Wednesday, December 5, 2018

पुणे अष्टविनायक सायकलवर संवाद यात्रा : रांजणगाव ओझर लेण्याद्री मंचर 115 किमी


27 November 2018: रांजणगाव ओझर लेण्याद्री मंचर 115 किमी 

पहाटे 04:30 वाजताच जाग आली। फ्रेश होऊन सायकलच्या स्पोक्स ला काही करता येईल का म्हणून पाहू लागलो तर लक्षात आले की 2 स्पोक्स तुटलेत 4 लूज झालेत। त्याला तसेच टाईट करून निघण्याची तयारी सुरू केली। मनात द्विधा मनःस्थिती होती की 11 वाजे पर्यंत इथेच वाट पाहून मेकॅनिक शोधावा किंवा तसेच नारायणगाव च्या दिशेने चालवत न्यावे। गणपती बाप्पांचा आशीर्वाद सोबत आहेच ना काही होणार नाही।  रामा अभंग दाम्पत्याचा निरोप घेऊन सकाळी 6 वाजता लाईट लावून रांजणगाव मंदिर पासून उजवीकडे वळलो। इथून रोड थोडा चढ उताराचा पण ऑफ रोड सोबत वारंवार स्पीड ब्रेकर असल्याने सावकाश चालवत मलठण रोड ला लागलो। वाटेत मॉर्निंग वॉक करणारे अनेक लोक भेटत होते। सायकलचे मागचे चाक पूर्ण आऊट असल्याने आवाज करत होते जड देखील जात होते. शिवाय उतारावर वेग देखील येत नव्हता। वाटेत एकाने मलठण ला सायकल दुरुस्तीचे दुकान असल्याचे सांगितले आणि जिवात जीव आला। 7 वाजले होते दुकान बंद होते पण त्याच्या घरी विचारले असता 30 मिनिटाने तो आला। त्याने पाहिले असता आणखी 2 असे ऐकून 4 काड्या तुटल्या होत्या। त्याने चाक उघडला, छरे काढले पण फ्री व्हील चा पाना नसल्याने ते निघेना। शेवटी त्याला आहे तो स्पोक्स टाईट करून तुटलेले स्पोक्स काढून टाकण्याची विनंती केली। किमान नारायणगाव पर्यंत जाईन या आशेने निघालो। त्याने केवळ 10 रुपये भवणी म्हणून घेतले। चौकात आलो नसेल सायकल जड जाऊ लागली। तितक्यात शिक्रापूर येथील 4 सायकलिस्ट भेटले त्यांनी नारायणगाव किंवा मंचर शिवाय सायकल दुरुस्ती होणार नसल्याचे सांगितले। मग त्यांचा निरोप घेतला मागील ब्रेक काढून आमची स्वारी निघालो ब्रेकलेस सायकलिंग टू नारायणगाव 45 किमी बाकी। 

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावरून पेडल मारत निघालो वाटेत कवठे गाव ओलांडून काळू बाई मंदिराचे बाहेरूनच दर्शन घेऊन पारगाव शिंगवे पोहोचलो। इथे साखर कारखाना असल्याने बरीच वर्दळ आहे। येथील ओली भेळ प्रसिद्ध आहे। भूक लागली कारण सकाळपासून केवळ चहा बिस्किटवर होतो। ओली भेळ खात असतांना सायकलवरील बोर्ड वाचून अनेक तेथील गिऱ्हाईक सायकल मोहिमविषयी प्रश्नांची सरबत्ती सुरू होती। शेवटी चहा पिऊन बॉटल भरून नारायणगाव कडे निघालो। वाटेत कालचीच काष्टी ला लागलेली घोड नदी ओलांडून रोड ला लागलो। येथे मीना नदी घोड नदीच्या संगमावर छान संगमेश्वर मंदिर आहे। थोडे फोटोसेशन करून निघालो। रांजनी, मांजरवाडी मार्गे 11 वाजता नारायणगाव पोहोचलो। आधी तेथील हायवे पोलिसांना विचारून सायकल शॉप शोधले। नाशिक हायवेवर अजंठा सायकल मार्ट मोठे दुकान होते। त्याच्या कडे पोहोचून मालकाला सर्व अडचण सांगितली। त्याच्या कडे बरीच गर्दी होती। अखेर 45 मिनिटाने नंबर लागला। त्यांन व्यवस्थित चाक उघडून, ट्यूब टायर बाजूला करून रिंग बाहेर काढले पण फ्री व्हील उघडण्यासाठी त्याच्या कडे देखील पाना नाही। पूर्ण शोधाशोध केल्यावर मालक मला पुण्याला घेऊन जा म्हणाला तेंव्हा क्षणभर मी घाबरलो की आपली यात्रा खंडित होते का ........

शेवटी त्या मालक मेकॅनिक दोघांना विनंती केली की काहीही करा पण हे दुरुस्त करून द्या। मग काय झाले की त्या मेकॅनिक ला अचानक हुरूप आला फ्रीव्हील चा पाना नसतांना देखील त्याने छानपैकी 5 नवीन  स्पोक्स जोडुन होईल तितका आऊट काढण्याचा प्रयत्न केला। थोडं ब्रेक ला घासत होते तिथे देखील हात फिरवून 1 तासात सायकल रेडी करून दिली। त्याला बिल विचारले असता फक्त 50 रुपये घेतले। गणपती बाप्पा मोरया नाव घेऊन त्याचे आभार मानुन निरोप घेऊन ओझर कडे निघालो।  

ओझर 10 किमी मला वाटले अर्धा तासात सहज पोहोचू पण इथे रस्ताच  नाही प्रचंड  ऊस वाहतूक मुळे पूर्ण उखडला गेलाय त्यामुळे 2 वाजता ओझर पोहोचलो तर स्वागतास माझा सोमनाथ छावणीतील शिबिरार्थी सुदर्शन कांबळे सर्व मित्र परिवार स्वागतास हजर। ओझर विघ्नहर गणपतीचे दर्शन गर्दी नसल्याने शिवाय दागडुजीचे काम चालू  असल्याने लगेच झाले। 

विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.

विघ्नहर देवस्थान समितीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। तेंव्हा मी एचआयव्ही बाधित बालकाच्या मूलभूत प्रश्नांवर सायकल मोहिमेतुन सुरू असलेल्या यात्रे विषयी जनजागृतीपर संवाद साधला। शेवटी सर्वांचा निरोप घेत तलाव जवळ फोटो काढून लेण्याद्री रोड ला लागलो। इथून केवळ 15 किमी पण अत्यंत खराब रस्ता म्हणून कॅनॉल रोड ने निघालो। पुढे एका निसर्ग ग्रामीण पर्यटन केंद्र येथील प्रसिद्ध मासवडी जेवण जेवलो। या भागात बेसनाच्या वड्या त्यात मसाला भरून मासवाडी तयार करतात जी या भागात  प्रसिद्ध आहे। जेऊन लेण्याद्री रोड ला लागलो पुढे एक रस्ता शिवनेरी किल्ला तर दुसरा लेण्याद्री कडे जातो। पुढे अत्यंत कठीण भर उन्हात घाम काढणारा असा दीड किमीचा चढ चढून लेण्याद्री पोहोचलो। पार्किंग ला सायकल लावून अवघ्या 10 मिनिट मध्ये 350 पायरी चढून लेण्याद्री गणपती मंदिर पोहोचलो।


लेण्याद्री (गिरिजात्मज) हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.  मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे. या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाहीत. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.
या देवस्थानाच्या पूर्व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत

इथून खूप विहंगम दृश्य दिसते समोर शिवनेरी किल्ला आणि दुसरीकडे भिमाशंकर कडे जाणाऱ्या डोगररांगा। लेण्याद्री गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे दर्शन घेऊन खाली सहज उतरलो। लिंबू पाणी घेऊन सुदर्शन चा निरोप घेतला पुन्हा भेटण्याच्या अटीवर। आता राजगुरूनगर मुक्काम शक्य नव्हते कारण पावणे पाच वाजले होते म्हणून मंचर मुक्काम करायची इच्छा असलेली फेसबुकवर पोस्ट टाकून निघालो। थोडं जुन्नर जवळ आलो असेल तितक्यात धुळे चे सायकलिस्ट सायकलवर नर्मदापरिक्रमा केलेले डॉ प्रशांतचंद्र पाटील सरांचा कॉल की त्यांचा मित्र डॉ ओंकार काजळे कडे मंचर येथे सोय केलीय म्हणून। लगेच आनंदाने खड्डे चुकवत एक नदी ओलांडून जुन्नर गावातून रस्ता विचारात नारायणगाव रोड च्या दिशेने निघालो। वाटेत शेतकरी हॉटेल वर चहा बिस्किटंचा ब्रेक घेतला। त्या हॉटेलचे मालक कबड्डीपटू होते जे अनेकवेळा परभणीत स्पर्धे निमित्त आले होते। चहा बिस्कीट घेतल्यावर पैसे देऊ केले तर त्यांनी नम्रपणे नकार देत पुन्हा येण्याचे आश्वासन दिले। 6 वाजता नारायणगाव गावातून ट्रॅफिक मधून मार्ग काढत असतांना अनेकांचे लक्ष माझ्या जनजागृती बोर्ड कडे वेधले जात होते। सायंकाळ झाल्याने  सायकलचा लाईट ऑन करून सहजपणे मंचर गाठले। इथे पाहिले तर मर्सिडीज प्रमाणे Montra & Track n Trail Bicycle चे शोरूम पाहून हपकलो।  डॉ ओंकार काजळे सर स्वतः घ्यायला आले होते। त्यांनी सहकुटुंब स्वागत केले। डॉ ओंकार डॉ सौ काजळे दोघेही BAMS डॉक्टर असून जनरल प्रॅक्टिश करतात तर त्यांचे भाऊ वडील वकील असून त्यांचे गारमेंटचे मोठे दुकान आणि संपूर्ण कुटुंब साई भक्त आहेत। फ्रेश होऊन त्यांच्या कुटुंबासह छान जेवण घेत निवांत आरोग्यपासून ते सायकलिंग एड्स जनजागृती पुनर्वसन विषयी सुरू असलेल्या कार्याविषयी संवाद साधला। 9 वाजता निरोप घेऊन झोपी गेलो कारण उद्याचे अंतर बरेच होते। 









Tuesday, December 4, 2018

पुणे अष्टविनायक सायकलवर संवाद यात्रा 26/11/18: पाटस सिद्धटेक रांजणगाव 111 km

26/11/18: पाटस सिद्धटेक रांजणगाव 111 km 


सायकलवरून जनजागृती कशी शक्य आहे हा अनेकांचा प्रश्न ? मला याच प्रश्नास उत्तर म्हणून एक प्रतिप्रश्न विचारावा वाटतो, आजवर शासन पातळीवर टीव्ही, वर्तमानपत्र, रोड शो, रेड रिबन एक्सप्रेस च्या माध्यमातून इतकी जनजागृती झाली. तरी आजही नारळ पानी अथवा कोका कोला पिऊ नका त्यात एचआयव्ही रक्त मिश्रित आहे। परभणी येथे जीवनरेखा बालगृहात मुले होती तेंव्हा देखील असाच परिसरातील लोकांमध्ये गैरसमज होता की इथे हे बालगृह नकोय कारण तर डास चावल्यामुळे एचआयव्ही चा प्रसार होईल ....
म्हणजे आजही समाजात असे अनेक गैरसमज आहेत जे केवळ संवादातूनच दूर होणे शक्य आहे आणि त्यासाठी सायकलवारी जगात लय भारी
पाटस येथे जगताप सरांकडे रात्री छान झोप लागली होती। पहाटे लवकर आवरून जगताप वहिनींनी केलेला सुमधुर असा काळा चहा घेऊन त्यांचा निरोप घेऊन 06:30 ला निघालो। हायवेला थोडे पुढे गेल्यावर टोलनाका ओलांडून डावीकडे दौंड च्या दिशेने लागलो। या भागात उसाचे उत्पादन भरपूर आहे शिवाय साखर कारखाने बरेच असल्याने ठिकठिकाणी उसाने भरलेले ट्रक भेटत होते। पण इथून रस्ता बराच खराब होता। शिवाय कालच्या खराब रोड मुळे मागील चाकात थोडे आऊट आले होते। तरी तसेच पायडल मारत 07:30 ला भीमा रेल्वे उड्डाण पूल ओलांडून दौंड शहरात प्रवेश केला। दौंड हे पुणे नगर च्या सीमेवरील तालुका। दौंड हे फार मोठे रेल्वे जंक्शन असून इथून सोलापूर दक्षिण भारत तर मनमाड दिल्ली व पुणे बारामती असा रूट फुटतो। सिद्धटेक चा रोड विचारून निघालो तर वाटेत शाळकरी मुलांची लगबग दिसत होती बहुतेक 26 पासून दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू होणार होत्या। स्टेशन, स्मशान भूमी ओलांडून सिद्धटेक रोड वर 10 किमी पुढे आलो असेल भूक लागली होती लगेच एक चहाची टपरी गाठून मस्त क्रीम बिस्कीट आणि चहा घेऊन निघालो। थोडं पुढे गेलो असेल तर ओ साहेब थांबा थांबा म्हनुन कोणी आवाज देत होते। थोडं थांबून पाहतो तर 50 वर्षाचा एक व्यक्ती जवळ येऊन मोरया म्हणत नमस्कार घातला। बोर्ड वाचून त्याला माझ्या सायकल मोहीम विषयी अंदाज येऊन म्हणाला मी 'राजेंद्र बुब' दौंड येथील रहिवासी आजवर शास्त्रोक्त पद्धतीने 12 वेळेस पायी अष्टविनायक यात्रा केलीय। मी लगेच त्यांना साष्टांग नामस्कारच घातला। आयला इथे एकदा निघालो तर सरकार आणि बांधकाम विभागाच्या नावाने खडे फोडायलो आणि हा व्यक्ती 12 वेळा यात्रा केलीय। त्यांनी सर्व रूट बद्दल मुखपाट असल्यासारखे माहिती दिली आणि आशीर्वाद देऊन काहीही अडचण असल्यास कॉल करा म्हणून निरोप घेऊन निघालो। पुढे देऊळगाव मार्गे सायकल चालवत खड्डे चुकवत भीमा नदीच्या पुलावर आलो मस्त फोटोसेशन करून सिद्धटेक तिसरा अष्टविनायक ला पोहोचलो। आज चतुर्थी असल्याने बरीच गर्दी होती। गर्दीतून मार्ग काढत प्रवेश द्वाराजवळ एका टपरीवाले काकांची परवानगी घेत सायकल पार्क केली। गर्दी होती तरी लगेच दर्शन झाले।
सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. . या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.
असा इतिहास जाणून घेऊन प्रसाद घेऊन बाहेर आलो तर पाहतो काय गावातील बरेच पोरं गियर ची सायकल व बोर्ड पाहून सायकलजवळ उत्सुकतेने जमली होती। त्यांना व उपस्थित गावकऱ्यांना मोहिमेची माहिती देत निरोप घेतला। भूक लागली होती आणि टपरीवर मस्त साबुदाणा वडे चा सुगंध दरवळत होता मग काय मस्त 3 वडे दाबून हणाले व चहाचा घोट घेत त्या काकांना रांजणगाव चा रस्ता विचारला। 3 रस्ते आहेत एक दौंड मार्गे 125 किमी, दुसरा शॉर्ट कट पण खराब रस्ता गावागावातून 110 किमी तर तिसरा श्रीगोंदा मार्गे 140 किमी।
