सायकलिंग म्हणजे आमचे नेहमीच विचारमंथनाचे माध्यम.आज सायकलिंग दरम्यान झिरो फाटा येथील चाय पे चर्चा मध्ये मी शिवा सरांना कालच्या कार्यक्रमाच्या प्रतिसाद व माध्यमाने घेतलेल्या दखल बद्दल चर्चा केली. सरांचा अत्यंत महत्वाचा परंतु विचार करायला लावणारा प्रश्न कि आयोजक, प्रमुख पाहुणे, संस्थेचे पदाधिकारी वगैरे ठीक आहे. पण ज्यांच्या कला अविष्कारावर हे जे कार्यक्रम यशस्वी होतात त्या किती कलाकारांबद्दल किंवा कार्यकर्ते बद्दल प्रसार मध्यमामध्ये दखल घेतलीय का ?
आज महाराष्ट्रात अनेक संस्था आहेत जसे अपंग, मुकबधीर, कर्णबधिर, दुर्धर आजारग्रस्त, कॅन्सरग्रस्त, कृष्ठरोगी, मतिमंद, कैद्यांची मुले, वैश्यांची मुले यांच्या पुनर्वसन साठी सांस्कृतिक व्यासपीठाचे आयोजन करून आपल्या प्रकल्पातील मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांची सांस्कृतिक पथक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात स्टेज गाजवतात व सोबत त्यांच्या सादारीकरणातून त्या मुलांच्या पुनर्वसनास आर्थिक मदत देखील होते.
मी देखील काय करतो याच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करतो त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि मग काय दुसऱ्या दिवशी वाह वाह डॉ साहेबानी अथवा अमुक अमुक संस्थेनी काय झकास कार्यक्रम आयोजित केला...... मग पेपर मध्ये बातमी मध्ये आमचेच नाव कि काय छान काम सुरु आहे. पण ज्या मुलांच्या कर्तृत्वावर आमचा अथवा एखाद्या संस्थेचा उदो उदो होतो त्या मुलांविषयी कोण लिहिणार ?
इतक्यावरच नाही तर संस्थेचे पदाधिकारी देखील आपल्या मनोगतात त्यांच्या घडविण्यासाठी काय काय परिश्रम घेतले याची यशोगाथा स्वतःच सांगतात. ...
नक्कीच त्यांना घडविण्याची यशोगाथा महत्वाची आहे आणि निःसंशय त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा त्याग देखील महत्वाचा आहे.
परंतु जी मुले घडलीय अथवा ज्यांच्या परिश्रमावर आज संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्था त्यांच्या कला सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर करून प्रकल्प चालविण्यासाठी आर्थिक मदत मिळवतात . सोबत त्या संस्थेची अथवा पदाधिकाऱ्यांची अथवा त्या गावातील आयोजकांची वाह वाह होतेय तेंव्हा मला एक अत्यंत महत्वाची बाब खटकतेय ती म्हणजे या मुलांच्या यशोगाथाविषयीं केंव्हा लिहिणार. ....
कारण एक फार मोठे शिक्षक अथवा तज्ञ आला आणि त्याने मुलांना कला शिकवली ज्यासाठी अनेक वर्ष परिश्रम घेतले, आणि केवळ त्याच्याच परिश्रम व प्रशिक्षणामुळे त्यातून कलावंताचा जन्म झाला. इतके सोपेे तर शक्य नाही. केवळ प्रशिक्षण देऊन जर कलावंत तयार झाले असते तर जे जे आर्ट स्कुल मधून प्रत्येक व्यक्ती अमिताभ, निळू फुले, नाना पाटेकर, चित्रकार हुसेन तयार झाले असते.
तसे नाही आज कोणत्याही संस्थेतील मुले घडली त्यांच्या घडविण्यात नक्कीच प्रशिक्षकाचा मोलाचा वाटा आणि त्याग देखील आहे. परंतु त्या मुलांनी आपल्या शारीरिक अथवा मानसिक व्यंगत्वावर, दुर्धर आजारावर आपल्या मेहनत, जिद्द, एकाग्रतेतून मात करून आपल्या कर्तृत्वावर यशस्वी झाली. त्यांनी आपल्या जिद्द, साहसाला शस्त्र बनविले आणि शारीरिक मानसिक दुर्बल तेवर मात केली.
आज याच मुलांच्या, कार्यकर्त्यांच्या यशोगाथावर लिहिणे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. आज या मुलांचे कर्तृत्व, मेहनत, जिद्द आहे म्हणूनच आज या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला यश प्राप्त होते, प्रसिद्धी मिळते. पण सोबत या मुलांच्या कर्तृत्वाची दखल त्या संस्थेने, प्रसार माध्यमाने, आयोजकांनी सर्वांनी घायलाच हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते.
याची छान सुरवात डॉ विकास भाऊ आमटेंनी 'संचिताचे कवडसे' या लोकसत्ता तील लेखमालेतून केलीय. या लेख मालेत भाऊंनी ज्या कृष्ठरोगी बांधवांमुळे आज आनंदवन घडले त्याविषयीचे जिवंत चित्रण या यशोगाथेतून मांडले.
बाबा आमटेंनी 'ज्वाला आणि फुले' मधील गीते
'अजून आहे पुढे जायचे अजून ओझे बाकी हजार जख्मी हाथ राबती श्रम सरितेच्या काठी ।
आनंद साधकांनो मुक्तांगणात यावे ।
'माणूस माझे नाव दहा दिशांच्या रिंगणात या पुढेंच माझी धाव।
रिंगणात मी क्षुद्र खरोखर तरी जिंकले सातही सागर
उंच गाठला गौरीशंकर।
अग्नी यान मम घेत चालले आकाशाचा ठाव',
या गीतातून आनंदवनातील कृष्ठरोगी, अपंग बांधवांच्या, कार्यकर्त्यांच्या जिद्द, मेहनत, साहस विषयीच्या कर्तुत्वगाथा मांडल्यात.
आज यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात ज्या ज्या संस्था सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जातात तेथे त्यांनी देखील या मुलांच्या कर्तृत्वाच्या यशोगाथा सर्वप्रथम व्यक्त केल्या पाहिजे.
याची सुरवात किमान मी स्वतः या मुलांच्या सहवासातून त्यांच्यात जो बदल घडलेला पाहिलाय अशा कर्तुत्वगाथा विषयी मालिका लिहिणार आहे.....

No comments:
Post a Comment