Sunday, April 24, 2022

Scotland Cycling: लिनलिथगो एडिनब्रा पाऊस, स्नो फॉल मध्ये सायकलिंग

 

लिनलिथगो एडिनब्रा पाऊस, स्नो फॉल मध्ये सायकलिंग 

सकाळपासून हवामान सायकलिंग साठी प्रतिकूल होते. जावे की नाही अशी द्विधा मनःस्थितीत 11 वाजता थोडं ऊन पडलं मग निघालो. पंकज चा आग्रह होता की ट्रेन ने जा आणि तिथं सायकलिंग कर पण तरी मी सायकलवर निघालो. बॅक पॅक, टिफिन, चॉकलेट, पंप घेऊन निघालो.  रस्ता माहीत नाही तरी हायवेने निघालो. B9080 हायवेवर दोन्ही बाजूला दाट हिरवळ, कॅनॉल ओलांडून वाटेतील चढ उतार चढत किंग्सकेव्हील ओलांडून विंचब्रा पोहोचलो. येथील ऐतिहासीक विंचब्रा पॅरिस चर्च ची वास्तू, पाहून रस्ता चुकू नये म्हणून एडिनब्रा साठी पुन्हा ब्रिजच्या पायऱ्या सायकल हातात घेऊन कॅनॉल रूट घेऊन सायकलिंग सुरू. वातावरण संमिश्र मध्येच ऊन, ढगाळ वातावरण, रिमझिम आणि गार वारा झोबत होता. वाटेत आज मॉर्निंग वॉकर्स, सायकलिस्ट तुरळक होते पण अश्या वातावरणात देखील काही ज्येष्ठ नागरिक Tandem सायकलवरून फिरत होते हे विशेष. वाटेत पोर्ट ब्युकन येथील कॅनॉल वरील लोकांच्या वैयक्तिक मालकीच्या हाऊसबोट, सुंदर रेस्टॉरंट पाहत माझा सायकल प्रवास दोन फुट कॅनॉल साईडने सायकल ब्रॉक्स बर्न येथील लेक ओलांडून अलमंड नदी ओलांडून पेडलिंग सुरू होती. वाटेतील राठो गोल्फ पार्क येथील सुंदर हाऊसबोट, किनाऱ्यावरील बदक, लहान मुलांना खेळण्यासाठी पार्क,रिसॉर्ट देखणीय होत्या. इथून पुढे जंगल लागले. 2-3 किमी नंतर पाऊस सुरू नंतर पुन्हा ऊन आणि सायकल अचानक जड झाली शंका आली आणि पाहतो काय टायर पंचर. आता वांदे झाले कारण पंचर किट नव्हते करायचे काय बॅग उघडली एक ट्यूब आणि पंप आता चाक उघडण्याशिवाय पर्याय नाही. Mechanical डिस्क ब्रेक वाली सायकलचा चाक पहिल्यांदाच कसेबसे उघडले. मोठ्या मुश्किलीने सिंगल लिव्हर घेऊन तसेच टायर उघडून ट्यूब बाहेर काढले. टायर मध्ये हात घालून चेक करतांना काटा माझ्याच बोटात घुसला तरी टायर मधून त्याला बाहेर काढून नवीन ट्यूब रिप्लेस केली.  आता सहज टायर बसवून निघणार तितक्यात गारपिट सुरू तसेच टायर बसवू लागलो पण डिस्क ब्रेक मध्ये फिट होत नव्हते. सर्व युक्ती करून पाहिल्या पण शेवटच्या पॉइंटवर डिस्क मध्ये लॉक होत नव्हते. YouTube वर काही टिप्स पाहिल्या तरी  जमत नव्हते मग मोबीन मेकॅनिक ला Whatsapp Video Call केला पण ऍलेन Key नव्हती काही उपयोग नव्हता. तितक्यात एक सायकलिस्ट आला पण त्याच्याकडे ऍलेन की नव्हती तरी त्याने सर्व युक्त्या वापरल्या काही उपयोग नाही. इकडे पंकजचा फोन त्याला लोकेशन पाठवले पण हायवेपासून मी दूर होतो आणि जवळील Decathlon Edinburgh Park 4 किमी बाकी. आता तसेच डिस्क आणि रियर कॅसेट मध्ये स्क्रू लॉक करून सायकल हातात घेऊन निघालो तरी चाक घासत होते एक एक किमी गाठायला 12-14 मिनिटं लागत होते तसेच हातात ढकलत प्रवास सुरू. एका बाजूला हायवेवर भन्नाट वेगाने धावणाऱ्या गाड्या, वेगाने धावणारा सेकंद काटा त्याविरुद्ध काहीही पर्याय नसल्यामुळे मंदावलेली माझी गती। इकडे पंकज Decathlon Edinburgh Park वर माझी वाट पाहतोय आणि वारंवार गारपिटीत तसेच मी सायकल ढकलत कॅनॉल साईड ने धावतोय. तरी वाटेत काही सायकलिस्ट ने प्रयत्न केला पण अयशस्वी अखेर हायवेला लागलो पण रस्ता चुकून लॉंग कट ने निघालो. वाटेत पंकजने लाईव्ह लोकेशनने मला कॅच केले 1 किमी नंतर Decathlon mall पोहोचून तिथे तेथील मेकॅनिक आदरपूर्वक बसायला सांगून केवळ 10 मिनिटात व्हील फिट करू  केले. रेपैरिंग चे पैसे विचारल्यावर त्याने घेण्यास नम्रपणे नकार दिला. चला विदेशात देखील असा अनुभव.....सायकलिस्ट देवो भव. 
पंकज ला ऑफिस अवर मध्ये यावे लागले त्याचेच वाईट वाटले. इथून पंकज चा आग्रह ट्रॉम ने सिटी सेंटर जावे त्याला हो हो म्हणत मी सायकलनेच निघालो. गिपीएस ऐवजी लोकांना रस्ता विचारणे मला आवडते कारण त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद होतो. येथील ट्रॉम मध्ये देखील सायकल साठी रॅक हे विशेष. सिटी सेंटर विचारत येथील पीक अवर मध्ये आमची सायकलस्वारी निघाली. वाटेत साईट हिल पब्लिक पार्क, तेथून वाहणारा धबधबा, ऐतिहासिक मॉनुमेंट, सॉटन पार्क, लिथ नाला, रग्बी चे आंतरराष्ट्रीय मरेफिल्ड स्टेडियम, वाटेतील डेव्हीड्सन ऐतिहासिक शाळा, हे मार्केट यार्ड, स्टेच्यु ऑफ जेमस यंग सिम्पसन, द रॉयल स्कॉट ग्रे मॉनूमेंट, फ्लोरल क्लॉक, स्कॉटिश नॅशनल गॅलरी म्युझियम पाहून इथून एडींब्रा कॅसल कडे अत्यंत तीव्र चढ चढून वर आलो. इथून उंचावरून संपूर्ण एडींब्रा शहर, बर्फ पडल्याने बर्फाच्छादित डोंगर, एका बाजूला नॉर्थ सी, दुसऱ्या बाजूला प्राचीन एडींब्रा शहर आदींचे दृश्य पाहून वेळेची मर्यादा असल्याने क्लीक घेऊन निघालो. एडींब्रा कॅसल बंद झाले होते. परंतु बाहेरून तेथील इतिहास आणि शौर्यगाथा जाणून घेतली. वाटेत एका ठिकाणी सायकल पार्क करून सेंट कोलंबस चर्च, वीचेस वेल, राईटर्स म्युझियम पाहून पुढे जुन्या एडींब्रा शहरातून कॅनॉनगेट किरकियार्ड पाहून दि क्वीन गॅलरी म्युझियम ला भेट दिली. आता सकाळपासून सतत फिरल्याने खरी भूक लागली होती बॅग उघदल्यावर शितलने दिलेल्या पालक पराठे कडे लक्ष गेले आणि पार्लमेंट येथील गार्डन मध्ये निवांत बसून अर्थर सीट डोंगराकडे बघत ताव मारला. अर्थात हा डोंगर सर करण्यासाठी हा भारतीय स्वतःला पालक पराठे खाऊन तयार करतोय. मग लगेच ऑफ रोड ने अर्थर सीट जे एडिनब्रा येथील उच्च शिखर कडे निघालो. ऑफ रोड अर्थात पायी चालण्यासाठी पायवाटेवर सीटवर उभे राहून दंडी मारत चढ चढत होतो. वाटेतील खाच खळगे, दगड चुकवत एका बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला स्टीप डोंगरकडा याचा समतोल साधत केवळ 1 फूट रस्त्यावरून मी आणि माझी सायकल सर्व शक्ती लावत चढत होतो. आता स्टीप चढाई आली आणि टेकडीच्या अर्ध माथ्यावर पोहोचलो. न घाबरता सायकल हातात घेऊन बाहुवर ताण देत सायकल उचलून चढाई सुरू केली. जिम न केल्यामुळे माझे हाताचे स्नायु तितके मजबूत नाही पण इच्छाशक्ती साथ देत होती. अर्धा पाऊण तास नंतर टॉप जवळ आलो तर तेथील लोकांना मी जसे काय सर्कस मधून आलोय असे माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. मग काळजीपूर्वक कडा चढून वर आलो आणि एक विलक्षण अनुभव आणि आनंद कारण आजवर मी कळसुबाई देखील कधी गेली नव्हतो. पण बेन नेव्हीस माऊंटनचा अनुभव सोबत होता तो इथे कामी आला. काही पर्यटकांनी सोबत सेल्फी काढले. केवळ एडींब्रा नाही तर दूरपर्यंत पसरलेला स्कॉटलँड मी इथून पाहून माझे डोळे तृप्त झाले. आता उतार अधिक धोकादायक असतो पण सांभाळून उतरत होतो. मागील वर्षी Decathlon हुन बिपिन ने पाठवलेले ट्रेकिंग शूज इथे कामी आले. मग खाली उतरून माऊंट आर्थर्स सीट डोंगरास सायकल ट्रॅक वरून प्रदक्षिणा मारली. हॉलिरुड पार्कची प्रदक्षिणा, वाटेत एका बाजूला दिसणारा समुद्र किनारा, सेंट मार्गारेट लॉक येथील जलक्रीडा करणारे पक्षी आणि जुने शहर फिरत स्टेशन पोहोचलो परतीच्या प्रवासासाठी.  जवळपास मागील 7 दिवसात अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत इच्छा शक्तीने अनुकूल करत हा स्कॉटलँड सायकल प्रवास खूप काही शिकवून गेला. याचे श्रेय जाते माझा लहान भाऊ पंकज, सुनबाई शीतल यांना. सर्वांचे मनःपूर्वक आभार

