18 नोव्हेंबर
कालच्या हेक्टिक आणि टफ राईड नंतर रात्री छान झोप झाली शिवाय ढगाळ वातावरण असल्याने काल पेक्षा थंडी कमी अर्थात 8 किंवा 9 'C इतकी होती. रात्री धर्मशाळा चालकाने पाण्याची मेन लाईन बंद केल्याने थोडी गैरसोय झाली. असो बडे बडे शहरो में छोटी छोटी मुश्किले आती रहती है. सकाळी आवरून 7 वाजता अग्रवाल धर्मशाळायेथे चहा घेतांना तेथील care taker विचारत होता "आपको रास्ते में पुलीस वाले परेशान करते होंगे". आम्ही म्हणालो "परेशान ? बिलकुल नहीं बलकी हमे सहयोग देते है, खुद हो के पाणी देते है, आगे का रास्ता, रात में ठहरने की व्यवस्था आदी" त्यांना निरोप देऊन टोंक येथून निघालो. मी तसा मारवाडी पण 100 वर्ष पेक्षा अधिक महाराष्ट्रात आमचे कुटुंब असल्याने आमची मराठी मारवाडी पेक्षा अधिक चांगली असून उलट मारवाडी मध्ये जरा खिचडी झाली आहे. तरी काल पासून अनेक लोकांशी मारवाडीत संवाद झाला पण त्यांनी आमची खिचडी मारवाडी भाषा ओळखून लगेच म्हणाले "आप दक्खन से हो क्या ?".
बस झाल्या गप्पा आणि आमची सकाळी आभाळ वातावरण असल्याने थंडीचा त्रास नाही झाला.
आज मी आणि पाटणकर सर मनाने देखील ताजे झालो होतो. सर्व नकारात्मकता रात्रीच त्यागून सकाळच्या सूर्याच्या किरणाने मिळालेल्या उर्जाने आम्ही कोटा हायवे ने निघालो. आजचा दिन विशेष होता कारण मागील 7 दिवसांत आज आमचे 1000 किमी सायकलिंग पूर्ण करून कोटा पोहोचणार होतो.
आजच्या तिसऱ्या मुक्कामी अर्थात शिक्षणाचे माहेरघर 'कोटा' म्हणजे IIT आणि NEET मधील टॉपर्स विद्यार्थांना घडवणारे केंद्र कदाचित आता COMMERCIAL HUB बनले असेल....असो
तसेंच 'कोटा फॅक्टरी' या वेब सिरीज मुळे कोटा विषयी बऱ्या पैकी माहिती होती.
आज कालच्या चुका टाळल्या अर्थात वेळेवर नास्ता , चहा पानी आणि Hydration. दोघे अत्यंत संयमाने पेडलिंग करत राईड चा आनंद घेत सकाळी 09 वाजता 35 किमी नंतर भरनी या गावाच्या पुढे धाब्यावर नाश्ता मध्ये चहा बिस्किटे आणि चिवडा इतकेच मिळाले. पण सोबतचे राजगिरा लाडू ची भूक लागल्यावर चव एकदम रुचकर लागते. पुढे सरोली जवळ रस्त्याच्या बाजूला माधवप्रसाद आश्रम जवळ तलाव आणि जवळ च्या परिसरात बहरलेली शेत असे विहंगम दृश्य होते. ते तलाव पाहून आम्ही निसर्गाच्या सानिध्यात सायकलिंग चा आनंद लुटत पुढे निघालो. 50 किमी नंतर दुनी तहसील ओलांडले. 9:30 वाजून गेले होते. पुढे डोलता - कुचलवाडा - टिकर दरम्यान 10 ते 15 किमी रस्त्याचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक वळवल्याने इथे सांभाळून चालवावे लागले. रस्त्याच्या बाजूला काटे, काचेचे तुकडे पासून टायर ला सांभाळून चालवत असतांना अखेर 80 किमी नंतर हिंदोली गावा जवळ टायर पंचर !
पण आज मी शिवी नाही हसडली. अत्यंत संयमाने टीम वर्क ने कामाला लागलो. मी टायर disment करून चाक उघडून ट्यूब बाहेर काढे पर्यंत पाटणकर सरांनी कालचे पंचर जोडले. नंतर ते जोडलेले पंचर पुन्हा हवा मारून चेक करून फिट केले. इकडे हे सर्व टायर फिटिंग करून सायकल रेडी करे पर्यंत पाटणकर सरांनी दुसऱ्या ट्यूब चे पंचर जोडले. तोपर्यंत पॅनियर बॅग कॅरियर वर फिट केली आणि जय भोलेनाथ म्हणत निघालो.
वाटेत सायकलवरील एड्स जनजागृती बोर्ड पाहून सगळ्यांचा पहिला प्रश्न असायचा "सरकार के पास से आयो हो क्या ? ये सायकलिंग के पैसे मिलेंगे क्या ? रेस है क्या ? आदी. "
पण जेव्हा त्यांना मी देखील मारवाडीत संपूर्ण उद्देश सांगायचो तेंव्हा आश्चर्याने आ वासून पहायचे.
जवळपास 95 किमी आलो असेल. इथे छोट्या मोठ्या डोंगर रांगा असल्याने चढ होता. पण वातावरणात गारवा आणि निसर्गाने जरा जास्तच कृपा केली. पाऊस सुरू .......रिमझिम सुरू आणि आणि आम्ही पण त्याच रिमझिम चा आस्वाद घेत 2,3 चढ चढत वर आलो. पाऊस थांबत नाही हे पाहून मी 2 इन 1 जॅकेट घातले कारण पावसासोबत थंडी पण खूप होती. काल पाटणकर सर चे रस्त्यात स्वेटर पडले होते. मग मी त्यांना थर्मल आणि रेफलेक्टर जॅकेट दिले. मागील 20 किमी पासून पावसात भिजत सायकलिंग सुरू होती. पुढे बुंदी गावा जवळ आलो. तर एका बाजूला बुंदी चा नयनरम्य आणि नवल सागर तलाव त्यात या पावसात देखील डोंगराचे प्रतिबिंब दिसत होते. आम्हाला सेल्फी चा मोह आवरला नाही. इथून ऐतिहासिक वास्तू व प्रेक्षणीय स्थळ जैत सागर किल्ला, लतारागढ किल्ला व गढ महल जवळच आहे. या तलाव जवळ नवल सागर उद्यान छान विकसित केले आहे.
प्राचीन बुंदी प्रदेशावर मीणांच्या उषार गोत्राचे राज्य होते, परंतु अक्रंकटा राजपूतांनी जुन्या शहराचा नाश केला. सध्याच्या बुंदीची स्थापना राव देवा हाडा यांनी 1242 मध्ये जैता मीनाची कपटाने हत्या करून केली होती. राजा बुंदा मीनाच्या नावावरून या भागाला ‘बुंदी’ असे नाव पडले. पुढे या नाल्याचे पाणी अडवून नवलसागर तलाव बांधण्यात आला. राजा देव सिंह यांच्यानंतर राजा बारसिंगने 1354 मध्ये टेकडीवर तारागड नावाचा किल्ला बांधला. यासोबतच किल्ल्यात राजवाडा आणि तलाव-बावडीओ बांधण्यात आला. 14व्या ते 17व्या शतकाच्या दरम्यान पायथ्याशी एक भव्य राजवाडा बांधण्यात आला. 1620 मध्ये राव रतन सिंह जी यांनी राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी एक भव्य खांब (दरवाजा) बांधला. दोन हत्तींच्या पुतळ्यांनी सजवलेल्या खांबाला ‘हत्तीपोल’ म्हणतात. बुंदी त्याच्या विशिष्ट चित्रकला शैलीसाठी प्रसिद्ध आहे, ती महाराव राजा "श्रीजी" उमेद सिंग यांनी बांधली होती, जे त्यांच्या चित्रकला शैलीसाठी जगप्रसिद्ध आहेत. हा झाला बुंदी चा इतिहास.
पुढे आणखी एक चढ चढून आम्हाला दीड किमी चा बुंदी हायवेवर बोगदा लागला जो सायकल चे दोन्ही लाईट लावून काळजीपूर्वक सायकल चालवत बोगदा मधून सायकल चालवत बाहेर आलो. आता जाम भूक लागली होती. पावसात भिजल्यावर थंडी पण वाजू लागली. दाल बाटी वर मस्त ताव मारला. हुडहुडी काही कमी होईना मग अखेर जॅकेट चढवून बसलो. पावसाकडे पाहत घोटभर चहा घेतला. दीड तास झाले पाऊस थांबत नाही म्हणून आणखी एक चहा घेतला. पुढे अखेर आम्ही पावसातच सायकल चालवायचा निर्णय घेऊन लाईट, रेफलेक्टर जॅकेट चढवून निघालो.
रिप रिप पाऊस सुरूच होता अखेर सकाळपासून 135 किमी नंतर कोटा कडे मेन रोड ने वळालो. इथे पुणे येथील लाहोटी uncle यांच्या पुढाकाराने स्थानिक उद्योगपतींनी कोटा येथे माहेश्वरी Resort मध्ये राहण्याची सोय केली होती. हॉटेल, लॉज आम्ही शक्यतो टाळतो पण त्याच्या प्रेमा खातर हे आदरातिथ्य स्वीकारून आजची 144 किमी राईड पूर्ण करून कोटा पोहोचलो.
कोटा येथील कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्र कृषी विषयक संशोधन साठी प्रसिद्ध आहे. तसेच IIT आणि NEET मधील टॉपर्स विद्यार्थांना घडवणारे केंद्र तर आपल्या सर्वांनाच परिचित आहे.
माहेश्वरी रिसॉर्ट चे मालक राजकुमारजी माहेश्वरी यांनी खूप छान आदरातिथ्य व जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांनी त्यांचे रिसॉर्ट्स मधील विविध रंगबिरंगी कारंजे, प्रकाशव्यवस्था, लायटिंग, लहान मुलांसाठी विविध खेळ, बोटिंग आदी दाखवले. अजूनही पाऊस सुरूच होता पण पाऊस उद्या तरी थांबू दे अशी वरुण राजाला प्रार्थना करून झोपी गेलो.
डॉ पवन चांडक
9422924861
