Tuesday, November 14, 2017

३१ ऑक्टोबर: चाट्टनूर त्रिवेंद्रम कन्याकुमारी



31 ऑक्टोबर रोजी डॉ शाजी सरांनीच आम्हास 04:30 ला उठवून गरम चहा बनाना वेफर्स दिली. सर स्वतः त्यांची सायकल घेऊन आमच्या सोबत पारपल्ली पर्यंत सायकलिंग करत आले. भविष्यात ते देखील मोठ्या सायकल मोहिमेत सहभागी होतील असे आश्वासन त्यांनी दिले. पारपल्लीला त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. पारपल्ली आटिंगल तिरुअनंतपुरम रस्ता चढ उताराचा, रोलिंग हेवी ट्रॅफिक नागरी वस्तीनं गजबजलेला होता. 25 किमी सायकलिंग नंतर आटिंगल पोहोचलो.थोडे शेंगदाणा लाडू खाऊन निघालो. कुडवूर जवळ हत्तीचे दर्शन झाले. काझाकोट्टाम ओलांडल्यावर त्रिवेंद्रम टेक्नो पार्क लागले. जिथे विप्रो, इन्फोसिस सारख्या मोठ्या आयटी कंपन्यांचे ऑफिस होते. किमान येथे ऑफिस ला जाणारी व्यक्ती ट्रॅडिशनल कपड्यां ऐवजी फॉर्मल सूट मध्ये दिसू लागली जे कि अख्या केरळ मध्ये कोची सोडून क्वचितच पहायला मिळाले.आकुलम लेक वरील पूल ओलांडून त्रिवेंद्रम शहरात प्रवेश केला. रस्ता चुकू नये म्हणून नॅशनल हायवे कन्याकुमारी रस्ता सोडला नाही. हेवी ट्रॅफिक मधून मार्ग काढत त्रिवेंद्रम येथील मित्र डॉ कन्नन सरांच्या घरी पोहोचलो. तेथे त्यांची पत्नी डॉ ज्योती, 2 मुले, रेल्वे मधून सेवानिवृत्त इंजिनियर प्रकाश त्यांच्या मित्रांनी आमचे स्वागत केले. डॉ ज्योती कन्नन मॅडम ने आग्रहाने केरळ डिश - पुट्टु सांबर खाऊ घातले. नंतर चहा घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.
10:40
वाजताच आभाळ वातावरण मुळे गर्मी जाणवू लागली आणि चढ उताराचा रस्ता आणि रस्ता लहान असल्याने ट्रॅफिक बाजूने एकदम जवळून जाणाऱ्या लोकल ट्रान्स्पोर्ट बसचा त्रास होत होता. थोडे 20 किमी पुढे गेल्यावर बलरामपुर पोहोचलो. तेथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरास भेट दिली. त्या मंदिराचीची कमान कामानिवरील पारसार्थी श्रीकृष्ण अर्जुन ची मूर्ती देखणी होतीपुढे नेयार नदीवरील पूल ओलांडून नेयटीकरा गाव ओलांडले. पुढे दुपारी 1 वाजता पारशाला गावातून तामिळनाडू राज्यात प्रवेश केला. इतके दिवस केरळ मध्ये असतांना रस्ते छान होते. पण पारशाला ते टकाली मधील रस्ता छोटा आणि ठिकठिकाणी काम चालू होते. दुपारी भूक लागली होते. व्यवस्थित हॉटेल्स मिळत नव्हते, आभाळ वातावरणाने गर्मी आणि प्रचंड चढ उतार यामुळे थकवा आला होता. मध्ये रस्त्यात केळी घेतली तर त्या केळीवालीला हिंदी येत नाही मग एकाची मदत घेऊन भाव विचारून पैसे दिले तर काय 40 रुपयात 3 केली त्यातील 2 कच्ची. 1 केळी दोघात खाऊन अखेर 2 वाजता मार्तंडम पोहोचलो. तेथे एका हॉटेल मध्ये पेस्ट्री, आईस्क्रीम, ज्युस घेतले. थोडे बरे वाटू लागले. गावातून थोडे 2 किमी बाहेर आलो असेल तर तितक्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. ऑक्टोबर असल्याने मी रेनकोट घेतले नव्हते. एका घराच्या छताखाली आडोश्याला थांबलो. 