Monday, November 13, 2017

२८ ऑक्टोबर वडकरा ते गुरुवायूर 154 km


28 ऑक्टोबर ला सकाळी 04:45 ला उठून आंघोळी, निघायची तयारी करून 6 वाजता सर्व जण वडकरा बस स्टँड ला जमलो.आमच्या सोबत वडकरा रायडर्स च्या 20 सायकलस्वार काही ठराविक अंतरासाठी सहभागी झाले होते. वडकरा शहरातून ठिकठिकाणी शाळेतील मुले आमच्या रॅलीला उभे राहून शुभेच्छा देत होते. निघायला 05:30 ऐवजी 06:20 झाले होते. 35 किमी नंतर कोयीलांडी नंतर एलट्टूर ब्रिज येथे मलबार रायडर्स ने स्वागत रॅलीचे आयोजन केले होते.20 किमी नंतर थोडी कॉफी घेऊन पुढे कप्पाड बीच पाहिले. वास्को गामा ने येथून प्रवेश केला होता. कोयीलांडी ओलांडून सिग्नल चौकात पोहोचलो तर थोडा निराश झालो. कारण तेथे कोणीच नव्हते.चूक आमची होती 08:45 वाजले होते.डॉ प्रशांत सरांना फोन केला तर सरांनी काळजी करू नकोस आम्ही पुढील चौकात वाट बघतोय म्हणाले. पुढे काहि किमी पेडलिंग केल्यावर पाहतो काय 50 सायक्लीस्टचा ग्रुप आमच्या स्वागताला तयार होते. माझे होमिओपॅथितील सर डॉ गफार, डॉ प्रशांत, डॉ उमन सरांनी आमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मी त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. तो पर्यंत संदीप, माउली, डॉ बकान, कैलास पोहोचले होते. सर्वांना अँपल ज्यूस दिले. मलबार रायडर्स कॅलिकत पॅडलर्स ग्रुप ने आमचे स्वागत केले.या ग्रुपच्या एका पेक्षा एक रोड बाईक, हायब्रीड बाईक देखण्या होत्या. सायक्लीस्ट सोबत दिलखुलास गप्पा मारल्या. आसपास च्या लोकांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. मल्याळम मनोरमा मातृभुमि दैनिकाच्या रिपोर्टर ला इंग्लिश मध्ये मुलखात दिली एचआयव्ही एड्स जनजागृती साठी सुरु सायकलिंग उपक्रमाची माहिती दिली.पुढे शिस्तीत एका मागे एक असे आम्ही सायक्लिस्ट निघालो. जवळपास 50-55 सायक्लीस्ट ओळीने रस्त्याच्या कडेने सायकल चालवताना सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकाणी शाळकरी मुले टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती. पुढे कालीकत येथील सुप्रसिद्ध हॉटेल मध्ये गेट टुगेदर न्याहारीची सोय केली होती. मस्त पैकी इडली वडा, अप्पम, व्हेज करी, मसाला डोसा तर नॉन व्हेज वाल्यांसाठी अप्पम फिश करी, चिकन 65 वर ज्याने त्याने आपापल्या इच्छेनुसार ताव मारला. येथे कोषीकोड आयएचएमए डॉक्टर्स शी आमच्या या सायकल मोहिमेविषयी चर्चा केली. त्यांना जनजागृती पत्रकांचे वाटप करून आभार मानले.
कोषीकोड केरळ राज्यातील नागरी वस्ती असलेले सर्वात मोठे शहर असून जगात त्याचा 192 वा क्रमांक लागतो. या शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. कालीकत बीच ला भेट देऊन आम्ही गुरुवायुर साठी राष्ट्रीय महामार्ग 66ला लागलो. वाटेत डेकॅथलॉन वर लाईटचे होल्डर घेतले जे विराजपेटच्या खराब रस्त्यात गहाळ झाले होते. तेथील स्टाफ, उपस्थित ग्राहकांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. दुपारचे 12 वाजले होते. आणखी 100 किमी बाकी होते. 1 वाजता कोटक्कल येथे कार्यक्रम होता. परंतु तो पर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. शिवाय कोटक्कल मार्गे गुरुवायुर 125 किमी तर तिरुर मार्गे 100 किमी होते. पुढे कालीकत विद्यापीठ जवळ 3 अवघड असे चढ चढून विद्यापीठ जवळ पोहोचलो. सायक्लीस्ट वसीम चा निरोप घेतला तो खास रस्ता चुकू नये म्हणून 30 किमी सोबत आला होता. तो आयटी चे शिक्षण घेतो त्याचे घर कालिकत विद्यापीठ येथे असून तो रोज ५० किमी सायकलवर प्रवास  करतो. कालीकत विद्यापीठ च्या शेवटच्या 1 किमी लांबीच्या चढणे सर्वांचा घाम काढला. सर्वांनी मस्त कोकोनट मिल्क पासून बनलेले ज्युस पिले. डॉ अन्वर सरांना कोटक्कल ड्रॉप करत असल्याची कल्पना देऊन माफी मागितली. कारण डॉ अन्वर यांनी टीम सफारी सोबत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुढे चेलारी जंक्शन हुन उजवीकडे कोस्टल रूट ने सायकलिंग करू लागलो. हायवे पेक्षा हा रूट कमी ट्रॅफिक चा आणि निसर्ग सौंदर्याची उधळण होती. छान नारळाची, फणसाची झाडे, एका बाजूला सागरी किनारा आणि बॅकवॉटर मजा येत होतीटायईलीकडवू पुलावर आलो. कडंलुंडी नदीवर फोटो काढले. थोडी चिक्की खाल्ली. गुरुवायुर 90 किमी बाकी होते. चेट्टीपडी रोड खराब होता परंतु सायकल ला त्रास नव्हाता शिवाय वाहतूक कमी होती. डॉ अन्वर सरांना आम्हास भेटण्याची इच्छा झाली ते कार ने परंपनगडी येथे भेटण्यास आले. मस्त दिलखुलास गप्पा झाल्या. त्यांच्या टीम सफारी रायडर्स साठी जनजागृती माहितीपत्रके दिली.पुढे रामेश्वर शिव क्षेत्र मंदिर पाहून पोरामपूझा बॅकवॉटर चे पूल ओलांडून तनूर येथे पोहोचलो. तनूर एक छोटे गाव तरी येथे होंडा सिटी चे शो रूम पाहून हपकलो. तेथील रिक्षावाल्याना रूट विचारून पाम्पलेट वाटले. पुढे तिरुर येथील मुख्य चौक मध्ये जनजागृती पत्रके वाटली.थोडी केळी खाल्ली चमरावाटनम पुलावर पोहोचलो. इतर मित्रांची वाट पाहतपुलावर बसून छान पक्षी, निसर्ग सौंदर्य न्याहाळत होतो. हा पूल भरतपुझा नदीवर बांधलेला जवळपास 750 मीटर्स लांबीचा पूल आहे. पुलावरून भरतपुझा नदी आसपास चे दृश्य नयनरम्य होते. बाकी मित्र येई पर्यन्त तेथील हॉटेल्स वरील लोकांना जनजागृती पत्रके वाटली. 5 वाजले होते. सायंकाळी 7 वाजता गुरुवायुर येथे कार्यक्रमास पोहोचणे आवश्यक होते. मग मी, संदीप, डॉ बकान यांनी प्लॅनिंग केली 35 किमी अंतर कसे कापायचे ते. व्यवस्थित लयबद्ध पेडलिंग करत पोनानी पोहोचलो. पोनानी गावाबाहेर कॉफी घेतली.पाणी भरून घेतले. आता केवळ 25 किमी 6 वाजत आले होते. हेड लॅम्प ऑन केला. तिघे एका पाठोपाठ एक असे पेडलिंग करत गुरुवायुर कोची रोडच्या चौक मध्ये पोहोचलो. गुरुवायुर 5 किमी होते. गुगल मॅप वर इंद्रप्रस्थ हॉटेल टार्गेट केले आणि शार्प 7:10 वाजता आम्ही तिघे मी, संदीप आणि डॉ बकान पोहोचलो. आमचे डॉ चंद्रन सर आयएचएमए थ्रिसूर टीम ने स्वागत केले. त्यांनी आयोजित केलेल्या ग्रँड कार्यक्रमात केरळ च्या सांस्कृतिक पद्धतीने आमचे स्वागत केरळ शॉल देऊन करण्यात आले. इतर लोक कॅलिकत विद्यापीठ तिरुर जवळ थकल्याने बॅक अप व्हेहिकल ने कसे बसे पोहोचले. मी सायकलिंग ची कशी प्रेरणा मिळाली सायकलिंग च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनःपर्यंत पोहोचून कशी जनजागृती सुरु आहे या विषयी तसेच एचआयव्ही बाधितांच्या मूलभूत हक्कांविषयी संवाद साधला.शेवटी डॉ चंद्रन सरांनी आभार मानले. रात्रीचे जेवण आम्हा सर्वांनी सोबतच घेतले. रात्री उशीर झाल्याने प्रसिद्ध प्राचीन विष्णू मंदिर गुरुवायुर देवस्थानचे दर्शन शक्य झाले नाही. दिवसभरात 154 किमी सायकलिंग झाल्याने थोडा थकलो होतो. इतर सायक्लीस्ट मित्रांनी थकल्यामुळे साईट सिईंग मुळे ब्रेक घेत असल्याचे सांगितले.












No comments: