Tuesday, November 14, 2017

३० ऑक्टोबर चेरथला कोल्लम चाट्टनूर 125 km








30 ऑक्टोबर ला सकाळी 5 वाजताच उठून तयारीला लागलो. 05:45 ला वेळेवर निघालो. 10 किमी वर काटूर बीच वर सूर्योदय अनुभवला. काटूर बीच जास्त लोकांना माहीत नसल्याने हे बीच शांत स्वच्छ होते. तो पर्यंत आल्लेपी रायडर्सचे सायक्लीस्ट पोहोचले. मस्त 20-25 सायक्लीस्ट सोबत आम्ही एका पाठोपाठ एक पेडलिंग करत आल्लेपी शहरात प्रवेश केला. आलेप्पी ला बॅकवाटर्स चे शहर म्हणतात. येथील हाऊसबोट जगप्रसिद्ध आहेत.आलेप्पी च्या जवळपास माझ्या सायकलच्या बॉटम बेअरिंग मध्ये प्रॉब्लेम झाला. कट कट आवाज सोबत पेडलिंग ला अवघड जात होते. काही रायडर्स टूल घेऊन आले तर लक्षात आले कि आतील बेअरिंग आणि एक्सेल खराब झालेत. मी थोडा निराश झालो. डॉ राजेश कुमार सरांच्या येथे पोहोचलो.मेकॅनिक 10 च्या पूर्वी भेटणे शक्य नव्हातेआलेप्पी रायडर्स आयएचएमए आल्लेपी ने आम्हा दोघांचे स्वागत केले. पुढे थोडा नाश्ता करून परमेडिकल चे विद्यार्थी, उपस्थित सायक्लिस्ट डॉक्टर्स ना आमच्या सायकल मोहीम, एचआयव्ही बाधितांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या कार्याविषयी इंग्रजीत संवाद साधला. डॉ शिबा राणी मॅडम ने तो मल्याळम मध्ये भाषांतर करून सांगितला. 10 वाजता अखेरीस सायकल दुरुस्ती साठी मेकॅनिक कडे गेलो. त्या पठ्ठ्याने केवळ 20 मिनिटात दुरुस्त करून दिले. तोवर मस्त इडली वड्यावर ताव मारला. 10:45 ला सायकल दुरुस्त झाल्यावर जीवात जीव आला सर्वांचे आभार मानून मी आणि संदीप निघालो. आधीच उशीर आणि या तीन तासात सायकल खराब झाल्यामुळे मनाची खूपच चल बिचल झाली होती.
पुढचा 105 किमी प्रवास आणखी बाकी होता. बॉटल रिफिल करून त्यात एनरझल ओआरएस मिसळून निघालो. आलेप्पी - कोल्लम भागात प्रंचड दमटपणा, ऊन त्यामुळे पायात क्रॅम्प येऊ नये म्हणून व्यवस्थित पाण्याचे संतुलन लयबद्ध पेडलीग करत 30 किमी सायकलिंग करत हरिपाद पोहोचलो. नॅशनल हायवे असल्याने हरिपाद पर्यंत हेवी ट्रॅफिक होती. येथून एक रस्ता कोल्लम तर दुसरा कोट्टायम कडे जातो.आम्ही कोल्लम रास्ता पकडला. हा हायवे समुद्राच्या अगदी जवळून जातो. आणखी 30 किमी नंतर दुपारी 1 वाजता करुनागपल्ली पोहोचलोथोडा पायात ताण जाणवू लागला म्हणून मोसंबी ज्यूस, टाटा ग्लुकोज घेतले. कॅडबरी खाऊन थोडी स्ट्रेचिंग केली. कोल्लम 30 किमी बाकी होते. पुढे कायमकुलम येथील केरळ ललीतकला अकॅडमीला भेट दिली. ज्याला शंकर मेमोरियल नॅशनल कार्टून म्युझियम म्हणतात. तेथील विविध कार्टून, हस्तकला, विविध लाकडावर कोरलेले शिल्प देखने होते.
दुपार चे जेवण स्कीप केले कारण आधीच 2-3वेळेस ज्यूस, चिक्की, कॅडबरी खाल्ले होते. सकाळी उशीर होऊन देखील सकाळ पासून जवळपास 80-85 किमी अंतर कापले होते. पुढे चवारा गाव ओलांडून 4 वाजता कोल्लम शहरात प्रवेश केला. कोल्लम शहरात प्रवेश करतांना अष्टमुडी लेक ला जोडलेले बॅकवाटर्स वर एक मोठा पूल ओलांडून जावा लागतो. या पुलावरून समुद्राचे समुद्राला मिळणाऱ्या कालदा नदीचे पाणी किनारी उभ्या असलेल्या मोठ्या बोटी हे दृश्य खूपच मोहक दिसते.
हॉटेल लेक व्यू कोल्लमला दोघे पोहोचले. कोल्लम हे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक प्रियदर्शन चे मूळ गाव. तेथे आयएच एमए कोल्लम चे पदाधिकारी डॉ बिजू जॉन, डॉ हरिकृष्णन, डॉ रेजिथ कुमार यांनी स्वागत केले. त्यांना एड्स जनजागृती सायकल मोहिमेविषयी माहिती देऊन पत्रके वाटप केली. दुपारचा नाश्ता मेदू वडा मोसंबी ज्यूस घेऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला. कोल्लम ला पोहोचायला उशीर झाल्याने एका शाळेत संवादाचा कार्यक्रम होऊ शकला नाही म्हणून वाईट वाटले.  कोल्लम - त्रिवेंद्रम हा अत्यंत गजबजलेला नेहमीच वर्दळ असलेला रस्ता यातून मार्ग काढत नेहमीचाच राष्ट्रीय मार्ग क्र 66 पकडला. 6 वाजता बरोबर चात्तन्नूर पोहोचून डॉ शाजी सरांना फोन केला. ते हि लगेच सायंकाळची बिझी ओपीडी असताना आम्हास घ्यायला आले. गरम कॉफी पाजून आमचे स्वगात केले. डॉ शाजी सर मानसोपचार होमिओपॅथिक तज्ञ अत्यंत बिझी शेड्यूल असतांना त्यांनी वेळ काढला. आमची दोघांची मुक्कामाची सोय त्यांच्या घरी केली होती. केरळ ट्रॅडिशनल घरात आमचा पाहिलाच मुक्कम. आम्ही दोघे फ्रेश होऊन त्यांच्या सहकुटुंब डॉ परिमल चॅटर्जी सरांसोबत जेवायला गेलो. केरळ पद्धतीने तयार केलेले व्हेज नॉन व्हेज खाद्यपदार्थ पोटभर जेवलो. सायंकाळी डॉ शाजी सरांच्या पत्नी ज्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत त्यांच्याशी एचआयव्ही बाधित बालकांच्या शिक्षण आजवर करत असलेले विविध कार्य समस्यांवर एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरातील स्पेशल काजू केळी दिली. त्यांचा मुलगा एक छान चित्रकार आहे. त्याच्या पेंटिंग पाहून आम्ही भारावलो. रात्री वेळेवर झोपी गेलो कारण उद्याचे टार्गेट नागरकॉईल किंवा कन्याकुमारी होते.

No comments: