Sunday, January 23, 2022

आझादी का अमृत महोत्सव निमित्त आमची अट्टारी वाघा बॉर्डर उज्जैन 1320 किमी सायकलवारी 10,11 नोव्हेंबर: रेल्वे प्रवास







आझादी का अमृत महोत्सव निमित्त आमची अट्टारी वाघा बॉर्डर दिल्ली उज्जैन 1320 किमी सायकलवारी

10,11 नोव्हेंबर: रेल्वे प्रवास

 

महामानव बाबा आमटे यांच्या भारत जोडो सायकल यात्रे पासून प्रेरणा घेऊन 2013 पासून दरवर्षी मी काही समःविचारी मित्रांसोबत भारतातील विशिष्ट भागात विविध सायकल मोहिमेचे आयोजन करून एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती करत असतो. 2010 पासून एचआयव्ही संक्रमित अनाथ बालकांचे मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य पुनर्वसनासाठी साठी कार्यरत असून आजवर जीवनरेखा बालगृह परभणी, सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर तसेच इंफॅन्ट इंडिया बीड, पालवी एड्स प्रकल्प पंढरपूर, सूर्योदय बालगृह अकोला येथील एचआयव्ही ग्रस्त अनाथ बालकांच्या मूलभूत प्रश्न गरजांसाठी वेळोवेळी लोकसहभागातून मदत करून आज या संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यावर एआरटी विभाग परभणी येथे उपचार घेणाऱ्या 150 पेक्षा अधिक एचआयव्ही ग्रस्त एक पालक मुलांच्या शिक्षण, आरोग्य, पोषक आहार पुनर्वसन विषयक गरजा विवाहयोग्य मुलींच्या विवाहासाठी मदत असो की निराधार एचआयव्ही ग्रस्त युवती महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीन, पिठाची गिरणी आदी द्वारे मदत केली आहे. चला ही झाली आमच्या कार्याविषयी पार्श्वभूमी

 तर या वर्षीच्या सायकल मोहिमेविषयी बोलूया. खरे तर या वर्षी नागपूर जगन्नाथ पुरी अशा सायकल मोहिमेचे नियोजन आयोजन केले होते. परंतु सोबत येणाऱ्या सहकाऱ्यांच्या शाळेच्या सुट्या कमी झाल्याने तो दौरा रद्द करून मी आणि माझे सायकलिस्ट मित्र पांडुरंग पाटणकर सोबत नवीन मोहिमेचे पूर्वनियोजन आखणी ऐन लक्ष्मी पूजन च्या दिवशी केले

होय ! वाघा बॉर्डर - अमृतसर - दिल्ली- जयपूर - उज्जैन अशा 5 राज्यातून प्रवास निमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी 'कुछ हटके करते है'.

मी व्यवसायाने होमिओपॅथीक डॉक्टर असल्याने जास्त दिवस माझ्या प्रायव्हेट क्लीनिक हुन सुट्टी शक्य नसल्याने 150 किमी सायकलिंग प्रति दिन नुसार नियोजन करणे कमीत कमी खर्चात त्या भागातील सायकलिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स यांच्याशी संपर्क साधून गुरुद्वारा, मंदिर, शासकीय विश्रामगृह आदी ठिकाणी मुक्काम करून लोकांशी संवाद साधून अत्यंत कमी खर्चात नियोजन केले. रोजचा खर्च जेवण, राहणे सोबत 300 ते 350/- प्रति व्यक्ती जाऊ नये याची काळजी आम्ही घेणार या हिशोबाने नियोजन करून सचखंड एक्सप्रेस ने सायकल बुक केली तेथील पार्सल ऑफिस कार्यालय ने सहकार्य केले. 10 नोव्हेंबर ला पूर्णा हुन अमृतसर साठी आमची ट्रेन होती. परभणीतून निघतांना बायको आशा , मुली प्रचिती, शर्वरी यांच्या शुभेच्छा आई आज्जीचे आशीर्वाद घेऊन पूर्णा साठी निघालो.   पूर्णा स्टेशनवर पोहोचल्यावर तेथील सायकल प्रेमी मित्र आनंद अजमेरा, विशाल चितलांगे, विशाल राठोड, अतुल शहाणे बालगोपाल मंडळी असे जवळपास 50 ते 70 जणांनी पूर्णा स्टेशनवर आमचे स्वागत करून भरभरून सायकल प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. हे सर्व स्वागत पाहून एक गोष्ट पक्की की या सायकल प्रेमींच्या शुभेच्छारुपी आशीर्वादाचा जोरावर आम्ही मोहीम फत्ते करणार. असा जणू आत्मविश्वास निर्माण झाला. ट्रेन ची निघायची घोषणा होताच मनात एक थोडीशी धाकधुक निर्माण झाली होती. लगेच वडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. गाडी पूर्णा हुन हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे खंडवा, भोपाळ, दिल्ली मार्गे अमृतसर असा मार्ग होता. सोबत अनेक सरदारजीची सोबत होती. दुसऱ्या दिवशी अमृतसर सायंकाळी पोहोचणार होतो. दुपारी भूक लागल्यावर धुरी स्टेशनवर छोले भटुरे चे गरम पार्सल घेतले. ते पण दोन्ही हातात, ते इतके गरम होते की 4 कोच चालत जाऊन सीट वर पोहोचे पर्यंत तर तळहात दोन्ही लाल झाले होते. बरेच पोळले होते, लगेच थंड पाण्यात वारंवार हात धुवून दाह कमी करत होतो. मनात एकच धाकधुक उद्याची सायकलिंग कशी होईल ? जर यावर blisters निर्माण झाले तर ?

पण सुदैवाने अमृतसर पोहोंचे पर्यंत आराम पडला. Cantharis 30 या होमिओपॅथी औषधाने फरक पडला.

अमृतसर ला पोहोचल्यावर मंजितसिंग यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत आमचे  स्वागत केले. आता प्रश्न होता सायकलचा ? पार्सल ऑफिस 5 वाजताच बंद झाल्याने सायकल उद्या मिळणार अर्थात उद्या 9 नंतरच पुढील नियोजन जसे वाघा बॉर्डर जाणे, फ्लॅग ऑफ वगैरे.....थोडा निराश झालो. पण मंजितसिंग ने दिलासा दिला "वाहे गुरुजी पर भरोसा रखो सब ठीक होगा. " सायंकाळी छेहार्ता साहेब गुरुद्वारा येथे आमची राहण्याची सोय मंजितसिंग यांनी केली होती तिथे आम्ही दर्शन घेऊन लंगरचा प्रसाद घेऊन रात्री लवकर झोपी गेलो

उद्या पहिल्या दिवशीचा 12नोव्हेंबर वाघा अमृतसर फगवाडा अनुभव शेअर करेल 

डॉ पवन चांडक 

9422924861

No comments: