20 नोव्हेंबर
आज आनंदी आनंद झाला.........
9 दिवस
5 राज्ये
8 मुक्काम
अनेक नद्या
4 विविध भाषा
5 विविध संस्कृती
1300 km सायकल संवाद यात्रा पूर्ण
या सर्वांना जोडत आम्ही 12 नोव्हेंबर अट्टारी बॉर्डर (अमृतसर) येथून सुरू केलेली अमृतपरिक्रमा चा आज शेवटचा दिवस.
आज 20 नोव्हेंबर
हे ईश्वरा हे भोलेनाथा आजची राईड आणि या मोहिमेचा शेवट गोड होऊ दे म्हणत सोयत हुन निघालो. थोडं पुढे एका हॉटेलमध्ये चहा, शेव पोहे खाल्ले व बिल देऊ लागलो तर हॉटेल मालकाने विनम्र पणे नकार दिला. कारण विचारले तर इतकच म्हणाला "जय महाकाल. महाकाल के दर्शन को जा रहे हो...बस. जय भोलेनाथ"
त्यांचे आभार मानून व त्या होटेल वर जमलेल्या यात्रेकरू जे कुतूहलाने आमच्या सायकल वरील बोर्ड पाहून मोहिमेविषयी विचारत होते त्यांच्याशी संवाद साधून सुसेन कडे निघालो.
वाटेत एक नदीवरील एक पूल ओलांडून चेक पोस्ट ओलांडून उज्जैन हायवेला लागलो.
पुढे पाहतो तर काय एकेरी नव्हे तर अत्यंत छोटा रस्ता तो पण केवळ दोन फुटांचा रस्ता होता.
त्यामुळे तर म्हणतोय आजची राईड विशेष परीक्षा घेणारी होती. पावलोपावली परीक्षा. अत्यंत खडतर रस्ता, केवळ 2 फूट वाहन जाण्यासाठी जागा, बाकी दोन्हीकडून खोदकाम सुरू ही परिस्थिती प्रथम 'अगर' पर्यंत 60 किमी पर्यंत होती. मागील टायर मधील हवा उतरत असल्याने त्यात प्रत्येक 25 किमीला हवा भरा आणि पांयदल मारा.
अगर जवळ वैद्यनाथ महादेव मंदिर चे बाहेरून दर्शन घेऊन अगर शहरात प्रवेश केला.
अगर येथे दैनिक भास्कर च्या रिपोर्टर ने सायकल पाहून थांबवून मुलखात घेतली. त्याला संपुर्ण सायकल मोहिमेच्या उद्देश विषयी माहिती दिली. पुढे अगर गाव ओलांडून बाहेर पडलो तेंव्हा लक्षात आले की पाटणकर सरांचा मोबाईल हरवला. नंतर बरेच शोधून सापडला नाही शिवाय नॉट रीचेबल देखील झाला. आम्ही दोघेही काही काळ साठी निराश झालो. पण तरी पाटणकर सरच म्हणाले "चला सर पुढे, चलता है". म्हणत निघालो. पुढे अरुंद रस्ता त्यात खाजगी ट्रॅव्हल हटकून सायकल खाली उतरवायला भाग पाडत होते. सांभाळून चालवत होतो. तरी एक सकारात्मक बाब म्हणजे वेळेवर नाश्ता, आणि hydration ब्रेक आणि जेवण. उजैन 30 किमी असतांना जेवणाचा ब्रेक घेऊन निघालो.
वाटेत काही यात्रेकरूंनी आम्हाला खास थांबवून चहा पाजला व पाणी बॉटल भरून देऊन जय बोलनाथ च्या जय घोषाने निरोप घेतला.
आजची एक सकारात्मक बाब म्हणजे जागोजागी लोकांशी संवाद होत होता. आणि तितकीच चर्चा ज्यामुळे प्रवासाचा थकवा निघून जात होता.
दुपारी 04 वाजता अखेर तो सुवर्ण व आनंदी क्षण आला आणि उज्जैन शहराच्या कमानीतून अखेर उज्जैन शहरात प्रवेश केला.
उज्जैन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेश द्वारावरच मार्केट कमिटी तर्फे मोत्याच्या हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. जवळपास 100 व्यापारी या प्रसंगी उपस्थित होते.
या प्रसंगी मार्केट कमिटी चे अध्यक्ष गोविन्द खंडेलवाल उपाध्यक्ष अनिल शेखावत,राजेन्द्र राठौर, हजारी लाल मालवीय,दीपक गर्ग घोटू राज श्री बिपीन शर्मा यांनी पुढाकार घेऊन स्वागत केले..
त्यांच्या आदरातिथ्य पाहून आमचे डोळे पाणावले. सोबत नई दुनिया, दैनिक अग्निपथ च्या पत्रकारांनी आमची सविस्तर मुलाखात घेतली.
रात्री एका धर्मशाळेत मुक्कामी होतो. आज आनंदाच्या भरात केंव्हा झोप लागली ते कळले नाही.पहाटे लवकर उठून महाकालचे दर्शन घेतले. तिथे बरेच महाराष्ट्रीयन मित्र भेटले. रेल्वे पार्सल ऑफिस ला जाऊन सायकल बुकिंग करून घेतली. दिवसभर क्षिप्रा नदी काठी बराच वेळ घालवला शिवाय उज्जैन शहरातील प्रेक्षणीय स्थळे पाहिली.
कोणतेही नियम, अट, चौकट न ठेवता अत्यंत स्वच्छंदपणे आम्ही दोघांनी एड्स जनजागृती या विषयावर सेल्फ सपोर्ट सायकल यात्रा अत्यंत काटकसरीने प्रवास करत पूर्ण केला.
एकमेकांच्या साथीने विविध प्रतिकुल परिस्थितीवर मात करत ही अमृत परिक्रमा सायकल यात्रा आम्ही यशस्वीपणे पूर्ण केल्याने आमच्या रोजच्या आरामदायी जीवनामुळे मरगळलेल्या मनात चेतना जागृत व्हायला मदत झाली.
सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार.विशेषतः पांडुरंग पाटणकर
सरांनी जी मोलाची साथ दिली लिंगामेन्ट इंज्युरी च्या शस्त्रक्रियेनंतर जवळपास ६ महिन्यांनी पाटणकर सरानी फ़िक्सि बाईक अर्थात विदाउट गियर सायकलवर हे मोहीम पूर्ण केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
