एचआयव्ही बाधित बालकांच्या मूलभूत प्रश्न शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन या विषयावर कार्य करतांना अनेकदा मी नेहमीच गणपती बाप्पाला प्रार्थना करायचो कि 'बाप्पा आमच्या लेकरांना घडव, चांगले आरोग्य दे, बळ दे' .
आता याच बाप्पांचे आशीर्वाद, आमच्या एचआयव्ही सह जगणाऱ्या चिमुकल्यांनी जिद्द, मेहनत, आत्मविश्वासाच्या जोरावर आज याच मुलांनी बघता बघता दीड महिन्यात 400 गणेश मूर्ती तयार करून सुरेख पद्धतीने त्याला रंगवून मणी, खडे यांची सजावट केलीय. तर आता म्हणायला हरकत नाहीय कि 'आमची मुले आता बाप्पाला घडवायला लागलीत'
एक वेळ होती 2010 ते 2012 दरम्यान परभणी येथील शासकीय अनुदानित एचआयव्ही बाधित अनाथ बालकांसाठीचे जीवनरेखा बालगृहातील मुलांशी एक प्रेम, जिव्हाळा व या मुलांसाठी काही तरी सकारात्मक कार्य करावे या उद्देशाने मी आणि माझे मित्र आमच्या एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून जोडले गेलो होतो. तेंव्हापासून या मुलांसाठी सण म्हणजे अत्यंत आनंदाचा दिवस त्यातला त्यात गणेश उत्सव म्हणजे जल्लोष. कारण त्यानिमित्ताने त्यांना बाहेरच्या जगात जाउन गणपती मूर्ती निवडायची, पताका, कमान, थर्माकोलचे मंदिर, सजावट, एचआयव्ही असल्याने त्यांच्या तब्बेतील मानवेल असा पोषक आहारयुक्त 10 दिवस 10 प्रकारचे नैवेद्य, रोज सकाळ, सायंकाळ आरती, रोज आरतीला नवनवीन पाहुणे येणार काही तरी गम्मत मजा, गप्पा मारता येणार, दुपारी मी म्हणजे मुलांचे डॉक्टर अंकल लॅपटॉपवर नवनवीन भक्तीपर, साहसी, कार्टून चित्रपट दाखवणार अशी मेजवानी असायची. मग गणपती पूजा करतांना अथर्वशीर्ष पठण, 21 दुर्वा तयार करणे, दुर्वांचा हार यातही मुले मस्त रमून जात.
याच मुलांच्या आयुष्यात एचआयव्ही असल्याने या विषाणूंचा त्यांच्या प्रतिकार शक्तीवर होणारा मारा यामुळे टीबी, न्यूमोनिया, डायरिया अश्या आजाराला बळी पडायच्या व एकदा तर 2012 मध्ये 2 मुले, 2013 मध्ये 2 मुली एड्स मुळे रूपांतर झाल्याने मृत्युमुखी पडाली होती . या मुलांचे अंतिम संस्कार करतांना नेहमीच आम्ही आमच्या बाप्पाला म्हणायचो बाप्पा आमच्या मुलांना घडव अर्थात चांगले आरोग्य दे.
आज हि मुले जून 2014 मध्ये सेवालय प्रकल्प लातूर येथे स्थलांतर झाल्यावर आज सेवालय संस्थापक रवी बापटले, कला शिक्षक ज्योतिबा बडे आणि कला व नृत्यदिग्दर्शिका स्नेहा शिंदे यांच्या मार्गदर्शन खाली स्वयंरोजगार व प्रशिक्षणाचे धडे घायला लागली.
यातच नुकत्याच या मुलांनी राख्या तयार केल्या आणि त्यांच्या या राख्यांना केवळ लातूरच नाही तर आमच्या एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून जवळपास 7 हजार रुपयांच्या राख्यांची विक्री झाली त्यास सर्व माता भगिनींनी, स्टुडंट असोशिएशन इन मायक्रोबायोलॉजि ज्ञानोपासक कॉलेज, यशोधन योग वर्ग तील सदस्यांनी प्रतिसाद देऊन मुलांचे कौतुक केले.
ज्योतिबा बडे हा दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थी त्याने विचार केला त्याच्यात जी कला आहे त्याने ती या मुलांना शिकवायची. जवळपास 26 जूनच्या आसपास त्याने अर्जुन, आदिनाथ, अक्षय, शंकर या व इतरही एचआयव्ही सह जगणाऱ्या विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती तयार करणे शिकवने सुरु केले. सुरवातीला शाडुचे गणपती तयार करण्याचा विचार होता. परंतु पावसाळा, ढगाळ वातावरण यामुळे मूर्ती वाळणे साठी वेळ हवा होता. मग मुलांनी प्लास्टर ऑफ परिसचाच विचार केला. पुढील प्रश्न याचे साहित्य साचे, पीओपी, ऑइल बॉण्ड कलर, बॉडी कलर, कंप्रेसर कुठून घ्यायचे वगैरे प्रश्न परंतु चांगला उद्देश असला कि मार्गही सापडतो.
मग काय चालू झाली मुलांची तयारी. साच्यातून गणपती काढतांना साबीतच निघेल असे नाही मग चुका आणि शिका नुसार मुले देखील मनलावून मूर्ती तयार करू लागली. दगडूशेठ गणपतीच्या सोंडीवरील काम असो कि लागबागच्या राज्याचा सिंहासन व मल्हारी गणपतीचा मल्हार राज्याचा चेऱ्यावरील भाव, पेहराव आणि मग रंग देतांना पीतांबर, मुकुट ला रंग देतांना शायनींग, दगडूशेठ गणपतीचे सुंदर बोलके डोळे, लाल बागच्या राजाचा पेहराव अत्यंत सुबक व सुरेख पद्धतीने काम केले.
पुढील कार्य गणपतीला अलंकार व आभूषणे याचे कार्य सेवलयातील मुलींनी अत्यंत सुंदर केले.
विशेष म्हणजे गणपतीचे वाहन आपले उंदीर मामा देखील छान जमले.
हे सर्व तयार केल्यावर पुढे समाजापर्यंत पोहोचायचे हे सोपे काम नाही लातूर हुन परभणीला आणायचे म्हणजे त्याला रद्दीच्या कागदांची बॉक्स पॅकिंग, छोटा हाती अर्थात मालवाहू टेम्पो मध्ये व्यवस्थित पॅक करून खड्डेयुक्त रस्त्यावरून सहीसलामत पणे अक्षय व आदिनाथ ड्रायव्हर सोबत परभणीला रात्री तीन वाजता परभणीला पोहोचली. तरी त्यांच्यात उत्साह होता. सर्व बॉक्स रिकामे करून परत पाठवणे व प्रदर्शनास गणपती मांडणे याची सूत्रबद्ध तयारी केली. सकाळी महानगरपालिका आयुक्त श्री राहुलजी रेखावर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्धाटन झाले तेंव्हा त्यांनी मल्हारी गणपती विकत घेऊन मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
तेंव्हाच प्रस्तावनेत माझ्या तोंडातून आनंदाने शब्द निघाले
'आता आमची मुले बाप्पाला घडवायला लागलीत.'.....
डॉ पवन सत्यनारायण चांडक
परभणी

No comments:
Post a Comment