Friday, January 28, 2022

मानेसर भिवाडी कोटपुतली शाहपुरा (राजस्थान) एड्स जनजागृती सायकल यात्रा 165 km













 
मानेसर भिवाडी कोटपुतली शाहपुरा (राजस्थान) एड्स जनजागृती सायकल यात्रा 165 km - 16 November 2021

16 नोव्हेंबर च्या सकाळी वशिष्ठ भाई चा निरोप घेऊन जयपूर कडे निघालो. सकाळी सोबत सौरभ नेवगी 15 किमी अंतर पर्यंत कंपनी देण्यासाठी आला. वाटेत पंचगावो येथील धाब्यावर त्याने आम्हास कुलाडी चाय व क्रीम रोल खाऊ घातले. पुढे तो जंक्शन वर आमचा निरोप घेऊन परत गेला. आजचा दिवस जरा वेगळा होता. शिवाय अजूनही गारवा होता आणि सूर्यनारायण ने आम्हाला दर्शन दिले नव्हते. धुक्यात सायकलचे लाईट लावून सायकल चालवत होतो. वाटेत छोटे मोठे चढ होते आणि हा इंडस्ट्रीयल झोन असल्याने ट्रॅफिक खूप होती.  आम्ही आमेर रोड ने अर्थात दिल्ली जयपूर हायवे ने आमच्या लक्ष कडे सायकलिंग करत बिलासपूर, सिंधरावली, कापदीवास गावातून पास करत भिवाडी च्या पुढे आलो . पाटणकर सर फुल फॉर्म मध्ये सायकलिंग करत पुढे होते. जवळपास 40 किमी नंतर ते भेटले. 09:30 वाजता असलवास गाव जवळ 50 किमी सायकलिंग झाल्यावर एका धाब्यावर नाश्ता साठी थांबलो. गरमागरम आलू पराठे वर ताव मारला. थोडी स्त्रेचिंग करून पुन्हा मार्गस्थ झालो. शाहाजहानपुर बॉर्डर चेक पोस्ट पर्यंतचा पूर्ण रस्ता म्हणजे Industrial Corridor असल्याने सोनिपत पासून दिल्ली ते आज शाहाजहानपुर पर्यंत शेताचे दर्शनच नाही. जिकडे तिकडे फक्त फक्त कारखाने आणि इंडस्ट्रीज आणि प्रदूषण ....तितक्यात माझे मित्र विष्णुदास चापके यांचा फोन त्याने सायकल मोहीम, अडचणी विषयी विचारपुस करून काही अडचण आल्यास महत्वाच्या व्यक्तीचे नंबर पाठवले.  शाजापूर जवळ किसान आंदोलनचे टेंट असल्याने  एकेरी वाहतूक वळवली असल्याने सांभाळून सायकल चालवावी लागत होती तरी अचानक एखादी कार, गाडी जवळ येत होती. सांभाळून सायकल चालवत अखेर शाजापूर चेक पोस्ट ओलांडून राजस्थान मध्ये प्रवेश केला.
उन्ह वाढत चालले होते त्यामुळे पुढे Dehydration टाळण्यासाठी निमरणा जवळ एका धाब्यावर लस्सी घेतली. आता आमच्या सायकल मोहिमेतील चौथे राज्य राजस्थान तेथील माती, रस्त्याच्या दुतर्फा शेत तेथील शुद्ध हवा आणि सकाळ पेक्षा कमी झालेल्या ट्रॅफिक मुळे आनंद घेत पेडलिंग करायला मजा येत होती. सकाळपासून 110 किमी नंतर कोटपुतली येथे श्री गणेश राजस्थानी भोजनालय येथे दुपारच्या जेवणासाठी  थांबलो. गरमा गरम गेहू की रोटी, 3 वेगवेगळ्या भाज्या, कढी, दाल आणि Unlimited मठ्ठा चा आस्वाद घेऊन थोडा आराम करून मार्गस्थ झालो.
इथे धाब्यावर बरेच ट्रक ड्रायव्हर उपस्थित होते म्हणून मी स्वतः हुन त्यांच्या शी बाजवर बसून जेवतांना कुठून आले वगैरे विचारपूस करून गप्पांची सुरवात केली. ते दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मधून आले होते. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही देखील आमच्या एड्स जनजागृती सायकल मोहिमेची आठवण करून देत त्यांना काही जनजागृती माहितीपत्रके दाखवत त्यांना मुळ विषयावर येऊन विचारलं  "आप घर से कितने दिन दूर रहते हो ? मेरा मतलब कभी इस सफर में किसींसे यौन संबंध आता है क्या ? तो आप सुरक्षित यौन संबंध हेतू क्या सावधानी बरतते हो ?  " आणि या संवादातून सुरक्षित लैंगिक संबंध दृष्टीने कंडोम च्या वापरासाठी त्यांना माहिती दिली तसेच वेळोवेळी लैंगिक संबंध नंतर जर काही त्रास झाल्यास गुप्तरोग तपासणी व एचआयव्ही टेस्टिंग करण्यासंदर्भात माहिती दिली.
पुढे आम्ही गोरधनपुरा, प्रागपूर मार्गे शहापूर कडे निघालो. 
वाटेत अचानक एक कार थांबली आणि त्या व्यक्तीने हातमिळवून आमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्याची ओळख करून देताना तो म्हणाला जवळच त्याचे फार्म हाऊस असून तो वैज्ञानिक असून त्याने देखील जयपूर ते स्टॅच्यु ऑफ युनिटी अशी सायकल मोहीम केल्याचे म्हणाला. आमच्याच बिरादरी अर्थात सायकलिस्ट जमातीचा भेटल्याने आनंद झाला. काही अडचण आल्यास त्याने त्याचा नंबर दिला. त्याचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो.
145 किमी सायकलिंग नंतर चहा ब्रेक साठी थांबलो व शाहपुरा येथे काही राहण्यासाठी व्यवस्था आहे का विचारपूस केली. परंतु तिथे मंदिर, धर्मशाळा किंवा डाकबंगला काहीच नाही. माझ्याकडे काही राजस्थान मधील फोन होते त्यांना पण कॉल करून पाहिले पण काही उपयोग नाही. कारण शाहपुर outskirt असल्याने तिथे धर्मशाळा, डार्क बंगला नाही. चलो जो होगा देखा जायेगा म्हणत आम्ही चहा घेऊन ताजेतवाने होऊन निघालो. पुढे छोटासा चढ लागला मग आम्ही लगेच गेअर बदलत  तो चढ आरामात चढल्यावर पाहतो काय मावळतीला सूर्य जणू आम्हाला आशीर्वाद देत होता.
जसा सूर्य मावळला तसा पांढऱ्या रंगाचे ऊन सोनेरी रंगात बदलले, सोनेरीचे शेंदरी आणि आता शेंदरीचे गुलाबी। आणि मावळतीला सूर्य आम्हाला म्हणाला
"वारे माझ्या लेकरांनो आजची राईड तुम्ही खूप खासच मारली.
जशी विश्वचषक च्या अंतिम सामन्यात धोनी ने श्रीलंका विरुध्द शानदार इनिंग खेळला होता. "
शहापूर हे गाव डोंगरात वसले असून इथे ऐतिहासिक वास्तू शहापूर हवेली प्रसिद्ध आहे. ती राजपूत शेखावत यांची राजधानी होती.  शहापुर हे जयपूर जिल्ह्यातील नगर परिषद असलेले गाव आहे.
अब सब अच्छा होता म्हणत शाहपुरा गावातून पेडलिंग करत आरामात गावाबाहेर आलो. पुढे कृष्णा लॉज येथे रूम साठी विचारले  तर 800/- रुपये पासून बार्गनिंग करत 500/- मध्ये ठरवून रूम पक्की केली. मस्त गरम पाण्याने अंघोळ करून रात्री पोटभर जेवण करून मागील 2 दिवसातील कपडे धुवुन लवकर झोपी गेलो. गावाबाहेर हॉटेल शिवाय डोंगराळ भाग असल्याने कडाक्याची थंडी होती त्यामुळे वॉर्मर आणि जॅकेट, माकडटोपी घालून झोपावे लागले.
165 किमी सायकलिंग मुळे झोप छान लागली.

डॉ पवन चांडक




















Thursday, January 27, 2022

गनोर दिल्ली मानेसर 125 किमी























 15 नोव्हेंबर रोजी सकाळी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी व भेटण्यासाठी अनिलजी खास सोनिपत हुन 6 वाजता कार चालवत आले होते. त्यांनीच काल च्या मुक्काम व जेवण्याची सोय केली होती. त्यांनी टी शर्ट देऊन आम्हा दोघांचे स्वागत केले व सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अब दिल्ली दूर नहीं म्हणत आम्ही पेडलिंग करत सोनिपत ओलांडून दिल्ली कडे निघालो. वातावरणात गारवा आणि कडाक्याची थंडी होती त्यामुळे स्वेटर काढले नव्हते. सोनिपत नंतर औद्योगिक वसाहत सुरू झाल्याने शेते नाहीशी झाली होती.  पुढे गाजीपुर टिकरी चेक पोस्ट जवळ किसान आंदोलन चे टेंट लागले होते. त्यात त्यांचे लंगर उभारले होते. त्यांनी वाटेत ये जा लोकांची, शेतकरी आंदोलकांची भोजन नाश्ता चहा ची मोफत सोय केली होती। विविध समाजिक संस्था, राजकीय पक्ष यांचे त्यांना समर्थनार्थ बोर्ड दिसत होते. पुढे पोलिसांना विचारून सायकल साठी योग्य मार्ग विचारून आम्ही एक शॉर्टकट घेतला.  परंतु त्या रस्त्यात खूपच धूळ, ट्रॅफिक, दगड धोंडे, माती शिवाय तो रस्ता कॅनॉल शेजारून जात होता वाटेत पंचर ची भीती होती, नुसते धुळीचे साम्राज्य यातून फुल ट्रॅफिक मग धूर ओकणारे व कर्णकर्कश हॉर्न वाजवणारे मोटारसायकल, ऑटो यातून मार्ग काढत अखेर एक कॅनॉल लागला त्याच्या बाजूने एक 2 -3 किमी ची पाऊलवाट ने सायकल चालवत अखेर 45 मिनिटांनी चेक पोस्ट लागली. तिथे SRP जवान व दिल्ली पोलिसांनी आमची विचारपूस केली आणि आम्ही  त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

10 वाजले होते आता इंडिया गेट दिल्ली 30 किमी. पुढे एका पेट्रोल पंप वर चहा बिस्कीट चा नाश्ता करून दिल्लीत प्रवेश केला. इथे एक उड्डाणपूल चढून इंडिया गेट राजघाट कडे रस्ता जातो पण आम्ही चुकलो आणि रोहिनी कडे जाणाऱ्या एका मेट्रो स्टेशन वर गेल्यावर चूक लक्षात आली. या दरम्यान दिल्ली मधील काही होमिओपॅथिक डॉक्टर्स जसे डॉ ललित संदल, डॉ आदित्य कौशिक यांचा फोन की त्यांच्या घरी या म्हणून. पण हे राजधानी दिल्ली आहे आणि practically अंतर इतके लांब असते की फिर कभी फुरसत से दिल्ली आया तो जरून आऊगा म्हणून त्यांना नकार दिला. आणि पुन्हा 5 किमी फिरून दिल्लीच्या ट्रॅफिक मध्ये सांभाळून चालवत पुन्हा मार्गी लागलो. उड्डाणपूल चढताना व जंकशन वर सांभाळून रस्ता ओलांडावा लागत होता. कारण जो तो सायकल ला कसे रस्त्याच्या खाली दाबू अशा आवेशाने चालवत होता. पुढे राजघाट जवळ आम्हाला यमुना मैया (नदीचे)चे दर्शन झाले. पुढे प्रगती मैदान मार्गे इंडिया गेट पोहोचलो.

इथे काम सुरू असल्याने सायकल अलीकडे पार्क केली. सुरवातीला सायकल ला प्रवेश नाही म्हणाले पण नंतर सायकल वरील बोर्ड पाहून प्रवेश दिला. इंडिया गेट येथील वार मेमोरियल ला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. 

इंडिया गेट येथे SBL होमिओपॅथी च्या टीमचे कौशल शर्मा व सर्व टीमने आमचे स्वागत केले. शिवाय दुपारच्या मिनी लंच ची व्यवस्था केली. इंडिया गेट येथील जवानांनी आमच्या मोहिमेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 

अखेर 2 वाजता दिल्ली चा निरोप घेण्याच्या उद्देशाने आम्ही निघालो.आजचा मुक्काम हरयाणा मधील जयपूर हायवेवर मानेसार किंवा गुरुग्राम च्या दिशेने निघालो. ठिकठिकाणी ट्रॅफिक सिग्नल ओलांडत लोकांना विचारात धौला कुंवा पोहोचलो. 

इथून पुढे एक रस्ता इंदिरा गांधी  हवाईअड्डा तर दुसरा गुडगाव कडे जातो.  आम्ही चुकून उड्डाणपूल चढलो पण त्यावरील ट्रॅफिक मुळे आम्हाला साईड ला जाताच येईना. वाहनेच वाहने एकही वाहन हात दाखवून देखील आम्हाला बाजूला जाऊ द्यायला तयार नाही. अखेर एका इनोव्हा वाल्याला दया आली आणि त्याने मार्ग करून दिला. खाली येऊन पाहतो तर काय आम्ही विमानतळ रस्त्याला लागलो होतो. 2 किमी परत यु टर्न घेऊन गुडगाव हायवेला लागलो. 

पुढे गुडगाव जवळ चहा ब्रेक साठी थांबलो. पाटणकर सर उड्डाणपूल चढून व दिल्लीतील ट्रॅफिक व प्रदूषण मुळे बरेच थकले होते. पण त्यांचे सांत्वन केले.  आम्ही दोघांनी मस्त केळी खाल्ली व गरम चहा बिस्कीट पिऊन गुडगाव गुरुग्राम हायवेने निघालो. वाटेत गुडगाव सायकलिंग क्लब च्या सदस्यांनी आम्हास शुभेच्छा दिल्या. वाटेत महादेव चे प्रसिद्ध मंदिर लागले आम्ही बाहेरून दर्शन घेऊन मार्गस्थ झालो. गुडगाव सायकलिंग क्लब चे सायकलिस्ट आमच्या सोबत गुरुग्राम पर्यंत आले व निरोप घेऊन मार्गस्थ झाले. 

पुढे मानेसार जवळ आलो तेंव्हा पाटणकर सरांचा एकदम आवाज आला. एका पेट्रोल पंप जबल मी थांबलो आणि काय झाले विचारत असतांना बाजूला असलेल्या लॉन वर ते स्वतःला झोकून एकदम लोळायला लागले. त्यांना थोड्या वेळाने पॅक ऑरेंज ज्यूस दिले. ते म्हणाले सर पुढे जाऊ शकत नाही मी त्यांचे सांत्वन करून मुक्कामाचे ठिकाण शोधुया म्हणत मानेसार पोहोचलो.

इथे गुरुद्वारा किंवा मंदिर काहीच नव्हते शिवाय औद्योगिक वसाहत असल्याने मोजकेच फ्लॅट system च्या इमारती असल्याने मुक्काम कुठे करावा अशा मनःस्थितीत असताना अचानक एक बुलेट स्वार समोर येऊन उभा ठाकला आणि म्हणाला "Do you need any help ? " 

मी न लाजता सरळ विचारलं  "इथे राहायला मंदिर किंवा गुरुद्वारा आहे का " . तेंव्हा  तो म्हणाला गावात एक चक्कर मारा पुढील 5 मिनिटं मध्ये तुम्हाला कळवतो असे म्हणून तो पुढे निघालो. पण पुढील 5 मिनिटांनी त्यांचा कॉल की "की, तुमची व्यवस्था माझ्या घरी केली आहे. त्यांनी घरी नेऊन प्रेमाने आदरातिथ्य केले. " 

पहा एक अनोळखी प्रदेश, शहर पण त्यात भेटलेला हा ग्रेट माणूस वशिष्ठ भाई. वशिष्ठ भाई हे पाकिस्तान मधून आलेल्या निर्वासित हिंदू  च्या पुनर्वसन साठी फार मोठे कार्य करत आहेत. रात्री त्याने प्रेमाने जेऊ घातले. याच दिवशी गुडगाव ला जॉब करणारा मराठी माणूस सौरभ नेगी ची भेट झाली. रात्री वशिष्ठ भाई सोबत सायकलिंग, सामाजिक कार्य, एड्स ग्रस्तांच्या प्रश्नांवर सुरू कार्य त्याचे ट्रेकिंग मधील व सामाजिक कार्य तील अनुभव विषयी गप्पा झाल्या. रात्री त्याच्या आई ने प्रेमाने जेऊ घातले. शिवाय त्यांनी पाटणकर सरांना acupressor द्वारे मसाज देऊन त्यांचा थकवा, पाठदुखी दूर केली.

डॉ पवन चांडक 

9422924861

Wednesday, January 26, 2022

14 नोव्हेंबर: अंबाला कुरुक्षेत्र पानिपत 140 किमी















शर्मा कुटुंबातील खास हरियानी पाहुणचार आणि रात्रीच्या सात्विक भोजनामुळे छान झोप घेऊन सकाळी वेळेवर उठून आटोपून शर्मा कुटुंबाचे आभार मानून  सकाळी 6:30 वाजता सर्वांचा निरोप घेऊन अंबाला सोडले. थंडी बरीच होती जवळपास 6'C तरी तापमान होते आणि धुके पण तरी व्यवस्थित सायकल चालवत होतो. अंबाला दिल्ली हायवे बराच व्यस्त असतो शिवाय दिल्ली जाणाऱ्या बऱ्याच ट्रॅव्हर्ल्स सुसाट धावत होत्या. हायवेच्या दुतर्फा शेतामध्ये गव्हाची पिके दौलत उभी होती. 7 वाजता सूर्यनारायण आपल्या प्रकाश किरणांद्वारे आम्हाला आशीर्वाद देत जणू म्हणत होता बाबांनो सांभाळून चालवा.  वाटेत चहा ब्रेक घेऊन सोबत आणलेले राजगिरा लाडू खाऊन आरामात पेडलिंग करत  सकाळी 9 वाजता 45 किमी सायकलिंग नंतर धर्मनगरी कुरूक्षेत्र पोहोचलो.

 तिथे इंडियन असोसिएशन ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन चे डॉ उमेश खन्ना, डॉ अनुप सिंगला व डॉ विवेक ललित यांनी स्वागत केले. त्यांच्या सोबत नाश्ता करत या सायकल मोहिमेचा उद्देश शिवाय एचआयव्ही एड्स ग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सोबत मुलींचे शिक्षण शिवाय Gender Equality विषयी केलेले कार्य व पुरुष नसबंदी आदी विषयीचे अनुभव शेअर केले. डॉ उमेश खन्ना हे त्या भागातील ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ असून केंद्रीय होमिओपॅथिक अनुसंधान परिषद च्या विविध संशोधन कार्यात त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला आहे. डॉ अनुप होमिओपॅथी औषधी कशी काम करतात या विषयी मॉलीक्युलर पातळीवर संशोधन करत आहेत. त्यांनी पुढील दिल्ली, जयपूर आदी मार्गावर डॉक्टर मित्रांना आमच्या सायकल मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य करण्याविषयी सूचना दिल्या. तेथे दैनिक अमर उजाला, दैनिक भास्कर, दैनिक जागरण, दैनिक ट्रिब्युन आदी दैनिकांच्या पत्रकारांनी आमच्या उपक्रमास प्रसिद्धी दिली व कार्य जाणून घेतले.

 कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले असे मानले जाते. ह्या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अर्जुनाला उपदेश देण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती. हिंदू पुराणानुसार कुरुक्षेत्र हे एक शहर नसून भौगोलिक प्रदेश आहे असे मानले गेले आहे.१९४७ सालापूर्वी थानेसर हे ह्या भागातील प्रमुख शहर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कुरुक्षेत्र शहर वसवले गेले. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र येथेच स्थित आहे.


सगळ्यांच्या निरोप घेऊन आम्ही करनाल च्या दिशेने रवाना झालो. जवळपास 75 किमी सायकलिंग नंतर दुपारी 12:30 वाजता दानविर कर्ण ची नगरी करनाल येथे पोहोचलो. 


करनाल हे यमुना नदी च्या किनाऱ्यावर वसलेले शहर असून येथील कलंदर शाह गुंबड, छावणी चर्च आणि सीता माई मंदिर आणि कर्ण जलाशय इत्यादी प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. कर्नाल येथील केंद्रिय गहू संशोधन आपल्या सर्वांना परिचित असेल. तसेच येथील बासमती तांदूळ संपूर्ण भारत तसेच भारताबाहेर देखील निर्यात केला जातो.


वाटेत डॉ विमल धवन सरांचे फोन येत होते परंतु रोड वर चुका मूक झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. या भागात Industries मुळे म्हणा दुपारी ऊन बरेच तापले होते. करनाल शहरात प्रवेश करतांना आम्हाला एक मोठा वेस्टर्न यमुना कॅनॉल लागला. जवळच प्रसिद्ध कर्ण तलाव आहे तो पाहिला. पुढे वेस्टर्न यमुना कॅनॉल  ओलांडून करनाल शहरात प्रवेश केल्यावर डॉ धवन यांचा मुलगा प्रतीक धवन याने मुख्य चौकात आमचे स्वागत केले. त्याच्या सोबत त्याचे मित्र व बरेच पत्रकार होते. त्यांना आमच्या सायकल मोहिमेविषयी जाणून घ्यायची खूप इच्छा होती. त्यांना विशेष म्हणजे कोणतेही बॅकअप न घेता तसेच स्पॉन्सरशीप न घेता करत असलेल्या सायकल प्रवासाचे कौतुक वाटले. त्यांनी आम्हाला दाल मखणी रायता तंदूर रोटी चे जेवण जेऊ घातले व पचण्यासाठी जीरा सोडा पाजला ज्यामुळे अत्यंत ताजेतवाने वाटले. प्रतीक व पत्रकार मित्रांचा निरोप घेऊन आमची स्वारी पानिपत सर करायला निघाली. 

उन्हात व्यवस्थित पांढऱ्या रुमालाने डोके झाकून वाटेत घोट घोट  पाणी पीत रस्त्याच्या डाव्या बाजूने व कडेकडेने व उड्डाणपूल चढताना सावधपणे सायकल चालवत होतो. अखेर पानिपत जवळील टोल प्लाझा येथे पोहोचलो. तिथे पवन अरोरा यांच्या पानिपत सायकल क्लब ने लिंबू सोडा पाजून स्वागत केले. पानिपत सायकल क्लब या नावे छान असा सायकल क्लब सायकलिंग चा प्रसार करत आहे. पुढे पानिपत शहरात प्रवेश केला. 

पानिपत येथे इंडियन असोसिएशन ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन चे डॉ अरुण व डॉ भरत मनोचा यांनी दुपारचा स्वादिष्ट नाश्ता व लस्सी पाजली. त्यांच्या सोबत पानिपत येथील बऱ्याच नागरिकांशी आमच्या एड्स जनजागृती सायकल मोहिमेविषयी संवाद साधता आला. 

पानिपत युद्ध संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेले स्मारक तिथून बरेच लांब व दुसऱ्या रस्त्याने असल्याने आम्ही तिथे भेट देऊ शकलो नाही याची खंत राहिली. 

सायंकाळ चे 04:30 वाजत आले होते आणि 120 किमी सायकलिंग झाली होती पण मुक्काम लांब असल्याने पानिपत च्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही  आम्ही सोनिपत च्या दिशेने निघालो.  परंतु मुक्काम कुठे करावा हा प्रश्न होता कारण सकाळपासून 120 किमी झाले होते. 

पुढे पानिपत च्या थोडे पुढे एक मोटारसायकलवर युवक आमच्याशी मोहिमेविषयी बरेच विचारत होता. त्याने आम्हाला सायंकाळचे जेवण जेऊ घालण्यासाठी आग्रह केला. परंतु आम्ही नम्रपणे त्यास नकार दिल्यावर त्याने  चहा पाजला व बिसलेरी बॉटल भरून दिली. त्याने काही अडचण आल्यास त्याचा नंबर दिला. त्याचा निरोप घेऊन  थोडे पुढे आल्यावर तितक्यात सोनिपत येथील अनिल भाई यांचा फोन आला. अनिल भाई यांचे ट्रॅक अँड ट्रेलचे सायकलचे दुकान असून ते सोनिपत सायकलिंग क्लब चे संस्थापक आहेत.

त्यांनी आमची व्यवस्था हायवेला गणोर येथे मित्रो दा ढाबा येथे केली आहे असे सांगितले. पहा अनोळख्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीने आमची भेट नाही तरी आम्ही मुक्कामी पोहोंचे पर्यंत आमची व्यवस्था झाली.......याला म्हणतात हरयाणा तील अस्सल पाहुणचार. 

धन्य ती हरयाणा ची माती व हरयाणा ची माणसे🙏.

सायंकाळी 6 वाजता आम्ही सकाळपासून 140 किमी सायकलिंग करत मित्रो दा ढाबा येथे मुक्कामी पोहोचलो. तिथे ढाबा चालकाने आमचे स्वागत केले. गेल्या गेल्या त्याने कुलाडी मध्ये गरमा गरम मसाला चहा दिला व आमच्या साठी छान खोलीत राहायची सोय केली होती.

गरम पाण्यांने अंघोळ करून ताजेतवाने झालो.

 रात्रीला छान पंजाबी जेवण - तंदूर रोटी, सरसोची भाजी दाल मखणी आदी स्वादिष्ट जेवण होते. झोपतांना मसाला दूध मिळाले. त्याला बिल विचारले तर म्हणाला अनिल भाई ने दे दिया है. 

 उद्या दिल्ली सर करायची असल्याने शरीराला आराम हवा तर वेळेवर 9 वाजताच लवकर झोपी गेलो. 


उद्या सायंकाळी 15 नोव्हेंबर रोजीच्या गनोर सोनिपत दिल्ली माणेसर चा अनुभव शेअर करेल. धन्यवाद 


डॉ पवन चांडक 

9422924861