Monday, September 11, 2017

हॅपी म्युझिक शो तील विठ्ठल आणि पोवाडातील अफजलखान - आमचा शंकर

लहान मुलांमध्ये देवाचा अंश असतो असे म्हणतात. परंतु मला या चिमुकल्यांमध्येच माझा विठ्ठल भेटला. अशाच या विठ्ठलाविषयी 'कर्तृत्वाचा यशोगाथा' मालिकेतून मी आज त्यांच्या विषयीच्या माझ्या भावना व्यक्त करणार आहे.

नुकताच परभणी मनपा आयोजित परभणी फेस्टिवल मध्ये सेवालय लातूर प्रस्तुत 'हॅपी म्युझिक शो' प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. हा शो पाहतांना सर्वांचे लक्ष वेधून घेत होता तो 'माउली माउली' या गाण्यातील विठ्ठल.

महाराष्ट्र ही संतांची भुमी ज्यात वारीला अत्यंत महत्व आहे. याच वारीचे दर्शन लय भारी चित्रपटातील अजय अतुलने स्वरबद्ध व संगीत दिलेले गीत म्हणजे 'माउली माउली'. या गीतावर सेवालयातील चिमुकल्यांनी उत्कृष्ठ नृत्य सादर केले आणि विशेष म्हणजे त्यातील विठ्ठल ज्याने साकारला त्याचे ते रूप अत्यंत मनमोहक होते. संपूर्ण गाण्यात कमरेवर हात ठेऊन उभा असलेला आमचा हा विठ्ठल एकाग्रपणे उभे राहून जणू सर्व वारकरी चिमुकल्यांनाच नाही तर संपूर्ण उपस्थित प्रेक्षकांना आपल्या सुंदर भाव मुद्रेने आशीर्वाद देत होता. हा विठ्ठल म्हणजे दुसरा कोणी नसून आमचा शंकर.  

शंकर 2014 मध्ये परभणीतील जीवनरेखा बालगृहातून सेवालय  प्रकल्प हासेगाव लातूर येथे स्थलांतर झाला. सेवालयात आल्यावर शंकरच्या वागण्यात, स्वभावात, त्याच्या कला गुणात जो बदल झाला ते मी सांगेनच.  

तत्पूर्वी त्याच्याविषयी परभणीतील अनुभव सांगू इच्छितो.

18 जुलै 2008 मध्ये मोफत होमिओपॅथिक उपचार व वैद्यकीय तपासणी निमित्त शंकर सोबत झालेली पहिली भेट. शंकर तसा पूर्वीपासून बिनधास्त स्वभावाचा सोबत मनमिळावू वृत्तीचा, थोडा खोडकर पण कधी कधी अत्यंत राग यायचा त्याला पूर्वी. आम्ही सर्व त्याला प्रेमाने काळ्या म्हणायचो. तुका म्हणे बरी हाक म्हणजे 'काळ्या'... ‌एकदा शंकरला नागीण अर्थात नागवेडा चा संसर्ग झाला होता सोबत त्याच्या कानात इन्फेक्शन झाले होते. आणि कानाच्या बाहेरील भागातून प्रचंड पाणी झिरपायचे, रात्र रात्र भर तो रडायचा. सेपट्रान,अँटिबायोटिकस, वेदनाशामक गोळ्या घेऊन देखील आराम पडायचा नाही. तेंव्हा त्याला होमिओपॅथिक औषधी आणि नांदेड ला नेऊन कानाची शस्त्रक्रिया करून पस ड्रेन करून मग वेदना थांबल्या. इतका भयंकर त्रास असून देखील या पठ्ठ्याने धीर सोडला नाही. ‌

अनेक वेळा जेंव्हा एचआयव्ही मुळे मुले आजारी पडायची तेंव्हा हा आमचा शंकर रात्र रात्र भर मुलांसोबत दवाखान्यात झोपायचा, त्यांना सोबत घेऊन एआरटी केंद्रावर जायचा.‌तब्बेतीने तो धडधाकट होता. त्यामुळे तो इतर सर्वच मुलांना धीर द्यायचा. शाळेत देखील सगळेच त्याला पहेलवान म्हणायचे. ‌त्याची एक विशेषतः होती तो काहीही हो कधीच मोठ्यांना उलटून बोलायचा नाही. ‌आमच्या घरी गणपती आगमनापासून, आरती ते विसर्जन पर्यंत तो आमच्या घरचाचसदस्य होता. ‌

जून 2014 मध्ये तो सेवालयात स्थलांतर झाल्यावर कला व नृत्य दिग्दर्शक स्नेहा शिंदे हिचे परिश्रम व सेवालय संस्थापक रवी बापटले सरांचे मार्गदर्शन यामुळे शंकर मध्ये हळू हळू त्याचे कलागुण विकसित होऊ लागले.सेवालय प्रकल्प उभारणीत छोटी मोठी  मेहनतीची कामे असो अथवा खेळ,झाडांची काळजी, देखभाल असो शंकर नेहमीच पुढे असायचा. ‌शंकरने सेवालयात देखील नेहमीच आपल्या सहकारी मित्रांची काळजी घेतलीय. सेवालयातील मुलांमध्ये त्याचे वागणे हे नेहमीच सगळ्यामध्ये मिसळून, मनमिळावू,हसरा, कोणत्याही कामाला नाही न  म्हणणारा, आज्ञानाधारक स्वभावाचा राहिला आहे. ‌

सेवालय संस्थापक रवी बापटले सर शंकर बद्दल सांगतात "शंकर अत्यंत प्रामाणिक, मेहनती मुलगा आहे. परभणीला असतांना सुरवातीला काही वर्षे तो शिक्षणापासून तो वंचित राहिल्यामुळे आज तो १८ वर्षाचा असून देखील सध्या ८वित शिकतोय. तरी जीवनातील खऱ्या मूल्यांवर आधारित शिक्षणापासून तो दूर नाही. ही मुले माझ्या आयुष्यात आलीय हे मी माझे भाग्य समजतो " 

हॅपी म्युझिक शो च्या कला व नृत्य दिग्दर्शक स्नेहा शिंदे यांचीशंकर बद्दल प्रतिक्रिया "विठ्ठलाची मूर्ती हि काळ्या पाषाणाची बनलेली आणि म्हणतात ना तुका म्हणे बरी हाक म्हणजे काळा. म्हणून विठ्ठलाच्या रोल साठी शंकरला आम्ही निवडले.आमचा शंकर देखील विठ्ठलाच्या रोल ने खुश झाला. त्याला केवळ विठ्ठलाच्या मूर्तीचा फोटो दाखवला आणि लगेच त्यांनेत्याचे आकलन करून अत्यंत कमी वेळात हा अभिनय साकारला. "

‌हॅपी म्युझिक शोच्या प्रॅक्टिस दरम्यान माउली माउली गाण्यात सुरवातीला विठ्ठलाची आराधना करतांनाचा देखावा असो व वारकरी रिंगण घेतांना असो शंकरची एकाग्रता, चेहऱ्यावरील हावभाव, कमरेवर हात ठेऊन उभा असतांना त्याच्यातला आत्मविश्वास सर्वच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो.

पोवाडातील - अफजलखान पहिल्यांदाच शंकरने चाळीसगाव येथील शो मध्ये साकारला होता. त्याची देखील छान गोष्ट आहे. हॅपी म्युझिक शो मधील अँकर विजय मस्के नेसर्वप्रथम शंकरला अफजल खान चे हसणे, त्याची देहबोली विषयी थोडा अभिनय करून दाखवला होता. सोबत अफजल खान या पात्रासाठी धिप्पाड देहयष्टी, चेहऱ्यावरील राग,अफजल खानासारखा हावभाव, देहबोली हवी होती. तो शंकरने छान साकारली.

'पोवाडा' तील शिवाजी महाराज अफजल खान भेट मध्ये शंकरने अफजल खानाचा अभिनय, त्याची वेशभूषा, मेक अप,त्याची शरीरयष्टी, त्याची देहबोली, त्यांचे महा भयंकर हसणे,शिवाजी महाराजांची भेट घेतांना कपटाने त्यांच्यावर केलेला वार असो वा शेवटी शिवाजी महाराजांनी त्याच्यावर वाघ नखाने वार केल्यावर त्याचा देह कोसळतांनाच अभिनय अंगावर शहारे निर्माण करतात. ‌

आज बघता बघता शंकरने हॅपी म्युझिक शो चा पहिला प्रयोग बालगंधर्व नाट्यमंदिर पुणे ते कालचा परभणी येथे झालेला39वा प्रयोग, या सर्व प्रवासात त्यांने आपल्या एकाग्रता, जिद्द,आत्मविश्वासाच्या जोरावर व्यासपीठावर आपली छाप सोडली आहे. बघता बघता पुणे, भिगवण, शाहूवाडी, कोल्हापूर,कराड, लातूर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, अमरावती, बुटी बोरी नागपूर, साकोली, जळगाव, चाळीसगाव, परळी वैजनाथ येथील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याच्या अभिनय व सादरीकरणाला मिळाला आहे.

‌या मुलांचा पालक म्हणून मी सांगू इच्छितो  कि जेंव्हा 17सप्टेंबर 2015 रोजी 'बालगंधर्व' नाट्यमंदिर’ पुणे  येथे सेवालय प्रस्तुत हॅपी म्युझिक शो चे पहीले सादरीकरण झाले. तेंव्हाच मला माझ्या जीवनातील सर्वात जास्त आनंद झालाहोता. कारण प्रत्येक कलाकारांच्या जीवनात बालगंधर्व सारखे व्यासपीठ हे एक ड्रीम असते. आणि या मुलांना पहिल्याच शोला हे व्यासपीठ भेटले. हे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे सेवालयाचे पालक राजकुमार धुरगुडे पाटलांचे विशेष आभार मानतो. ‌ ‌

२५ ऑक्टोबर २०१५ रोजी बी रघुनाथ सभागृह परभणी येथेझालेल्या कार्यक्रमात तर 'माउली माउली' या गाण्याला प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात साद दिली होती. ते जिवंत दृश्य इतके मनमोहक होते कि आम्ही सर्वानी माऊलीच्या रिंगणाचा आस्वाद घेतला.

एकाच शो मध्ये 'विठ्ठलाचा' अर्थात आपल्या सर्वांच्या विठु माऊलीचा रोल आणि 'पोवाडा' मधील 'अफजल खान' चे नकारात्मक पात्र शंकरने साकारले. अत्यंत कमी वेळात त्यांने हा अभिनय अत्यंत सहजतेने आणि तितक्याच प्रभावीपणे साकारला.

त्याच्या अभिनयाला खरच मनःपासून खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.

डॉ पवन सत्यनारायण चांडक 
अध्यक्ष 
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज 
परभणी 
मो: ९४२२९२४८६१ 

Wednesday, September 6, 2017

कार्यकर्त्यांच्या यशोगाथा प्रकाशात येणे महत्वाचे

सायकलिंग म्हणजे आमचे नेहमीच विचारमंथनाचे माध्यम.आज सायकलिंग दरम्यान झिरो फाटा येथील चाय पे चर्चा मध्ये मी शिवा सरांना कालच्या कार्यक्रमाच्या प्रतिसाद व माध्यमाने घेतलेल्या दखल बद्दल चर्चा केली. सरांचा अत्यंत महत्वाचा परंतु विचार करायला लावणारा प्रश्न कि आयोजक, प्रमुख पाहुणे, संस्थेचे पदाधिकारी वगैरे ठीक आहे. पण ज्यांच्या कला अविष्कारावर हे जे कार्यक्रम यशस्वी होतात त्या किती कलाकारांबद्दल किंवा कार्यकर्ते बद्दल प्रसार मध्यमामध्ये दखल घेतलीय का ?

आज महाराष्ट्रात अनेक संस्था आहेत जसे अपंग, मुकबधीर, कर्णबधिर, दुर्धर आजारग्रस्त, कॅन्सरग्रस्त, कृष्ठरोगी, मतिमंद, कैद्यांची मुले, वैश्यांची मुले यांच्या पुनर्वसन साठी सांस्कृतिक व्यासपीठाचे आयोजन करून आपल्या प्रकल्पातील मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांची सांस्कृतिक पथक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात स्टेज गाजवतात व सोबत त्यांच्या सादारीकरणातून त्या मुलांच्या पुनर्वसनास  आर्थिक मदत देखील होते.

मी देखील काय करतो याच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करतो त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि मग काय दुसऱ्या दिवशी वाह वाह डॉ साहेबानी अथवा अमुक अमुक संस्थेनी काय झकास कार्यक्रम आयोजित केला...... मग पेपर मध्ये बातमी मध्ये आमचेच नाव कि काय छान काम सुरु आहे. पण ज्या मुलांच्या कर्तृत्वावर आमचा अथवा एखाद्या संस्थेचा उदो उदो होतो त्या मुलांविषयी कोण लिहिणार ?

