शर्मा कुटुंबातील खास हरियानी पाहुणचार आणि रात्रीच्या सात्विक भोजनामुळे छान झोप घेऊन सकाळी वेळेवर उठून आटोपून शर्मा कुटुंबाचे आभार मानून सकाळी 6:30 वाजता सर्वांचा निरोप घेऊन अंबाला सोडले. थंडी बरीच होती जवळपास 6'C तरी तापमान होते आणि धुके पण तरी व्यवस्थित सायकल चालवत होतो. अंबाला दिल्ली हायवे बराच व्यस्त असतो शिवाय दिल्ली जाणाऱ्या बऱ्याच ट्रॅव्हर्ल्स सुसाट धावत होत्या. हायवेच्या दुतर्फा शेतामध्ये गव्हाची पिके दौलत उभी होती. 7 वाजता सूर्यनारायण आपल्या प्रकाश किरणांद्वारे आम्हाला आशीर्वाद देत जणू म्हणत होता बाबांनो सांभाळून चालवा. वाटेत चहा ब्रेक घेऊन सोबत आणलेले राजगिरा लाडू खाऊन आरामात पेडलिंग करत सकाळी 9 वाजता 45 किमी सायकलिंग नंतर धर्मनगरी कुरूक्षेत्र पोहोचलो.
तिथे इंडियन असोसिएशन ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन चे डॉ उमेश खन्ना, डॉ अनुप सिंगला व डॉ विवेक ललित यांनी स्वागत केले. त्यांच्या सोबत नाश्ता करत या सायकल मोहिमेचा उद्देश शिवाय एचआयव्ही एड्स ग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सोबत मुलींचे शिक्षण शिवाय Gender Equality विषयी केलेले कार्य व पुरुष नसबंदी आदी विषयीचे अनुभव शेअर केले. डॉ उमेश खन्ना हे त्या भागातील ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ असून केंद्रीय होमिओपॅथिक अनुसंधान परिषद च्या विविध संशोधन कार्यात त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला आहे. डॉ अनुप होमिओपॅथी औषधी कशी काम करतात या विषयी मॉलीक्युलर पातळीवर संशोधन करत आहेत. त्यांनी पुढील दिल्ली, जयपूर आदी मार्गावर डॉक्टर मित्रांना आमच्या सायकल मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य करण्याविषयी सूचना दिल्या. तेथे दैनिक अमर उजाला, दैनिक भास्कर, दैनिक जागरण, दैनिक ट्रिब्युन आदी दैनिकांच्या पत्रकारांनी आमच्या उपक्रमास प्रसिद्धी दिली व कार्य जाणून घेतले.
कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले असे मानले जाते. ह्या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अर्जुनाला उपदेश देण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती. हिंदू पुराणानुसार कुरुक्षेत्र हे एक शहर नसून भौगोलिक प्रदेश आहे असे मानले गेले आहे.१९४७ सालापूर्वी थानेसर हे ह्या भागातील प्रमुख शहर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कुरुक्षेत्र शहर वसवले गेले. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र येथेच स्थित आहे.
सगळ्यांच्या निरोप घेऊन आम्ही करनाल च्या दिशेने रवाना झालो. जवळपास 75 किमी सायकलिंग नंतर दुपारी 12:30 वाजता दानविर कर्ण ची नगरी करनाल येथे पोहोचलो.
करनाल हे यमुना नदी च्या किनाऱ्यावर वसलेले शहर असून येथील कलंदर शाह गुंबड, छावणी चर्च आणि सीता माई मंदिर आणि कर्ण जलाशय इत्यादी प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. कर्नाल येथील केंद्रिय गहू संशोधन आपल्या सर्वांना परिचित असेल. तसेच येथील बासमती तांदूळ संपूर्ण भारत तसेच भारताबाहेर देखील निर्यात केला जातो.
वाटेत डॉ विमल धवन सरांचे फोन येत होते परंतु रोड वर चुका मूक झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. या भागात Industries मुळे म्हणा दुपारी ऊन बरेच तापले होते. करनाल शहरात प्रवेश करतांना आम्हाला एक मोठा वेस्टर्न यमुना कॅनॉल लागला. जवळच प्रसिद्ध कर्ण तलाव आहे तो पाहिला. पुढे वेस्टर्न यमुना कॅनॉल ओलांडून करनाल शहरात प्रवेश केल्यावर डॉ धवन यांचा मुलगा प्रतीक धवन याने मुख्य चौकात आमचे स्वागत केले. त्याच्या सोबत त्याचे मित्र व बरेच पत्रकार होते. त्यांना आमच्या सायकल मोहिमेविषयी जाणून घ्यायची खूप इच्छा होती. त्यांना विशेष म्हणजे कोणतेही बॅकअप न घेता तसेच स्पॉन्सरशीप न घेता करत असलेल्या सायकल प्रवासाचे कौतुक वाटले. त्यांनी आम्हाला दाल मखणी रायता तंदूर रोटी चे जेवण जेऊ घातले व पचण्यासाठी जीरा सोडा पाजला ज्यामुळे अत्यंत ताजेतवाने वाटले. प्रतीक व पत्रकार मित्रांचा निरोप घेऊन आमची स्वारी पानिपत सर करायला निघाली.
उन्हात व्यवस्थित पांढऱ्या रुमालाने डोके झाकून वाटेत घोट घोट पाणी पीत रस्त्याच्या डाव्या बाजूने व कडेकडेने व उड्डाणपूल चढताना सावधपणे सायकल चालवत होतो. अखेर पानिपत जवळील टोल प्लाझा येथे पोहोचलो. तिथे पवन अरोरा यांच्या पानिपत सायकल क्लब ने लिंबू सोडा पाजून स्वागत केले. पानिपत सायकल क्लब या नावे छान असा सायकल क्लब सायकलिंग चा प्रसार करत आहे. पुढे पानिपत शहरात प्रवेश केला.
पानिपत येथे इंडियन असोसिएशन ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन चे डॉ अरुण व डॉ भरत मनोचा यांनी दुपारचा स्वादिष्ट नाश्ता व लस्सी पाजली. त्यांच्या सोबत पानिपत येथील बऱ्याच नागरिकांशी आमच्या एड्स जनजागृती सायकल मोहिमेविषयी संवाद साधता आला.
पानिपत युद्ध संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेले स्मारक तिथून बरेच लांब व दुसऱ्या रस्त्याने असल्याने आम्ही तिथे भेट देऊ शकलो नाही याची खंत राहिली.
सायंकाळ चे 04:30 वाजत आले होते आणि 120 किमी सायकलिंग झाली होती पण मुक्काम लांब असल्याने पानिपत च्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही आम्ही सोनिपत च्या दिशेने निघालो. परंतु मुक्काम कुठे करावा हा प्रश्न होता कारण सकाळपासून 120 किमी झाले होते.
पुढे पानिपत च्या थोडे पुढे एक मोटारसायकलवर युवक आमच्याशी मोहिमेविषयी बरेच विचारत होता. त्याने आम्हाला सायंकाळचे जेवण जेऊ घालण्यासाठी आग्रह केला. परंतु आम्ही नम्रपणे त्यास नकार दिल्यावर त्याने चहा पाजला व बिसलेरी बॉटल भरून दिली. त्याने काही अडचण आल्यास त्याचा नंबर दिला. त्याचा निरोप घेऊन थोडे पुढे आल्यावर तितक्यात सोनिपत येथील अनिल भाई यांचा फोन आला. अनिल भाई यांचे ट्रॅक अँड ट्रेलचे सायकलचे दुकान असून ते सोनिपत सायकलिंग क्लब चे संस्थापक आहेत.
त्यांनी आमची व्यवस्था हायवेला गणोर येथे मित्रो दा ढाबा येथे केली आहे असे सांगितले. पहा अनोळख्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीने आमची भेट नाही तरी आम्ही मुक्कामी पोहोंचे पर्यंत आमची व्यवस्था झाली.......याला म्हणतात हरयाणा तील अस्सल पाहुणचार.
धन्य ती हरयाणा ची माती व हरयाणा ची माणसे🙏.
सायंकाळी 6 वाजता आम्ही सकाळपासून 140 किमी सायकलिंग करत मित्रो दा ढाबा येथे मुक्कामी पोहोचलो. तिथे ढाबा चालकाने आमचे स्वागत केले. गेल्या गेल्या त्याने कुलाडी मध्ये गरमा गरम मसाला चहा दिला व आमच्या साठी छान खोलीत राहायची सोय केली होती.
गरम पाण्यांने अंघोळ करून ताजेतवाने झालो.
रात्रीला छान पंजाबी जेवण - तंदूर रोटी, सरसोची भाजी दाल मखणी आदी स्वादिष्ट जेवण होते. झोपतांना मसाला दूध मिळाले. त्याला बिल विचारले तर म्हणाला अनिल भाई ने दे दिया है.
उद्या दिल्ली सर करायची असल्याने शरीराला आराम हवा तर वेळेवर 9 वाजताच लवकर झोपी गेलो.
उद्या सायंकाळी 15 नोव्हेंबर रोजीच्या गनोर सोनिपत दिल्ली माणेसर चा अनुभव शेअर करेल. धन्यवाद
डॉ पवन चांडक
9422924861

No comments:
Post a Comment