Scotland Cycling: लिनलिथगो ग्लासगो सिटी सायकल टूर

 

३१ मार्च २०१९ : लिनलिथगो ग्लासगो सिटी सायकल टूर

 

आज पासून भारत आणि युकेच्या वेळेत 1 तासांचा अंतर कमी झाले त्यामुळे रोज 05:30 ला येणारी जाग सकाळी 06:30 वाजता आली . मग काय आधीच उशीर शिवाय अव्हीमोर (हायलँड) भागात पंकज सोबत कारने जायचा प्लॅन होता. परंतु उद्या फोर्ट विलियम जायचे आणि आज 450 किमी कार प्रवास म्हटले की उद्या देखील हेक्तीक होईल. शिवाय मला कार पेक्षा ट्रेन किंवा सायकलने प्रवास जास्त आवडतो म्हणून नकार दिला कारण मला लोकांशी संवाद साधत रस्ते, गल्ली बोळ्यातून विचारत ग्लासगो मधील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणे पालथी घालायची होती. शिवाय परभणीतील मित्र प्रफुल कल्याणकरची छोटी ताई रुपाली केवाळे ग्लासगो येथे राहते. तिचे ग्लासगो भेटी दरम्यान घरी येण्याचे खास आमंत्रण होते. आणि माझ्या सारख्या भटक्या, गप्पिष्ट  आणि खवय्या व्यक्ती भारतीय आमंत्रण नाकारू शकत नाही ना

उशीर झाला होता पण तरी 09:52 ची एडींब्रा ग्लासगो क्वीन स्ट्रीट ट्रेन स्टेशनचे तिकीट घेऊन लिफ्ट ने सोबत सायकल देखील प्लॅटफॉर्म वर सोबत आणून ट्रेनची वाट पाहू लागलोमाझ्या सारखे अनेक भटके सायकलिस्ट  हवामान अनुकूल  झाल्यामुळे ते देखील सायकलवर सामान बांधुन ट्रेन  प्रवासास निघालेट्रेनमध्ये चढल्यावार सायकलसाठी विशेष जागा आणि बाजूला बसायला सीट देखील. मी म्हटलो आयला आपल्यासोबत आपल्या सायकलचे देखील आदरातिथ्य ? पण असा सायकलचा पाहुणचार पाहून माझे डोळे भरून आले

कारण पंढरपूर, कुरुडवाडी, चित्तोडगढ, अकोला येथील सायकल मोहीम दरम्यान ट्रेनने सायकल बुक करतांना अनुभव कठीण प्रतिकूल होते पण असू द्या

या सुपरफास्ट ट्रेन मध्ये 35 मिनिटात 60 किमी अंतर गाठून ग्लासगो पोहोचलो. येथील ट्रेन स्टेशन आपल्याला थोडं मुंबई चर्चगेट स्टेशन ची आठवण करून देतं . स्टेशन बाहेर आल्यावर प्रीती ताईने पाठवलेला पत्ता शोधत निघालो. वाटेत ग्लासग्रो शहरातील मोठे आणि  लहानग्याला, थोर ज्येष्ठ व्यक्तीसाठी जॉगिंग, प्ले पार्क, सायकलिंग ट्रॅक अशा सर्व सुविधांनी युक्त 'ग्रीन पार्क' जे क्लाइड नदी काठी शहराच्या मध्यवस्तीत मोठे पार्क आहे.

थोडा वेळ फिरून गोर्बल्स येथे राहणाऱ्या प्रीती कल्याणकर केवाले यांच्या यांच्या  पोहोचलो. त्यांनी खूप छान स्वागत आदरातिथ्य केलं. त्यांच्या येथे गप्पा मारतांना परभणी, पुणे, नागपूर मधील विविध आठवणींना उजाळा देत  महाराष्ट्रीयन जेवण सोबत कढी भजे आणि फ्रुट सलाड चा आस्वाद घेतला. परभणीतील वर्गमित्र प्रफुल्ल कल्याणकर ची ती छोटी ताई नुकतंच दीड वर्षांपूर्वी सहकुटुंब ग्लासगो येथे शिफ्ट झाली. परदेशात भारतीय आदरातिथ्यची मजाच न्यारी अखेर त्यांचा निरोप घेऊन ग्लासगो भटकायला निघालो. सायकलिंग करत मस्जिद हुन क्लाइड रिव्हर साईडहुन खास सायकल ट्रॅक वरून पेडलिंग करत एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला विविध आयटी कंपनीची ऑफिसेस, बीबीसी स्कॉटलँड पाहत ग्लासगो विज्ञान केंद्र पोहोचलो. तेथील विविध आविष्कार, विविध वैज्ञानिक गंमत जमत, चाचण्या आदी पाहून ग्लासगो रिव्हरसाईड म्युझियम ला पोहोचलो. तेथे सर्व जुन्या मोटारगाड्या, सायकलचा शोध, जगातील पहिली सायकल, फ्लाइंग स्कॉटमनची सायकल, व्हीन्टेज बाईक्स, मोटारगाड्या, कार, वाफेचे इंजिन, बोट, म्युझियम बाहेर नदीच्या पात्रात लावलेले जहाज पाहून पुढे निघालोपुढे  गल्ली बोळ्यातून मार्ग काढत 'केलव्हींगरोव्ह पार्क पोहोचलोया भागात खाली वर, चढ उतार वर सायकलिंगची वेगळीच मजा येत होती . पुढे केलव्हीनग्रोव्ह आर्ट गॅलरी म्युझियम येथील विविध चित्र, कलाकृती, प्राण्यांच्या कलाकृती स्कॉटलँड कल्चर तेथील शिल्पकला, वास्तू आदी पाहून भारावलो. थोडं पुढे गेल्यावर गुरुद्वारा येथे दर्शन लंगर येथे प्रसादग्रहन हिंदू मंदिर येथे दर्शन घेऊन ग्लासगो हुन लिनलिथगोकडे परतीचा प्रवास सुरू