श्रीरंगपटनमहुन सकाळी 5 वाजताच उठून रंगनाथ स्वामी मंदिराचे दर्शन घेऊन 06:40 ला निघालो. वाटेत रंगनाथीट्टू पक्षी अभियारण्यास भेट दिली. आमचा पक्षी मित्र संदीप ने लगेच कॅमेरात छान फोटो कॅप्चर केली. आम्हाला बर्डिंग मधील काही कळत नसल्याने मस्त ओढ्या काठी थोडा वेळ बसलो. हा रस्ता थोडा इंटिरियर होता पण छान वातावरण भात शेती, कावेरी बॅकवॉटर असा मार्ग व तीव्र खाली वर असा रोलिंग रस्त्यावर पेंडल मारत वृन्दावन गार्डन गेट गाठले. सकाळी गार्डन बंद असल्याने आम्ही पुढे निघालो.धरण परिसर असल्याने रस्ता चढ उताराचा होता. सकाळी 8 वाजता पुष्कळ घाम निघत होता. 30 किमी पेंडल मारत पुन्हा राष्ट्रीय महामार्ग 275 गाठले. नारळ पाणी पिऊन हायवे वर आम्ही तिघे मस्त कोऑर्डिनेशन साधत सायकल चालवत होतो.वाटेत बिलकेरे गावी नाश्ता केला. तेथील लोकांना धड हिंदी बोलता येत नव्हती.पाम्पलेट वाटून पुढे निघालो.मैसूर - हुंसुर रस्ता हा खाली वर रोलिंग होता. त्यामुळे वारंवार गियर बदलावे लागत होते. हायवे मुळे रस्त्याच्या दुतर्फा झाडी कमी होती.पुढे 11 वाजता हुंसुर पोहचलो. रस्ता विचारायच्या निमित्ताने काही मालवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर्स ला पत्रके वाटली. हुंसुर पासून पुढे 10 किलोमीटर पुढून राज्य मार्ग पकडला. येथून जंगल लागले. दुपारचे 1 वाजले होते. येथून विराजपेट 53 किमी होते. सागर धाब्यावर थांबलो. तेथील प्रसिद्ध असे घी राईस व इतरांनी फिश राईस वर ताव मारला. बिल देतांना ते ढाबा वाले चाचा मराठीत बोलले “कुठून आलात ? कोणत्या गावचे ?” वगैरे. मला वाटले चाचा मुस्लिम दिसताय, आणि अख्खल मराठीत बोलताय. तरी मी हिंदीतच त्यांना उत्तर देऊ लागलो.तर त्यांनी मस्त सुनावले 'काय रे मराठीत बोलायला लाज वाटते का ? '
आम्हाला देखील आपल्या महाराष्ट्राचा व्यक्ती भेटल्याचा अत्यंत आनंद झाला. चाचाची गळाभेट घेतली. त्यांनी स्वतः होऊन बिल देखील कमी घेतले होते. ते चाचा अनेक वर्षे कोल्हापूरला होते. त्यांचा निरोप घेऊन निघालो
पुढे विराजपेट चे जंगल लागले.येथून विराजपेट 40 किमी होते. रस्त्याच्या दुतर्फा झाडे, केवळ काही माकडे नजरेस पडली. थोडे पुढे आम्हाला घोणस साप दिसला. दुपारी 3 वाजता तिथीमती पोहोचलो.तेथील टाटा कंपनीच्या कॉफीचे मळे बाहेरूनच पाहिले. तिथीमतीचे फॉरेस्ट गेस्ट हाऊस छान होते. 4 वाजता गोनिकोप्पा गाठले तेथील शासकीय रुग्णालयातील एड्स नियंत्रण विभागाचे कौन्सीलर्स व डॉक्टर्स नि आमचे स्वागत केले. मस्त मोसंबी ज्यूस पिऊन मार्केट मध्ये पाम्पलेट वाटले. काही व्यक्तींनी आम्हास प्रवासासाठी पैसे देऊ केले परंतु आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला. गोनिकोप्पा ते विराजपेट तीव्र चढ व घाटाचा रस्ता. काही चढ तर इतके अवघड होते कि दोन्ही साईडला गियर 1 वर घेऊन पेंडल मारावे लागायचे. अचानक गियर बदलल्याने चेन वाजायची. सकाळी 100 किमी सायकल चालवल्यावर जितका थकवा आला नाही तितका या केवळ 15 किमी तीव्र चढ उताराच्या रस्त्याने घाम काढला. सायंकाळी अखेरीस दिवसभरात 118 किमी सायकल चालवून दुपारी 5 वाजता विराजपेट पोहोचलो. विराजपेट तसे थंड हवेचे ठिकाण. या भागात ढो ढो पाऊस पडतो त्यामुळे ठिकठिकाणी तळे होते. भात शेती व कॉफी व मसाला लागवड हि येथील मुख्य शेती व्यवसाय.
परंतु कुर्ग जवळ असल्याने पर्यटन साठी प्रसिद्ध शहर. तेथील प्रसिद्ध गणपती मंदिर, मारियम्मा मंदिर व सिटी टॉवर भागात पाम्पलेट वाटून जनजागृती केली. मी आणि संदीप तेथील प्राचीन गणपती मंदिर, सेंट एनी चर्च, मारियम्मा मंदिर ला भेट दिली. विराजपेट हे कोडगु जिल्ह्यातील तालुका आहे. हे पर्यटन स्थळ असल्याने लोकांना बऱ्यापैकी हिंदी, इंग्रजी समजते. शाळा, मंदिर मध्ये सोय नसल्याने रात्रीचा मुक्काम नाईलाज असल्याने लॉज मध्ये केला.सुदैवाने केवळ 150/- प्रति व्यक्ती प्रमाणे रूम मिळाली. या भागात शाकाहारी जेवण मिळणे दुर्मिळ असल्याने संदीप ने माझ्यासाठी ब्रेड आणि सॉसची व्यवस्था केली. सायंकाळी स्वेटर्स घालून आम्ही शहरात मस्त पायी फेरफटका मारला. दिवसभराच्या चढ उताराच्या रस्त्यामुळे पाय थकले होते. पायी फिरल्याने मस्त वाटले. रात्री लवकर झोपी गेलो.
















No comments:
Post a Comment