1 तास तर शांत बसलो पण पाऊस थांबत नाही हे पाहून मनाची चलबिचल सुरु झाली. दीड तास झाले पावसाचा जोर सारखाच होता. दुपारचे 4 वाजले होते. कन्याकुमारी 45 किंमी बाकी होते. सायंकाळी मुक्कामी पोहोचू का असे विचार सुरु झाले. मग राहवून एखाद्या पियाजो, छोटा हाथी, मालवाहू गाड्यांना हात दाखवणे सुरु झाले. पण कोणीच थांबेना. बाजूच्या हॉटेल वाल्याची मदत घेतली. त्याने पुढे 5 किलोमीटर वर वेलोकोड स्टॉप आहे तिथे विचारून पहा. सुदैवाने 5 किमी नंतर पावसाचा जोर कमी झाला. मग हळू हळू मनातील नकारात्मक विचार कमी होऊन आत्मविश्वास येऊ लागला. आता बॅक अप व्हेहिकल, लिफ्ट कशाचीच गरज नाही आपण सहज पोहोचूटकाली येई पर्यंत तर नागरकॉईल ऐवजी आम्ही कन्याकुमारीच मुक्कामी जायचे ठरवले. आता आम्हाला पाऊस पडून गेल्यावर मनावरील नकारात्मकतेचे ढग हाटल्यावर आजू बाजूच्या टेकड्या, रस्त्यात लागलेले वटीमुरीचन लेक सुंदर दिसू लागले. पाऊस पडल्यावर गर्मी कमी होऊन वातावरण देखील छान झाले. पुढे चुंकनकडी लेक जवळ थांबून तलावातील कमळाचे फोटो काढले. आमचा पक्षीमित्र डॉ संदीपला तर मस्त बर्ड फोटोग्राफी करता आली. 05:30 ला नागरकॉईल पोहोचून क्लॉक टॉवर चौकात गरमागरम कॉफी घेतली. तेथे उपस्थित लोकांना रस्ता विचारून जनजागृती पत्रकांचे वाटप केले. कन्याकुमारी हायवेला लागलो. वाटेत परक्कई लेक जवळ फोटोग्राफी केली. आमचे सूर्यास्त दर्शन उशीर झाल्यामुळे कन्याकुमारी ला होता परक्कई लेक येथेच झाले. अंधार पडला होता. हेड लॅम्प ऑन केला, रिफ्लेक्टर जॅकेट घातले. वाटेत मुरुगन कुडम मंदिराचे दर्शन घेऊन भारताचे दक्षिणेकडील टोक स्वामी विवेकानंदांची पावनभूमी  कन्याकुमारी शहरात सकाळपासून 150 किमी सायकलिंग मागील 7 दिवसात 900 किमी सायकलिंग करत प्रवेश केला. मुक्कामासाठी स्वामी विवेकानंद केंद्र निवडले होते. योगायोगाने तेथे रूम मिळाली. या बेंगलोर केरळ कन्याकुमारी यात्रेचा समारोप स्वामी विवेकानंद आश्रम मध्ये करण्याचा आनंद काही वेगळाच होता. फ्रेश होऊन आश्रम परिसरात शेकडो महाराष्ट्रीयन पर्यटक भेटले.त्यांच्याशी या मोहिमेविषयी संवाद साधला. संपूर्ण विवेकानंद आश्रम, रामायण दर्शन, गणपती मंदिर पाहिले. रात्री छान झोप लागली. 1 नोव्हेंबर ला सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहण्यासाठी सन राइज पॉईंट ला गेलो. संगम जवळ सायकल सोबत फोटोसेशन केले. कारण या सायकल ला विवेकानंदांच्या पावन भूमीतील मातीचे दर्शन घेणे आवश्यक होते. आज मागील 4 वर्षापासून एका विशिष्ट उद्देशाने सायकल मोहीम करत असल्याचे समाधान वाटले. तेथील पर्यटक, स्थानिक लोकांना आमच्या 1000 किमी सायकल प्रवासाचे कुतुहूल वाटू लागले. कन्नड, तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी प्रत्येक भाषेची माणसे भेटली. सर्वच जण आपली वाटली जी या महान व्यक्तीच्या पावन भूमीचे दर्शन घायला आली होती. संदीप आणि मी एकमेकांच्या अनुभवाचे चित्रीकरण केले. कन्याकुमारी रॉक बीच पाहिले. 