Monday, November 13, 2017

27 ऑक्टोबर 2017 : विराजपेट ते वडकरा (केरळ) 110 km




27 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता विराजपेट हुन मस्त कॉफी पिऊन निघालो. विराजपेट भागात कॉफीचे पुष्कळ मळे होते. सकाळच्या धुक्यातून मार्ग काढत चेक पोस्ट गाठले तिथून कुर्ग कन्नूर राज्य मार्ग घ्यावा लागतो. येथून जवळपास 20 किमी तीव्र उताराचा रस्ता. मस्त पैकी घनदाट ब्रम्हगिरी जंगलातून मार्ग काढत वेगावर नियंत्रण ठेवत उतरत होतो. वाटेत ठिकठिकाणी झरे लागले. पुष्कळ झाडी मुळे कॅमेरात टिपू शकलो नाही. प्रसिद्ध शिव मंदिराचे दर्शन घेतले. जवळपास 18 किमी उतार झाल्यावर वाटेत आम्हाला काही बुलेट स्वार भेटले.ते देखील कन्नूर बेंगलोर बुलेट एक्सपेडिशन साठी जात होते.त्यांना आमच्या मोहिमे विषयी कुतुहूल वाटले.त्यांनी आम्हास शुभेच्छा दिल्या. पुढे मक्काकोट्टम मार्गे आम्ही केरळ राज्यात प्रवेश केला. पुढे थोडे पुढे एक नदी ओलांडून त्या नदीवरील जुन्या पुलावरून आम्ही इरिट्टी हायवेवर निघालो. हा रस्ता अत्यंत खराब ठिकठिकाणी काम चालू होते. पुढे इरिट्टी जवळ एक सुंदर सेंट सेंबस्तियन सेंट पेंटेकोस्ट चर्च लागले. इरिट्टी जवळ नाश्ता केला. इरिट्टी हे कन्नूर जिल्ह्यातील एक तालुका पण अत्यंत सुंदर असे निसर्ग सौंदर्य लाभलेले गाव

येथून पुढील रास्ता तीव्र चढ उतार काही ठिकाणी अत्यंत कठीण असे चढ होते सोबत या भागात वातावरणात दमटपणा असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. पूढे चावशेरी मार्गे मतन्नूर गाठले. तेथे मी संदीप डॉ बकान सर ने मोसंबी ज्युस घेतला. केरळ मध्ये एक विशेष कि कुठेच गाव संपत नाही एका मागे एक गाव सुरु. प्रत्येक गाव सर्व सुविधांनी युक्त या भागात गर्मी दमटपणा असल्याने जागोजागी शीतपेय, ज्यूस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. मतन्नूर नंतर कुटुपरंबा पोहोचलो. आज दुपारी 1 पर्यंत वडकरा पोहोचणे आवश्यक होते कारण तेथील 2 शाळा, सायकलिंग क्लब ने ठिकठिकाणी एड्स जनजागृती संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आमच्या लोकेशन विषयी वडकरा हुन फोन येत होते. कुटुपरंबा हुन पोक्कोड गावातून  2 रस्ते फुटटात डावीकडे पानुर, माहे, कोषीकोड तर उजवीकडे तलशेरी, कन्नूर. आम्ही डावीकडेकडे वळलो. पानुर लागले.पानुर ते माहे अत्यंत चढ उताराचा रस्ता. चढ इतके तीव्र कि दोन्ही कडे गियर 1 वर आणावे लागायचे. माझ्या पार्टनर डॉ बकान च्या गियर सेटिंग मध्ये प्रॉब्लेम असल्याने ते शिफ्ट होत नव्हते वडकरा शिवाय एक्स्पर्ट सायकल मेकॅनिक नव्हता. त्यामुळे ते अक्षरशः चढ आला कि सायकल हातात घ्यायचे आणि उतारावर सीटवर बसायचे. आम्ही दोघे पानुर येथे पोहोचलो.मस्त उसाचा गार रस पिऊन थोडी स्ट्रेचिंग केली. बस स्टँड भागात मल्याळम भाषेतील एड्स जनजागृती पत्रके वाटली आणि पुढे निघालो. पानुर नंतर चढ उतार तर होतेच पण निसरसौंदर्य खूप सुंदर होते. समुद्र जवळ असल्याने ठिकठिकाणी बॅकवॉटर, छोट्या नद्या लांबच्या लांब पूल मजा येत होती. पुढे माहे जवळ येत असतांना एक मोठा चढ चढून  माहे नदीवरील पूल ओलांडून कुन्हीपल्ली गाव ओलांडून माहे शहरात प्रवेश केला. माहे हे जिल्ह्याचे मुख्यालय तसे पॉंडिचेरी केंद्र शासित प्रदेश मध्ये मोडते. रेल्वे क्रॉसिंग लागली रेल्वे यायला वेळ आहे पाहून लगेच माहितीपत्रके वाटली. सर्वांना आमच्या सायकल वरील ओझे, इतका लांबचा प्रवास ऐकून आश्चर्य होत होते. पुढे चौकातून डावीकडे वळून नॅशनल हायवे 66ला लागलो. 4 किमी नंतर मुक्काली गाव लागले. मुक्काली गाव माझे होमिओपॅथितील गुरू डॉ सुदिन कुमार यांचे गाव. त्यांनी माझे डॉ बकान सरांचे स्वागत केले. मस्त गार संत्रा ज्यूस घेतले. सरांच्या क्लीनिक मध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन वडकरा साठी निघालो.जवळपास 9 किंमी नंतर वडकरा येथील बी.इ.एस. शाळेत पोहोचलो. सकाळपासून 103 किमी सायकलिंग झाली होती. सुरवातीला जरी 25 किमी उतार असला तरी पुढील सर्व रस्ता चढ उताराचा समुद्र किनारी असल्याने दमटपणा खूप होता त्यामुळे थोडा थकवा आला होता. पण तो थकवा या शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे केंव्हाच निघून गेला. स्काऊट गाईडच्या पथक ने आमचे स्वागत केले. उपशिक्षणाधिकारी श्री वेणुगोपाल, बीइएस शाळेच्या प्राचार्या श्रीमती स्टेला , वटकरा रायडर्स या सायकलिंग क्लब चे श्रीजीथ,मनाली मोहनन, दिनेश के पी, सी प्रसून यांनी आमचे स्वागत करून आमच्या मोहिमे विषयी माहिती दिली. एड्स जनजागृती पत्रकाचे वाटप करून मदतीचे आवाहन केले. पुढे मी आजवर सुरु असलेल्या एचआयव्ही बाधितांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या कार्यावर एचआयव्ही एड्स विषयी माहिती देऊन  सायकलिंगचे पर्यावरण संवर्धनासाठीचे महत्व सांगितले. डॉ सुदिनकुमार यांनी आभार मानले. पुढे श्रीनारायणा इंग्लिश स्कुल कडे आम्ही निघालो पण पुढे काय होणार हे आम्हाला माहीत नव्हाते.चढ चढून शाळेच्या गेट मध्ये प्रवेश केला तर शाळेच्या इमारतीच्या तिन्ही बाजूने टाळ्यांच्या कडकडाटात शिस्तीत शाळेच्या बँड पथकाने आम्हाला स्वागत करत मुख्य हॉल पर्यंत आणले. शाळेचे मुख्याध्यपक, शिक्षक मंडळीने केरळ मधील प्रसिद्ध असे लहान पण अत्यंत गोड केळी   लिम्बु शरबत दिले. थोडे बोलून आम्ही सभागृहकडे निघालो. सभागृहात 9 वि ते 12 वि तील शेकडो विद्यार्थी बसले होते. त्यांना एचआयव्ही एड्स ची कारणे, प्रसार आदी विषयी माहिती देऊन एचआयव्ही बाधित विद्यार्थ्यांना सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन केले. सोबत सर्वांना सायकलिंग फिटनेस चा मंत्र देखील दिला. पुढे प्रश्नोत्तर च्या सेशन मध्ये मुलांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तो पर्यंत संदीप पोहोचला होता.पावसामुळे तो पानुर येथे अडकला होता. त्यामुळे त्याचे हे दोन्ही कार्यक्रम मिस झाले.त्याला घेऊन आम्ही तिघे डॉ सुदिन सर दुपारी पोटभर जेवलो.सायकल च्या गियर सेटिंग चा प्रॉब्लेम असल्याने डॉ बकान सरांची चलबिचल होत होती. ती देखील तेथील सायकल मेकनीक नि गियर सेटिंग दुरुस्त करून दिली. मग वडकरा येथील सुंदर समुद्र किनारा येथे भेट द्यायला गेलो.छान सूर्यास्त अनुभवला. वडकरा बीच ला सॅंड बँक बीच देखील म्हणतात. हा एक सुंदर समुद्र किनारा असून कोटक्कल नदी येथे अरबी समुद्र ला मिळते.वडकरा येथील लोकणारकवू मंदिर सुप्रसिद्ध आहे. मलबार प्रांतातील वडकरा हे प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे

सायंकाळी ग्रिफि हॉल येथे वटकरा रायडर्स आयएचएमए वटकरा ने छान समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वडकरा चे पोलीस उप अधीक्षक टी प्रेमराज उपस्थित होते. सायंकाळ पर्यंत का होईना इतर सायक्लीस्ट कसे बसे सायकल, बॅक अप व्हेहिकल ने पोहोचले होते.या कार्यक्रमात सर्व सायक्लीस्ट, डॉक्टर्स, फिटनेस प्रेमींचे उपस्थितीत आम्हा सर्व 8 टीम मेंबर्स चा सत्कार करण्यात आला. मी देखील या सर्व सायक्लीस्ट, सामाजिक कार्यकर्ते, फिटनेस प्रेमींशी संवाद साधत आजवर एचआयव्ही बाधितांच्या हक्कासाठी सुरु असलेल्या कार्यासाठी मदतीचे आवाहन केले.सोबत सर्वांना जनजागृती पत्रके वाटली. रात्रीचे जेवण आम्ही डॉ सुदिन कुमार सरांच्या कुटुंबासोबत केरळ स्पेशल डिश फ्राईड राईस, पापड, रसम, पायसम, नॉन व्हेज साठी फिश करी, प्रॉन आणि घी राईस, परोठे यावर सर्वांनी आपापल्या आवडीनुसार ताव मारला.रात्रीची झोपण्याची सोय शाळेतील वर्गात केली होती. मस्त बेंच जुळवून आम्ही झोपी गेलो.














1 comment:

Niranjan Welankar said...

अतिशय जबरदस्त सर!!!!!!!!