Tuesday, February 1, 2022

कोटा झालावाड सोयत - एड्स जनजागृती सायकल यात्रा 140 किमी















 



19 नोव्हेंबर 2021
आज सकाळी माहेश्वरी रिसॉर्ट हुन स्थानिक आयोजकांनी दिलेल्या पाहुणचार स्वीकारून कोटा मधून निघालो. कोटा म्हणजे प्राचीन संस्कृती, इतिहास आणि शिक्षण चा त्रिवेणी संगम.
काल एकच चुकले ते म्हणजे जी डी पटेल यांनी कोटा शहरात स्वामी नारायण टेम्पल येथे कार्यक्रम आयोजित केला होता पण तो मूळ रूट पेक्षा 10-15 किमी आत जावे लागणार होते शिवाय 3 दिवस पासून सतत 160 किमी सायकलिंग मुळे काल 145 किमी वरच ब्रेक होईल म्हणून माहेश्वरी रिसॉर्ट व स्थानिक माहेश्वरी समाज बांधवांनी दिलेले आदरातिथ्य स्वीकारले. यामुळे जी डी पटेल साहेबांचे आदरीतिथ्य स्वीकारता न आल्याबद्दल त्यांना दिलगिरी व्यक्त केली.
परभणीतील माझे मित्र डॉ व्यंकटेश पेडगावकर यांची  कन्या नेहा ही  IIT तयारी साठी  कोटा येथे शिकते. सध्या काल पाऊस खूप सुरू आहे. या पावसात रेनकोट/जॅकेट अशा 2 in 1 ची गरज होती. माझ्याकडे UK हुन आणलेले जॅकेट कामी आले परंतु पाटणकर सरांचे थंडी मुळे व पावसापासून रक्षण व्हावे म्हणून काल नेहा ला जॅकेट साठी विनंती केली असता अत्यंत योग्य वेळी नेहा पेडगावकर ने 10 किमी ऑटो ने प्रवास करून आपलूकीची भेट दिली. कोटा मध्ये परभणीची तीच आपुलकी आणि जिव्हाळा चा अनुभव आला. 8 वाजता तिचा क्लास असून देखील तिने ऑटो ने येऊन ही भेट दिली. तिचे मनःपूर्वक आभार मानून निरोप घेतला.
तत्पूर्वी कोटा मधील चंबल नदीवरील विशाल पूल ओलांडताना 'मर्दानी 2' या चित्रपटात व्हिलन चा पाठलाग करतांना अभिनेत्री राणी मुखर्जी ने याच पुलावरून उडी घेतलेला तो scene आठवला.
इथून जवळच चंबल नदीवरील नयापुरा डॅम पर्यटन साठी प्रसिद्ध आहे. वाटेत कोटा झूलॉगीकल पार्क, स्टेडियम लागले तिथून उजवीकडे वळल्यावर उजवीकडे एक किशोर सागर तलाव लागले जिथे जग मंदिर मंदिर, दर्गा आणि श्री तेजाजी महाराज आणि नाग नागीण आदी धार्मिक प्रार्थना स्थळे आहेत.
जग मंदिर महेल कोटा च्या एका राणीने 1740 मध्ये बांधले असून त्या किशोर सागर तलाव मध्ये या महेल चे सुंदर असे प्रतिबिंब दिसून येते. तसेच चंबल नदीवरील चंबल गार्डन एक छान पर्यटन स्थळ जिथे तलावात बऱ्याच मगरी दिसून येतात. तसेच देवताजी हवेली, गणेश उद्यान व सी वी गार्डन सारखी प्रसिध्द पर्यटन स्थळे आहेत.