मी देऊळगाव मार्गे निघालो। देऊळगाव ओलांडून वाटेत लोकांना वाट विचारत सायकल चालूवू लागलो। पुढे भीमा नदी ओलांडून खडखड रस्त्यावर पेडल मारत अजनुज गाव लागले। थोडा चढ चढून गावात पोहोचलो। रस्ता खराब असला तरी इकडचे गाव व शेतकरी मेहनती व सधन दिसत होते गावागावात दूध संकलन केंद्र, छान फार्म हाऊस दिसत होते। भीमा नदी काठ असल्याने शेत जमीन सुपीक दिसत होती। पुढे काष्टी गाव लागले। काष्टी येथील बाजारपेठ मोठी असल्याने बरीच वर्दळ होती। इथे मात्र अनेकांनी सायकल मोहीम विषयी प्रश्न विचारले त्यांना उत्तर देत घोड नदी ओलांडून न्हाव्वारे रोड ला लागलो। या भागात कांद्याचे भरगोस पीक घेतात। जागोजागी साठवणीघर दिसत होते। इनामगाव च्या पुढे आलो नसेल भूक लागली होती। । जवळ सिद्धटेक चा मोदक प्रसाद होता तो खाऊन पुढे निघालो पाणी संपले होते। पुढे शिरसासगव ला पाणी भरून घेऊन थोडं पुढे निघालो तर पुन्हा कॅरियर चा कट कट आवाज तसच सायकल चालवत पुढे निरवी ला एका ऑटोमोबाईल मेकॅनिक ने जुगाड करून नट बसवून दिले जे पुढे निघाले नाही। निरवी व निमोणा पर्यंतचा रस्ता खूप चढ उतार पठार असलेला शिवाय रस्ता खराब असल्याने उतारावर सांभाळून खड्डे चुकवत सायकल चालवत होतो। या रस्त्यावर अत्यंत तुरळक रहदारी होती। पुढे निरवी पोहोचलो।
इथून एक रस्ता न्हावरा तर दुसरा गुणात मार्गे निमोणे हुन रांजणगाव कडे। 2 वाजले होते पोटात कावळे ओरडत होते। गुणात ते निमोणे खराब रस्ता पार करून निमोणे पोहोचलो। 2 वाजता जिल्हा परिषद च्या शाळा सुटली होती। अनेक मुले सायकल कडे व गावकरी बोर्ड वाचून प्रश्न करत एकटेच का ? किती गणपती झाले ? पण एकाने देखील उद्धट प्रश्नकेला नाही कदाचित गावातील संस्काराचा भाग असेल की वाटसरुणा मदत करावी। मस्त राईस प्लेट आणि सोबत ताक मागवून जेवलो। भूक लागलेली असल्याने ताट चकाचक केले। उन्ह बरेच होते त्यात पाईपलाईन रस्ता पकडून करडे गावात पोहोचलो। इथून रांजणगाव औद्योगिक वसाहत सुरू होते पुढे कारेगाव हुन नगर हायवेला लागलो। 3:30 ला आरामात 115 किमी सायकलिंग करून रांजणगाव गणपती पोहोचलो।
इथे स्वागतास माझ्या आत्याच्या गावचे गावकरी व काकांचे (फुफाजी) मित्र रामा अभंग पत्नीसह उभे होते। ते मूळचे हातगाव ता शेवगाव जि अहमदनगर चे पण दुष्काळ मुळे गाव सोडून इथे रांजणगाव इथे एका कंपनीत स्थायिक झाले होते। इथे लांडे वस्ती मध्ये त्यांची एकच खोली पण त्या दाम्पत्याचे मन बंगल्याहून मोठे होते। सायकलवर प्रवास असल्याने रांजणगाव महागणपती देवस्थान समितीने लाईन मध्ये न लागता त्वरित दर्शन करू दिले।
रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.
दर्शन घेतल्यावर सायकलवरील बोर्ड पाहून अनेक पर्यटक भाविक कुतूहलाने विचारत होते तुमची संस्था का ? कशासाठी काम करते ? कितवा गणपती झाला ?
त्यांना उत्तरे देतांना मनात एकाच प्रश्न की सायकलचे मागील चाक आऊट झाल्याने सायकल जड जात होती। निरवी पासून रांजणगाव असा 33 किमी सपाट व उतार असून देखील अत्यंत त्रास झाला होता। गाव नुसते मोठे पण 2 तास शोधून एकही मेकॅनिक सापडला नाही। एक बोर्ड वर लिहिलं होतं की आऊट काढून मिळेल पण तो दुसऱ्या दिवशी 11 वाजता येणार होता त्यामुळे मग नाईलाजाने रामा च्या घरी मुक्कामी आलो। त्या दाम्पत्याने छान आदरातिथ्य केले। लांडे वस्ती चे मालक यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। पुढे आश्चर्य म्हणजे फेसबुक वरील पोस्ट पाहून माझा सोमनाथ श्रमसंस्कार छावणीतील मित्र किशोर अदक भेटायला आला तेंव्हा सर्व 2012 च्या आनंदवन सोमनाथ मधील जुन्या आठवणी ताज्या झाल्या। मस्त जेऊन लवकरच 08:30 ला झोपी गेलो की उद्या पुढे नारायणगाव रस्त्यावर एक चांगला मेकॅनिक मिळेल या आशेने।









पुणे अष्टविनायक सायकलवर संवाद यात्रा: पहिला दिवस: पुणे -थेऊर - मोरगाव -पाटस 115 km

पहिला दिवस: पुणे -थेऊर - मोरगाव -पाटस २५ नोव्हेंबर २०१८ 
 
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एखादी मोठी सायकल मोहीम करावी अशी इच्छा होती। अर्ध नर्मदा परिक्रमा करावी असा विचार दिवाळी पर्यंत मनात होता। पण नंतर विचार केला की अर्ध परिक्रमा ऐवजी एका दमात पुढील वर्षी संपूर्ण नर्मदा परिक्रमा करू म्हणून मग छोट्या मोहीम कराव्यात असा विचार मनात होता। पुरी, भुवनेश्वर, विशाखापट्टणम असे 800-1000 किमी च्या टूर करूया असे विचार सुरू असतांना प्रत्यक्ष गुगल ने मोजले असता सायकल प्रवास व टूर पूर्ण केल्यावर परतीचा प्रवास असा 12 दिवसाची प्लॅनिंग होऊ लागली जी मला आज घडीला इतके दिवस क्लीनिक बंद ठेवणे शक्य नव्हते। शिवाय पक्षी मित्र संमेलन असल्याने माझा सायकलिंग पार्टनर डॉ संदीप साखरे याला देखील दोन्ही साठी सुट्या घेणे शक्य नसल्याने मग छोट्यात छोटा पण सुरवात व शेवट करणे सोयीचे जावे व अधिकाधिक लोकांशी संवाद साधता यावा म्हणून अष्टविनायक सायकल मोहीम आखली। पण नियोजन 21 नोव्हेंबर नंतर आई बाबा स्कॉटलँड हुन परत आल्यावरच शक्य असल्याने मला वेळेवर पार्टनर मिळणे कठीण असल्याने एकट्याने सायकल चालवायची ठरले. पण पेडल मारतांना सर्व मित्रांचे शुभेच्छा रुपी बळ आपल्या सोबत असेल या विचाराने 6 दिवसात पुणे अष्टविनायक पुणे अशी मोहीम आखून 24 तारखेला पनवेल एक्सप्रेसने पुणे जाण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली। मला शुभेच्छा देण्यासाठी माझे गुरू व सेवालय प्रकल्प संस्थापक प्रा रवी बापटले सर खास हसेगाव लातूरहून आले होते। त्यांच्या व आई बाबांच्या, पत्नी आशा, 2 मुली प्रचिती व शर्वरी व आजी यांच्या शुभेच्छा घेऊन पनवेल एक्सप्रेस ट्रेन मध्ये सायकल बुक करून ट्रेन ने निघालो। यावेळेस विदर्भ सायकल मोहीम नंतर एकटाच असल्याने थोडा नर्व्हसपणा जाणवत होता। पण मग लगेच स्वतःला सावरत, समजूत घालत की या मोहिमेत अनेक नवीन मित्र, सोमनाथ छावणीतील व त्या भागात राहणाऱ्या सम विचारी मित्र भेटतील या विचाराने जेऊन झोपी गेली। 5 वाजता जाग आली तर कळले की ट्रेन 1 तास उशिरा धावत आहे। तोवर ट्रेन मध्येच फ्रेश होऊन 07:30 वाजता पुणे पोहोचून सहजपणे पार्सल ऑफिसवरून सायकल सोडवून बाहेर आलो। तर स्वागताला सागर खरात, सोमनाथ छावणीतील सर्वांच्या मदतीला धावून येणारा दोस्त किशन टाकमोडे व छात्रभारती संघटनेच्या माध्यमातून यशस्वीपणे कँडल मार्च काढून दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले असा लोकेश लाटे या त्रिमूर्तींनी माझे स्वागत केले। 
 
सोबत नाश्ता आणि सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत 2013 नंतर आज आम्ही भेटलो होतो तर जुन्या आठवणी आठवत इडली सांबर चा आस्वाद घेत गप्पा मारल्या। 
 
9:15 वाजले होते व पहिला गणपती थेऊर करायचा होता म्हणून विलंब न करता त्यांचा निरोप घेऊन थेऊर कडे निघालो। सोबत काही किमी मुंढवा फाट्या पर्यंत किशनने रस्ता दाखवून शुभेच्छा देऊन तो परत गेला। पुढे मुंढवा, मांजरी पर्यंत पुण्यातून च गेल्यासारखे गजबजलेले रस्ते होते। मांजरीला भेटायला सोमनाथ छावणी 2012 तील मित्र पवन इंदूरकर आला। वेळेची मर्यादा असल्याने थोड्या गप्पा मारून पुन्हा यायचे वचन देऊन त्याचा निरोप घेऊन पुढे निघालो। सायकलिंग करत मुळा मुठा नदीवरील पूल ओलांडून नदी कोलवाडी मार्गे थेऊर येथे पोहोचलो। इथे देखील औद्योगिक वसाहती असल्याने रस्ता वर वर्दळ बरीच होती। पण कोलवाडी ते थेऊर रस्ता दरम्यान उसाचे मळे आणि त्यात पाणी सोडल्याने सायकल चालवताना सकाळी 10 वाजता देखील थंडी वाजत होती। वाटेत बच्चा कंपनी गियर ची सायकल म्हणून कौतुकाने टाळ्या वाजवत होती। थेऊर गावात पोहोचून तेथील चहा च्या टपरीजवळ सायकल पार्क केली। सायकलवरील बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता। अनेकांचे प्रश्न कुठून आले, कुठे व कशासाठी चालले व एकटेच का ? याची उत्तरे पुढील 6 दिवस आपल्याला द्यायची आहेत याची तयारी करूनच मी संवाद साधत होतो। रविवार असल्याने श्री चिंतामणी गणपती मंदिर जे अष्टविनायकपैकी एक असल्याने बरीच गर्दी होती। 45 मिनिट लाईन मध्ये लागल्यावर दर्शन झाले। त्या दरम्यान मंदिराचा इतिहास देखील वाचून झाला। 
 
ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे। श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. 
 
11 वाजले होते सायंकाळी मुक्कामाची सोय भिगवण चे सायकलमित्र संजय चौधरी यांनी दौंड ला केली होती। नीरा ड्रिंक पिऊन हळू हळू सोलापूर हायवेला लागलो पुढे कुंजीरवाडी नंतर उरळीकांचन येथील चौकात जेजुरी मोरगाव चा रस्ता विचारून जेजुरी रोड ला लागलो। इथून खरी परीक्षा होती कारण उरळीकांचन ते जेजुरी रस्ता अत्यंत खराब, खडतर होता। या भागात तुलनेने कमी पाऊस व डोंगराळ भाग यामुळे आसपास चा परिसर ओसाड जाणवत होता। शिंदवणे गाव ओलांडून एका टपरीवर चहा व लाडु घेतला। सगळ्यांचा एकच प्रश्न तुम्ही एकटेच का ? कंटाळा येत नाही का ? मी देखील हसत त्यांना एकच उत्तर अरे राव तुम्ही सगळे आहात ना सोबत मग कशाला बोर होणार आणि सोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद सो नो चिंता....ओन्ली सायकलिंग...  पुढे अडीच किमी चा घाट लागला तसा हा छोटा घाट पण कमी अंतरात तीव्र चढ व खराब रस्ता व सोबत 8 किलोचे सामानाचे वजन त्यामुळे 2 मिनिटाच्या ब्रेक घेऊन चढलो। वाटले इथून तरी बरा रस्ता लागेल पण नाही वाघापूर, बेलसार मार्गे थेट जेजुरी पर्यंत खडखड रस्ता। दुपारचे 2 वाजले होते। उशीर झाल्याने खंडोबा मंदिराचे कळस घेउन मोरगाव रोड कडे निघालो। वाटेत लस्सी पिऊन पेडल मारत होतो। वाटेत सायकलवरील बोर्ड पाहून लोक विचारत होते आणि आपली तीच उत्तरे... पावणे तीन वाजले होते सोबत भूक देखील लागली होती। वाटेत सुरेश झोपडेंची बिन भिंतीची कुडाची शाळा ला भेट दिली। सुरेश खोपडे यांचे नाव २०१४ च्या निवडणुकीत सुप्रिया ताई च्या विरुद्ध उभे होते म्हणून ऐकलेले होते शिवाय आयपीएस म्हणून त्यांची कारकीर्द परिचित होती. पुढे थोडे अंतर आल्यावर कटकट आवाज येत होता पाहिले तर खराब रोड मुळे सायकलच्या कॅरियर चा नट निघाल्याने ते घासत होते. ते एका सायकल मेकॅनिक ने दुरुस्त करून पैसे देखील घेतले नाही उलट शुभेच्छा दिल्या। पुढे उसाचा रस पिऊन दुसरे अष्टविनायक मोरगाव पोहोचलो। रविवार असल्याने मयुरेश्वर गणपती मंदिर मोरगाव येथे दर्शनास गर्दी होती म्हणून मुख दर्शन घेतले। 
 
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभार्‍यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. 
 