8 वाजता संगम वर जाऊन कन्याकुमारी देवीचे दर्शन घेतले. बोट हाऊस वरून तिकीट घेऊन विवेकानंद रॉक वर पोहोचलो. त्या बोटीत महाराष्ट्रीयन पर्यटकांचा ग्रुप होता.जवळपास 8 दिवसांनी मराठी बोललो. खूप गप्पा मारल्या त्यातली अनेक लोक परभणी, नांदेड, लातूर कडची होती. सायकलिंग मुळे आपली, त्यांची हा भेद नाहीसा होतो. सर्वच माणसे आपली असतात. तेथे प्रांत, भाषा, धर्म, जात या आड येत नाही. आणि इथे तर एचआयव्ही बाधितांच्या मूलभूत प्रश्नावर जनजागृती करण्यासाठी आम्ही सायकलवर येथे आलो होतो. स्वामी विवेकानंद रॉक येथे ध्यान मँडप येथे थोडा वेळ ध्यान करून स्वामी विवेकानंद, आई रामकृष्ण परमहंस च्या मूर्तीचे दर्शन करून प्रार्थना केली. विवेकानंद स्मारक 1970 मध्ये विवेकानंद स्मारक समितीने स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ बांधले. हे स्मारक भारताच्या दक्षिण टोकापासून 500 मीटर अंतरावर 2 खडकावर आहे. स्वामी विवेकानंद 1892 मध्ये याच खडकावर ध्यानास बसले होते. विवेकानंद मंडप मध्ये ध्यान मंडप, सभा मंडप, मुख मंडप नमस्तुभ्यम असे भाग आहेत.
10:30 वाजता बोट च्या बाहेर आलो. 7 दिवसाच्या आठवणी घेऊन परतीचा प्रवास करीत नागरकॉईल कडे निघालो. रस्त्यात विविध मंदिर, तलाव पाहत होतो. विविध निसर्ग सौंदर्य, मंदिराची शिखर कला कॅमेऱ्यात टिपत होतो. हायवेवर प्राचीन सुचिंद्रम तनुमालयम मंदिर, मंदिराच्या परिसरातील पवित्र कुंड चे दर्शन घेतले
दुपारी वेळेवर त्रिवेंद्रम पोहोचलो. सायंकाळी शासकीय होमिओ रुग्णालय येथे आमच्या 1000 किमी बेंगलोर केरळ कन्याकुमारी एड्स जनजागृती सायकल मोहिमेचा समारोप कार्यक्रम लॉयन्स क्लब, जिल्हा होमिओ रुग्णालय, आयएचएमए त्रिवेंद्रम त्रिवेंद्रम सायकलिंग ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास त्रिवेंद्रम लॉयन्स क्लब चे अध्यक्ष, होमिओपॅथिक विभाग केरळ राज्यचे संचालक, डॉ शाजीकुट्टी, डॉ कन्नन केरळ एड्स नियंत्रण कक्षचे कविश्वर उपस्थित होते.त्यांच्या हस्ते आम्हा दोघांना सन्मानित करण्यात आले. या समारोप प्रसंगी एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसन जनजागृती साठी सुरु असलेले कार्य आजवर केलेल्या सायकल मोहिमेतील विविध अनुभवासह संवाद साधला. तेथे एड्स जनजागृती पत्रकांचे वाटप केले. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा 1000 किमी सायकल मोहिमेचा सोहळा पार पाडला. या मोहिमेचे वैशिष्ठ म्हणजे कुठेही आम्ही दोघांनी बॅक अप व्हेहिकल घेता, शिस्तबद्ध पद्धतीने सायकलिंग करत शक्य तेथे लोकांशी संवाद साधत ठिकठिकाणी शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी जनजागृती विषयक कार्यक्रमातून एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती करत अनेक आव्हाने कधी सायकल खराब होणे, घाटांचा रस्ता, चढ उतारांचे रस्ते, प्रचंड गर्मी ह्यूमीडिटी आदी आव्हाणांना सामोरे जात हि मोहीम पूर्ण केली.
2
नोव्हेंबर पूर्ण दिवस सायकलवर साईट सिईंन्ग साठी राखीव होता. सकाळी 6 वाजता कोव्हलम बीच येथे सूर्योदयाचा आनंद लुटला. तेथील वाळू, लाटांमध्ये मस्त खेळलो. आसपासची बीच - लाईट हाऊस बीच, पोर्ट ऑफ विल्लींघम, हार्बर बीचला भेट दिली. सुप्रसिद्ध दक्षिण शबरीमला मंदिर तिथून उंच टेकडीवरून दिसणारा समुद्र किनारा, पोर्ट ऑफ विल्लींघम लाईट हाऊस बीच चे टोक, आझिमला शिवक्षेत्र देवस्थान, आझिमला येथील सुंदर समुद्र किनारा एक ना एक देखावा नयनरम्य होता.
सकाळ चा नाश्ता डॉ शाजीकुट्टी सरांच्या घरी अप्पम, डोसा, रसम असा पोटभर केला.सरांच्या गच्चीवरील ऑरगॅनिक भाजी पाला गार्डन पाहिले. सरांच्या होमिओपॅथिक क्लीनिक ला भेट देऊन त्रिवेंद्रम पोहोचलो. दुपारी राजा रवी वर्मा ने काढलेल्या चित्र प्रदर्शन केरळ आर्ट गॅलरी ला भेट दिली. तेथील झू पार्क पाहून दुपारी रेल्वे स्टेशन ला जाऊन पार्सल ऑफिस मध्ये सायकली जमा केल्या. सायंकाळी प्रसिद्ध प्राचीन पद्मनाभ स्वामी मंदिराचे दर्शन घेतले. तेथील दीपोत्सव, पालखी सोहळा अनुभवला. 3 तारखेला त्रिवेंद्रम रेल्वे स्थानक ला सकाळी पोहोचून परतीचा प्रवास शबरीं एक्सप्रेस ने करण्यासाठी गाडीत चढलो. सोबत या 8 दिवसाच्या असंख्य आठवणी घेऊन. प्रत्येक आठवणी शब्दबद्ध करू शकलो नाही. पण या 3 राज्यातून काढलेल्या सायकल मोहिमेने हजारो अनुभवांची शिदोरी सोबत दिली. या मोहिमेत माझे केरळ मधील होमिओपॅथी चे गुरुजन वर्ग आणि सर्व मित्रांची साथ लाभली. माझा सायकलिंग पार्टनर डॉ संदीप चे संपूर्ण मोहिमेतील साथ लाख मोलाची असून कधीच विसरू शकत नाही. आता तात्पुरता विराम घेतोय पुढच्या वर्षीच्या आणखी मोठ्या सायकल मोहिमेस सज्ज होण्यासाठी.
              डॉ पवन सत्यनारायण चांडक
'श्रद्धा' विष्णू नगर वसमत रोड परभणी 431401 Mo: 9422924861













1 comment:

Niranjan Welankar said...

Great sir!!!!!!! Salute to you.