इतक्यावरच नाही तर संस्थेचे पदाधिकारी देखील आपल्या मनोगतात त्यांच्या घडविण्यासाठी काय काय परिश्रम घेतले याची यशोगाथा स्वतःच सांगतात. ...

नक्कीच त्यांना घडविण्याची यशोगाथा महत्वाची आहे आणि निःसंशय त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा त्याग देखील महत्वाचा आहे.

परंतु जी मुले घडलीय अथवा ज्यांच्या परिश्रमावर आज संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्था  त्यांच्या कला सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर करून प्रकल्प चालविण्यासाठी आर्थिक मदत मिळवतात . सोबत त्या  संस्थेची अथवा पदाधिकाऱ्यांची अथवा त्या गावातील आयोजकांची वाह वाह होतेय तेंव्हा मला एक अत्यंत महत्वाची बाब खटकतेय ती म्हणजे या मुलांच्या यशोगाथाविषयीं केंव्हा लिहिणार. ....

कारण एक फार मोठे शिक्षक अथवा तज्ञ आला आणि त्याने मुलांना कला शिकवली ज्यासाठी अनेक वर्ष परिश्रम घेतले, आणि केवळ त्याच्याच परिश्रम व प्रशिक्षणामुळे त्यातून कलावंताचा जन्म झाला.  इतके सोपेे तर शक्य नाही. केवळ प्रशिक्षण देऊन जर कलावंत तयार झाले असते तर जे जे आर्ट स्कुल मधून प्रत्येक व्यक्ती अमिताभ, निळू फुले, नाना पाटेकर, चित्रकार हुसेन तयार झाले असते.

तसे नाही आज कोणत्याही संस्थेतील मुले घडली त्यांच्या घडविण्यात नक्कीच प्रशिक्षकाचा मोलाचा वाटा आणि त्याग देखील आहे. परंतु त्या मुलांनी आपल्या शारीरिक अथवा मानसिक व्यंगत्वावर, दुर्धर आजारावर आपल्या मेहनत, जिद्द, एकाग्रतेतून मात करून आपल्या कर्तृत्वावर यशस्वी झाली. त्यांनी आपल्या जिद्द, साहसाला शस्त्र बनविले आणि शारीरिक मानसिक दुर्बल तेवर मात केली.

आज याच मुलांच्या, कार्यकर्त्यांच्या यशोगाथावर लिहिणे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. आज या मुलांचे कर्तृत्व, मेहनत, जिद्द आहे म्हणूनच आज या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाला यश प्राप्त होते, प्रसिद्धी मिळते.  पण सोबत या मुलांच्या कर्तृत्वाची दखल त्या संस्थेने, प्रसार माध्यमाने, आयोजकांनी सर्वांनी घायलाच हवी असे मला प्रामाणिकपणे वाटते.

याची छान सुरवात डॉ विकास भाऊ आमटेंनी 'संचिताचे कवडसे' या लोकसत्ता तील लेखमालेतून केलीय. या लेख मालेत भाऊंनी ज्या कृष्ठरोगी बांधवांमुळे आज आनंदवन घडले त्याविषयीचे जिवंत चित्रण या यशोगाथेतून मांडले.

बाबा आमटेंनी 'ज्वाला आणि फुले' मधील गीते
'अजून आहे पुढे जायचे अजून ओझे बाकी हजार जख्मी हाथ राबती श्रम सरितेच्या काठी ।

आनंद साधकांनो मुक्तांगणात यावे ।

'माणूस माझे नाव दहा दिशांच्या रिंगणात या पुढेंच माझी धाव।
रिंगणात मी क्षुद्र खरोखर तरी जिंकले सातही सागर
उंच गाठला गौरीशंकर।
अग्नी यान मम घेत चालले आकाशाचा ठाव',

या गीतातून आनंदवनातील कृष्ठरोगी, अपंग बांधवांच्या, कार्यकर्त्यांच्या  जिद्द, मेहनत, साहस विषयीच्या कर्तुत्वगाथा मांडल्यात.

आज यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात ज्या ज्या संस्था सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जातात तेथे त्यांनी देखील या मुलांच्या कर्तृत्वाच्या यशोगाथा सर्वप्रथम व्यक्त केल्या पाहिजे.

याची सुरवात किमान मी स्वतः या मुलांच्या सहवासातून त्यांच्यात जो बदल घडलेला पाहिलाय  अशा कर्तुत्वगाथा विषयी मालिका लिहिणार आहे.....