मुख दर्शन घेऊन मस्त झुणका भाकर, ठेचा वर ताव मारला। 4 वाजले होते आणि प्राजक्ता मतिमंद विद्यालय सुप्पा ला भेट देऊन दौंड जायचे होते। 7 किमी पुढे आलो असेल तितक्यात मागील चाक पंचर होऊन बसले। मी देखील विलंब न करता पंचर काढले पण ट्यूब valve जवळ व्यवस्थित न बसल्याने बाहेर येत होते त्यामुळे थोडी हवा कमी करून सुप्पा गाठले। सुप्पा येथे प्राजक्ता मतिमंद विद्यालय येथे 25 विशेष मुलांचे शिक्षण व संगोपन केले जाते। अत्यंत मेहनतीने तेथील शिक्षक या विशेष मुलांचा सांभाळ व त्यांना घडवतात। प्रकल्पात बायोगॅस, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छ स्वयंपाकघर व खेळण्यासाठी मोठे मैदान आशा छान सुविधा असून लोकसहभागावर चालते। पुढे मुलांना त्यांचं नाव, गाव विचारून मुलांचा वैद्यकीय इतिहास व IQ तसेच कौटुंबिक इतिहास विचारून हा विषय समजून घेऊ लागलो। 5:30 वाजले होते उशीर होऊ नये म्हणून चहा घेऊन गावात सायकल रिपेरिंग साठी गेलो. तेथील लक्ष्मण सायकल मार्टचे कुलकर्णी यांनी पंचर जोडून ट्यूब बाहेर यायचा प्रॉब्लेम देखील दुरुस्त करून दिला आणि पैसे देखील घेतले नाही। गणपती बाप्पा मोरया म्हणून सर्वांचा निरोप घेऊन चौफुला कडे निघालो. 6 वाजताच अंधार पडल्याने लाईट लावला सुप्पा घाट सांभाळून उतरून हेवी ट्रॅफिक व मोठे मोठे ट्रक्स चे अप्पर लाईट मधून मार्ग काढत 15 किमी नंतर चौफुला पोहोचलो। उशीर झाल्याने दौंड पोहोचणे शक्य नव्हते म्हणून चौधरी सरांना फोनवर पाटस येथे मुक्कामाची विनंती करन सोलापूर हायवेवरून पाटस कडे निघालो। हायवेवर साईड ला काचा पडलेल्या असल्याने सांभाळत सायकल चालवत होतो. पाटस च्या 2 किमी अलीकडे चौधरी सरांचा फोन वाजला तुमच्या मुक्कामाची सोय झालीय। मेसेज चेक करा। पाटस चा पेट्रोल पंप ओलांडून पुला खाली आलो तर पाहतो काय चौधरी सरांचे मित्र नवनाथ शितोळे सर स्वागतास तयार। मला आश्चर्य वाटले की काही ओळख न पाळख पण केवळ चौधरी सरांचा फोन वरून या माऊली ने राहण्याची व्यवस्था प्रा जगताप सर तर जेवण्याची व्यवस्था स्वतःच्या घरी केली। नवनाथ शितोळे यांचे पाटस हुन 4 किमीवर फार्म हाऊस असून तेथे कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, भाजीपाला इत्यादी सर्व काम संपूर्ण कुटुंब, त्यांचे भाऊ, आई बहीण मुले हे स्वतः करते हे पाहून भारावून गेलो। त्यांच्या कुटुंबाने आदराने जेऊ घातले सर्वांशी गप्पा मारून या माऊलीचा निरोप घेऊन जगताप सरांकडे आलो। जगताप सर जिल्हा परिषदच्या च्या शाळेत शिक्षक आहेत त्या कुटुंबाने खूप आदरातिथ्य केले। रात्री भेटण्यासाठी खास भिगवण सायकल क्लब चे सदस्य संजय चौधरी, डॉ जयप्रकाश खरड सर इतक्या लांबून आले। सर्वांशी सध्या एड्स जनजागृती व पुनर्वसन कार्याविषयी संवाद साधून झोपी गेलो एका नव्या ऊर्जेने उठण्यासाठी।