सकाळच्या वेळी उज्जेन, इंदोर हुन येणाऱ्या ट्रॅव्हर्ल्स बस ची वाहतूक बरीच होती. याच किशोर सागर तलाव शेजारी पर्यटन साठी प्रसिद्ध असे 'सेवन वंडर्स पार्क आहे. इथे  अनेक हिंदी चित्रपटांची शूटिंग झाली आहे जसे बद्री की दुल्हानिया, मर्दानी 2 आदी.
कोटा येथे चंबल नदी च्या पूर्व किनाऱ्यावर 'सिटी फोर्ट पॅलेस' हा किल्ला प्रसिद्ध आहे जी 17 व्या शतकात बांधला होता.
तसेच राव माधो सिंह संग्रहालय जे कोटा राज्याचे प्रथम शासक राव माधो सिंह यांच्या नावावर सुरू झाले आहे. या संग्रहालयात कोटा येथील प्रसिद्ध शिल्पे, छायाचित्रे, शस्त्रे आणि राजघराण्याशी संबंधित वस्तू पाहता येतील.
पुढे पाऊस चालूच होता आम्हाला देखील अंतर जास्त असल्याने पावसात भिजत कोटा विमानतळ समोरून सायकलिंग करत कोटा शहराच्या बाहेर पडलो.
झालावाड रोड ला लागलो हा रस्ता सिमेंट रोड असून चार पदरी होता काही ठिकाणी अनंतपुर जवळ रस्त्याची कामे सुरू असल्याने सावधपणे सायकल चालवत होतो.
आज स्पीड देखील कमी आणि पावसामुळे टांगळ मंगळ होत होते. 33 किमी ला कसर या गावा जवळ नाश्ता साठी थांबलो
इथे ताडपत्री च्या शेड मध्ये  नाश्ता तर मिळाला नाही मग काय चाय, बिस्कीट और गाठी शेव पे काम चल गया.
पुढे दाराह गावात ORS ब्रेक घेऊन गावाबाहेर पडलो.
दरा जवळ 'दरा राष्ट्रीय वन्य जीव अभयारण्य' हे मगरी आणि सडपातळ तोंडाच्या मगरीसाठी खूप लोकप्रिय आहे. इथे बिबट्या, हरणेही बऱ्याच प्रमाणात आढळतात.
दरा पासून  जवळच ऐतिहासिक वास्तू 'अबली मिणी का महल' प्रसिद्ध आहे.
पुढे आम्ही सायकलिंग करत  मुकंदरा टायगर रिझर्व्ह मध्ये प्रवेश केला. इथे 2 ते 3 चढ लागले. गियर बदलत पहिल्या गियर वर पेडलिंग करत घाट चढला. चढावर एक कार आम्हाला ओव्हरटेक करून समोर थांबली. त्यांनी आमच्या मोहिमेविषयी जाणून अभिनंदन केले इतकेच नाही तर या दुर्गम घाटात पावसात भिजल्यावर अद्रक वाला चहा थर्मास मधुन ओतला. या मायेच्या आपुलकीने दिलेल्या चहाला प्रसाद समजून आम्ही ग्रहण केली. आमच्या सामाजिक विषयावर भर घाटात रस्त्याच्या कडेला गप्पा रंगात आल्या असतांना राजस्थान पोलीस देखील सामील झाले. विशेष 'वंश परंपरा' टिकविण्याच्या हव्यासापोटी स्त्रियांवर मुलगा व्हावा म्हणून लादलेले बाळंतपण आणि मुलीला दुय्यम स्थान. या परिस्थिती व मानसिकतेत आजही काहीच बदल नाही मग हरयाणा असो की राजस्थान की आपला महाराष्ट्र मानसिकता तीच.....😢
असो या सर्व भावनिक गप्पात RK जैन साहेबांनी त्या जंगलातील वाघ वाचविण्यासाठी व वन्य जीव संवर्धन साठी खूप प्रयत्न केले होते. पण काय 'शेरणी' चित्रपट प्रमाणे भ्रष्ट यंत्रणा......काय होणार.....

अरे मी चहा विषयी बोललो पण पाणी ? ते तर त्या दरोगा साहेबांनी भरून दिले. शिवाय धाब्यावर जेवणाचं सांगतो म्हणाले पण आम्ही आदराने नकार दिला. पुढे पेडलिंग करत घाट उतरून सुकेत या शहरात प्रवेश केला. इथून एकेरी वाहतूक सुरू होते शिवाय रोड चे काम सुरू असल्याने सावधपणे सायकल चालवत होतो. या रोड वर शाहबादी तसेच विविध स्टोन/मारबल चे काम करणाऱ्या बऱ्याच स्टोन इंडस्ट्रीज असल्याने खूप धुळीचे साम्राज्य होते. सर्वात महत्वाचे म्हणजे पाऊस थांबला होता. इथून एकेरी वाहतूक सुरू असल्याने अवघड जात होते पण एका मागे एक करत सायकलिंग करत
सुकेत गावा बाहेर पडलो. पुढे अहु नदी ओलांडून पुढे 2 छोटे चढ लागले आणि  मग तीव्र उतार उतरून  प्राचीन झालावाड शहरात पोहोचलो.
एका स्वीटमार्ट वर छोले भटूरे, गाजर हलवा, ढोकळा आणि लस्सी चा पोटभर आस्वाद घेऊन झालावाड शहरात भटकलो.
पुढे उजव्या बाजूला झालावाड तलाव लागला. इथे चामुंडा माता मंदिर वसले आहे. इथून 8 किमी अंतरावर काली सिंध नदीच्या व आहु नदीच्या संगमावर  प्राचीन गागरोन किल्ला प्रसिद्ध आहे. 13 व्या शतकात इथे चौहान यांचे राज्य होते.
तसेच इथे कृष्ण सागर नावाचे सरोवर प्रसिद्ध आहे ज्याच्या किनाऱ्यावर लाकडांनी बांधलेली इमारत आहे.

पुढे सायकलिंग करत ट्वीन सिटी अर्थात झालरापाटण पोहोचलो.
झलरपटन येथील सूर्य मंदिरास बाहेरून भेट दिली. वास्तुकला दृष्टिकोनातून हे सूर्य मंदिर महत्वपूर्ण असून 10 व्या शतकात मालवा च्या परमार वंशीय राज्याने याचे निर्माण केले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णू अर्थात पद्मनाभस्वामी ची मूर्ती विराजमान आहे. या मंदिराची बनावट कोणार्क च्या सूर्य मंदिर प्रमाणे आहे असे मानले जाते.
चला आजचा मुक्काम आणखी 40 किमी दूर असल्याने आम्ही उज्जेन हायवे ने सोयत कडे निघालो.

सोयत रोड ला तलाव, कॅनॉल पाण्याने भरून वाहत होते. गव्हाचे शेत बहरलेले होते. सिंगल रस्ता असून देखील वाहतूक कमी असल्याने पेडलिंग मजेत सुरू होती. रायपूर ला चहाचा आस्वाद घेऊन सुवास गाव ओलांडल्यावर मध्य प्रदेश बॉर्डर मध्ये प्रवेश केला.
पुढे सोयत येथे जैन लॉज मध्ये केवळ 300 रुपयात मिळाली. चला विद्यार्थी आहे म्हटल्यावर खोली स्वस्तात मिळाली. मोहिमेच्या 8 व्या मुक्कामी 1160 किमी सायकलिंग करून मध्य प्रदेश राज्यात दाखल झालो.

डॉ पवन चांडक

No comments: