स्वागत करून परतीच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। दर्शन घेऊन कुंड येथील विविध रंगांची उधळण करणाऱ्या तुषारांचा आनंद घेत मागील 4 दिवसांचा मागोवा घेत बसलो होतो। थोड्या वेळाने थोडं कोकम शरबत घेऊन घरी 8वे अष्टविनायक  पूर्ण केल्याचा निरोप देऊन शासकीय विश्रामगृह येथे पोहोचलो तर पाहतो काय माझे मित्र प्रमोद जाधव खास माणगाव हुन मला भेटण्यासाठी आले होते। त्यांच्याशी त्यांच्या लग्नात त्यांनी केलेल्या पुस्तकरूपी आहेर पासून सृजन यात्रेतून सामाजिक संस्थांच्या भेटी ते शिवम प्रतिष्ठान कराड आशा विविध मुद्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या। रात्रीचे जेवण करून मग केंव्हा झोप लागली ते कळाले नाही।