परतीचा प्रवास: पाली पुणे २०० किमी २९ व ३० नोव्हेंबर
दुसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर सकाळी मी आणि प्रमोदने सोबतच
बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन पालिवाला कॉलेज येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे आयोजित एड्स
जनजागृती वर संवाद साधण्यासाठी पोहोचलो। महाविद्यालयातर्फे सत्कार
स्वीकारून एचआयव्ही व एड्स मधील फरक सांगत, सध्याची परिस्थिती, उपाययोजना व
विविध समज गैरसमज विषयी संवाद साधला। शिवाय मागील 10 वर्षांपासून एचआयव्ही
बाधित बालकांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन विषयी सुरू असलेले कार्य
तसेच जीवनरेखा बालगृहात असताना व पुढे 2014 मध्ये सेवालाय प्रकल्प येथे
हि मुले स्थलांतर झाल्यावर व आता ही मुले मोठी झाल्यावर रवी बापटले सरांच्या सेवालय
प्रकल्प तर्फे मुलांच्या स्वयंरोजगार व प्रशिक्षण चे धडे आदी विषयी संवाद
साधला। या संवाद कार्यक्रमात मुली जास्त मोकळेपणाने प्रश्न विचारताना
दिसल्या तर मुले लाजळु होती असे वाटले। शेवटी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा बडगुजर सर, प्राचार्य व उपस्थित सर्वांचा व विशेषतः प्रमोद जाधव जो खास वेळ काढून कालपासून माझ्या सोबतच होता त्याला पुन्हा लवकर भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेऊन परतीच्या
प्रवासाकडे निघालो।
11 वाजले होते आज कामशेत किंवा
पुढे पुण्या जवळ मुक्काम करायचा होता। कालच या रस्त्यावरून आल्यामुळे खड्डे
माहीत होते ते चुकवत सहज 17 किमी पार करत परळी पोहोचलो। तिथून पुढे एका
हॉटेलवर चहा व चिक्की घेतली। त्यां हॉटेल चालवणाऱ्या दाम्पत्याला 4 दिवसांत अष्टविनायक पूर्ण केल्याचे
नवल वाटले। पण अख्या अष्टविनायक यात्रेत रोड खराब असल्याची खंत आमच्या
दोघांच्या बोलण्यात होती। या भागात रेंज नसल्याने फोन असून नसल्यागत होता
पण रहदारी बरीच होती। खोपोली कडे जाताना बरेच छोटे मोठे चढ चढत 1 वाजता
पाली फाटा ओलांडून थोडे पुढे आलो तर गोपाल शहा यांचा फोन की काल आपण घरी जेवण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले ? मी त्यांना नम्रपणे नकार देऊन सोबत चहा घेऊ म्हणालो।
पुढे हॉटेल कृष्णा येथे आम्ही सोबत इडली सांबर व शीत पेय पीत असताना थोड्या गप्पा झाल्या व
त्यांना परभणी येण्याचे आमंत्रण देऊन खोपोलीकडे निघालो। वाटेत जत्रा लागली
- छान रात्रपाळने, विविध खेळ, मौत का कुंवा छान जत्रा सजली होती आणि सोबत
लोकांची गर्दी देखील पुष्कळ होती। गर्दीतून मार्ग काढत खोपोली गावातून NH4
ला लागलो। घोट घोट पाणी पिणे सुरूच होते एक कॉलेज गेल्यावर भोर घाटाची चढाई
सुरू झाली. मी देखील लगेच समोर 1 आणि मागे 3ऱ्या व काही वेळाने पहिल्या गियरवर चेन घेऊन घाट चढणे
सुरू केले। 2 वाजल्याने उन्ह बरेच आणि शिवाय भरपूर सामान असल्याने थोडं जड
जात होतं. अखेर दीड किमी नंतर एक हायड्रेशन ब्रेक घेऊन पुन्हा चढाई सुरू मग 2
किमी नंतर शिंगोबा मंदिर पर्यंत पोहोचलो। इथे मात्र 10 मिनिट चा ब्रेक
घेऊन थोडी चिक्की आणि जवळील माझा ड्रिंक पिऊन सकाळपासूनची पहिली फेसबुक पोस्ट टाकली।
शिंगोबाचे दर्शन घेऊन पुन्हा चढाई सुरू आता खंडाळा घाटाच्या दिशेने उड्डाण
पुलावरून आमची चढाई सुरू असताना वाटेत अनेक पालख्या लागल्या त्यांच्या
सोबत चढतांना आणखी हुरूप येत होता। अखेर शेवटच्या टप्यात घाटांचा राजा च्या
पोस्टर समोर सेल्फी घेत भोर घाट फत्ते केल्याचं मनोमय आनंद साजरा केला। मग
आरामात खंडाळा टॉप वरून लोणावळा पोहोचलो। दुपारचे 03:45 वाजले होते मस्त गारेगार लस्सी पिली. पण आता
वाटले की आपण कामशेत ऐवजी तळेगाव सहज सर करू. तरी किसन टाकमोडे ला मुक्कामाची कुठे सोया होईल का ? म्हणून कॉल करून
निघालो। आरामात पेंडलिंग करत कार्ला गाव क्रॉस केले। कामशेत घाट चा चढ चढून
नाश्ता करण्यासाठी रेस्टॉरंटला पोहोचलो तर तितक्यात किसन टाकमोडे चे भाचे
सुरेश खरसे यांचे आग्रहाचे निमंत्रण मुक्कामी मोशीला या म्हणून पण आता 5
वाजले होते आणि रात्री इतक्या वेळ सायकल चालवणे शक्य नसल्याने त्यांना
नम्रपणे नकार देऊन आभार मानले। तितक्यात निसर्ग सायकलमित्र चे सायकलिस्ट
मारोती पवार यांचा फोन सर मी पिंपरी चिंचवड ला राहतो तुम्हाला माझ्या घरी
मुक्कामी यायचंय। मी लगेच त्याना होकार दिला कारण इथून 30 किमी अंतर बाकी
होते जे मी सहज दीड तासात पोहोचू शकतो। इकडे महाराष्ट्र टाइम्स चे रिपोर्टर
आनंदजी कस्तुरे यांना सध्या एड्सग्रस्त व्यक्तींची विशेषतः बालके यांची
आकडेवारी, त्यांच्या मूलभूत समस्या व सामाजिक सुरक्षा योजना या विषयी फोनवर
माहिती देऊन नाश्ता आटोपून 05:30 ला आमची सायकलस्वारी निघाली वडगाव,
तळेगाव अंतर आरामात कापले मग हेड लाईट ऑन करून सहज देहू रोड क्रॉस केले।
इथून बरीच ट्रॅफिक होती आणी फेसबुकवर मुक्काम विषयी पोस्ट टाकल्याने फोन
येत होते म्हणून थांबून लगेच मुक्कामाची सोय झाल्याची कमेंट टाकून निघालो। 7
वाजता 100 किमी सायकलिंग करून भक्ती शक्ती चौक निगडी मध्ये पोहोचलो तर
पाहतो काय सायकलिस्ट मारोती पवार सर स्वागतास हजर होते। त्यांनी कृष्णनगर
येथील घरी नेले अत्यंत आदरातिथ्यपूर्वक स्वागत केले।
गरम पाण्याने अंघोळ
करून आम्ही दोघं पोटभर जेवलो। मारोती पवार सर रामदेव बाबा यांचे साधक योगा,
प्राणायाम पासून स्वदेशी उत्पादन, सात्विक आहार यावर त्यांचा भर स्वतःचा
व्यवसाय सांभाळून पतंजली चे त्यांचे स्वतःचे स्टोअर आहे। निसर्ग सायकलमित्र
ग्रुपचे अस्सल सायकलिस्ट, मनमिळाऊ स्वभावाचे त्यांच्यासोबत आजवर एचआयव्ही
एड्स पासून सायकलिंग व एड्स बाधित बालकांच्या समस्यावर सुरू असलेल्या
कार्यावर चर्चा केली।
दै सकाळ पिंपरी चिंचवड आवृत्तीचे सागर शेंडे यांनी
फोनवर सायकल मोहिमविषयी मुलाखत घेतली। इंडो सायकलिस्ट क्लब चे गजू दादा आणि
अजित पाटील सर भेटण्यास आले त्यांनी ICC Club तर्फे स्मृतिचिन्ह व T shirt
देऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या। पुण्यात निसर्ग सायकलिंग क्लब आणि
इंडो सायकलिस्ट क्लब दोघांनी सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी फार मोठे
कार्य केले आहे। ICC क्लब सायकलिंग, रनिंग, मॅरेथॉन, Triathlon, Hiking,
Swimming साठी प्रोत्साहन देते ज्याचे आज शेकडो सदस्य आहेत। निसर्ग
सायकलमित्र ग्रुप ने आजवर सायकलिंग सोबत शेकडो झाडे लावून व त्यांचे संगोपन
करून पर्यावरण संवर्धनाचे व्रत जोपासले आहे। माझा सोमनाथ श्रमसंस्कार
छावणीतील मित्र व दै पुण्यनगरी येथील बातमीदार अमोल काकडे भेटण्यास आला
त्यांच्याशी सायकल मोहीम विषयी निवांत गप्पा मारून निरोप घेतला।
ही संपूर्ण
मोहीमच संवाद यात्रा झाली कारण या 5 दिवसात ओळखीचे असो व अनोळखी
अनेकांशी मनमोकळेपणे बोललो, सुरू असलेल्या कामाविषयी भावना व्यक्त करता
आल्या, नवीन मित्र भेटले, फेसबुकवरून अनेकांनी अस्थावाईकपणे वेळोवेळी चौकशी
केली, सायकल खराब झाल्यावर असो की रात्री मुक्कामाची सोय किंवा कुठे एड्स
जनजागृती कार्यक्रम असो प्रत्येकांचे शुभेच्छारुपी पाठबळ सोबत होते म्हणूनच
केवळ 5 दिवसात 600 किमी अष्टविनायक सायकल प्रवास करून पिंपरी चिंचवड
व्यवस्थित पोहोचलो। आता केवळ स्टेशन पोहोचून औपचारिक समारोप बाकी होता पण
समाधानाची ऊर्जा घेऊ झोपलो।
आता औपचारिकता बाकी
30 नोव्हेंबर ची पहाट 5
वाजताच उजाडली साडे पाच तास झोपून देखील फ्रेश होतो। आता मी आणि मारोती
पवार सरांची स्वारी निघाली आळंदीला ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी नथमस्तक
व्हायला।
मला रोड माहीत नव्हता मी केवळ मारोती पवार
सरांना फॉलो करत पेंडलिंग करत होतो। आरामात 15 किमी नंतर पुणे आळंदी रोड ला
लागलो। 06:30 वाजता संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर पोहोचलो तर तिथे काल
ज्यांनी घरी मुक्कामी यायचे निमंत्रण दिले होते असे आदरणीय सुरेश खरसे सर
आमची वाट पाहत होते। सायकली व्यवस्थित पार्क करून मुख दर्शन घेतले कारण
लाईन मोठी असून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी रांगेत उभे असतांना आपण केवळ
सायकलवर आलोय म्हणून ट्रस्टीना दर्शनासाठी सोडा म्हणणे योग्य वाटले नाही
म्हणून मुख दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारून मृदंग वाजवणाऱ्या माऊलींचे
आशीर्वाद घेऊन ही अष्टविनायक यात्रा पूर्ण झाल्याचे आभार मानले। आता आमची
स्वारी मोशी कडे खरसे सरांच्या घरी नाश्ता साठी निघाली। सरांच्या
घरच्यांनी छान पोहे व चहा देऊन आदरातिथ्य केले। सुरेश खरसे सर मुळचे
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी जवळ त्यांचे गाव अनेक वर्षापासून पुणे येथे एक
कंपनीत स्थाईक झालेले अशा खरसे कुटुंबीयांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पिंपरी
चिंचवड पोहोचलो। 11 वाजता महानगरपालिका शाळा धायरी येथे एड्स जनजागृतीपर
संवादाचा कार्यक्रम होता म्हणून पटापट पॅकिंग करून सायकलला बांधून पवार
कुटुंबियांचे आभार मानून निरोप घेतला। तरी रस्ता दाखवायला सर मुठा
पुलपर्यंत आले। पुढे हायवेने आरामात पेंडलिंग करत निघालो वाटेत आरोग्यदायी नीरा आणि
हायड्रेशन ब्रेक सुरू होते। पण गियर सेटिंग मध्ये प्रोब्लेम आल्याने चेन
डिरेलर सोडत होती। मग वारंवार थांबून सेटिंग करत होतो। वर्किंग डे असल्याने
ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम मधून मार्ग काढत धायरी पोहोचलो। गुगल लोकेशन ने
थोडा चकवले मग सरळ ऑटोवाल्याला रस्ता विचारून महानगरपालिका शाळा धायरीत
पोहोचलो। मुलांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले। माझा मित्र लोकेश लाटे
आणि रशीद मणियार या दोघांनी या कार्यक्रम साठी खास पुढाकार घेतला होता।
लोकेश ने साने गुरुजींची प्रेरणादायी गीते मुलांकडून म्हणवून घेतली आणि
तितकाच प्रतिसाद मुलांनी दिला। पुढे मी 9वि, 10वित शिकणाऱ्या मुलांशी
एचआयव्ही एड्स त्याची कारणे, प्रसार, समज, गैरसमज इत्यादी विषयी माहिती
देऊन आजवर या एचआयव्ही बाधित बालकांच्या हक्कासाठी सुरू असलेले कार्य व
सायकल मोहिमेतून आजवर 40 हजार किमी पेक्षा अधिक सायकल प्रवास विषयी संवाद साधला। विद्यार्थ्यांत विशेषतः मुलींनी एड्स ची लक्षणे, समाजात त्याविषयी असलेले गैरसमज
विषयी अत्यंत मुद्देसूद प्रश्ने विचारून शंकांचे निवारण करून घेतली। मुख्याध्यापक हिरेमठ
मॅडम नि शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। भविष्यात देखील पर्यावरणाचे रक्षण व
प्रदूषण मुक्तीसाठी सायकल वापरण्याविषयी मुलांना आवाहन करून निरोप घेतला।
इथून आमची स्वारी सम्यक फाऊंडेशन च्या कार्यालयात पोहोचली। इथे संदीप
आखाडे नावाचा चळवळीतील आणि अत्यंत मेहनती कार्यकर्ता भेटला। तो सम्यक
फाऊंडेशन चे काम सोबत सध्या वृत्तपत्रविद्या विभागात पदवी घेऊन दै लोकमत
मध्ये त्याची इंटर्नशिप सुरू आहे। सम्यक फाऊंडेशन चे Gender Equality वर
सखोल असे काम झाले आहे. संदीप कडून संस्थेचे काम जाणून घेतले। त्याने
देखील पत्रकारितेच्या शैलीत एचएआरसी संस्थेच्या एचआयव्ही बाधितांच्या
मूलभूत प्रश्नावर सुरू असलेल्या कार्याविषयी चर्चा केली। पुढे निरोप घेऊन
आम्ही साने गुरुजी स्मारक येथे पोहोचून छात्रभारती कार्यालय व राष्ट्रीय
सेवा दल च्या कार्यालयास भेट देऊन तेथील कार्यकर्त्यांना सायकल मोहीम विषयी
माहिती दिली। तिथे Sakal Times चा रिपोर्टर निखिल बोरकर खास मुलाखत
घेण्यासाठी आला होता। 2008 पासून जीवनरेखा बालगृहातील 18 एचआयव्ही बाधित
अनाथ मुले व मग पुढे ही मुले सेवालाय प्रकल्प हसेगाव लातूर येथे स्थलांतर
झाल्यावर वाढलेले व्यापक कार्य, शिक्षण आरोग्य व पुनर्वसन आदी विषयावर
कार्य करतांना आलेल्या अडचणी व सायकल मोहिमेतून सुरू असलेली एड्स जनजागृती व
त्यातील अनुभव अशी सविस्तर चर्चा करून निरोप घेतला। वाटेत तेजस्विनी मॅडम
यांच्या बुधवार पेठेतील सहेली या संस्थेस भेट दिली। येथे वेश्याव्यवसाय
करणाऱ्या महिलांच्या मुलांचे संगोपन केले जाते। त्यांचे जगावेगळे असे काम
जाणून निरोप घेऊन सकाळपासून 100 किमी सायकल चालवून पुणे स्टेशन पोहोचलो।












No comments:
Post a Comment