Monday, August 21, 2017

4 वर्षात 32000 किमी पेक्षा अधिक सायकलप्रवासातून एड्स व पर्यावरण जनजागृती

22 ऑगस्ट २०१७ ला माझ्या ट्रेक 3700 या सायकलचा 4था वाढदिवस साजरा करणार. सायकलचा वाढदिवस आश्चर्य वाटतंय ना ? 
हो गोष्टच तशी आहे.
22 ऑक्टोबर 2013 ला पुण्याहून मी अमेरिकन मॉडेल ट्रेक 3700 नावाची सायकल विकत आणली आणि बघता बघता छंद म्हणून चालू केलेली सायकलिंगच्या माध्यमातून मी एचआयव्ही बाधितांच्या मूलभूत हक्कावर संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान या ४ राज्यात आजवर 32000 किमी पेक्षा अधिक सायकलवर प्रवास करून जनजागृती केली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण सायकल प्रवास हॉटेल, लॉजचा मुक्काम टाळून, कोणतीही बॅकअप व्हॅन सोबत न ठेवता, पंचर, सायकलिंगचे किट सोबत बाळगूनच जेमतेम कमी खर्च्यात प्रवास केला आहे. 
तशी खऱ्या अर्थाने मी एप्रिल 2013 पासून सहज म्हणून विद्यापीठात 'एवन' सायकलवरवर 8 किमी चक्कर मारायचो. त्यातही सातत्य नव्हते.
सोमनाथ श्रमसंस्कार छावणी आणि भारत जोडो यात्रा प्रेरणास्थान: 
१५ मे 2013 ते २२ मे २०१३ दरम्यान सोमनाथ, चंद्रपूर येथील जंगलात झालेल्या श्रमसंस्कार छावणी शिबिरात दरवर्षीप्रमाणे मी सहभागी झालो.  तेंव्हा तेथे भारत जोडो यात्राची डॉक्यूमेंट्री पाहिली ज्यात बाबा आमटे यांनी 1986 व 1988 मध्ये भारत जोडो यात्रेतून संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील युवकांना घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश ते ओखा अशी सायकल यात्रा आयोजित करून एकात्मतेचा संदेश दिला होता. मी विचार केला जय वयाच्या 65-70 व्या वर्षी बाबा आमटे युवकांना घेऊन त्या काळी सायकलवर भारत जोडो यात्रेचे आयोजन करून यशस्वी करू शकतात तर किमान आपण सायकलिंग मधून एड्सविषयी जनजागृती का करू शकत नाही. 
'एवन' सायकलचा प्रवास: श्रमसंस्कार शिबिरातून परत परभणीला आल्यावर नियमित सायकलिंग सुरु केली. सुरुवातीला बलसा पर्यंत जायचो येतांना पाय दुखल्याने अक्षरशः हातात सायकल घेत थोडी चालवत मग सायाळा पर्यंत रोज 18 किमी, पुढे इठलापूर देशमुख आणि एके दिवशी सरळ पोखर्णी पर्यन्त जाऊन येऊन 44 किमी सायकल केली. त्या दिवशी बायकोकडून पाय दाबून घेतले. पुढे वाटले आता बस फक्त नियमित 18 किमी सायकल करायची बाकी लांब सायकलिंग नको बाबा.
भाग मिल्खा भाग आणि जो जिता वही सिकंदरमधून प्रेरणा:  एके दिवशी फरहान अख्तरचा 'भाग मिल्खा भाग' आणि सहजच टीव्हीवर 'जो जिता वही सिकंदर'  चित्रपट पाहल्यावर काय स्फूर्ती आली कि एकदा रविवारी सकाळी ६ वाजता निघून धसाडी अंगलगाव येथे गोदावरी नदी किनारी सायकलवर भ्रमण करून 60 किमी सायकलिंग करून घरी १० वाजता परतलो. ६० किमी सायकलिंग त्या वेळची माझी वैयक्तिक उच्च सायकलिंग. अश्या पद्धतीने नियमित सायकल कधी राहाटी पूल, झिरो फाटा, झरी, देवगाव फाटा, दैठना, लिमला, ताडकळस, मिरखेल, यशवाडी, आरळ अशी सायकलिंग चालू केली. साध्या सायकलवर एक व्हायचे ताशी 15 किमी पेक्षा अधिक वेग यायचा नाही, सायकल  वजनाला जड असल्याने लांबच्या प्रवासात अवघड जायची. आणि लांब सायकलिंग करून परत येतांना समोरून हवा ज्याला 'हेड विंड' म्हणतो ती असल्याने घामाघूम व्हायचो. 
माझे सायकलिंग मधील गुरु डॉ केदार खटींग:  
 एकलव्याने कसे मनोमन द्रोणाचार्य ला न भेटता गुरू मानले होते तसे मी डॉ केदार खटिंग यांच्या सायकलिंगचे किस्से माझ्या पेशंट, मित्रांकडून ऐकत होतो पण इतक्या मोठ्या सायकलिस्टला भेटायची हिम्मत होत नव्हती. मग काय नियमितपणे त्यांना न भेटता केवळ त्यांचा आदर्श समोर ठेऊन मनोमन त्यांना गुरू मानून रोज ३०-४० किमी सायकलवर सराव करू लागलो. बघता बघता ४०-५० किमी सायकलिंग जमू लागल्यावरच मग एकदा सहज इंटरनेट वर त्यांचा नंबर शोधून त्यांना भीतभीत कॉल केला कि सर उद्या सायकलिंग ला सोबत जाऊ का आणि त्यांनी लगेच होकार दिला. त्या रात्री उद्या डॉ खटींग आणि डॉ भालेराव सरांसोबत सायकलिंग गेल्याची स्वप्ने पाहत मी झोपलो. सकाळी 5 वाजताच सरांच्या १ फोननेच तयार होऊन त्यांना जॉईन झालो तेंव्हा सर्वप्रथम मी ट्रेक अर्थात इंपोर्टेड बाईक/सायकल पाहिली.
पहिला तांत्रिक अडचणी चा अनुभव: मी डॉ खटींग सरांच्या वेगाने दांडी व पांयडल मारत सायकल चालवत होतो पुढे मांडाखळी, इंद्रायणी देवी, दफवाडी, उमरी सोडले भारसस्वाडा रस्त्यावर अचानक कड्कन आवाज झाला आणि पाहतो तर काय माझ्या सायकलची चेन तुटली होती. मला यायला वेळ लागलेला दिसून डॉ खटिंग सर देखील मागे आले.  त्यांनी चेन जोडण्याचा प्रयत्न केला पण न जमल्याने शेवटी डॉ खटिंग सरांनी देखील मला त्यांच्या सायकलच्या दांडीवर बसवून ऐका हाताने सायकल धरत भारस्वाडा पर्यंत आणले. तिथे अनेकाने जीपवर सायकल टाकून परभणी जायचा सल्ला दिला पण मला तो मला मान्य नव्हता.  शेवटी तिथेच एका सायकलवाल्याकडे चेन जोडून सायकलवरच 10 वाजता परभणीला पोहोचलो.  असा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केलेला 60 किमी सायकल प्रवास. 
ट्रेक सायकल घायचा निर्णय: जड वजनाची सायकल, लोखंडी फ्रेम, फिक्स्ड गियर यामुळे लांब प्रवासात घामाघूम होणे, चेन तुटण्याची भीती, चढावर दांडी मारल्याने गुडघे व मांडीच्या स्नायू व लिगामेंटला होणारी इजा या सर्व तांत्रिक बाबींचा अभ्यास करून इंपोर्टेड सायकल घ्यायचा निर्णय घेतला. ट्रेक ३७०० सायकल ची किंमत 27500/- होती. इतकी मला न झेपणारी होती. शेवटी वडिलांच्या क्रेडिट कार्डवर घेतली आणि रोज 1 हजार प्रमाणे 27 दिवस जमा करून 22 ऑगस्ट ला पुण्याहून माझी ड्रीम सायकल ट्रेक 3700 घरी आणली. त्यादिवशी आनंदाने सर्व मित्रांना सायकलवरच पेढे वाटलॆ. 
ट्रेकचा प्रवास: रोज नियमितपणे 30-40 किमी सायकल कधी झिरो फाटा, हट्टा, झरी, दैठना, मिरखेल, देवगाव फाटा या रोडवर चालवू लागलो.  
जावई बापू आणि सायकलवर ? : तिज चा सणनिमित्त  बायको माहेरी गेली असल्याने तिला ट्रेक सायकल घेतल्याचे सांगितलेच नव्हते. मग सरप्राइज म्हणून शुक्रवारी ठरवले दुपारचे क्लीनिक करून 'तिज'हा आमचा मारवाडी समाजातील सण असतो ज्यात पूजा साठी नवरा सासुरवाडीला जातो. मग काय काढली सायकल आणि थेट सेलूला 50 किमी सायकल चालवत सासुरवाडीला पोहोचून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. जावई बापू आणि सायकलवर ? आमच्या सासरेबुवानी मार्केट कमीटीतील सर्व व्यापारी, हमाल यांना माझी सायकल कौतुकाने दाखवली. दुसऱ्या दिवशी सायकल चालवत वेळेवर घरी पोहोचलो. 
एकदा असाच किशोरजी व्यास यांची भागवत कथेसाठी मानवत, पाथरी मार्गे ढालेगावला गेलतो सासरवाडीतील सर्व मंडळींना भेटलो. पहिल्यांदाच एकाच दिवशी 110 किमी सायकलिंग करण्याचा अनुभव. सेंच्युरी मारून घरी आल्यावर एक वेगळाच उत्साह असायचा. पूर्वी सारखा घामाघूम होणे, पाय किंवा गुडघे दुखणे बंद झाले. 
एकदा कंबर दुखीचा त्रास सुरु झाला होता. थोडा अभ्यास आणि फिजियो डॉ केंद्रेकरची भेट यातून असे निदर्शनात आले कि सिटची उंची आणि हॅण्डरबारची भूमिती कुठे तरी चुकतेय. त्याला तांत्रिकदृष्टया दुरुस्त करून पाठीचे व्यायाम करून हा कंबर दुखीचा त्रास देखील नाहीसा झाला.
लगेच नवरात्रीत मी आणि शिवा आयथॉल, मुकेश ने भोगाव देवीची 110 किमी सायकलिंग केली. 
सायकलिंग मधून मिळालेले मित्र: जीवनरेखा बालगृहातील सामाजिक कार्याच्या निमित्ताने डॉ शिवा आयथॉल आणि मुकेश पैठने ची झालेली ओळख पुढे माझे कायमचे सायकलिंग पार्टनर म्हणून झाली. पुढे मी आणि मुकेशने सोबत अनेक सायकलिंग मोहिमा केल्या ज्यात मुंबई कोंकण, परभणी पंढरपूरवारी, पुणे महाबळेश्वर सायकल मोहीम. 
डॉ शिवा आयथॉल सर तर माझे कायमच सायकलिंग चे सोबती आहेत. केवळ सायकलिंग नाही तर सामाजिक कार्य असो व जीवनात येणारे चढ उतार असो ते मला नेहमीच मार्गदर्शन करतात. कैलास तिथे, डॉ संदीप कार्ले, डॉ चंद्रशेखर भालेराव, डॉ गणेश चव्हाण, डॉ विवेक कुलकर्णी, खापरे सर, विक्रम शिंदे, सचिन घोघरे, रवी मौर्य, रमेश मुंदडा या मित्रांचे सायकलिंग मधील योगदान व सहवास नेहमीच आनंददायी राहिला. 
सायकलिंगमुले प्रशासकीय अधिकाराची ओळख आणि सामाजिक कार्यात वाटा: श्री एस पी सिंग परभणीतील कर्तव्यदक्ष कलेक्टर त्यांना केवळ सायक्लीस्ट तथा उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर व महेश वदडकर यांच्यामुळे भेटू शकलो. या भेटीत ओळख दरम्यान त्यांना एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसन साठी करत असलेल्या कार्याबद्दल सांगितले त्याचा परिणाम लगेच जिल्हा पुरवठा अधिकारी वेणीकर सर व तहसीलदार पवार मॅडम यांनी बालगृहास भेट देऊन 18 मुलांचे केवळ काही तासात अंत्योदय कार्ड कधीं त्यांना 1 रु दराने 35 किलो गहू व 2 रु दराने तांदूळचा लाभ मिळवून दिला. 
तसेच मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची देखील परभणी नांदगाव सायकलिंग मुळेच ओळख झाली पुढे आरोग्यविषयक व्याख्यान असो अथवा एचआयव्ही बाधितांनी तयार केलेल्या गणपती प्रदर्शन त्यांची नेहमीच सामाजिक कार्यात मदत झाली आहे. 
सायकल रेस मधून जनजागृती: रेस वगैरेची मला तितकी आवड नाही पण सायकलिंग मधून भटकंती आणि त्यातून सायकलवर एड्स व पर्यावरण जनजागृती संदेशाचा बोर्ड लावून जनजागृती व्हावी या उद्देशने मी आजवर परभणी सेलू जिंतूर अश्या 135 किमीची राष्ट्रीय स्तराची रेस, नाशिक पेलोटॉन 150 किमी रेस, परळी सायक्लोथॉन 100 किमी रेस मध्ये भाग घेऊन एड्स विषयी जनजागृती केलीय. 
उन्हाळा आणि सायकलिंग: उन्हाळ्यात सकाळी 4 वाजता उठून आम्ही दर रविवारी परभणी वसमत, जिंतूर, निमगिरी, औंढा, गंगाखेड, सेलू, पाथरी असे प्रत्येक रविवारी 100 किंमी सायकलिंग करू लागलो. 
घोस्ट राईड: वसमतच्या रेल्वे पुलावर भूत असल्याच्या अनेक दंत कथा ऐकल्या होत्या मग काय मी, डॉ खटिंग, डॉ शिवा सर रात्री 1 वाजता परभणीहून सायकलवर निघून 3 वाजता वसमत, मालेगाव मार्गे साडे चारला नांदेड च्या तरोडा नाक्यावर पोहोचून परत सकाळी 8 वाजता परभणीला पोहोचलो. अश्या प्रकारे परभणी नांदेड परभणी 140 किमी नाईट सायकलिंग केली होती. ज्याला आम्ही सहज 'घोस्ट राईड' असे नाव दिले होते परंतु आम्हाला वसमतला कोणताच भूत भेटला नाही. 
200 किमी ब्रेव्हेट: अशीच उन्हाळ्यात नाईट सायकलिंगचा अनुभव म्हणून मी आणि डॉ केदार खटिंग सरांनी पुणे येथील ब्रेव्हेत स्पर्धेत भाग घेतला ज्यात पुणे पिरंगुट, टेमघर लवासा हुन परत बालेवाडी मार्गे लोणावळा हुन परत पुणे असा 200 किमी ४ वेगवेगळ्या घाटातून नाईट सायकलिंग चा अनुभव घेतला. ज्यात टीम स्पिरितचा महत्वाचा सहभाग असल्याने आलेल्या प्रत्येक तांत्रिक अडचणी पंचर असो किंवा रात्री पाणी संपणे, थकल्यावर धाब्यावर केलेले शवासन मजा आली होती. पुढे नांदेड बोधन नांदेड २०० किमी आणि नांदेड उमरखेड नांदेड अशी २०० किमी ब्रेव्हेट मध्ये यशस्वी सहभाग घेतला. या ब्रेव्हेट दरम्यान जो पायाला तीव्र स्वरूपाचा वात आला तेंव्हा डॉ उमेश भालेराव सरानी ओआरएस हायड्रेशन चा सल्ला मोलाचा ठरला. 
सायकलिंग मधून एचआयव्ही एड्स व पर्यावरण विषयी जनजागृती: बाबा आमटेंच्या भारत जोडो यात्रेच्या फिल्म मधून प्रेरणा घेवून पहिली जनजागृती यात्रा मुंबई अलिबाग मुरुड जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, आंजर्ले, दापोली लाडघर, दाभोळ, जयगड, गणपती पुळें, रत्नागिरी पावस असा 390 किंमी सायकल प्रवास सागरी मार्गातील घाट, डोंगर मार्गातून केला. ज्यात मुंबई येथील सायकलिस्ट मित्र रवी कुमार मौर्य, पुणे येथील राजेश कौशिक ज्यांची फेसबुकमुळे ओळख झाली आणि परभणीचा मुकेश पैठणे यांची सोबत लाभली. 
पुढे नियमितपणे दरवर्षी परभणी अंबेजोगाई कळंब येरमाळा बार्शी माढा पंढरपूर अशी 300 किमी एड्स जनजागृती पंढरपूर सायकलवारी २०१४, २०१६ मध्ये केली.  
पुढे सप्टेंबर 2014 मध्ये मी आणि शिवा सरांनी अशीच परभणी परळी अंबेजोगाई तांदूळजा मुरुड उस्मानाबाद तुळजापूर असा 200 किमी एड्स जनजागृती सायकलिंग केली होती. 
डिसेंबर 2014 मध्ये जागतिक एड्स जनजागृती सप्ताह मध्ये परभणी गंगाखेड, परळी, अंबेजोगाई, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, कोल्हापूर, गगनबावडा, तळेले, कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, पणजी असा 750 किमी सायकल प्रवास विविध सामाजिक संस्था जसे मानवलोक अंबेजोगाई, सेवालय एड्स प्रकल्प लातूर येथील जनजागृतीपर मशाल रॅली, सोलापूर येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील व कोल्हापूर करवीर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांशी एड्स जनजागृतीविषयी साधलेला संवाद, पालवी पंढरपूर येथील एड्सग्रस्त प्रकल्प भेट, कोल्हापूर अनिस च्या कार्यकार्यांशी संवाद असा अविस्मरणीय प्रवास 5 दिवसात पूर्ण केला होता. 
जून 2015 मध्ये मी, शिवा सर, मुकेश पैठने, विक्रम शिंदे, गणेश कानोजिया, डॉ संदीप कार्ले सरांसोबत पुणे हडपसर, दिवे घाट मार्गे सासवड, नारायणपूर, खांबाटकी घाट, वाई, पाचगणीचा पसरणी घाट, महाबळेश्वर ला पोहोचून दुसऱ्या दिवशी परत पुणे सिंहगड पुणे असा 380 किमी अवघड अश्या घाटातून भर पावसात आम्ही केवळ 3 दिवसात हा प्रवास केला होता।
कौटुंबिक जबाबादारीमुळे सायकलिंगला थोडी विश्रांती:  1 ऑगस्ट 2015 ला अत्यंत प्रतिकूल अश्या आरोग्य स्थितीत 8व्या महिन्यातच मला दुसरी मुलगी शर्वरी झाली. 8 व्या महिन्यात झाल्याने तिला श्वास घेण्यास त्रास असल्याने ती तब्बल 2 महिने नवजात कक्षात होती. दुसरीकडे माझी पत्नी देखील सिरीयस होती. सायकलिंग मुळे ओळख आणि मैत्री झालेले डॉ राजगोपाल कालानी, डॉ संदीप कार्ले, डॉ राठोड यांनी तिची काळजी घेतली तर डॉ नाईक सरानी माझ्या पत्नीला झालेला न्योमोनियावर उपचार केल . या दरम्यान कौटुंबिक जबाबदारीमुळे सायकलिंग बंदच होती. दोघे सुखरूप घरी असल्यावरच परवानगी घेऊनच सायकलिंग चालू केली. 
विदर्भ दौरा: 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर असा 826 किमी एड्स जनजागृती विदर्भ दौरा अकोला, अकोट मेळघाट जंगलातील मधील पोपटखेड, खटकाळी, धारणी, उतावली, कोलूपुर, सिमदोह, परतवाडा, अमरावती, वर्धा, सेवाग्राम, पवनार, बुटी बोरी, नागपूर, भंडारा, गोंदिया, सडक अर्जुनी, साकोली, लाखनी असा सायकल प्रवास एकट्याने केला होता. विशेषतः यात मेळघाटातील 45 किमी निर्मनुष्य घाट व चढ, उतावली येथे कुपोषण व बालमृत्युवर संशोधन करणारे डॉ आशिष सातव यांची भेट, कोलूपुर येथील डॉ रवींद्र कोल्हे डॉ स्मिता कोल्हे यांच्या प्रकल्पास भेट, मेळघाट मधील कुपोषण, आदिवासींच्या समस्या, रोजगार हमी आदी प्रश्नावर कार्य करणाऱ्या खोज संस्थेतील कार्यकर्त्यांशी चर्चा, अमरावती येथील सेवांकुर संस्थेचे डॉ अविनाश सावजी यांची भेट, सेवाग्राम महात्मा गांधी आश्रम, पवनार आश्रम, भांगडीया आमदार, भारतीय स्टेट बँक झोनल ऑफिस येथील संवाद, लायन्स क्लब भंडारा, सोंदड, साकोली येथील शाळा व महाविद्यालयातील संवाद, साकोली येथे उपविभागीय अधिकारी, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा आणि दीक्षाभूमी नागपूर येथे समारोप असा छान आणि साहसी 826 किमीचा प्रवास झाला होता. यात मेळघाट दरम्यान डॉ संदीप साखरे नावाचा मित्र जोडला गेला. 
राजस्थान दौरा:  डिसेंबर 2016 मध्ये सुरत, भरुच, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती आश्रम, मेहसाना, पालनपूर, माउंट अबू, गुरुशिखर, पिंडवाडा, हल्दी कि घाटी, उदयपुर, चित्तोडगढ़ असा 855 किमी सायकल प्रवास केला. या सायकलिंग मधून सामाजिक संस्था, धाबे वर भेटणारे ट्रक ड्रायव्हर्स, माऊंट अबू, उदयपुर, चित्तोडगढ़ येथील पर्यटक, मेहसाना पालनपूर औद्योगिक वसाहत मधील कारखान्यात कामगारांशी संवादातून एड्स विषयी जनजागृती करता आली. 
या प्रवासात उदयपुर येथे सायकलचे पांयदल तुटून देखील मध्येच यात्रा न सोडता ते जोडून पुढील प्रवास पूर्ण केला. 
गुजरात राजस्थान दौरा केल्यावर खासकरून धुळे, विदर्भ, गोंदिया, भंडारा भागात व्याखनासाठी आमंत्रणे आली. पुढे साकोली, सडक अर्जुनी, नवेगाव, प्रतापगड भागात सायकलिंग आणि व्याख्यानातून हजारो विद्यार्थी, पोलीस पाटील, स्नेह सम्मेलनातून जनजागृती केली. 
गडचिरोली संवाद यात्रा:  फेब्रुवारी 2017 मध्ये जंगल भागातून साकोली लाखांदूर वडसा, आरमोरी, गडचिरोली मुल चंद्रपूर आनंदवन असा सायकल प्रवास शाळा, महाविद्यालय, बँक, शासकीय कार्यालय, वन विभाग आणि सामाजिक संस्थांना भेट देत 270 किमी यात्रा पूर्ण केली. 
हॅपी म्युझिक शोला प्रतिसाद:  याच विदर्भ सायकल संवाद यात्रेची प्रचिती साकोली येथे सेवालयातील विद्यार्थ्यांच्या हॅपी म्युझिक शो या कार्यक्रमास मिळालेल्या प्रतिसादातून मिळाली. ज्यात साकोलीकरांनी 1 लाख 35 हजाराची मदत आम्ही सेवालयातील एचआयव्ही ग्रस्तांच्या पुनर्वसन प्रकल्पास देऊ शकलो. 
पुणे आळंदी पंढरपूर वारी:  नुकतीच पुणे आळंदी हडपसर, उरळी, यवत, भिगवण, इंदापूर, अकलूज, वेळापुर, पंढरपूर असा 270 किमी एड्स जनजागृती सायकल प्रवास सचिन घोगरे या मित्रासोबत पूर्ण केली. या दरम्यान पुणे येथील महात्मा गांधी विचार मंच चे कार्यकर्ते,स्वयंम ग्रुप पुणे, भिगवण येथील रोटरी क्लब आणि ग्रामस्थांशी साधलेला संवाद, वेळापुर येथे विविध पालखी आणि पत्रकार मित्रांशी संवाद आणि पालवी एड्स प्रकल्प येथील विद्यार्थांना वैद्यकीय उपकरणे देऊन समारोप असा ऊर्जा देणारा प्रवास होता. 
बघता बघता या 32000 किमी सायकलिंग मधून अनेक मित्र, गावातील वेशीवर भेटलेले शेतकरी, चहावाला, शाळेला जाणारी मुले, गावागावात जाऊन चादर, रग, मुरकुल, शुगर कॅन्डी विकणारे छोटे मोठे व्यावसायिक, ट्रॅफिक पोलीस, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते, ट्रक ड्रॉयव्हर्स, चहावाले, हॉटेलवाले, मंदिर देवस्थानातील कार्यकर्ते यांच्या भेटीतून झालेला संवाद व त्यांची वेळोवेळी लाभलेली मदत मी कधीच विसरू शकत नाही. सायकल हे नुसते रेस, फिटनेस किंवा दळणवळणाचे साधन नसून माणसे जोडण्याचे त्यांचे मने जोडण्याचे काम सायकलिंग मधून होत आहे याचा मला आनंद आहे. 
सर्वात महत्वाचे म्हणजे या सायकलिंग साठी मला घरून वेळोवेळी मिळालेला सपोर्ट माझी आई, माझे सायकलिस्ट वडील सत्यनारायण चांडक, माझी पत्नी आशा, बाबा आज सायकलिंग ला गेले नाही का असे विचारणारी माझी मुलगी प्रचिती, शर्वरी आणि स्कॉटलंड मध्ये सायकलिंग करणारा माझा लहान भाऊ पंकज याचे देखील मोलाचा वाटा आहे. 
आरोग्यास फायदा: आज धावपळीच्या जीवनात कळत नकळत वाढलेल्या अपेक्षामुळे येणारा ताणतणाव नाहीसा होण्यास सायकलिंगने मदत झाली आहे. माझा दमा, ऍलर्जी, सर्दी सायकलिंगमुळे आटोक्यात आली आहे.
सामाजिक बांधिलकी: डॉ शिवा आयथॉल यांच्या देणे समाजाचे उपक्रमांतर्गत 1 रुपये किमी प्रति किलोमीटर प्रमाणे आजवर 32000 किमी साठी 32000/- रुपये मधून आजवर एचआयव्ही बाधित तसेच अनाथ बालकांना मदत केली आहे. 
डॉ पवन सत्यनारायण चांडक 
'श्रद्धा' विष्णू नगर 
वसमत रोड परभणी
9422924861

3 comments:

bsanjiv said...

अभिनंदन सर खूपच प्रेरणादायक प्रवास आहे आपला ,आपल्या कर्तृत्व ला सलाम ,मी सुध्दा आपल्या पासून प्रेरणा घेऊन सायकल घेण्याचा विचार करतोय

Vijay Vasve said...

खुप प्रेरणा देणारा सायकलप्रवास आहे डॉक्टर, खुपच छान. असेच चालु राहु द्या. शब्दांकन छान केले आहे.

Palash Mandlecha said...

तुमच्या प्रेरणादायी कार्याला आमचा सामाजिक सलाम.. आमचं NGO PACIFIC MORALITY FOUNDATION ला नेहमी तुमचं सहकार्य मिळालयं त्याबद्दल मनःपूर्वक आभार..